विशेष हक्क
वकील म्हणाला, "तुम्ही जरा शांत व्हा. काही गोष्टी तुम्हाला सांगितल्याच पाहिजेत असं मला वाटतं. आम्हा वकील मंडळींचं नाव विनाकारण बदनाम झालं आहे. लोक म्हणतात आम्हीच त्यांना ऊठसूट खटले भरण्याचे सल्ले देत असतो कारण त्यामुळे आम्हाला तेवढीच जास्त फी मिळते. पण वस्तुस्थिती उलट आहे. पक्षकाराचे नातलग, मित्र हेच त्यांना दावे लावण्यासाठी भरीला घालत असतात. त्यात त्यांचं काहीच जाणार नसतं. पण कोर्टात केस गेली की ते किती खर्चाचं असतं हे आम्हा वकिलांच्याइतकं दुसऱ्या कुणालाच माहीत नाही."
ह्या खर्चाच्या मुद्द्याचा चॅडविकने आतापर्यंत विचारच केला नव्हता. तो शांतपणे म्हणाला, "कितीपर्यंत खर्च येईल?"
"तुमची सगळी कमाई त्यात खर्च होईल."
"ह्या देशात कायद्याचा आधार सगळ्यांना सारखाच मिळतो नं?"
"मिळायला हवा, पण प्रत्यक्षात तसं होत नाही. मि.चॅडविक तुम्ही तुमची गणना श्रीमंतांमध्ये कराल का?"
"अहो साहेब, माझा एक लहानसा व्यवसाय आहे. मी कष्ट करून तो चालवतोय. सध्याच्या मंदीच्या काळात तर तो केव्हा बसेल हीच धास्ती मला सारखी वाटत असते. माझं घर आहे, गाडी आहे, विम्याच्या दोन/तीन पॉलिस्या आहेत, बॅंकेत थोडे पैसे आहेत. एवढंच. मी एक सर्वसामान्य माणूस आहे. माझी गणना श्रीमंतांमध्ये होणं शक्य नाही."
"मला तेच म्हणायचं होतं. आजकाल अशी परिस्थिती आहे की केवळ श्रीमंतच श्रीमंतांवर खटले भरू शकतात. विशेषत: अब्रूनुकसानीचे. कारण ह्या प्रकारच्या खटल्यांमध्ये कोणीही जिंकलं तरी खटला चालवण्याचा खर्च प्रत्येकाला आपला आपणच करावा लागतो. कधी कधी तो मिळणार्या नुकसानभरपाईच्या कितीतरी पटीने जास्त असतो."
वकील पुढे म्हणाला, "ही मोठाली वर्तमानपत्रं, प्रकाशन संस्था यांनी अब्रूनुकसानीसाठी मोठमोठ्या रकमांचे विमे उतरवलेले असतात. त्यामुळे त्यांना वेस्ट एंडच्या महागड्या वकिलांना वकीलपत्र देणं परवडतं. ते तुमच्यामाझ्यासारख्या किरकोळ माणसांकडे फारसं लक्षही देत नाहीत. काहीतरी शक्कल लढवून चार/पाच वर्ष केस कोर्टात उभीच राहू देत नाहीत. मधल्या काळात वकिलाची फी वाढतच जाते. वकिलाबरोबर त्याचा शिकाऊ मदतनीस असतो. त्यालाही खिरापत द्यावी लागते."
"साधारण कितीपर्यंत हा खर्च जाऊ शकतो?"
"केस बरीच लांबली तर पन्नास/साठ हजार पौंडांपर्यंत सुद्धा जाऊ शकतो. अपील केलं तर पुन्हा सर्व पहिल्यापासून सुरू!"
"आणखी काय?"
"तुम्ही केस जिंकलात तरी कोर्टाचा खर्च तुम्हाला मिळेलच याची खात्री नाही. उलट तुम्ही हरलात आणि प्रतिपक्षाचा खर्च तुम्हाला द्यावा लागला असं मात्र होऊ शकतं. अब्रूनुकसानीच्या दाव्यांचे निश्चित असे नियम नाहीत. शिवाय वर्तमानपत्रातून छी: थू होईल हे आहेच. तुम्ही काहीच केलं नाही तर थोड्या दिवसात लोक हा लेख, तुमची बदनामी हे सगळं विसरूनही जातील. पण केस चालत राहिली तर वर्तमानपत्रात त्यावर चर्वितचर्वण होत राहणार. एक स्वतंत्र व्यावसायिक म्हणून तुमची जी प्रतिमा आहे ती डागाळण्याचा पुरेपूर प्रयत्न संडे कुरिअरचा वकील करणार."
"म्हणजे आशेला काहीच जागा नाही. अगदी कोणत्याही बाजूने विचार केला तरी माझं नुकसानच होणार असं दिसतंय!"
"तसं आहे खरं. मला तुमच्यासाठी खूप वाईट वाटतं. पण मी तुम्हाला केस करा असा सल्ला देणार नाही कारण त्यातले धोके मी चांगलेच जाणतो. लोक भावनेच्या भरात केस करतात आणि मग खर्चाचं ओझं आणि मानसिक ताण यानं खचून जातात. अशी बरीच उदाहरणं मी पाहिली आहेत. मि.चॅडविक, तुम्हाला प्रामाणिकपणे सल्ला देणं हे माझं कर्तव्य आहे असं मी मानतो."
"तुम्ही तो दिलाही आहे. मी तुमचा अगदी मनापासून आभारी आहे." असं म्हणत चॅडविक उठला.
---
दुसर्या दिवशी आपल्या ऑफिसमधून त्याने संडे कुरिअरला फोन केला आणि प्रमुख संपादकांशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. फोनवर संपादकांची सेक्रेटरी आली. तिने संपादकांकडे काय काम आहे असे विचारले. चॅडविकने आपले नाव सांगून, दोन आठवड्यापूर्वी आलेल्या गेलॉर्ड ब्रेंट यांच्या लेखाच्या संदर्भात बोलायचे आहे असे सांगितले. सेक्रेटरीने सांगितले की मि.बक्स्टन ऑफिसमध्ये कुणालाच भेटत नाहीत. तुम्ही आम्हाला याविषयी पत्र लिहिलेत तर आम्ही त्याचा विचार करू. लगेच तिने फोन ठेऊनही दिला.
दुसर्या दिवशी चॅडविक सरळ सेंट्रल लंडनमधल्या संडे कुरिअरच्या कार्यालयात जाऊन धडकला. कार्यालयाच्या स्वागतकक्षात त्याला एका फॉर्मवर त्याचे नाव, पत्ता, फोन नंबर, कोणाला भेटायचे आहे त्याचे नाव, कामाचे स्वरूप इत्यादी भरून द्यावे लागले. तो फॉर्म घेऊन एक शिपाई आत गेला. साधारण अर्ध्या तासानंतर एक रुबाबदार माणूस बाहेर आला. शिपायाने त्याच्याकडे पाहून चॅडविकच्या दिशेने खूण केली. त्याने पुढे जाऊन चॅडविकशी हस्तांदोलन केले आणि म्हणाला, "मी मि.बक्स्टन यांचा पीए. काय मदत करू तुम्हाला?" चॅडविकने सर्व सांगितले. पीएने शांतपणे ते ऐकून घेतले आणि म्हणाला, "मि.चॅडविक, तुमचा मन:स्ताप मी समजू शकतो पण मि.बक्स्टनशी तुमची भेट होणं जवळजवळ अशक्यच आहे. ते फार व्यस्त असतात. मला वाटतं तुमच्या वकिलानं आम्हाला पत्र पाठवलं होतं."
"पाठवलं होतं ना! त्याचं उत्तरही आलं, पण ते त्यांच्या सचिवाकडून. तेही काही फारसं उत्साहवर्धक नव्हतं. म्हणून मग स्वत:च संपादकांना प्रत्यक्ष भेटून माझी बाजू मांडावी म्हणून मी इथे आलो."
"हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की संपादकांची भेट काही होऊ शकणार नाही. त्यांच्या वतीनं तुम्हाला एक पत्र पाठवणं एवढंच काय ते आम्ही करू शकतो."
"बरं, मग मला गेलॉर्ड ब्रेंटना तरी भेटता येईल का?"
"त्याचा काही उपयोग होईल असं मला वाटत नाही. आता तुम्ही किंवा तुमच्या वकिलानं पुन्हा पत्र लिहिलं तर आमच्या कायदेविषयक सल्लागाराकडे ते जाईल आणि त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील कारवाई होईल. मला वाटतं याहून जास्त मदत मी आपल्याला करू शकणार नाही."
---------
चॅडविक तिथून बाहेर पडला. जवळच्याच एका उपाहारगृहात जाऊन त्याने थोडेसे खाऊन घेतले आणि मग तो सेंट्रल लंडनमधल्या एका सार्वजनिक वाचनालयात गेला. त्या वाचनालयात महत्त्वाच्या घटनांचे संदर्भ आणि वर्तमानपत्रांमधील कात्रणे ठेवलेली असत. त्याने तिथे अलीकडच्या काळात झालेल्या अब्रूनुकसानीच्या दाव्यांसंबंधीची माहिती शोधली. ती वाचल्यावर त्याला आढळले की त्याच्या वकिलाने त्याला जे सांगितले होते त्यात अजिबात अतिशयोक्ती नव्हती.
एका केसबद्दल वाचून तर तो घाबरूनच गेला. त्याच्यासारख्याच सर्वसामान्य माणसाची ती गोष्ट होती. एका बड्या लेखकाने आपल्या पुस्तकात ह्या माणसाबद्दल चुकीची माहिती दिली होती. त्या माणसाने लेखकावर, प्रकाशकावर केस दाखल केली. तो जिंकला पण प्रकाशकाने वरच्या कोर्टात अपील केले. त्यात तो हरला. अशी अपिलावर अपिले झाली. पाच वर्षे हे प्रकरण चालू होते. शेवटी तो केस जिंकला. त्याची प्रतिष्ठा त्याला परत मिळाली पण तोपर्यंत तो कफल्लक झाला होता! केस सुरू करताना काढलेल्या त्याच्या फोटोतील उत्साही, आनंदी चेहरा पाच वर्षांनंतर, केस जिंकल्यावर, काढलेल्या फोटोत कुठेच दिसत नव्हता. दिसत होता तो कर्जाच्या बोज्याखाली आणि मानसिक ताणाखाली दबून गेलेला चेहरा!
चॅडविकने मनाशी निश्चय केला की तो त्याच्या बाबतीत असे अजिबात होऊ देणार नाही. आता तो सरळ वेस्टमिन्स्टरमधल्या सार्वजनिक वाचनालयात गेला. तिथे जाऊन त्याने हॉलस्बरीचे ’लॉज ऑफ इंग्लंड’ हे पुस्तक शोधून काढले आणि ते शांतपणे वाचत बसला.
त्याचा वकील म्हणाला होता त्याप्रमाणे अब्रूनुकसानीच्या संबंधात निश्चित असा कायदा नव्हता परंतु त्यातच लॉ ऑफ लिबेल अमेंडमेंट ऍक्ट होता व त्यात ’बदनामी’ची व्याख्या दिली होती. ती अशी:
'बदनामीकारक मजकूर म्हणजे असा मजकूर की ज्यायोगे ज्या व्यक्तीबद्दल तो लिहिला आहे ती व्यक्ती समाजातील शिष्ट, सभ्य लोकांच्या नजरेतून उतरते; अगर त्या मजकुरामुळे त्या व्यक्तीला समाज आपल्यात सामावून घेत नाही; अगर समाज त्या व्यक्तीचा तिरस्कार किंवा घृणा करायला लागतो; अगर त्या व्यक्तीच्या नोकरीला किंवा व्यवसायाला त्यामुळे हानी पोहोचते.'
चॅडविक मनाशी म्हणाला, "वा! शेवटचं वाक्य मला चांगलंच लागू पडतंय." त्याला हेही आठवले की वकील म्हणाला होता की कोर्टात केलेले सगळे आरोप, प्रत्यारोप हे जसेच्या तसे छापता येतात. त्यासाठी त्याची शहानिशा करून बघावी लागत नाही. वकील म्हणाला ते बरोबर होते. त्या कायद्याच्या मजकुरात पुढे हेही स्पष्ट केले होते की ’कोर्टात सुनावणी चालू असताना जे बोलले जाते ते जसेच्या तसे वर्तमानपत्रात किंवा इतर माध्यमात प्रसिद्ध करता येते. त्यासाठी पत्रकार, संपादक, प्रकाशक यांच्यावर कोणी अब्रूनुकसानीचा खटला भरू शकत नाही. कोर्टात जे बोलले जाते ते एखाद्याला कितीही अपमानकारक, हानिकारक, बदनामी करणारे वाटले तरी त्यावर कोणीही कायदेशीर कारवाई करू शकत नाही. कोर्टात असे बोलण्याबाबत जी सूट दिली जाते त्याला "ऍबसोल्यूट प्रिव्हिलेज" असे म्हणतात.