विशेष हक्क
मग मॅजिस्ट्रेट गेलॉर्ड ब्रेंटकडे वळून म्हणाले, "तुम्हाला आत येण्याची तसदी दिली याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. तुमच्या साक्षीची आता काही आवश्यकता भासेल असे वाटत नाही. पण तरीही तुमची इच्छा असेल तर तुम्ही कोर्टरूममध्ये बसू शकता." ब्रेंटने मान हलवली, आपल्या पत्रकार मित्रांकडे पाहून स्मितहास्य केले आणि थोड्या वेळापूर्वी साक्ष देऊन आलेला हवालदार जिथे बसला होता तिथे त्याच्या शेजारी तो जाऊन बसला.
मॅजिस्ट्रेट चॅडविकला म्हणाले, "आपण दोषी आहोत असे तुम्ही म्हणत आहात. म्हणजे तुम्हाला गुन्हा कबूल आहे. तुम्हाला साक्षीसाठी कोणाला बोलवायचे आहे?"
"नाही सर. मी स्वत:च डॉकमधून -ह्या आरोपीच्या पिंजर्यातून- माझं स्टेटमेंट देणार आहे."
"ठीक आहे. तो तुमचा हक्कच आहे."
चॅडविकने खिशातून एक वर्तमानपत्रातले कात्रण काढले आणि म्हणाला, "सर, सहा आठवड्यांपूर्वी संडे कुरिअरमध्ये काम करणारे मि.गेलॉर्ड ब्रेंट यांनी हा लेख लिहिला होता. आपण यावर जरा नजर टाकलीत तर बरं होईल."
"ह्याचा केसशी काही संबंध आहे का?"
"हो सर, खूपच संबंध आहे."
ते कात्रण वाचून मॅजिस्ट्रेट म्हणाले, "असं आहे तर!"
चॅडविक म्हणाला, "ह्या लेखात गेलॉर्ड ब्रेंट यांनी माझ्यावर बिनबुडाचे आरोप करून माझी बदनामी केली आहे. तुम्ही वाचलंतच की ह्या लेखात एका कंपनीबद्दल लिहिलं आहे, जिचं हल्लीच दिवाळं निघालं आणि त्यामुळे त्या कंपनीमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली होती अशा लोकांचं प्रचंड नुकसान झालं. मी त्या कंपनीची उत्पादनं विकत होतो. इतर लोकांप्रमाणे मला पण वाटलं होतं की कंपनी चांगली स्थिरावलेली आहे. पण तसं नव्हतं. माझंही खूप नुकसान झालं. ह्या लेखात या गलथान, आळशी, अकार्यक्षम पत्रकारानं माझ्याबद्दल खोटंनाटं लिहिलं आहे. कंपनीच्या गैरव्यवहारात माझा सहभाग होता असाही आरोप माझ्यावर केला आहे. काहीही लिहिण्यापूर्वी त्याची सत्यासत्यता तपासून पाहिली पाहिजे ही साधी गोष्ट ह्या निर्बुद्ध पत्रकाराला माहीत नाही."
कोर्टात एकदम आश्चर्योद्गार आणि पाठोपाठ काही वेळ स्तब्धता पसरली. पण काही वेळच! काही क्षणातच पत्रकारांच्या पेन्सिली त्यांच्या पॅडवर सरसर चालू लागल्या!
सरकारी वकिलाने विचारले, "हे सगळं सांगण्याची आवश्यकता आहे का?"
चॅडविक म्हणाला, "सर, मी केवळ माझ्या गुन्ह्याची पार्श्वभूमी स्पष्ट करून सांगितली. त्यामुळे मी गुन्हा करायला प्रवृत्त का झालो हे आपल्याला कळेल."
मॅजिस्ट्रेट म्हणाले, "ठीक आहे. पुढे बोला."
"धन्यवाद सर." चॅडविक पुढे म्हणाला, "समाजातील गैरव्यवहार पुढे आणण्याच्या बाबतीत आपला हात कोणी धरणार नाही असा वृथा अभिमान बाळगणार्या ह्या पत्रकारानं हा कचरा लिहिण्यापूर्वी माझ्याशी संपर्क केला असता तर मी त्याला माझ्या फाईली, बॅंक स्टेटमेंट आणि इतर कागदपत्रं दाखवून सिद्ध केलं असतं की कंपनीच्या गैरव्यवहाराशी माझा सुतराम देखील संबंध नव्हता. उलट माझं सुद्धा इतर लोकांप्रमाणे खूप नुकसान झालं आहे. माझा फोन नंबर डिरेक्टरीमध्ये सहज मिळण्यासारखा आहे. तरीही ह्या माणसाने माझ्याशी संपर्क केला नाही. मला तर वाटतं निर्भीडपणाचा बुरखा पांघरलेला हा गर्विष्ठ पत्रकार आपलं लिखाण दारूच्या गुत्त्यामध्ये ऐकलेल्या गावगप्पांवर बेततो."
गेलॉर्ड ब्रेंट रागाने लाल झाला होता. तो जागेवरून उठून ओरडला, "हे बघा, मी..."
"शांतता, कोर्ट चालू आहे."
मॅजिस्ट्रेट चॅडविकला म्हणाले, "तुमचा राग मी समजू शकतो पण ह्या सगळ्याचा तुमच्या गुन्ह्याशी काय संबंध आहे?"
चॅडविक म्हणाला, "सर, माझ्यासारखा एक सर्वसामान्य, सरळमार्गी आणि कायद्याचं पालन करणारा माणूस जेव्हा दुसऱ्या एखाद्या माणसावर हात उगारतो तेव्हा त्यानं हे का केलं हे समजून घ्यायला पाहिजे. केसचा निकाल लावताना ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं."
"ठीक आहे. गुन्हा करण्यामागचं तुमचं कारण सांगा. पण भाषा जरा जपून."
"होय, सर." चॅडविक पुढे म्हणाला, "सर, जागृत पत्रकारितेच्या नावाखाली हे जे सगळं धादांत खोटं छापून आलं त्याचा माझ्या धंद्यावर फार वाईट परिणाम झाला. इतका की माझ्या काही सहव्यावसायिकांनी त्याच्यावर विश्वासही ठेवला! त्यांना माहीत नव्हतं की ब्रेंटसाहेबांच्या लेखनाचा जन्म हा परिश्रमपूर्वक केलेल्या अभ्यासातून होत नसतो तर तो व्हिस्कीच्या बाटलीच्या बुडातून झालेला असतो."
इकडे ब्रेंटचा पारा रागाने चढत होता. तो शेजारी बसलेल्या हवालदाराला म्हणाला, "हा काय वाट्टेल ते बोलतोय. ह्याला असं...."
"श्श्श... " हवालदाराने त्याला गप्प बसवले. तरीही ब्रेंट उठला आणि म्हणाला, "सर, मला असं म्ह.."
"शांतता, कोर्ट चालू आहे."
"यापुढे कोर्टाच्या कामात कोणी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कोर्टरूममधून बाहेर काढले जाईल." मॅजिस्ट्रेट कडकपणे म्हणाले.
"तर सर, मी विचार करायला लागलो, एका बेजबाबदार पत्रकाराला, केवळ त्याच्या पाठीशी एक बलाढ्य वर्तमानपत्र उभं आहे म्हणून सर्वस्वी अनोळखी असलेल्या एखाद्या सामान्य, सरळमार्गी आणि कष्टाळू माणसाची बदनामी करून त्याला आयुष्यातून उठवण्याचा हक्क कोणी दिला?"
"तुमची बदनामी झाली हे खरं, पण न्याय मिळवण्याचे कायदेशीर मार्गही उपलब्ध आहेत."
"अगदी नि:संशय उपलब्ध आहेत. पण ते कोणाला? सर, आपणच विचार करा. देशभर प्रसिद्ध असलेल्या एका प्रतिष्ठित वर्तमानपत्राशी टक्कर घेणं एखाद्या सामान्य माणसाला हल्लीच्या काळात परवडण्यासारखं आहे का? म्हणून मी संडे कुरिअरच्या संपादकांना प्रत्यक्ष भेटून, सर्व कागदपत्रं दाखवून आपली बाजू सांगावी असा विचार केला. पण त्यांनी मला भेटायला नकार दिला. मला तिथे गेलॉर्ड ब्रेंटशी भेटही नाकारली. म्हणून मी ब्रेंटच्या घरी गेलो."
"त्यांच्या नाकावर ठोसा मारण्यासाठी? तुमचं नशीब म्हणून ब्रेंटना फारशी इजा झाली नाही, पण झाली असती तर तुम्हीच मोठ्या प्रकरणात अडकला असतात. खेरीज मारहाण करणं हा काही प्रश्न सोडवण्याचा मार्ग नाही." मॅजिस्ट्रेट म्हणाले.
आश्चर्यचकित होऊन चॅडविक म्हणाला, "छे छे सर. मी तिथे गेलो ते ब्रेंटना मारायला नव्हे तर त्यांच्याशी चर्चा करून माझी बाजू स्पष्ट करायला."
"आहा! शेवटी कारण सापडलं तर! तर तुम्ही ब्रेंटकडे त्यांच्याशी चर्चा करायला गेलात. पण मग चर्चा केलीत की नाही?"
चॅडविक जरा नरमाईने म्हणाला, "सर, मी प्रयत्न केला, पण कुरिअरच्या कार्यालयात जशी तुच्छतेची वागणूक मला मिळाली तशीच इथेही मिळाली. त्याला माहीत होतं की माझ्यासारखा एक किरकोळ माणूस संडे कुरिअरसारख्या बलाढ्य पत्राशी लढत घेऊ शकणार नाही."
"मग काय झालं?"
"मग काय झालं ते माझं मलाच कळलं नाही. माझ्या हातून एकदम अक्षम्य वर्तन घडलं साहेब! मी ब्रेंटच्या नाकावर ठोसा मारला. माझ्या एवढ्या आयुष्यात अगदी पहिल्यांदाच माझा स्वत:वरचा ताबा सुटला."
मॅजिस्ट्रेटला आठवले की काही वर्षापूर्वी त्याने दिलेल्या एका निकालावर पत्रकारांनी केवढा गदारोळ उठवला होता. तेव्हा त्याचाही स्वत:वरचा ताबा सुटला होता. नंतर तोच बरोबर होता हे सिद्ध झाल्यावर तर त्याचा राग आणखी वाढला होता. उघडपणे तो म्हणाला, "मि.चॅडविक ही अतिशय गंभीर बाब आहे. तुमच्यावर अन्याय झाला होता हे खरं आहे आणि तुम्ही रविवारी मि.ब्रेंटच्या घरी गेलात तेव्हा त्यांना मारहाण करण्याचा तुमचा इरादा नव्हता हेही मान्य आहे. पण मि.ब्रेंटना तुम्ही मारलंत ही देखील वस्तुस्थिती आहे. समाजस्वास्थ्यासाठी अशा प्रवृत्तींना आळा घातलाच पाहिजे. मी तुम्हाला शंभर पौंड दंड ठोठावत आहे."
चॅडविकने लगेच चेक लिहून दिला. तोपर्यंत पत्रकार मंडळी बाहेर पडली होती. चॅडविकही कोर्टाच्या पायर्या उतरू लागला. तेवढ्यात मागून कोणी तरी त्याचा हात धरला. त्याने वळून पाहिले तर तो ब्रेंट होता. तो संतापाने थरथर कापत होता.
"xxxxxx (इथे एक सणसणीत शिवी!) तुला काय वाटलं, तू आत जे काय बोललास ते खपून जाईल होय?"
चॅडविक म्हणाला, "हो जाईलच. डॉकमधून असं बोलायची मुभा असते. त्यावर कोणी हरकत घेऊ शकत नाही. तुला माहीत नसेल पण त्याला 'ऍबसोल्यूट प्रिव्हिलेज' म्हणतात. विशेष हक्क!"
"पण तू माझ्याबद्दल जे बोललास त्यात सत्याचा अंशसुद्धा नाही. असं खोटंनाटं कोणी दुसर्याबद्दल बोलू शकत नाही."
"का नाही? तू माझ्याबद्दल बोलला नव्हतास?"