भातुकलीचा डाव
बाइक ट्रेलच्या दोन्ही बाजूला उंच वाढलेली झाडे होती. सोहनने ती झाडे मोजली. त्यामधली चार झाडे रात्रीतून अदृश्य झाली तर किती राहतील याचे उत्तरही त्याने दिले. मग चार पिवळ्या पानाची झाडे जर आणखी लावली तर किती पिवळी झाडे होतील ते सुद्धा त्याने सांगितले. ऑक्टोबर महिन्यात दिसतात तसे फॉल-कलर दिसत होते. काही केशरी, पिवळी, जांभळी झालेली पाने लक्ष वेधत होती. एक दोन आठवड्यातच सगळी झाडेच्या झाडे रंगाने माखतील, झळाळतील असे वाटत होते. आज त्यामानाने तापमान जास्त होते म्हणून बाइकर्स येत जात होते.
"किती सुरेख आहेत ना ती झाडं!"
"त्यांची पानं गेली की आवडत नाहीत मला ती. टोकदार स्पाईस्क मला टोचतील असं वाटतं. ड्रॅगनचे दात असतात तसे दिसतात ते." तिला त्याच्या कल्पनाशक्तीचे कौतुक वाटले.
"ड्रॅगनचे दात नाहीत. त्यांच्यावर रात्री चांदण्या येऊन बसतात, म्हणून पानं जातात."
"खरंच?" त्याच्या चेहर्यावर कुतूहल होते. चांदण्या म्हटल्यावर सोहन आश्वस्त झाला.
"मी टायर्ड झालो आहे आता. हंगरी पण. मला पिझ्झा हवा आहे. आईनी म्हटलं ते इंडियन फूड नको मला."
"आधी ते खाल्लंस तर संध्याकाळी मी पिझ्झा ऑर्डर करीन."
"नाही, आधी पिझ्झा. मग डिनरला मी खाईन ते. प्लीज!"
सोहनच्या डोळ्यात निरागस भाव होते. दोघे पिझ्झाशॉपमध्ये शिरले तेव्हा सुनीतालाही भूक लागली होती. सकाळपासून तिने फक्त कॉफी घेतली होती. सुनीताने सोहनला ऑक्टोबर महिन्याची गोष्ट सांगितली. सोहनला तिने त्या गोष्टीमधल्या ऑक्टोबर, विंटर, फॉल, हॅलोविन अशा वेगवेगळ्या शब्दांचे स्पेलिंग विचारले. गोष्टीतला 'पम्पकिनपाय'चा उल्लेख ऐकून सोहनने रात्रीचे जेवण झाले की पम्पकिनपाय हवा असा हट्ट धरला. ते प्रॉमिस करून तिने त्याला वाचनालयात नेले. सोहनसाठी काही पुस्तके घेऊन दोघे घराकडे निघाले. सोहनला गाडीतच झोप लागली होती. सुनीताने त्याला उचलून अलगद गादीवर झोपवले. शेजारच्या खुर्चीत ती पण डोळे मिटून बसून राहिली.
एवढा वेळ माझ्याबरोबर अशा ठिकाणी फिरला असता तर विक्रम म्हणाला असता "जीव गुदमरतो आहे माझा, रंग काय, प्रदर्शन काय, लायब्ररी, म्युझियम ही काय जागा आहे जायची?"...त्याच्या चेहर्यावरचे तुच्छ आणि उद्धट भाव बघून आपल्या आवडीनिवडीला मुरड घालण्याऐवजी आपण पहिल्यांदाच म्हणायला हवे होते मग जा हवे तिथे, हो मोकळा तू .... ते करता आले नाही. सर्वस्वी त्याच्या मनाप्रमाणे वागताही आले नाही. मग तगमग आणि भांडणे....
सोहनच्या क्लासची वेळ झाली होती . सुनीताने त्याला उठवले, सोहनला कपभर दूध दिले. तिने स्वत:करता कॉफीचा मग भरून घेतला. गाडी काढून दोघे राजधानी टेंपलडे निघाली. अमेरिकेत चालणारे मराठी, हिंदी आणि पंजाबीचे देवळातले,गुरुद्वारातले क्लासेस वगैरेचे तिला हसूच येई. एक भाषा, एक संस्कृती, ओळख इतपत ठीक आहे, पण त्यात अनेकदा अट्टाहास आणि वेडी स्पर्धा असे त्याचे काय? अमेरिकेत वाढत असताना मुद्दाम मुलांच्या इच्छेविरुद्ध अनेक वेळा पालक त्यांना ओढत आणतात असे तिला वाटायचे. वरून त्याला संस्कृतीरक्षण असे लेबल लावणे हा तर लहान मुलांवर अन्याय वाटायचा तिला. "तुला स्वत:चं मूल झालं की कळेल!" तिच्या मैत्रिणीने तिला एकदा ऐकवले होते. त्यावर ती निरुत्तर झाली होती.
"कॅन यू रीड ऍन्ड राइट मराठी? तुला रामाची गोष्ट माहिती आहे?"
"तो सीतेला का सोडून देतो? त्याला आवडत नव्हती का ती?"
तिच्या उत्तराआधीच पुढच्या प्रश्नाचा भडिमार सुरु होता.
"मुलं कशी राहतील तिच्याशिवाय मग? म्हणून मला रामाचा राग येतो."
"रामाला सीता आवडायची, पण तो किंग होता ना म्हणून त्याला ते डिसिजन घ्यावे लागले."
"माझा बाबा तर किंग नाही, इथे तर कुणी किंग नाही. मग का कितीतरी आई बाबा असे वेगवेगळे राहतात? माझे पण!"
रेवतीने काही सांगितले नव्हते. तिने सांगावे अशी अपेक्षा नव्हतीच सुनीताला. पण सोहनमुळे आई-वडिलांच्या घटस्फोटाची माहिती तिला कळलीच. रेवतीचे वागणे बघून याची कल्पना आली नसती. विक्रमच्या नकाराने किती बदलले आपले आयुष्य.. एका मुलाची जबाबदारी आणि रेवती इतकी समर्थपणे काही घडले नाही असे वागू शकते?
"तू पण आईसारखा जॉब करतेस ना?" सोहनचे प्रश्न थांबले नव्हते.
सुनीताला रस्त्याकडे बघायचे, गाडी चालवायची की आधी याच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी ते कळेनासे झाले. ती कातावलीच. स्वत:चा मुलगा असता तर त्याच्यावर ओरडून गप्प केला असता त्याला. तिने जमेल तेवढा आवाज शांत ठेवला.
"क्लास झाला की देते तुझ्या प्रश्नांची उत्तरं. आता क्लासला जाईस्तोवर काही तरी म्हणून दाखव मला. तुला ट्विंकल ट्विकल येतं का?"
सोहनने ट्विंकल ट्विकल म्हणायला सुरूवात केली. सुनिताच्या डोक्यात मात्र देवळात भेटणार्या मराठी लोकांचे गाणे वाजू लागले. पुन्हा ते नकोसे चेहरे बघावे लागतील म्हणून तिच्या अंगातला उत्साह एकाएकी सरला. या भारतीयांमध्ये तिला जिव्हाळ्याचे कुणी मिळाले नव्हते. मतलबापुरते बोलणारीच होती गावातली भारतीय मंडळी. फार झाले तर चौकशा करून,चार सुस्कारे टाकून पुन्हा आपापल्या कामाला लागणारी. सणावाराला, कार्यक्रमाला आणि देवळात चालणार्या त्यांच्या 'मल्टायस्टार पिक्चर'च्या थाटामाटात तिला खूप एकटे वाटू लागे. ते तिच्या चेहर्यावर दिसत असावे. मग 'उपलब्धता' चाचपणारी पुरुषांची नजर अधिकच तीक्ष्ण वाटायची. विक्रम तिच्या आयुष्यात येण्याआधी, तो बरोबर असताना, त्याने लग्न मोडल्यावर अशा सर्व उलथापालथींत निव्वळ उद्गारार्थी वाक्यांशिवाय, शेरेबाजीशिवाय या मंडळींनी दुसरे काही केले नव्हते. वर्षे उलटत गेली, नवी माणसे आली, ती जुनी देखील झाली, काही बदलून गेली. तिच्याबरोबर जे कुणी विद्यार्थी म्हणून आले होते, यथावकाश त्यांची लग्ने झाली. त्यांची मुलेही तिसरी-चौथीत गेली. अंजूसारखी एखादी मैत्रीण तिला गावातले, माहितीतले एखादे स्थळ सुचवायची. अटी होत्या-नव्हत्या, तरी तिचे लग्न जमले नव्हते.
"आणखी किती वेळ आहे? सगळ्या नर्सरी र्हाइम्स झाल्या. आय ऍम बोअर्ड . मी काही बेबी नाहीये. तुला कळलंच नाही ते. ख्रिस्तीन मला एका वेळी एकच र्हाईम म्हणायला सांगते."
काहीतरी बोलून तिने सोहनचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. सोहनच्या बोलण्याने ती दुखावली होती.
तिने दर्शन घेतले, देवळाला देणगी दिली. देवळातल्या भिंतीवरचा जाहिरात आणि माहितीवजा प्रत्येक कागद नजरेखालून घातला. तिथे असणार्या मंडळींमध्ये तिला ओळखणारे कुणी नव्हते. तरी कितीतरी नजरा अधूनमधून तिच्याकडे बघत होत्या असा तिला भास झाला. तेवढ्यात रेवतीने फोन करून सोहनची चौकशी केली. त्यानंतर तिने सुनीताला, तुला वाचायला पुस्तके हवी असतील तर आहेत स्टडीत, आणि गेस्ट रूममधे टिव्ही आहे, पीसी आहे, हवे ते खायला करून घे, बाहेरून मागवलेस तरी चालेल अशा जुजबी सूचना केल्या. सुनीताला कुरबुरणारी लहानगी मुले, स्ट्रोलरमध्ये कंटाळलेली बाळे, हातातल्या सेलफोनवर बोलणार्या, ताटकळणार्या आया, ऑफिसचे काम करणारे, फोनवर बोलत असलेले वडील तिथे दिसत होते. कलकलाट असला तरी शेवटी सुरक्षित, उबदार घरट्याचा समाधानी भाव त्यांना आश्वस्त करत होता. शेजारच्या खोलीतून शिकवणार्या बाईचा आवाज येत होता. ती शिकवत असलेली मुळाक्षरे, शब्द त्या मुलांना जेवढी आपलीशी किंवा अपरिचित होती त्याहून जास्त परकेपणाची भावना सुनीताला अस्वस्थ करत होती. क्लास संपला. क्लासमधली काही मुले शेजारी असणार्या सरोवराकाठी आणि बागेत जाणार होती. सोहनने तसाच हट्ट धरला.
तिने होकार देताच "यू आर सो नाईस, आय ऍम सो लकी!" असे म्हणत तो सुनीताला बिलगला.
"तू कुणाला सुखी करू शकणार नाहीस. तू आलीस की तुझ्याबरोबर काळजी, चिंता आणि काहीतरी वाईट घडणार याची चाहूल सुद्धा येते."
"तुझा जॉब गेला ही माझी चूक नाही!" तिने विक्रमला फटकारले होते. स्वत:च्या चुका मान्य करणे त्याच्या स्वभावातच नव्हते. सगळे प्राधान्य स्वत:ला द्यायचे आणि तरी मनासारखे झाले नाही की त्याचा दोष इतरांना द्यायचा अशी त्याची वृत्ती होती. त्याच्यासाठी तिने एकदा नाही, दोनदा नोकरी बदलली होती. हातात नोकरी करण्याचा परवाना होता, ग्रीन कार्ड येणारच होते. अनेकांच्या ग्रीन कार्ड हरवल्याच्या कथा तिने ऐकल्या होत्या, तरी तिने पत्ता बदलला होता. सुदैवाने तिला ग्रीन कार्ड नव्या पत्त्यावर मिळाले, न हरवता. रंग, ऋतू, संगीत, कुठे पैसा खर्च करायचा अशा अनेक छोटयामोठ्या गोष्टींबद्दल दोघांची मते, आवडनिवड वेगळी आहे हे तिला लवकरच कळले होते. बर्याच वेळा आपण, पण कधीतरी त्याने जुळवून घेतले की झाले, अशी तिची धारणा होती.
"झाडाची गळलेली पाने मलाच गोळा करावी लागतात, हा घरकामात मदत करत नाही, सगळी बिले मलाच द्यायला लावतो," अशा कोणत्याही कारणावरून अमेरिकन बायकांसारखी ती नाते मोडणार नव्हती. विक्रमशी जुळवून घेणे तिने काही अंशी मान्य केले होते. बोलता बोलता एकदा तिच्या आईला तिने याची कल्पना दिली होती. आईला त्यात काही वावगे आहे असे वाटलेच नव्हते. आपला नवरा, आपला संसार, मग त्यासाठी तडजोड करावी लागते हे कुणी नवीन सांगायची गरज नव्हती.
"किती गुंतली आहेस त्याच्यात. जरा काळजी घे. ही वरवरची कारणे असतात हे नक्की. पण त्याहून जास्त बोच असते ती नकाराची. नकार कशालाही असू शकतो. त्रास होतो तो जुळवून न घेण्यामुळे, हेकेखोरपणामुळे. अशी कारणे साठत जातात आणि माणूसच नकोसा होतो." असे एकदा तिची अमेरिकन मैत्रीण, ज्युली म्हणाली होती.