“धी ऑक्सफर्ड बुक ऑफ पॅरडीज” - प्रस्तावनांशाचा अनुवाद
विडंबन पुन्हा पुन्हा आपल्या सीमा विस्तारत असते आणि नक्कल करण्याच्या हेतूने सुरू केलेल्या लेखनाचे रूपांतर स्वतंत्र कल्पनेत होते. कल्पित साहित्यास हे विशेषत्वाने लागू होते. 'डॉन किहोते' (ही कादंबरी आपली बर्लेस्क-मुळे ओलांडून त्याच्या पलीकडे गेली.) पासून कादंबर्यांच्या वाढीत विडंबनाचा महत्त्वाचा सहभाग होता. ह्या संग्रहातील दोन लेखकांची उदाहरणे ही प्रक्रिया स्पष्ट करते - फिल्डिंगच्या शॅमेलातील उतारा (ह्याच मार्गावर पुढे जाऊन त्याने त्यांची पहिली कादंबरी 'जोसेफ ऍन्ड्र्यूज' लिहिली.), आणि जेन ऑस्टेनने पौगंडवयात लिहिलेल्या काही प्रहसनांतील उतारे. (पुढे येणार्या नॉर्थॅन्गर ऍबेची ती नांदी होती.) [अनुवादकाची नोंद : शॅमेला इथे वाचा.]
मात्र जे विडंबन आपल्या लक्ष्यापासून भरकटते त्याला विडंबन म्हणण्यात काही अर्थ नाही. (वाचकांनाच एखाद्या लिखाणातील विडंबनांश माहीत नसणे वेगळे - लुईस कॅरॉल ह्यांच्या ऍलिस इन वन्डरलॅन्ड ह्या पुस्तकातील कविता ह्याचे सुप्रसिद्ध उदाहरण आहे.) विडंबनकार विडंबितावर विविध प्रकारे प्रकाशझोत टाकू शकतात – सामाजिक, मानसशास्त्रीय तसेच कलात्मक. उदाहरणादाखल आर्थर क्लेमेन्ट्स हिल्टनने १८७२ मध्ये (एका मत्स्यालयाला भेट दिल्यानंतर) लिहिलेले 'ऑक्टोपस' हे स्विन्बर्नचे विडंबन घ्या. सकृतदर्शनी ह्यातील विनोद कवीची आलंकारिक शैली व तिला सर्वस्वी अननुरूप असा तिचा विषय ह्यांच्या विरोधाभासात असला तरी मूलत: ही कविता स्विन्बर्नच्या लैंगिकतेविषयी आहे.
“Ope thy mouth to its uttermost measure
And bite us again!”
हिल्टनला काय काय माहीत होते असा प्रश्न आपल्याला पडतो. (त्या वेळी तो केवळ एक उपस्नातक होता.) ह्याच्या काही वर्षे आधी एडाह मेन्केन नावाच्या स्विन्बर्नच्या मैत्रिणीने डान्टे गॅब्रिएल रोसेटीकडे तक्रार केली होती की प्रियकराच्या भूमिकेत स्विन्बर्न कमी पडत होता : “चावून काही फायदा नाही हे मी त्याला समजावू शकत नाही.”
विडंबनकार करमणूक करतात तसेच अंतरंगाचे दर्शनही घडवतात. त्यांच्या विनोदाचा आवाका मजेशीर अश्लाघ्यापासून ते कटु-गोडापर्यंत मोठा असू शकतो. त्यांच्या (विडंबनांच्या) जगात राग आणि दु:खभोग अशा दोन्हींना स्थान असते. (ह्या पुस्तकात एक विडंबनकार भरपूर पैसे कमावल्याबद्दल क्रिस्तोफर रॉबिनला टोमणे मारतो, तर दुसरा तो म्हातारपणी कसा एकटा पडला आहे ते दाखवतो.) शेवटी, त्यांच्या इतर फायद्यांपलीकडे ते आपल्याला वर उल्लेख केलेले कलात्मक समाधान देतात – किंवा त्यांनी ते द्यावे. नामी विडंबनकार असलेल्या जॉन अपडाइकच्या शब्दांत सांगायचे तर, 'विडंबन ही शब्दकोड्यांप्रमाणे चिकाटीने घडवलेली शाब्दिक रचना नाही; ते उत्स्फूर्त असायला हवे. त्याला अंगभूत लालित्य हवे, त्याचे उलगडत जाणे सुखावह असायला हवे.'
अर्थात, प्रत्येक विडंबन हा आदर्श गाठू शकत नाही, पण अनेक गाठतात. केनेथ कॉकने केलेले विलियम कार्लॉस विलियम्सचे विडंबन उत्कृष्टतेच्या जवळ पोहोचते. ऍलन बेनेटने 'फॉर्टी यर्स ऑन' मध्ये चितारलेले जॉन बुकन-छाप खलनायक परिपूर्ण आहेत, विशेषत: 'बोलताना ओठ हलवण्याची सवय' असलेला पांढर्या केसांचा म्हातारा. [अनुवादकाची नोंद : 'फॉर्टी यर्स ऑन'चे BBCवर प्रसारित नभोनाट्य रूपांतर इथे मिळेल.] वर्ड्सवर्थच्या अतिसुलभ शैलीची अनेकांनी रेवडी उडवली आहे. त्या सर्वांत कॅथरिन मारिया फॅन्शॉ उठून दिसते कारण ती खालील ओळी कवीने अशा का लिहिल्या असाव्यात ते दाखवून देते :
“There is a river clear and fair
'Tis neither broad nor narrow;
It winds a little here and there—
It winds about like any hare;
And then it holds as straight a course
As, on the turnpike road, a horse,
Or through the air an arrow.”
हे अतिशय रटाळ आहे, पण आश्चर्य म्हणजे त्याचबरोबर ते एखाद्या प्रसन्न, रमणीय डच भूप्रदेशासारखे शांततामय व सुंदरही आहे. का कोणास ठाऊक, पण विनोदी असल्यामुळे जरा अधिकच सुंदर.
इंग्रजी भाषेतील विडंबनांचा इतिहास लिहायचा झाला तर त्याची सुरुवात चर्चला (धार्मिक प्रार्थनांची विडंबने सर्रास केली जात) किंवा दरबारी प्रेमाला व वागणुकीला अनुलक्षून केलेल्या अनेक मध्ययुगीन बर्लेस्कांपासून करावी लागेल. संग्राहकावर मात्र असले कोणतेही बंधन नसते. तसेच त्याला एलिझाबेथीय आणि जॅकोबीय नाटकांतील विडंबनांचे तुकडे हुडकत फिरावे लागत नाही, की सतराव्या शतकातील किरकोळ बर्लेस्कांत हिरे-माणके शोधावे लागत नाहीत. ह्या गोष्टी त्याचे वाचक विशेषज्ञांवर सोडून देतील असे तो गृहित धरू शकतो.
ऑगस्टीय व जॉर्जीय उपहासाचे सर्वमान्य उत्कृष्ट नमुने संग्राहकाच्या कक्षेत असल्यासारखे वाटू शकतात. आजही ते आपली ताकद व दर्जा राखून आहेत, व त्यांतील अनेकांत – उदाहरणार्थ 'धी रेप ऑफ धी लॉक', किंवा 'धी बेगर्स ऑपेरा' - विडंबनाचे घटक आहेत. परंतु इतकी मोठी व्याप्ती असलेल्या रचनांना 'विडंबन' हा शिक्का योग्य वाटत नाही. विडंबन म्हटले की छोटी, नेटकी लेखनकला डोळ्यासमोर येते.
ज्यास प्रामुख्याने विडंबनकार म्हणता येईल असा पहिला इंग्रज लेखक होता आयसॅक हॉकिन्स ब्राउन (१७०५-१७६०) – एक श्रीमंत (मौनी) खासदार व समाधानी माणूस. १७३६ मध्ये त्याने 'अ पाइप ऑफ टोबॅको' हे शीर्षक असलेली पुस्तिका प्रकाशित केली. त्यात तंबाखूची महती सांगणार्या सहा कविता होत्या व त्या तत्कालीन आघाडीच्या सहा कवींनी (ह्यात स्विफ्ट व पोप ह्यांचीही नावे होती) लिहिल्या असल्याची बतावणी केली होती. त्या कौशल्याने रचलेल्या व बर्या असल्या तरी विशेष परिणामकारक नव्हत्या. सत्तर-ऐंशी वर्षांनंतरही लोक त्यांची आठवण काढत होते - 'मॅन्सफिल्ड पार्क'मध्ये त्यांचा उल्लेख आहे - ह्यात एक तर त्यांच्या नावीन्याचा भाग होता [अनुवादकाची नोंद : 'झेंडूचीं फुलें'ची आठवण आजही काढली जाते त्यामागचे कारण काही प्रमाणात हेच असावे काय ?] व दुसरे म्हणजे मधल्या काळात बदल अतिशय धीम्या गतीने झाले होते. अठराव्या शतकाच्या अखेरीस जॉर्ज कॅनिंग व 'ऍन्टी-जॅकोबिन'मधील त्याच्या सहकार्यांच्या लेखनातून विडंबन पूर्ण शक्तिनिशी पुढे आले. त्यानंतर, १८१२ मध्ये आलेल्या जेम्स व होरेस स्मिथ ह्यांच्या 'रिजेक्टेड ऍड्रेसेस'ने आयसॅक ब्राउन हॉकिन्सलाही मागे टाकले.
एकोणिसाव्या शतकात विडंबनांची संख्या खूप वाढली व विसाव्या शतकातही तशीच अव्याहत वाढत राहिली. त्यांत लेखनकामाठी करणार्या विनोदी लेखकांपासून ते सि.एस. कॅल्व्हरले आणि जे.के.स्टिफेन सारख्या नामांकित व दर्जेदार लेखकांपर्यंत सर्व प्रकारचे विडंबनकार होते. एकच लेखक वेगवेगळ्या पातळ्यांवरही लिहीत असे. लूइस कॅरॉलची सर्वोत्तम विडंबने कवितेच्या रूपात आहेत, पण तो नित्य परिपाठाच्या व्हिक्टोरीय थट्टाही करू शकत असे. त्याने स्विनबर्नच्या 'ऍटलान्टा इन कॅलिडन'चे 'ऍटलान्टा इन कॅमडेन टाऊन' नामक विडंबन केले होते.
विडंबनांना मिळणारी लोकप्रियता व्हिक्टोरीय व व्हिक्टोरियोत्तर संस्कृतीत साहित्याला किती महत्त्व होते ते सिद्ध करते. विडंबित साहित्याशी बहुसंख्य लोकांची किमान तोंडओळखही नसती तर विडंबनांचा एवढा प्रसार झाला नसता. हे मात्र खरे की दर्जाची काही हमी नव्हती. विडंबनकारांची आवडती लक्ष्ये म्हणजे संग्रहांतील लिखाण, भावनोद्दीपक अभिजात वाङ्मय आणि शालेय अभ्यासक्रमातील व पाठांतरासाठी लावलेल्या कविता. त्यामुळे बहुतेक विडंबने ही चेस्टर्टन ज्याला 'गूड-बॅड पोएट्री' (बर्या-वाईट कविता) म्हणतो त्याचे नमुने असत. (१९०४ मध्ये कॅरोलिन वेल्स नावाच्या तज्ज्ञेने लिहिले होते की एकोणिसाव्या शतकातील सर्वात विडंबित कविता होती ऍन टेलर-रचित 'माय मदर'.)
व्हिक्टोरीय शाळांचा वारसा विसाव्या शतकातही टिकून होता. तो अनपेक्षित ठिकाणी उद्भवतो. उदाहरणार्थ, नोएल कॉवर्डचे लिखाण. कॉवर्डच्या अप्रतिम गाण्यांपैकी एक गाणे खालील ओळींभोवती रचलेले आहे :
“The stately homes of England,
How beautiful they stand”
ह्या ओळी त्याने फेलिशिया हेमॅन्स ह्या कवयित्रीने १८३० मध्ये लिहिलेल्या कवितेतून जशाच्या तशा उचलल्या आहेत. (ह्याच कवयित्रीने विडंबनकारांची लाडकी "धी बॉय स्टूड ऑन धी बर्निंग डेक" ही कविताही लिहिली होती.) पण सौ. हेमॅन्स पुढे लिहितात :
“Amidst their tall ancestral trees,
O'er all the pleasant land”
आणि कॉवर्ड मात्र लिहितो :
“To prove the upper classes
Have still the upper hand . . .”
ह्याच गाण्यात वॉल्टर सॅवेज लॅन्डरची 'रोझ एल्मर' ही कविताही प्रतिध्वनित होते - "Ah what avails the sceptred race!" १९३०च्या दशकात कॉवर्डच्या किती प्रेक्षकांना हे संदर्भ कळले, कोणास ठाऊक. पण ते महत्त्वाचे नाही. त्या शब्दांनी त्या गाण्याला दर्जेदार केले हे महत्त्वाचे.