किती होते भास तुझे
तुझ्या एका आठवणीमध्ये;
मी मला रमवत जाते;
हरणं ज्याचा निकाल आहे;
तो खेळ मी खेळत राहते.
या जगाच्या धावपळीमध्ये;
मी आहे, तूही आहेस;
माझ्या सगळ्या वेळा निसटता;
तुझे क्षण मी वेचीत जाते.
वेदना तू ओंजळीत देता;
मी सुखाचा बहाणा केला;
कळेल तुझी चूक तुला;
म्हणून वेळोवेळी आसावत राहते.
वसंत येता बहरून वेडा;
आज माझ्या अंगणात;
उमलतील तुझ्या प्रीतीची फुले;
म्हणून मी मला पेरीत राहते.
तुला टाळायचं ठरवलं तरी;
माझं मीपण तुझ्यात असतं;
अन् काय चुकलं माझं म्हणून ;
माझ्याच प्रेमाला पारखीत राहते.
किती होते भास तुझे ;
मी इथे मोजीत जाते;
फाटलेले जीवन झाकण्या;
मी उगा टाचीत जाते.