वॉलेस आणि डार्विन
वॉलेस १८५४ मध्ये पूर्वेकडील देशात गेला. तिथे त्याने वॉलेस रेषा शोधून काढली. १८५५ मध्ये वॉलेसने 'ऑन द लॉज् विच हॅव रेग्युलेटेड द इंट्रॉडक्शन ऑफ न्यू स्पीशीज' हा शोधनिबंध लिहिला आणि या विषयात डार्विनला चांगली गती आहे हे ठाऊक असल्याने त्याला अभिप्रायार्थ पाठवून दिला. डार्विन आपले संशोधन चर्चला आणि सार्वजनिक टीकेला घाबरून ठामपणे मांडायला धजत नव्हता. आपल्या प्रबंधाचा गोषवारा एखाद्या त्या विषयात पारंगत, तज्ज्ञ असलेल्या विद्वत्ताप्रचुर शास्त्रज्ञाला काढायला सांगितला तर जसा असेल त्यापेक्षा सरसच आणि आत्मविश्वासपूर्ण अशा नेमक्या भाषेतला असा वॉलेसचा तो शोधनिबंध वाचून डार्विनची काय अवस्था झाली असेल ते सांगायला नकोच. सामाजिक टीकेला अजिबात न घाबरणार्या वॉलेसने जर हा शोधनिबंध त्या वेळी त्वरित प्रसिद्ध केला असता तर उत्क्रांतीचा सिद्धांत एकट्या वॉलेसच्या नावावर गेला असता आणि डार्विन कदाचित कोणाला ठाऊकही झाला नसता. पण दैवगती वेगळी होती. पुढे काय झाले?
वॉलेसचा प्रबंध हाती पडल्यावर देखील डार्विन आपला एकट्याचा शोधनिबंध त्वरेने प्रसिद्ध करू शकला असता. कारणे काहीही असोत, पण त्याने तसे केले नाही. डार्विनने वॉलेसचा प्रबंध चार्ल्स लायेल आणि डॉ. हूकर यांना दाखवला. त्या दोघांनी एक तोडगा काढला. डार्विनचा १८४४ चा शोधनिबंध आणि वॉलेसचा १८५५ चा शोधनिबंध दोन्ही १ जुलै १८५८ रोजी लिनिअस सोसायटीकडे एकाच वेळी एकत्रितरीत्या सादर केले. त्यातल्या त्यात वॉलेसचे नशीब एवढे की उत्क्रांतीच्या शोधाच्या इतिहासात वॉलेसचे नाव डार्विनच्या बरोबरीने कोरले गेले. पण प्रसिद्धीचा झोत मात्र सदैव डार्विनवरच राहिला. सुरुवातीला धार्मिक नेत्यांनी प्रतिक्रिया नोंदवली नाही. पण ही वादळापूर्वीची शांतता होती. २४ नोव्हेंबर १८५९ रोजी डार्विनचा 'ऑन द ओरिजिन ऑफ स्पीशीज' हा १२५० पानी ग्रंथ प्रकाशित झाला. आता चर्चने आणि कर्मठ प्रसारमाध्यमांनी डार्विनला लक्ष्य केले. 'डिसेन्ट ऑफ मॅन' हे डार्विनचे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर तर डार्विनचे डोके आणि माकडाचे धड असलेले व्यंगचित्र १८७१ साली एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. म्हणजे डार्विनला जे धर्ममार्तंडांचे भय होते ते वाजवी होते. वॉलेस जर जन्मालाच आला नसता वा त्याने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला नसता तर कदाचित डार्विनचा सिद्धांत डार्विनच्या हयातीनंतर प्रसिद्ध झाला असता.
पण डार्विनचे समाजातले उच्च स्थान आणि उच्चभ्रू वर्गातल्या चार्ल्स लायेल, ग्रे, डॉ. जोसेफ हूकर, थॉमस हक्सले, इ. घनिष्ट मित्रांचा ठोस पाठिंबा यामुळे त्याला निभावून नेता आले. १९ एप्रिल १८८२ रोजी इंग्लंडमधल्या केंट परगण्यातील डाउने येथे डार्विनचा वयाच्या ७३व्या वर्षी मृत्यू झाला. खरे तर डाउनेच्या सेंट मेरी चर्चमागे त्याचे दफन होणार होते. पण त्याचा एक सहकारी विल्यम स्पॉटिंगवूड हा तेव्हा रॉयल सोसायटीचा अध्यक्ष होता. त्याच्या प्रयत्नाने डार्विनचे दफन वेन्स्टमिन्स्टर ऍबेच्या शाही स्मशानभूमीत सर आयझॅक न्यूटन आणि जॉन हर्षल यांच्या सान्निध्यात झाले.
वॉलेसचे नशीब एवढे थोर की उत्क्रांतीच्या संशोधनाला डार्विनसारखे उच्चभ्रू पाठीराखे लाभले होते. वॉलेस एकटा असता तर कदाचित चर्चने त्याची वासलात लावली असती. वॉलेसचे पुढे काय झाले? १८८० मध्ये देवीच्या लशीला देखील एक समाजसुधारक(?) या नात्याने आक्षेप घेऊन वॉलेसने देवीलसविरोधी चळवळीत भाग घेतला. देवीच्या रोगाचा केवळ सार्वजनिक आणि शारीरिक अस्वच्छतेमुळे प्रसार होतो आणि या लशीच्या प्रसारामागे वैद्यकीय व्यावसायिकांचे आर्थिक हितसंबंध असावेत असा त्याचा संशय होता. आजच्या वैद्यकीय विश्वाचे चित्र पाहाता त्याचा असा संशय असण्यात काही वावगे दिसत नाही. देवीसंबंधात वॉलेसने आपल्या मुद्द्याच्या समर्थनार्थ दिलेली आकडेवारी ही संशयास्पद होती असे 'लॅन्सेट' या संस्थेचे मत होते. त्याचा भाऊ जॉन हा अमेरिकेत स्थायिक झाला होता. १८८६ मध्ये वॉलेसने अमेरिकेचा दहा महिन्यांचा दौरा करून जैवभूगोलशास्त्र, अध्यात्म आणि अर्थशास्त्रीय सामाजिक सुधारणा या एकमेकांशी सर्वस्वी भिन्न असलेल्या तीन विषयांवर व्याख्याने दिली. त्याचे व्यक्तिमत्त्व असे बहुरंगी, बहुढंगी, बहुपेडी होते. या वास्तव्यात तो एक आठवडा कोलोरॅडो इथे राहिला आणि रॉकी पर्वतांतील वनस्पतीचे नमुने जमा केले. आशियातील, डोंगराळ भागातील वनस्पती आणि युरोप, तसेच अमेरिकेतील डोंगराळ भागातील वनस्पती यात जे साम्य आहे त्यावर हिमयुगाच्या दृष्टिकोनातून काय प्रकाश पडतो याचा अभ्यास करायला हे नमुने उपयुक्त ठरले. १८८९ मध्ये वॉलेसने 'डार्विनिझम' नावाचा डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या तत्त्वाची पाठराखण करणारा ग्रंथ लिहिला. त्यात मांडलेले संकरित जातीबद्दलचे तत्त्व 'वॉलेस इफेक्ट' या नावाने ओळखले जाते.
नंतरच्या काळात मात्र वॉलेस अध्यात्माच्या नादी लागला होता. त्याच्या मते किमान तीन वेळा अज्ञात शक्तीने इतिहासात हस्तक्षेप केला. प्रथम निर्जीव रसायनांपासून सजीव पेशी बनली तेव्हा, दुसर्यांदा उच्च प्रजातीत जाणिवा निर्माण झाल्या तेव्हा आणि तिसर्यांदा मानवात उच्च कोटीची बुद्धिमत्ता निर्माण झाली तेव्हा. असे असले तरी विविध संस्थांची पदे त्याने भूषविली आणि विपुल लेखन केले. १८९३ मध्ये वॉलेसची रॉयल सोसायटीवर निवड झाली. १९०७ मध्ये त्याने मंगळावरील कालव्यांवर लेखन केले. वृद्धापकाळात वॉलेस एक थोर शास्त्रज्ञ आणि समाजसुधारक म्हणून ख्यातनाम होता. ७ नोव्हेंबर १९१३ रोजी इंग्लंडमधल्या ब्रॉडस्टोन, डॉर्सेट इथे वयाच्या नव्वदाव्या वर्षीं वॉलेसचा मृत्यू झाला. त्याचे दफन वेस्टमिन्स्टर ऍबे इथे डार्विनच्या शेजारी व्हावे अशी त्याच्या घनिष्ट मित्रांची इच्छा होती. पण त्याच्या पत्नीने म्हटले की ब्रॉडस्टोनच्या छोट्या चर्चमागेच चिरनिद्रा घ्यायची त्याची इच्छा होती. मग काही तत्कालीन आघाडीच्या ब्रिटिश शास्त्रज्ञांनी वेस्टमिन्स्टर ऍबे इथे डार्विनच्या थडग्यापासून जवळ, त्याच्या व जोसेफ लिस्टरच्या भित्तीपदकांच्यामध्ये, वॉलेसच्या नावाचे संगमरवरी भित्तीपदक (medallion) बसवावे म्हणून समिती स्थापन केली. १ नोव्हेंबर १९१५ रोजी भित्तीपदकाचे अनावरण झाले.
न्यूयॉर्क टाईम्स वॉलेसच्या मृत्यूलेखात म्हणतो, "द लास्ट ऑफ द जायंट्स बिलॉंगिंग टु दॅट वंडरफुल ग्रूप ऑफ इंटलेक्चुअल्स दॅट इन्क्लूडेड, अमंग अदर्स, डार्विन, हक्सले, स्पेन्सर, लायेल ऍंड ओवेन, हूज डेअरिंग इन्व्हेस्टिगेशन्स रेव्होल्युशनाईज्ड ऍण्ड इव्हल्यूशनाईज्ड द थॉट ऑफ द सेन्च्युरी."
क्लिष्टता तसेच विस्तार टाळण्यासाठी उत्क्रांती, उत्परिवर्तन, नैसर्गिक निवड, लैंगिकतेच्या अनुषंगाने होणारी नैसर्गिक निवड, इ. बारकाव्यांचा उल्लेख टाळला आहे.
संदर्भ:
१. उत्क्रांतीची नवलकथा, निरंजन घाटे, ०१/१९९३
२. विकीपीडियाची संकेतपाने - वॉलेस आणि डार्विन
३. तिन्ही चित्रे विकीपीडियावर विनामूल्य उपलब्ध.
४. वॉलेसच्या भित्तीपदकाचे चित्र आणि माहितीसाठी पुढील दुवे पहावेत. :
सिटी ऑफ वेस्टमिन्स्टर व दी आल्फ्रेड रसेल वॉलेस वेबसाईट