विशेष हक्क

पृष्ठ क्रमांक

मीरा फाटक

आपल्या उपनगरातील घरी परतताना गाडीमध्ये त्याच्या डोक्यात एक किडा वळवळू लागला.

त्याने बरीच शोधाशोध करून गेलॉर्ड ब्रेंटचा पत्ता मिळवला. गेलॉर्ड ब्रेंट हॅम्प्स्टेडमधल्या एका अत्याधुनिक वस्तीत राहात होता. पुढच्या रविवारी सकाळी चॅडविक त्याच्या घरी पोहोचला. रविवारी प्रसिद्ध होणार्‍या वृत्तपत्रात काम करणारा माणूस रविवारी कामावर जाणार नाही असा त्याने तर्क केला आणि सुट्टीच्या दिवशी तो घरात असावा अशी आशा करत त्याने ब्रेंटच्या घराची घंटा वाजवली.

दोन मिनिटात एका पस्तिशीच्या बाईने दार उघडले.

चॅडविकने विचारले, "मि.ब्रेंट घरात आहेत का? संडे कुरिअरमधल्या त्यांच्या एका लेखाबद्दल मला त्यांच्याशी बोलायचंय." हे खोटे नव्हते आणि त्याचा हवा तो परिणाम झाला. मिसेस ब्रेंट हसतमुखाने म्हणाली, "एक मिनिट थांबा हं." आणि ’गेलॉर्ड, गेलॉर्ड’ अशा हाका मारत आत गेली. एका मिनिटात गेलॉर्ड ब्रेंट दारात आला. त्याने प्रश्नार्थक मुद्रेने चॅडविककडे पाहिले.

चॅडविक म्हणाला, "आपण गेलॉर्ड ब्रेंट?"

"हो."

चॅडविकने वर्तमानपत्रातले ते कात्रण खिशातून बाहेर काढले आणि ब्रेंटसमोर धरले. ब्रेंटच्या कपाळावर आठी उमटली. तो म्हणाला, "हे चार आठवड्यापूर्वीचं आहे. आता काय त्याचं?"

"हे पहा, ह्या लेखात तुम्ही माझ्याबद्दल चुकीचा आणि माझी बदनामी करणारा मजकूर लिहिला आहे. त्यामुळे माझ्या धंद्याचं बरंच नुकसान झालं आहे आणि माझ्या मित्रमंडळींमध्ये तोंड दाखवायला मला जागा राहिलेली नाही."

ब्रेंटच्या कपाळावर आणखी आठ्या उमटल्या आणि चेहऱ्यावर चिडकेपणा आला. जरा आवाज चढवून तो म्हणाला, "तुम्ही आहात तरी कोण?"

"सॉरी! माझं नाव विल्यम चॅडविक."

आता ब्रेंटला थोडा बोध झाला आणि त्याला रागही आला. तो म्हणाला, "तुम्हाला ह्या लेखाबद्दल काही तक्रार असेल तर ती करण्याचे इतर मार्ग आहेत. त्यासाठी तुम्ही माझ्या घरी येण्याचं काहीच कारण नाही. तुमच्या वकिलाला आम्हाला पत्र लिहायला सांगा."

"ते मी सांगितलंच होतं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तुमच्या संपादकांची भेट घेण्याचा पण मी प्रयत्न केला पण त्यांनी भेट नाकारली. म्हणून मी तुमच्याकडे आलोय."

"हे तुमचं वागणं माझा अपमान करणारं आहे." असे म्हणत ब्रेंट दरवाजा लावायला निघाला. तेवढ्यात चॅडविक म्हणाला, "थांबा, मी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय."

ब्रेंट दरवाजा लावता लावता थबकून म्हणाला, "काय?"

"हे!" असे म्हणत चॅडविकने त्याच्या नाकावर एक जोरदार ठोसा लगावला! ब्रेंट कळवळला. त्याचे हाडबीड काही मोडले नाही पण नाकातून रक्त यायला लागले. चॅडविककडे एक जळजळीत नजर टाकत त्याने धाडकन दरवाजा लावून घेतला. चॅडविक पायर्‍या उतरून रस्त्यावर आला. थोड्याच अंतरावर त्याला एक पोलीसचौकी दिसली. तिथे जाऊन तिथल्या हवालदाराला तो म्हणाला, "ऑफिसर, जरा माझ्याबरोबर चला. एका माणसावर हल्ला झाला आहे."

"कुठे?"

"मी दाखवतो."

दोघेही ब्रेंटच्या घरासमोर पोहोचले. हवालदाराने घराची घंटा वाजवली. मिसेस ब्रेंटने दार उघडले. चॅडविकला पाहून तिने डोळेच विस्फारले!

चॅडविक म्हणाला, "मिसेस ब्रेंट, ह्या ऑफिसरना तुमच्या पतीशी काहीतरी बोलायचं आहे." मिसेस ब्रेंट ’बरं’ अशा अर्थी मान हलवत घरात गेली. आतून नवराबायकोच्या बोलण्याचे आवाज येत होते. काय बोलत आहेत ते कळत नसले तरी ’तो माणूस’ आणि ’पोलिस’ हे शब्द स्पष्ट ऐकू येत होते!

थोड्या वेळात नाकावर रूमाल धरून ब्रेंट बाहेर आला.

हवालदाराने विचारले, "आपण गेलॉर्ड ब्रेंट?"

"हो."

चॅडविक म्हणाला, "काही वेळापूर्वी मि.ब्रेंट यांच्या नाकावर एकाने जोरदार ठोसा मारला."

"हे खरं का?" हवालदाराने विचारले.

"हो."

"कुणी मारला?"

"मी." चॅडविक म्हणाला.

आता डोळे विस्फारण्याची पाळी हवालदाराची होती! त्याने पुन्हा ब्रेंटला विचातले, "हेही खरं का?"

"हो."

"तुम्ही असं का केलंत?" हवालदाराने चॅडविकला विचारले.

"त्याबद्दल माझं स्टेटमेंट मी पोलिस स्टेशनातच देईन."

हवालदाराला काय बोलावे तेच कळेना. शेवटी तो म्हणाला, "मग चला तर माझ्याबरोबर पोलिसस्टेशनावर."

हवालदाराने गाडी मागवली होतीच. दोघेही पोलिसस्टेशनावर गेले. हवालदाराने चॅडविकला ड्युटीवर असलेल्या सार्जंटकडे नेले आणि काय झाले ते थोडक्यात सांगितले. सार्जंट मध्यमवयीन, अनुभवी अधिकारी होता. तो चॅडविकला म्हणाला, "कुणाला मारलं तुम्ही?"

"एका गेलॉर्ड ब्रेंट नावाच्या माणसाला."

"तुम्हाला तो आवडत नाही वाटतं?"

"फारसा नाही."

"तुम्ही त्याला मारलंत, पण ते हवालदाराला येऊन सांगण्याचं काय प्रयोजन?"

"म्हणजे? तसा कायदा आहे नं? एखाद्या माणसावर हल्ला झाला तर ती गोष्ट पोलिसात कळवली पाहिजे."

"वा! तुमचा विचार आदरणीय आहे." त्याने हवालदाराला प्रश्न केला, "ब्रेंटला कितपत इजा झाली आहे?"

"विशेष नाही."

सार्जंटने एक सुस्कारा सोडला आणि म्हणाला, "मला ब्रेंटचा पत्ता सांगा आणि तुम्ही इथेच थांबा. मी आलोच."

त्याने दुसर्‍या खोलीत जाऊन ब्रेंटचा फोन नंबर शोधून त्याला फोन केला. परत येऊन ह्या दोघांना म्हणाला, "ब्रेंटला तक्रार करायची नाही असं दिसतंय."

चॅडविक एकदम उत्तेजित होत म्हणाला, "ते काही ब्रेंटच्या हातात नाही. ही काही अमेरिका नाही. एक गुन्हा घडलाय आणि त्याबद्दल तक्रार नोंदवणं हे एक जागरूक आणि जबाबदार नागरिक या नात्यानं माझं कर्तव्य आहे. आता ती तक्रार नोंदवून घ्यायची की नाही हे पोलिसांनी ठरवावं."

"ठीक आहे. मग पोलिसांना तक्रार नोंदवून घ्यायची नाही असं समजा."

"तसं असेल तर मी पुन्हा तिथे जाऊन पुन्हा ब्रेंटला एक ठोसा मारीन."

सार्जंटने चॅडविककडे एक नजर टाकली आणि तक्रार नोंदवून घेण्यासाठी हताशपणे पॅड पुढे ओढले.

चॅडविकने आपले नाव, पत्ता इत्यादी माहिती सांगितली. स्टेटमेंट द्यायला मात्र नकार दिला. तो म्हणाला की योग्य वेळ आल्यावर तो मॅजिस्ट्रेटच्या समोरच त्याचे स्टेटमेंट देईल. त्याच्यावर गुन्हा केल्याचे आरोपपत्र दाखल केले गेले आणि १०० पौंडाच्या जामिनावर त्याची सुटका झाली. त्याला दुसर्‍या दिवशी मॅजिस्ट्रेटसमोर हजर राहण्यास सांगितले गेले.

दुसर्‍या दिवशी तो रिमांडवर हजर राहिला. सुनावणीला जेमतेम दोन मिनिटे लागली. त्याने कोणतेही बचावात्मक किंवा उलट विधान करण्यास नकार दिला. कारण त्याला माहीत होते की असे केल्याने त्याला नंतर आपल्या सोयीने ’मी दोषी नाही’ असे सांगता येणार होते. त्याला दोन आठवड्याचा रिमांड दिला आणि पुन्हा १०० पौंडाच्या जामिनावर त्याची सुटका झाली. ही सुनावणी रिमांडवर असल्याने ब्रेंट त्यावेळी हजर असण्याची आवश्यकता नव्हती. ह्या सुनावणीत चॅडविकवर एका व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप दाखल केला गेला. ही बातमी स्थानिक वर्तमानपत्रात आली खरी पण तिने वर्तमानपत्रातील केवळ एक/दीड इंचाचीच जागा व्यापली होती. त्यामुळे तिच्याकडे कुणाचे लक्षही गेले नाही.

केस कोर्टात उभी रहाण्याच्या आधीच्या आठवड्यात फ्लीट स्ट्रीटवरील सर्वच वर्तमानपत्रांच्या संपादकांना निनावी फोन गेले आणि सर्वांना ’टिप’ देण्यात आली की नॉर्थ लंडन मॅजिस्ट्रेट्स कोर्टात पुढच्या सोमवारी 'पोलीस विरुद्ध चॅडविक' असा खटला आहे आणि त्यात संडे कुरिअरचे तडफदार पत्रकार गेलॉर्ड ब्रेंट साक्ष देणार आहेत. संपादकांनी आपापले हुशार बातमीदार कोर्टात पाठवावेत. चांगली रसभरित बातमी हमखास मिळेल!

बहुतेक संपादकांनी सोमवारी अशी केस आहे की नाही याची खात्री करून घेतली आणि आपल्या निवडक बातमीदारांना सोमवारी कोर्टात पाठवले. चॅडविकला बरोबर १० वाजता कोर्टात आणले आणि त्याची केस येईपर्यंत थांबायला सांगितले. सव्वाअकरा वाजता केस उभी राहिली. तो साक्षीदाराच्या पिंजर्‍यात उभा राहिला आणि त्याने समोर एक नजर टाकली. पत्रकारांसाठी राखून ठेवलेले दालन गच्च भरून गेले होते. गेलॉर्ड ब्रेंट पण कोर्टरुमच्या बाहेर मुख्य हॉलमध्ये बाकावर बसला होता. ब्रिटिश कायद्यानुसार कोणत्याही साक्षीदाराची साक्ष देण्याची वेळ येइपर्यंत त्याला कोर्टरुममध्ये प्रवेश करता येत नाही. हे लक्षात आल्यावर चॅडविक जरा गोंधळात पडला पण त्याने त्यातून तोड काढली. चॅडविकने 'मी निर्दोष आहे.' असे विधान करायचे ठरवले. मॅजिस्ट्रेटने त्याला तुमचा कोणी वकील आहे का असे विचारल्यावर त्याने नकारार्थी उत्तर दिले आणि माझा बचाव मीच करणार आहे असे सांगितले.

सरकारी अधिकार्‍याने केसची पार्श्वभूमी सांगितली. चॅडविकने स्वत:च गुन्ह्याची नोंद केली हे ऐकून अनेकांच्या चेहर्‍यावर आश्चर्य उमटले. हॅम्पस्टीडमधल्या त्या हवालदारालाची साक्ष झाली. त्यानंतर गेलॉर्ड ब्रेंटला साक्ष देण्यासाठी बोलावले गेले. तो साक्षीदाराच्या पिंजर्‍यात उभा राहताच चॅडविक एकदम म्हणाला, "सर, मला माझं विधान बदलायचं आहे. मी दोषी आहे." हे ऐकून मॅजिस्ट्रेट, सरकारी वकील, ब्रेंट सगळेच अवाक झाले. मॅजिस्ट्रेट सरकारी वकिलाला म्हणाले, "तुमची याला काही हरकत आहे का?"

"हरकत नाही, पण मगाशी मी केस जशी विशद केली त्याबद्दल आरोपीचे काही दुमत आहे का?"

त्यावर चॅडविक म्हणाला, "अजिबात नाही. उलट जसजशा घटना घडल्या, आपण अगदी तशाच सांगितल्या आहेत."