भातुकलीचा डाव

पृष्ठ क्रमांक

सोनाली जोशी

लग्नाच्या तयारीसाठी सुनीता भारतात आली तेव्हा तिला कसलीशी अनामिक हुरहूर वाटत होती. विक्रम लग्नाच्या एक आठवडा आधी येणार होता. निमंत्रणे, खरेदी, सर्व काही जवळजवळ पूर्ण झाले होते. त्यावेळी विक्रमने फोन करून तिला मी लग्न करू शकत नाही असे सांगितले. त्याची कारणे तो सांगत होता पण सुनीताला पुढचे काही ऐकूनही समजले नाही. रंगवलेले चित्र कुणी पाणी ओतून विस्कटले तर जसे हतबल होऊ, तसेच तिने सुन्नपणे फक्त ते ऐकून घेतले. ओरडून, चिडून ते चित्र पुन्हा जसेच्या तसे होत नाही हे तिला पटलेले होते. सुनीताच्या आई-वडीलांना खूप धक्का बसला. नातेवाईक, मित्रमैत्रिणींच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे हे उमजले नव्हते. विक्रमच्या आई-वडिलांनासुद्धा हा धक्का होता. "आजकाल लग्नं मोडतात, पण घटस्फोट होण्यापेक्षा बरं नाही का? तुझी फरफट तरी वाचली." विक्रमच्या आईने समजंसपणे म्हटले.

एरवी आपण सावरलो आहोत असे सुनीता दाखवत होती, पण शालू, पैठणी, दागिने याकडे लक्ष गेले की तिच्या डोळ्यांत पाणी येई. हे सर्व इथे घरी ठेवले तर आई-वडील झालेली घटना आठवून पुन्हा त्रास करून घेतील म्हणून तिने बळेच सगळे सामान बॅगांत भरले.

"जे झाले त्यात तुझी चूक नसेल, पण म्हणून आततायीपणे कुठलाही निर्णय घेऊ नकोस. इथे परत यायचं आहे, तिथे राहायचं आहे, शिकायचं आहे, जे करशील ते मन लावून कर." आई-वडील म्हणाले.

"सगळे मुलगे विक्रमसारखे नसतात. लग्न करणार नाही असं काही ठरवू नकोस बेटा!" आजीने डोळे पुसत सांगितले.

ती परत आली. ऑफिसात जाऊ लागली. आर्टक्लासला येत राहिली. पुढचे सहा महिने विक्रम असे का वागला, माझ्याशीच का, माझी काय चूक होती, अशा प्रश्नांची न मिळणारी उत्तरे शोधत राहिली; जीव नकोसा होईपर्यंत. एकदा रागाच्या भरात तिने आपली नवीकोरी पैठणीच मुलांना छोटे छोटे तुकडे करून वाटून टाकली. हवे ते यापासून तयार करा असे म्हणत!

दुसरीकडे विक्रमने मात्र आपले लग्न ठरवले होते, पार पाडले होते.


मनसोक्त खेळायला मिळाल्यामुळे सोहन खूष होता. कुरकुर न करता तो जेवला. सोहनच्या वडिलांचा फोन आला.

"मी खूप मजा केली. लॉट ऑफ फन!" सोहनने सांगितले.

त्याने वाचनालयातली पुस्तके सुनीताकडून वाचून घेतली. "तुला थॅंक्स म्हणाला बाबा." झोपण्याआधी सोहन पुटपुटला. पाच मिनिटांत झोपलाही. सुनीताला झोप आली नव्हती. काही तरी वाचावे म्हणून ती पुस्तके बघू लागली. जॉन ग्रिशमच्या पुस्तकांनी एक कप्पा भरला होता. पु.ल., निवडक जी.ए., मिलिंद बोकील यांची पुस्तके एका रांगेत होती. खालचा सर्व कप्पा व्यवस्थापनावरच्या वेगवेगळ्या पुस्तकांनी भरला होता. शेजारचे कपाट हिंदी, मराठी, इंग्रजी अशा अनेक सीड्या आणि डीव्हीड्यांनी भरले होते.

मधल्या कप्प्यात काही रशियन, चिनी आणि स्पॅनिश लोककला आणि लोककथांची पुस्तके होती. या सर्व पुस्तकांवर सोहनच्या वडिलांचे नाव होते. तिला थोडे आश्चर्य वाटले. बाहुल्यांचे चित्र असलेले रशियन आर्टचे पुस्तक तिने उचलले. तिला रशियन बाहुल्या माहिती होत्या. एका बाहुलीच्या आतून निघत जाणार्‍या, आकाराने लहान लहान होत जाणार्‍या या बाहुल्या म्हणजे स्त्री व मातृत्वाचे प्रतीक. रूपकार्थाने घ्यायचे तर समान तत्त्वांनी, गुणधर्माने एकमेकांशी जोडले गेलेले काहीही. आपल्यानंतर आपल्याशी साम्य असेल असे कुणीच नाही...तो विचार बाजूला ढकलून तिने पेन्सिल उचलली. शेजारी टेबलावर असणारे कोरे कागद घेऊन ती बराच वेळ त्या बाहुल्या रेखाटत होती. तिची आजी, आई आणि फ्रॉक घालणारी ती दारासमोर रांगोळी काढण्यात रमणार्‍या...कलेची आवड आजीकडूनच आली. गणिताच्या आवडीमुळे एकमेकांच्या जास्त जवळ आलेले ती आणि तिचे बाबा. शाळा-कॉलेजमधे अशा समान धाग्याने एकमेकींशी बांधलेल्या, नाही म्हणायला एक दोन मैत्रिणी मिळाल्या. बाकी इतर सर्व तात्पुरते.. कोणत्यातरी नफ्यातोट्याच्या धाग्याने काही काळापुरते जवळ आलेले. पाच-पाचचे संच करत तिने बाहुल्या रेखाटल्या. आपण गुणदोषासकट व्यक्ती आपली म्हणयाचा प्रयत्न करतो, ज्युली तशीच म्हणून तिच्याशी मैत्री टिकून राहिली.

विक्रमशी आपण जुळवून घेतले. तिने विक्रम आणि ती अशा दोन बाहुल्या काढल्या. या दोन बाहुल्याही एकमेकात गुंतल्या होत्या, पण शारीर आकर्षंणाच्या ऊर्मी जशा ओसरल्या तशा विलग झाल्या. कायम एकत्र राहू शकतील असा धागा सापडलाच नाही. ती उसासली . कागदावर बाहुल्या पसरल्या होत्या. एका चित्रात ती होती आणि दुसर्‍या चित्रातले सोहन आणि त्याचे बाबा होते. ती दचकली. मनात आलेला विचार चूक की बरोबर ? तिने दिवा मालवला आणि डोळे मिटून घेतले. तिच्या डोळ्यापुढे बाहुल्या येतच राहिल्या..

दुसर्‍या दिवशी उठताच सोहनचे हट्ट सुरू झाले होते, "मला पॅनकेक खायचा आहे ब्रेकफास्टला. मला दूध नको."

सुनीताने घाईगडबडीने सगळे आवरले.

"सोहन, बस गाडीत, जिमनॅस्टिकचा क्लास सुरू होईल."

"मला नाही जायचं क्लासला, मला टीव्ही बघायचा आहे."

तिने त्याला उचलून गाडीत ठेवले. पट्टा लावला. ती पुढे येऊन बसली. गाडी गॅरेजबाहेर काढून ती फ्रीवेला लागली. सोहनची बडबड अखंड सुरु होती. ती काय उत्तर देते याने विशेष फरक पडत नव्हता. सोहन क्लासमधे होता. ती बाहेर बसून बघत होती. तेवढ्यात गाडी बाहेर काढल्यावर गॅरेजचे दार बंद केले की नाही अशी शंका तिच्या मनात आली. गॅरेजमध्ये उघडणार्‍या स्वयंपाकघराच्या दाराचे कुलूप लावलेले असले म्हणजे मिळवले. तिने सिक्युरिटी अलार्म लावला होता. तरीही क्लासचा सगळा वेळ ती अस्वस्थ होती. क्लास संपताच सोहनला घेऊन ती थेट घरी निघाली. कुणी घरात शिरले नसेल ना, चोरी तर झाली नसेल ना? तिचे मन धास्तावले. अलार्म वाजला, म्हणून सेक्युरिटी कंपनीने केलेला कॉल रेवतीने घेतला असेल का? रेवती तिथे आली असेल का? तिला आपले वागणे किती बेजबाबदारपणाचे वाटेल. शंकाकुशंकांनी तिला घेरले. सुदैवाने तिने गॅरेज बंद केले होते, स्वयंपाकघराच्या दाराला कुलूपही लावले होते आणि अलार्मही लावला होता.

"मला गेम खेळायचे आहेत कॉम्प्यूटरवर, मला पीनट बटर सॅन्डविच दे."

सोहनच्या मागण्या सुरू होत्या. तिने फ्रीजरमधून पराठे काढले, तयार पनीरचे पाकीट उघडून दोन्ही गरम केले. आपल्याबरोबर सोहनचेही ताट वाढले.

कुरकुर करत सोहनने पराठा खाल्ला.

"यू आर लाईक मॉम, आईसारखंच तू मला इंडियन फूड खायला लावतेस!"

ती हसली.

"मला पुन्हा पिझ्झा हवाय. आय होप बर्थडे पार्टीला पिझ्झाच असेल. तू बास्केटबॉल खेळ माझ्याशी, आय विल विन, तुला हरवेन मी!"

तिचे लक्ष सोहनच्या बोलण्याकडे नव्हते. तिने भराभरा दोन्ही ताटे, टेबल आवरले. सोहनने तेवढ्यात टीव्ही लावून कुठलीशी डिव्हीडी बघायला सुरुवात केली होती. सुनीताला रात्री अंजूकडे गेटटुगेदरला जायचे होते. एका भारतीय सहकार्‍याशी ओळख करून देईन असे ती म्हणाली होती. विक्रमनंतर तीन वर्षे सुनीताने लग्नाचा विषयही काढला नव्हता. मग काही जणांना ती भेटली. तिची नोकरी, तिची राहणी, तिचे वागणे, कुठलेसे कारण पुरले. तिचे लग्न जुळले नाही. विक्रम आणि तिचे संबंध होते म्हणून, तर कुणी अजून एकटी आहे म्हणून, जेवणानंतर सरळ एकत्र राहू असाच प्रस्ताव मांडला होता. त्यांना बांधिलकी नको होती. तिला लग्न करायचे होते, तिचा स्वत:चा संसार हवा होता. फक्त दोन शरीरांपुरतेच असते का लग्न? शरीराच्या मागण्या नाकारताही येत नाहीत आणि उघडपणे विचारलेलेही चालत नाही आपल्याला. तिला स्वत:चा राग आला होता.

"तू माझ्याशी खेळणार होतीस !"

"लेट्स गो आऊट, चल लवकर," म्हणून सोहनने घरातल्या लाकडी जमिनीवर बास्कटेबॉल बदडायला सुरुवात केली.

"सोहन, काही तोडशील- फोडशील तू! बाहेर खेळू या." नाईलाजाने सुनीता त्याच्याबरोबर बास्केटबॉल खेळू लागली.

बास्केट झाली असे वाटत असताना नुसता रिंग चाटून बॉल बाहेर पडला. मग पुढचे दोन तीन निदान रिंगच्या जवळ तरी गेले. त्यानंतर तिचा बॉल रिंगच्या जवळपासही गेला नाही. धावून तिला दम लागला होता. तिच्या हातातून बॉल काढून सोहनने तीनवेळा बॉल बास्केटमध्ये टाकून पॉइंटस मिळवले. बॉलच्या टप्प्यांबरोबर तिचे विचार हेलकावे घेत होते.