“धी ऑक्सफर्ड बुक ऑफ पॅरडीज‌” - प्रस्तावनांशाचा अनुवाद

पृष्ठ क्रमांक

खोडसाळ

“धी ऑक्सफर्ड बुक ऑफ पॅरडीज‌” (संपादक : जॉन ग्रोस) ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतील उतार्‍याचा अनुवाद.

धी ऑक्सफर्ड बुक ऑफ पॅरडीज‌
धी ऑक्सफर्ड बुक ऑफ पॅरडीज

ऋणनिर्देश: वरदा वैद्य ह्यांनी हा अनुवाद बारकाईने तपासून त्यातल्या अनेक त्रुटी दूर केल्या. त्यांच्या मौलिक सूचना, साक्षेपी संपादन व सहकार्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. - खोडसाळ

विडंबन म्हणजे विनोद-निर्मितीसाठी एखाद्या लिखाणाची किंवा लेखनशैलीची केलेली नक्कल. स्थूलमानाने ह्या व्याख्येवर बहुतेक सर्व शब्दकोशांचे व संदर्भग्रंथांचे एकमत आहे. वर वर पाहता हे स्पष्ट व सरळ वाटते. परंतु लिखाणांचा स्वतंत्रपणे विचार केल्यास गुंतागुंत वाढते. उदाहरणार्थ, विडंबनात शैलीची नक्कल शेवटपर्यंत टिकवावी लागते का? दुसरे म्हणजे नक्कल हाच विडंबनकाराच्या कलेच्या केंद्रबिंदू असावा का? आणि ज्या लिखाणाचे तो विडंबन करत आहे त्याचा खरा उद्देश जर विडंबनकाराला वेगळ्याच लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी आकृतिबंध उपलब्ध करून देणे हाच असेल तर ?

विडंबनांच्या स्वरूपात, आकारात व मार्मिकतेत बरेच वैविध्य आढळते. उपहासात्मक विडंबने, प्रेमळ विडंबने, अत्यंत काटेकोर विडंबने, ओबडधोबड परंतु परिणामकारक विडंबने, हलकीफुलकी प्रहसने, गमतीदार नक्कल आणि क्रूर उपहासात्मक थट्टा. विडंबन हा टीकेचा सर्वात मनोरंजक व नाजुक प्रकार असू शकतो. पांडित्यपूर्ण व सूचक असला तरी तो लोककलेचा एक प्रकार आहे - मुलांनाही आवडणारी लोकप्रिय विनोदाची एक खाण आहे. जोनाथन स्विफ्टची कविता “अ डिस्क्रिप्शन ऑफ अ सिटी शॉवर” हे एक प्रकारचे विडंबन आहे. (त्याचा पूर्ण आस्वाद घेण्यासाठी ती कविता व्हर्जिलच्या जिओर्जिक्स आणि एनिडमधल्या दोन लहान प्रवेशांवर आधारित आहे हे ठाऊक तरी असावे लागते किंवा कोणीतरी दाखवून द्यावे लागते.) “व्हाइल शेपर्ड्स वॉश्ड देअर सॉक्स बाय नाइट” हे सुद्धा एक प्रकारचे विडंबनच आहे. [अनुवादकाची नोंद : मूळ क्रिसमस कॅरॉल इथे वाचता येईल]

विडंबनाच्या अलीकडे दुसर्‍याच्या शैलीची मुद्दाम उसनवारी करून केलेले लिखाण (पॅस्टिश) व पलीकडे महत्वाच्या विषयावर केलेले उपहासात्मक विनोदी लिखाण (बर्लेस्क) असते असा विचार केल्यास त्याच्या वर्गीकरणाचा प्रश्न सोपा होतो. उपहासाचा हेतू न बाळगता दुसर्‍याची शैली वापरून केलेले लिखाण म्हणजे पॅस्टिश. बर्लेस्क उच्च साहित्याचे थिल्लर रूपांतर करते, गंभीर पात्रांना हास्यास्पद परिस्थितीत ढकलते.

आपल्याला मात्र इतका काटेकोर फरक करायचा नाही. बरीचशी बर्लेस्के विडंबन म्हणूनही खपतील. (अर्थात, तुम्हाला जर ते अतिदर्जाहीन वाटले नाही आणि 'विडंबन' हा शब्द केवळ उच्च दर्जाच्या लिखाणासाठी राखून ठेवावा अशी तुमची भूमिका नसेल तर.) त्याचप्रमाणे विडंबन व पॅस्टिश ह्यामधील फरकही सुस्पष्ट नाही. पॅस्टिश म्हणजे भ्रष्ट नकलीची लपवाछपवी नव्हे. उलट, आपण नक्कल आहोत ह्याची ते मुद्दाम जाहिरात करते. त्यातील नक्कल करण्याचे कौशल्य वाखाणण्याजोगे असते. उत्तमोत्तम विडंबनांमध्येही असेच वाखाणण्याजोगे कौशल्य असते. उदाहरणार्थ - मॅक्स बीअरबोह्मची, चार्ल्स स्टुअर्ट कॅल्वर्लेची (“फ्लाय लिव्हस”) ही विडंबने. आपण लेखकाच्या कौशल्याचे कौतुक करता करता त्यात दडलेल्या विनोदाचा आनंद घेतो.

विडंबनाविषयी लिहिणार्‍याने नेमक्या व्याख्यांच्या शोधात गुंतून पडू नये. विडंबन हा लेखनप्रकार फार गांभीर्याने घ्यायचा नसतो. त्याचा मुख्य उद्देश करमणूक करणे हाच असतो. जो संग्राहक विडंबन-संग्रहासाठी केवळ उत्कृष्ट, निर्दोष नमुने शोधतो तो स्वत:स बर्‍याच बहुमोल साहित्यापासून वंचित ठेवतो. विडंबन करण्याची प्रेरणा इतकी खोल रुजलेली, पसरलेली व वेगवेगळे पैलू असलेली आहे की तिला ठरावीक स्वरूपात किंवा कडक नियमात बंदिस्त करणे अशक्य आहे.

इतर लेखकांच्या मर्यादा चव्हाट्यावर आणणे हे काही मोठे उदात्त कार्य नाही आणि विडंबनकारांचा हाच प्रमुख फायदा असेल तर त्यांचा धंदा फारसा चांगला समजला जाणार नाही. प्रत्यक्षात विडंबनाचे सुधारणात्मक पैलू दुय्यम असतात - अनेकदा तेवढेही नसतात. विडंबन ही एक कला आहे आणि इतर कोणत्याही कलेप्रमाणे त्यासाठी कल्पनाशक्ती व तांत्रिक कौशल्य दोन्ही हवे. विडंबनकाराला केवळ इतरांतील असंबद्धता शोधून भागत नाही. त्याला स्वत: काहीतरी असंबद्ध निर्माण करावे लागते - काहीतरी जाणूनबुजून, मजेदार असे असंबद्ध.

काही टीकाकारांनी पुढे जाऊन असेही म्हटले आहे की चांगले विडंबन हे नेहमी ममत्वावर आधारित असते. ह्यामागील कल्पना अशी की लेखकाच्या अंतरंगात शिरण्यासाठी त्याच्यावर माया असावी लागते, अन्यथा ते लेखन केवळ त्याच्या लकबींची, ढंगाची नक्कल ठरेल. पण हा ह्या प्रकाराविषयी फारच सकारात्मक दृष्टिकोन झाला. राग किंवा तिरस्कार ही अनेक उत्तम विडंबनांमागची प्रेरणा असते. ती विडंबने हल्ला करण्यासाठी, जमीनदोस्त करण्यासाठीच रचलेली असतात. मात्र हेही खरे आहे की अशा प्रकारची विडंबने संख्येने अल्प आहेत. बहुसंख्य विडंबने, विशेषत: कालौघात टिकून राहण्याची शक्ती असलेली विडंबने; सौम्य असतात. विडंबन हा जरी व्यंगचित्राच्या सर्वात जवळ जाणारा साहित्यप्रकार असला तरी तो अधिक खेळकर आहे. ज्या गाढवाकडे आपण वाचकांनी सहृदयतेने, किंबहुना आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहावे असे त्यांना वाटते त्याची ओळख जि.के. चेस्टर्टन आपल्या “धी डॉन्की” ह्या कवितेत “धी डेविल्स वॉकिंग पॅरडी | ऑन ऑल फोर-फूटेड थिंग्ज” अशी करून देतात. 'चालते व्यंगचित्र' असे त्याचे वर्णन केल्यास ते फार कठोर वाटले असते.

बहुतेक विडंबनकार ममताळू असोत वा नसोत, ते ज्या शैलींची टर उडवतात त्यांचा आनंद नक्कीच लुटतात. त्यांचा विडंबने लिहिण्यामागचा उद्देश कोणी रॉबर्ट ब्राउनिंगसारखे (किंवा जॉर्ज क्रॅब, हेन्री जेम्स, अथवा म्युरियल स्पार्कसारखे) लिहू नये असे सुचविण्याचा नसतो. अथवा त्यांचा उद्देश ब्राउनिंगने ब्राउनिंगसारखे लिहू नये असे सांगण्याचा तर अजिबातच नसतो. त्यांचा (त्यांच्या लिखाणांमधून मिळणारा) संदेश हा आश्चर्य व समाधानाचे मिश्रण असतो. कोणीही ब्राउनिंगसारखे लिहावे- (ब्राउनिंगप्रमाणे) त्यालाही हे विश्व अशा विलक्षण रीतीने आकळावे हे किती असामान्य आहे, त्याचे सातत्य - त्याचे कायम ब्राउनिंगप्रमाणेच लिहिणे - किती समाधानकारक आहे, हे सूचित करण्याचा त्यांचा उद्देश असतो.

विडंबनांतील बराचसा आनंद हा लेखकांनी निर्माण केलेल्या वेगळ्या, प्रतिस्पर्धी जगांना समजावून घेण्यामध्ये असतो. ही जगे त्यांचे असे स्वत:चे विशिष्ट गुणधर्म असलेली आणि स्वयंकेंद्रित असतात. हा आनंद विडंबनकाराच्या दोन ठरावीक युक्त्यांनी द्विगुणित होतो - एखाद्या विषयाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात केलेला बदल वा विषयात केलेले फेरफार (“ओल्ड किंग कोल”कडे पाहण्याच्या दहा तर्‍हा) आणि एका लेखकाचा मालमसाला दुसर्‍याच्या लेखनचौकटीत वापरणे - ज्यामुळे एलिझाबेथ बेनेट व तिच्या बहिणी पोहोचतात लरॉगबला, आणि जोन हंटर डन वर चॉसर कविता करतो. अशा प्रकारच्या अदलाबदलीत उपहासापेक्षा विसंगतीतील आनंद महत्त्वाचा.

उत्तम विडंबनकार शैलीत किंचित, जेमतेम दिसून येणारे बदल करण्यात प्रवीण असतात. किपलिंगने खरोखरच “ऍन्‌ इट्स ट्रन्च ट्रन्च ट्रन्चन डस धी ट्रिक” हे धृवपद असलेली कविता लिहिली होती का? नाही. पण (ही कविता वाचताना) आपल्याला मात्र असे वाटते की (कविता लिहिण्यापासून) किपलिंगने स्वत:ला कसेबसे थोपवले - आणि मग बीअरबॉह्मने येऊन त्याच्यासाठी ते काम केले. त्याचप्रमाणे हेन्री रीडने टॉमस हार्डीच्या कवितेचे जे विडंबन केले त्यातील ही ओळ पहा - “इट वेअर बेटर शुड सच अनबी”. हे हार्डीने लिहिले नसावे हे आपल्याला केवळ ह्या कारणास्तव पटते की तो स्वत:ला फक्त सहा शब्दांत व्यक्त करू शकेल हे खरे वाटत नाही. त्यासाठी विडंबनकारच हवा. [अनुवादकाची नोंद : हार्डीची मूळ कविता -'मिडनाईट ऑन धी ग्रेट वेस्टर्न' ; रीड ह्यांचे विडंबन - 'स्टाउटहार्ट ऑन धी सदर्न रेलवे'.]

विडंबनात उघडपणे विनोद करणे अनेकदा चूक ठरते. अशाने विडंबनातील गांभीर्याचा मुद्दाम आणलेला आव नष्ट होऊ शकतो. पण हे संदर्भावर व विडंबनकाराच्या सारासार विचारशक्तीवर (आणि अर्थातच ते विनोद किती प्रभावी आहेत ह्यावरही) अवलंबून असते. आयरिस मर्डोकच्या लेखनाचे माल्कम ब्रॅडबरीने केलेले विडंबन 'बिशप्स ब्रीचेस'’ नावाच्या हवेलीत घडते. जवळपासच 'बटक्स' नावाची दुसरी हवेली आहे हे कळल्यावर आपल्याला हा प्रकार जरा संशयास्पद वाटू लागतो पण लवकरच संशय दूर होतो. त्या लेखातील विडंबनभाव नाजूक भावनांची व श्रीमंत, ऐशआरामाच्या राहणीमानाची दिवास्वप्ने आणि एकामागोमाग एक येणारे धक्कादायक विनोदी किस्से ह्यांच्या विरोधाभासातून निर्माण होतो. ह्या दोहोंतील संतुलन विडंबनकाराने अप्रतिम साधले आहे.