कास पुष्पमहोत्सव
कुठलीही अमूल्य गोष्ट म्हटली की ती आपल्या मालकी हक्काची किंवा आपल्या जवळ असलीच पाहिजे या हव्यासापोटी ही फुले मुळासकट उपटून काढणारे काही लोक दिसले. फुलांचे छायाचित्रण करण्याऐवजी त्यांवर लोळण घेऊन स्वत:चीच छायाचित्रे काढून घेणारेही काही दिसले. त्यामुळे अशा नैसर्गिक ठेव्याचे संरक्षण करण्यासाठी खूप काही करणे आवश्यक असल्याचे लक्षात आले. अशा लोकांना निसर्गप्रेमी म्हणता येईल का ? पोलीसदलाचे लोक यांकडे लक्ष ठेवून होते, पण मुळातच गर्दी खूप. त्यात पर्यटक पठारावर सर्वत्र विखुरलेले. सगळ्यांवर लक्ष ठेवणे त्यांना शक्यच नव्हते. एक बाई अशीच उपटलेलली रोपे घेऊन चालल्या होत्या. पोलिसांनी हटकताच त्यांनी लाडे-लाडे तोंडाचा चंबू करून, 'मग घ्या तुम्हालाच' म्हणून दोन्ही हातांनी रोपे त्यांच्या समोर धरली. पण असल्या लाडिक विभ्रमांना बळी न पडता त्या पोलिसाने सरळ तिला दोनशे रुपये दंड ठोठावला. खरे तर दंड घेऊन सोडून देण्यापेक्षा त्यांना पठारावर पुढे जाऊ न देता सरळ परत पाठवायला हवे होते असे वाटले. कारण दंडाने थोडा वचक राहील पण वृत्ती कशी बदलणार? एका छोट्या मुलीच्या हातात अशीच उपटलेली रोपे दिसली, तिला विचारले, "तू रोपं का तोडलीस? अगं, झाडं आपण लावली आहेत का? नाही ना? मग तोडणारे आपण कोण?'' तिच्या आई-वडिलांनी लगेच तिला तिथलीच माती घेऊन मुळांना लावून रोपे तिथेच ठेवायला सांगितले.
कास पठारावर फुले अनेक वर्षांपासून फुलत आहेत. हल्ली-हल्ली प्रसारमाध्यमांमुळे ती लोकांपर्यंत (खरे तर लोक त्यांच्यापर्यंत) पोहोचत आहेत. त्याचा प्रसार होणे, आपण घेतलेला आनंद सर्वांनाच घेता यावा यासाठी प्रयत्न होणे ही आवश्यक आणि महत्वाची बाब आहेच, पण खूप लोकांची तिकडे रीघ लागल्यामुळे पर्यटकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विकासकांनी सुरू केलेल्या हालचाली पाहून पर्यावरणप्रेमी-निसर्गप्रेमींच्या पोटात भीतीचा गोळा उठला. विकासक मोठमोठी बांधकामे करतील, सुख-सुविधांची रेलचेल झाली की निसर्गाच्या ओढीपेक्षा केवळ मौजमजा करणार्या आत्ममग्न पर्यटकांचीही गर्दी वाढेल आणि प्लास्टिकच्या पिशव्या, बिस्किटांच्या पुड्यांची वेष्टने (हे दृश्य आताच दिसू लागले आहे), बाटल्यांच्या काचा इत्यादीमुळे परिसर आणि पर्यायाने पुष्पपठाराचे अस्तित्वच धोक्यात येईल ही भीतीही रास्तच म्हणावी लागेल. या भीतीपोटीच पर्यटन विकास महामंडळाला इथे विरोध झाला. उलट-सुलट चर्चा झाल्या. पुण्या-मुंबईचे लोक येऊन पठाराची वाट लावतील असा प्रांतिक सूरही त्यात लावला गेला. पर्यावरण आणि पर्यटन विकास याच्यातील द्वंद्वाचाच हा उद्रेक होता. अर्थात सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे भान किंवा स्वयंशिस्त कुठल्याही प्रांताची मक्तेदारी नाही. सर्व प्रकारचे, सर्व प्रकारच्या वृत्तीचे लोक सर्वत्र आढळतात. मात्र सर्वांनीच आपआपल्या परीने कास पुष्पपठाराच्या संरक्षण-संवर्धनाचे काम करणे आवश्यक आहे.
कास पुष्पपठाराला जागतिक नैसर्गिक वारशाचा दर्जा मिळावा म्हणून केलेला प्रस्ताव युनेस्कोकडे विचाराधीन आहे. या संदर्भात तज्ज्ञांची एक समिती ऑक्टोबरच्या अखेरीस कास पुष्पपठाराला भेट देणार आहे. वनविभागाने तयार केलेल्या विकास कार्ययोजनेला नुकतीच केंद्र व राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. वनविभागाने पर्यावरण व विकास यात सुवर्णमध्य गाठत कासचे पुष्पवैभव अबाधित राखण्यासाठी उपाययोजना तयार केल्या आहेत. पर्यटन जरूर वाढावे पण त्यामुळे उपद्रव वाढू नये याची काळजी घेण्यासाठी पर्यटकांनीही काय करावे व काय करू नये याबद्दल माहितीपत्रकाद्वारे जागृती केली जाणार आहे. सर्वांच्या सहकार्यावरच यश अवलंबून आहे. यासाठी स्वयंशिस्त महत्त्वाची आहे. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी सुख-सुविधांची अपेक्षा करताना पर्यटकांनीही सार्वजनिक स्वच्छता, त्या ठिकाणाचे सौंदर्य अबाधित ठेवणे, किमान आपल्याकडून त्याला हानी पोहोचता कामा नये याचे भान ठेवणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक असलेली स्वयंशिस्त जोवर अंगी बाणत नाही तोवर पोलिसी खाक्या, दंडाची आकारणी असे अप्रिय पण कायदेशीर इलाज करावेच लागतील. पर्यावरण आणि विकास यांच्यातले द्वंद्व मिटले पाहिजे आणि दोन्हीचा समतोल राखला जाऊन कास पठाराचे पुष्पवैभव सर्वांसाठी आनंदाची पर्वणी ठरले पाहिजे.
यंदा फुलांचा बहर ओसरत असताना जाऊनही कासच्या फुलांनी मुळीच निराश केले नाही. काही दुर्मिळ होत चाललेल्या फुलांच्या प्रजाती पाहायला मिळाल्या. पुढच्या मौसमात मात्र योग्य वेळी कास पठारावर जाण्याची मनोमन प्रतिज्ञा केली आणि वर्षातून एकदा हा पुष्पमहोत्सव डोळे भरून पाहून येण्याचा संकल्पही सोडला.
आपल्या नाजूक, मोहक सौंदर्याने लक्षावधी लोकांचे लक्ष असेच वेधून घेऊन कोट्यवधी फुलांचा हा बहर बहार उडवू दे.
( कास पुष्पमहोत्सवाची आणखी काही प्रकाशचित्रे बघावी.)