विशेष हक्क

पृष्ठ क्रमांक

मीरा फाटक

रशियन बाहुल्या( Frederick Forsyth यांच्या Privilege ह्या कथेचा स्वैर अनुवाद.)

सकाळी साधारण साडेआठाच्या सुमाराला बिल चॅडविकच्या टेलिफोनची घंटा वाजली. थंडीचे दिवस होते आणि रविवारही होता. त्यामुळे चॅडविक अजून बिछान्यातच होता. घंटा ऐकून त्याने फक्त कूस बदलली. पण दहा वेळा घंटा वाजल्यावर मात्र तो अंथरूणातून उठला आणि हॉलमध्ये जाऊन त्याने फोन घेतला.

पलीकडून आवाज आला, "हॅलो बिल, मी हेन्री बोलतोय."

त्याच्या घरापासून चार घरांपलीकडे रहाणारा हेन्री कार्पेंटर बोलत होता. दोघांची जुजबी ओळख होती.

"गुड मॉर्निंग हेन्री. तू काय रविवारी सुद्धा पहाटे उठतोस की काय?" बिल म्हणाला.

"हो.., नाही... म्हणजे त्याचं काय आहे, मी जॉगिंगला जातो नं," हेन्री कार्पेंटर जरा चाचरत म्हणाला.

बिल चॅडविकच्या डोळ्यासमोर हेन्री कार्पेंटरची सडसडीत शरीरयष्टी आली. तो मनात म्हणाला, हा जॉजिंगला जाणाऱ्यातला आहे खरा! एक जांभई देत तो फोनवर म्हणाला, "बरं, एवढ्या थंडीमध्ये सकाळी, सकाळी माझ्याकडे काय काम काढलंस?"

"काम काही नाही, पण तू आजचे सकाळचे पेपर पाहिलेस का?"

चॅडविकने हॉलच्या दारात येऊन पडलेल्या वर्तमानपत्रांवर नजर टाकली आणि म्हणाला, "नाही. का बरं?"

"तू संडे कुरिअर घेतोस का?" कार्पेंटरने विचारले.

"नाही. का?"

हेन्री काही सेकंद गप्पच बसला. मग म्हणाला, "तू तो पेपर बघच. त्यात तुझ्याबद्दल काही तरी आलंय."

"काय आलंय?"

कार्पेंटर बोलायला जरा बिचकत होता असे चॅडविकला वाटले. त्याच्या आवाजात थोडा ओशाळलेपणाही जाणवत होता. चॅडविकने ते वाचले असेल आणि आपण त्याबद्दल चर्चा करू शकू असा त्याचा अंदाज असावा.

"ते तू स्वतःच पहिलंस तर बरं." असे म्हणून कार्पेंटरने फोन ठेवून दिला. वर्तमानपत्रात आपल्याबद्दल काहीतरी आले आहे म्हटल्यावर कुणालाही जी एक स्वाभाविक उत्सुकता वाटते तशीच चॅडविकला पण वाटायला लागली. तो बेडरूममध्ये गेला, ताजी वर्तमानपत्रे बायकोला दिली आणि बाहेर जाण्याचे कपडे चढवू लागला.

"आता कुठे निघालास?" बायकोने आश्चर्याने विचारले.

"जरा कोपर्‍यावर जाऊन आणखी एक वर्तमानपत्र घेऊन येतो. हेन्री कार्पेंटर म्हणाला त्यात माझ्याबद्दल काही तरी आलंय."

"तुझं नाव छाप्यात आलंय? वा! तू येईपर्यंत मी नाश्ता तयार ठेवते."

कोपर्‍यावरच्या दुकानातून चॅडविकने संडे कुरिअर घेतले. संडे कुरिअर हे एक अनेक पुरवण्या असलेले, चॅडविकच्या मते अहंमन्य लोकांनी अहंमन्य लोकांसाठी चालवलेले पत्र होते. ते लठ्ठ पत्र तिथेच उघडून पहाण्याची कितीही इच्छा चॅडविकला झाली तरी थंडीमुळे त्याला ते शक्य झाले नाही. तो घरी पोहोचला तेव्हा त्याच्या बायकोने नाश्ता टेबलावर ठेवलेलाच होता.

चॅडविकने पेपर उघडला आणि त्याच्या लक्षात आले की कार्पेंटरने कोणत्या पानावर त्याचे नाव आले आहे ते सांगितलेच नव्हते. त्याने प्रथम बातम्या चाळल्या. त्यात काही नव्हते. मग 'कला आणि संस्कृती' पुरवणी आली, ती बाजूला ठेवली. मग क्रीडावृत्त आले, तेही बाजूला ठेवले. त्यानंतर 'व्यवसायविषयक' पुरवणी आली. तो स्वत: एक लघुव्यावसायिक होता म्हणून त्याला वाटले की इथे आपले नाव असू शकेल.

तो तिसर्‍या पानावर पोहोचला तेव्हा त्याचे लक्ष एका नावाने वेधून घेतले. ते नाव त्याचे नव्हते, पण एका कंपनीचे, जिच्याशी त्याचा काही महिन्यांपूर्वी संबंध होता, तिचे होते. ती कंपनी आता बुडाली होती. ह्या प्रकारामुळे चॅडविकचे बरेच नुकसानही झाले होते. संडे कुरिअरमध्ये नियमितपणे एक सदर येत असे आणि समाजातील अपकृत्यांवर आम्ही लक्ष ठेवतो असा त्या सदराचा दावा होता. त्या सदरात हे स्फुट आले होते. त्याने ते वाचले आणि कॉफीचा कप तसाच खाली ठेवत त्याने आ वासला! तो म्हणाला, "असं कसं काय तो लिहू शकतो? हे धादांत खोटं आहे."

"काय झालं?" बायकोने काळजीने विचारले. चॅडविकने काही न बोलता तिच्या हातात ते पान दिले. ते वाचता वाचता त्याच्या बायकोनेही आ वासला आणि म्हणाली, "बापरे! भयंकरच आहे हे! म्हणजे हा माणूस असं सूचित करतोय की त्या कंपनीत झालेल्या अफरातफरीत तुझाही हात होता."

चॅडविक स्वयंपाकघरात अस्वस्थपणे फेऱ्या घालत होता. बायकोचे बोलणे ऐकून तो चिडून म्हणाला, "सूचित काय? अगदी स्पष्टच तसं म्हणतोय तो. पण हे खोटं आहे. त्या कंपनीत माझी भागीदारी नव्हती, मी फक्त त्यांची उत्पादनं विकायचो. कंपनीच्या ह्या भानगडीमुळे माझंही खूप नुकसान झालं आहे."

बायकोचा चेहरा चिंताग्रस्त झाला. ती काळजीच्या स्वरात म्हणाली, "ह्यामुळे तुझं नुकसान होईल का रे?"

"नुकसान? वाटोळं होईल माझ्या धंद्याचं! शिवाय हे सर्व खोटं आहे. लिहिणारा कोण आहे कुणास ठाऊक? मी त्याला कधी भेटलेलो पण नाही. काय आहे गं त्याचं नाव?"

"गेलॉर्ड ब्रेंट." बायकोने पेपरात बघून सांगितले.

"माझी त्याची काही ओळखही नाही. त्यानं लिहिण्यापूर्वी माझ्याशी बोलायला हवं होतं. असं वाटेल ते तो कसं लिहू शकतो?"

---

सोमवारी दुपारी तो त्याच्या वकिलाला भेटायला गेला आणि त्याला सर्व सांगितले. वकिलाने शांतपणे सर्व ऐकून घेतले. असे खोटे लिहिणे आणि ते छापून आणणे ह्याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. चॅडविकने कंपनी बुडाल्याने त्याचे कसे नुकसान झाले आहे आणि हे वर्तमानपत्रात आलेले वाचून त्याचे आणखी नुकसान कसे होणार आहे हेही सांगितले. वकिलाला त्याच्याबद्दल अगदी मनापासून सहानुभूती वाटली. तो म्हणाला, "तुम्ही जे सांगताय त्यावरून ह्या लेखात तुमची बदनामी केलेली आहे हे उघड आहे."

"त्यांनी माफी मागून आपले शब्द मागे घेतले पाहिजेत." चॅडविक चिडून म्हणाला.

वकील म्हणाला, "हो. त्यांनी खरं तर तसं करायला पाहिजे. आपण असं करू, तुमच्या वतीने मी संडे कुरिअरच्या संपादकाला एक पत्र पाठवतो आणि कळवतो की त्यांच्या एका कर्मचाऱ्याकडून माझ्या अशिलाची बदनामी झाली आहे. तरी नुकसानभरपाई म्हणून त्याबद्दल माफी मागणारे आणि आपले शब्द मागे घेणारे पत्र त्यांनी त्वरित आपल्या वर्तमानपत्रात जनतेच्या सहज लक्षात येईल अशा ठिकाणी प्रसिद्ध करावे."

चॅडविकच्या वकिलाने तसे पत्र पाठवले. दोन आठवडे झाले तरी संपादकाकडून काहीच उत्तर आले नाही. चॅडविकला त्या अवधीत आपल्या कार्यालयातील माणसे आणि व्यावसायिक मित्रमंडळी यांच्या नजरा कशा चुकवाव्यात तेच कळेना. हे कमी होते म्हणून की काय, त्याला अगदी खात्रीने मिळू शकली असती अशी दोन कंत्राटे त्याच्या हातून निसटून गेली.

शेवटी संडे कुरिअरकडून वकिलाला पत्र आले. पत्र संपादकाच्या सचिवाने लिहिलेले होते. त्याचा गोषवारा असा: मि.चॅडविक यांच्या वतीने आपण पाठवलेले पत्र मिळाले. मि.चॅडविक यांचे जे काही म्हणणे असेल ते त्यांनी आम्हाला पत्राने कळवावे. ’वाचकांचा पत्रव्यवहार’ मध्ये आम्ही ते प्रसिद्ध करू. अर्थातच, आम्हाला आवश्यक वाटल्यास ते संपादित करण्याचा हक्क आम्ही राखून ठेवत आहोत."

"म्हणजे माझ्या पत्राच्या ते हव्या तशा चिंध्या करणार. हे त्यांचं पत्र म्हणजे नुसतं मधाचं बोट लावणं आहे."

हे ऐकून वकिलाने मान हलवली. तो म्हणाला, "बरोबर आहे. ही मोठी वर्तमानपत्रं अशीच पत्रं पाठवतात. माफी मागणारं किंवा दिलगिरी व्यक्त करणारं पत्र ते कधीच प्रसिद्ध करत नाहीत."

"मग आता मी काय करावं?"

"प्रेस कौन्सिल कडे तक्रार करता येईल."

"ते काय करतील?"

"फारसं काही नाही. ते त्या वर्तमानपत्राला खरमरीत समज देतील एवढंच."

"कौन्सिल त्यांना माफी मागायला लावणार नाही?"

"नाही."

"आणखी काय करता येईल?"

वकिलाने एक सुस्कारा सोडला. तो म्हणाला, "आणखी एक पर्याय आहे खरा. तो म्हणजे ह्या वर्तमानपत्रावर अब्रूनुकसानीचा दावा करून नुकसानभरपाईची मागणी करणं. आपण तसं केलं तर ते कदाचित कोर्टकचेऱ्या न करता आपल्या वर्तमानपत्रात जाहीर माफी मागतील."

"असं ते करतील?"

कदाचित. पण कदाचित ते केसही लढवतील."

"पण केस लढवण्यापेक्षा माफी मागणंच त्यांना जास्त बरं नाही का पडणार? कारण केस तर सरळ सरळ माझ्या बाजूनेच आहे."

वकील दोन क्षण गप्प बसला. मग म्हणाला, "मि.चॅडविक, मी तुम्हाला अगदी स्पष्टच सांगतो. अब्रूनुकसानीचे दावे वाटतात तितके सरळ नसतात. हे करताना माणसाची मन:स्थिती कशी आहे, आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल त्याला किती माहिती आहे, वगैरे अनेक गोष्टींचा विचार केला जातो. कोर्टात केस केली तर तुम्ही फिर्यादी असाल आणि ते वर्तमानपत्र, त्याचा संपादक आणि मि.गेलॉर्ड ब्रेंट हे आरोपी असतील. तुम्हाला हे सिद्ध करून दाखवावं लागेल की बुडालेल्या कंपनीच्या गैरव्यवहाराबद्दल तुम्हाला काडीमात्र कल्पना नव्हती. तरच तुमची बदनामी झाली आहे असं म्हणायला जागा आहे."

"म्हणजे मी त्यांच्यावर केस करू नये असा सल्ला तुम्ही देत आहात की काय?" चॅडविकने आश्चर्याने विचारले. " माझ्यावर वाटेल ते बिनबुडाचे आरोप ह्या माणसाने केलेत ते काय मी गप्प बसून ऐकून घेऊ? ह्यामुळे माझ्या धंद्याचं नुकसान होतंय तरीही मी तक्रार करू नये असं तुम्ही म्हणता?" चॅडविकचा आवाज आता चांगलाच चढला होता.