फडफड

पृष्ठ क्रमांक

मनीषा साधू

फडफडअंधारून आलं तरी गजानन ओट्यावरच बसून होता. हातापायाला चावू लागलं तसं आता उठावं या विचारानं जरा ढुंगण हलवून वजन इकडचं तिकडे करण्यापलिकडे त्याने काहीच केलं नाही. हरी समोरून सायकलवर येताना दिसला. दळणाचा चौकोनी लोखंडी डबा सायकलच्या कॅरिअरमध्ये कोंबून पायडलवर वजन मारत तो नेमका गजाननच्या ओट्यापाशी आला."गजा, आज काम नाही का काही?" गज्याला विचारत ओट्याला उजवा पाय टेकवून त्याने सायकल थांबवली. कॅरिअरच्या नाजुक स्प्रिंगला अवजड डबा दाबणे कठीण झाले. आता त्याचा डबा निसटणार हे बघून नाईलाजाने गजा पटकन वाकून डबा धरता झाला. पिठाच्या गरम चटक्यानं त्याचा हात पोळला अन् कललेला डबा अधिकच कलल्यानं जरासं पीठ ओट्यावर सांडलं.

"यावेळी कुणीकडं? आन् तुझ्या घरापाश्ची चक्की?" गजानं विचारलं.

"बंद आहे आज. रिबन जळली म्हणतोय." हरीनं दुसरा पाय खाली टेकवला. सायकल जरा सरळ करून डबा बॅलन्स केला.

"हात्तीच्या!"

"काकू कशा आहेत?"

"हं..." मुळीच विचारायला नको असा अप्रिय प्रश्न हरीने विचारल्यासारखं तोंड करीत गजाने त्याचा डबा उगाच अधिक सरळ केला आणि ओट्यावरचं पीठ बसायला घेतलेल्या पिशवीने आपटून साफ केलं.

"काल तब्येत जास्त झाली म्हणून टेंभरे काकू आईला सांगत होत्या." हरी म्हणाला.

"ते नेहमीचंच... बसणार काय?" त्याची सायकल मागून उचलून पायानं स्टँड लावायची तयारी दाखवत गजा म्हणाला.

"नको, नको आता निघतो. दळण हवंय आईला लवकर. रातको मिलते है कट्टेपे." हरीनं दोन पायांमध्ये असलेली सायकल तशीच पुढे रेटली. गजाने मागून जोर लावत ढकलली. हळुच तोल सावरत ओट्यावरचा पाय पायडलवर घेत हरी निघाला. त्याला बॅलन्स येईपर्यंत दोन-तीन पावलं गज्या सोबत धावला.

गजाननच्या हाता-पायावर डास चावल्याने खाज सुटली होती. आलेल्या लाल गुथी नखाने कराकरा खाजवत आत जावे कां या विचारात पिशवी हातात धरून तो परत ओट्यावरच बसला. सांडलेल्या आणि हाताला, पिशवीला लागलेल्या कणकीच्या खरपूस वासानं तो अस्वस्थ झाला. हरी आता घरी जाईल. त्याची आई त्याच कणकेची गरम पोळी करून त्याला वाढेल या विचारानं तो बेचैन झाला. दिवसभर काम करणारी हरीची आई डोळ्यापुढे आली की आपल्या दुर्देवाची चीड अधिक तीव्र होते गजाची.

आतून कण्हल्यासारखा आवाज आला. त्यानं मान वळवून आत पाहिल्यासारखं केलं. परंतु यापेक्षा जास्त काही करावंसं वाटलं नाही त्याला, जणू त्याचं कर्तव्य तेवढ्यानंही पूर्ण झालं.

समोरून बाबी आली. पुंडशांची बाबी म्हणजे बबली पुंडशे. जिला "बॉबी" हे नाव गजानन व त्याच्या मित्रांनी ठेवलं. आपापसात बोलतांना ते तिला "बाबी"(म्हणजे बॉबी) म्हणतात. हे एक ओलं ठिकाण सोडलं तर अख्ख्या गावात सगळं कोरडं ठण्णच आहे असा त्याचा समज तिला बघून परत दृढ झाला.

"अंधारात काय बसलाया? दिवा न्हाई लावायचा?" ती अधिकारानं पायर्‍या चढून आत गेली. दिव्याचं काळकुट्ट पडलेलं बटन खाली ओढलं. मंद, रोगट पिवळ्या प्रकाशानं घराला उदास उजळलं. आता त्याला उठावंच लागणार होतं. घरात जाण्याच्या कल्पनेनंच त्याच्यावर मरणाचं सावट पडलं. हे असं नुसतं सावटच येतं घरावर मरणाचं. एकदाचं मरण आटोपलं तर फार बरं होईल; असा विचार करायचा नाही हे अगदी लाखवेळा ठरवूनही परत मनात आलाच त्याच्या.

"मायवं! पांघरुनबी नाई घातलं मायबाईवर? केवढं चिलटं चावलंया!" गजाच्या आईच्या अंगावर बसलेले असंख्य डास हातांनी वारत तिने त्या हवालदील देहावर पांघरुण घातलं. गेली कित्येक वर्षे ही माय अशीच पडून राहते सतरंजीवर. थोडं बरं असलं की उठून बसते भिंतीला टेकून, आणि ढुंगण घासत घरात फिरते. गेल्या काही दिवसांपासून तब्येत जास्त झाल्यानं नुसतीच पडून असते. डासांना या रक्तहीन देहाचे लोथडे चघळून मिळतं तरी काय असा प्रश्न नेहमीच पडतो त्याला. आणि मग ओघानं नानाचं सांगणं आठवतं,"चांगला घोडा होईस्तवर लुचायचा तू मायला!"आठवणींना खूप ताण दिल्यावर त्याच्या डोळ्यापुढे यायचं ते चोखून पांढरं पडलेलं मासाचं रक्तहीन, दूधहीन लोथडं. "माऊ" म्हणायचा तो त्याला. मायची लोंबलेली रक्तहीन छाती लुचत बसून त्याला तरी काय मिळत असावं? तसंही तिच्यापासून कुणाला कधी काही मिळालं असेल का? त्याला नको असलेलंही आठवतं मग. सकाळी पाणी भरुन झालं की नाना बसतात तिच्या बाजूला अन् गजाचं लक्ष नाही हे पाहून तिच्या पदरात हात घालून कुस्करत बसतात किती तरी वेळ. नाना काय नी डास काय, द्यायला काही नसतानाही ती निपचीत पडून राहते स्थितप्रज्ञासारखी. की द्यायला काही नाही याचं प्रायश्चित करीत असावी? त्याला कीव आली मायची. दिवा लावायला पाहिजे होता. पांघरुण टाकायला पाहिजे होतं. हे अपराधीपणही सवयीनं मनात आल्याचं जाणवलं त्याला.

"काकीनं भाजी दिलीये गवारीची" बाबीनं वाटीवरची झाकणी जरा बाजूला करुन त्याला दाखवल्यासारखी केली आणि स्वयंपाकघरात ठेवून आली. तेवढ्यानंही त्याच्या नाकात खमंग भाजीचा वास पोहोचला अन् भूक चाळवली. बाबी निघाली तसा मायचा क्षीण आवाज उमटला, "बबले..."

"आं?"

"जरा दिवाबत्ती कर वं..." मायं क्वचितच अन् तेही बबलीशीच बोलत असे.

"हाव जी." बबली वळली. देवाजवळ कोनाड्यापाशी जाऊन तिने दिवा पेटवला. तेलाच्या वासाने व त्यापाठोपाठ उदबत्तीच्या सुगंधाने घरात पवित्रतेची एक करुण झुळूक फिरली. वात सारखी करुन तेलाचे हात केसांवर पुसत बाबी गेली. घरातल्या बाईचा वावर कशी जादू करतो ते बाबीच्या कधीमधी येण्याने अनुभवायचा गजानन. मग त्या आठवणी धरधरुन तो कितीतरी दिवस काढायचा.

बाबी बाहेर जाताच तो स्वयंपाकघरात गेला. हुडकायला काही शिल्लक नाही हे ठाऊक असूनही सकाळची भाकरी शोधली त्याने. मग हरीच्या घरच्या पोळ्या आठवत त्याने बोटानेच भाजी खायला सुरुवात केली. नानासाठी थोडी ठेवावी म्हणता म्हणता भाजी संपली. त्याने चाटून वाटी स्वच्छ केली. नाना येतील आता घरी. मग खिचडी टाकतील. फळफळ पाण्यात हीर राहिलेली, अर्धवट शिजलेली खिचडी खाऊन कंटाळा आलाय त्याला. पण नाना काही नीट खिचडी शिकले नाहीत. सकाळी एकदाच ते भाकर्‍या थापतात. त्या बर्‍या करतात. संध्याकाळी शेतावरुन आल्यावर त्यांच्यात त्राण उरत नाही. बदल म्हणून कधी मुगाची तर कधी तुरीची एवढंच. माय थोडं पातळ पाणी पिते खिचडीच्या नावानं. तिचं जेवण म्हणजे नुसतं डचडच घाण करणं. एक भाकरी, थोडी भाजी; जिचं पाणी गोल ताटभर पसरतं आणि वाटीभर दूध असं नाना ठेवतात तिच्यापुढे. तिला भिंतीला टेकून बसवतात. ती जोर नसलेल्या हातानं भाकरीचे तुकडे दुधात कुस्करत राहते कितीतरी वेळ आणि मग अंगावर, हनुवटीवर, छातीवर सांडत गिळत राहाते. बर्‍याच वेळानं तिनं आजूबाजूला करुन ठेवलेली गिचगिच नाना साफ करतात. अनेकदा तोंड पुसलेल्या, न धुतलेल्या फडक्याने तिला परत पुसतात आणि आडवं करतात. तिच्या आजूबाजूला दूधाचा वास असतो नुसता. पोटात किती अन् काय जातं याची पर्वा कुणीच, कधीच करीत नाही.

बाहेर नानांची चाहूल लागली. नाना वायरची पिशवी घेऊन आत आले. स्वयंपाकघरात चुलीपाशी पिशवी उघडी केली. दोनचार मिरच्या, वांगे, टमाटे, पातीचा कांदा सारवलेल्या जमिनीवर पडले, "हणमंताच्या शेताकडनं आल्तो. त्थ्यो म्हनला घिऊन जाय, म्हनलं आन! यीवू दे!" असं म्हणतानाच तोंडात आलेली लाळ नानांनी सुळ्कन आवाज करीत जीभेवरून ओढत गिळली. ही भाजी आत्ता शिजती अन् जोडीला भाकरी, तर काय मजा येती असं मनात आल्यानं गज्यानंही कल्पनेत कल्पनेत तशीच लाळ गिळली"सुळ्कन!"मग खिचडीची वाट बघत मधल्या खोलीत खाटेवर बसला."गज्या, थोडा स्वैपाक शिकून घे गड्या." आज नाना थकलेले दिसतात. खूप थकले असले की ते खिचडी टाकण्यापूर्वी एवढंच म्हणतात. पण गज्याला काहीच करावंसं वाटत नाही. त्याला वाटतं आपलं लग्न करुन दिलं तर दोन वेळेस खाऊ घालणारी तरी येईल. पण या घाणीत आपला संसार कसा असेल याची कल्पनाही करवत नाही त्याला.