भातुकलीचा डाव

पृष्ठ क्रमांक

सोनाली जोशी

विक्रमनंतर मध्ये दोन तीन वर्षे अशीच गेली. आपण घालवली. अमूक कोर्स कर, त्या बढतीच्या मागे धाव, असे करत. लग्नाचे म्हणून कुणाला भेटलो नाही की बोललो नाही. पण लग्न मनातून दूर गेले नव्हते. अंजू अधूनमधून कुणाकुणाशी ओळख करून द्यायची. अंजूने आग्रह केला म्हणूनच दोन वर्षांनंतर कुणाशी बोलायला तयार झालो आहोत आपण. लग्न-संसार-मूल सगळे जमेल का आपल्याला? सहा-सात वर्षांच्या मुलाला सांभाळणे एवढे अवघड जाते .. करता येईल का कुणासाठी तडजोड? की ते सगळे आपले, आपल्या हक्काचे म्हणून आनंदाने करू आपण?

सोहनला पार्टीसाठी तयार करता करता तिने हातपाय धुतले, कपडे बदलले. आपली पिशवी आवरून ठेवली. ती गेस्टरूममधून बाहेर आली आणि दोघे गाडीत बसले.

"कुठे आहेस?" अंजूचा फोन आला. "अजून तिथेच आहेस? गेटटुगेदर विसरली नाहीस ना? ये आताच."

"अंजू , आता नाही, सोहनला एका बर्थडे पार्टीला आणले आहे. ती झाली की त्याला घरी सोडीन. येईन ना आठ पर्यंत."

"तोवर इथे या पार्टीचं काय? आणि रोहनचं काय?"

"सोहनचे बाबा सहाला येतील की मग निघतेच."

"सोहनची आई?"

"दोघंही येतील." जास्त न बोलता सुनीताने बोलणे संपवले.

सोहनला घेऊन ती घरी आली. सात वाजत आले तरी सोहनच्या बाबांचा पत्ता नव्हता. फोन नव्हता. रेवतीला फोन केला तर तिचा वॉइसमेल आला. दिवसभर खेळून सोहन दमला होता. बसल्या बसल्या तो कोचावर झोपला. अंजूला मी येऊ शकत नाही असे कळवावे असा विचार सुनीता करत होती. पण दुसरीकडे तीच रोहन कसा असेल, एकमेकांशी काय बोलणार, त्याने एकदम प्रपोज केले तर अशा शक्यता पडताळून बघत होती. तेवढ्यात गॅरेजचे दार उघडल्याचा आवाज झाला. सोहनचे बाबा स्वयंपाकघरातून घरात शिरले.

"सॉरी, उशीर झाला." त्यांनी सुनीताची नजर टाळत उत्तर दिले. "इटस ओके!" म्हणत सुनीताने पिशवी उचलली, गाडीत टाकली आणि ती अंजूकडे जायला निघाली. रशियन बाहुल्यांची रेखाटने मात्र खोलीतच राहिली होती...................

पार्टी सुरु झाली होती. हसून खुलून बोलणार्‍या लोकांकडे सुनीता बघत बसली. थोड्यात वेळात एक टकीला, दोन टकीला, तीन टकीला आणि भुईसपाट अशी रोहनची गत होईल की काय असे तिला वाटले. फारसे गप्पात न गुंतता रोहन शांतपणे पीत होता. दोघे एकमेकांशी बोलत नाहीत ते बघून अंजूने दोघांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. राहणे कुठे, नोकरी कुठे, किती वर्षे अमेरिकेत, या पलिकडे रोहन काही बोलला नाही. हातातला ग्लास तसाच धरून सुनीता तिथे ताटकळली. खाणेपिणे निरिच्छेने न्याहाळत राहिली. निघताना रोहन तिच्याजवळ आला. "मी तिला विसरू शकत नाही. आय ऍम सॉरी!" एवढे बोलून तो निघाला. तिने डोळे मिटून घेतले. हा जिची आठवण काढतो ती मुलगी नशीबवान असावी. आपली आठवण काढणारे असे कुणीच नाही. तिला रोहनचा राग आला नाही. समंजसपणे अंजूचा निरोप घेऊन ती गाडीत बसली. आपली वाट बघणारे, झुरणारे कुणी हवे होते.. जिवंत माणूसच असे नाही, तर किमान एखादा कुत्रा मांजर तरी .. विक्रमसाठी कधी काळी आपण झुरत होतो... त्याच्या भोवती फिरत होतो. त्या आकर्षणाच्या क्षणांचे भुंगे तिच्या मनात डोलत राहिले, गुणगुणत राहिले. अजूनही आपल्या मनात चालू असलेला कुठलाही विषय विक्रमवर येऊन थांबतो. फ्रीवेवरची एक एक एक्झिट, टॅकोबेल, मॅक्डॉनल्ड्स, शेल, एक्सॉनमोबिल, सनोकोचे पेट्रोल पंप बघत ती गाडी चालवत राहिली. रस्त्यावर अध्येमध्ये दिसणारे पिवळे दिवे, जाहिरातींचे फलक, या सगळ्या ओळखीच्या रस्त्यांकडे, खाणाखुणांकडे अनोळखी नजरेने पाहत ती सावकाश घरी आली. उजाडले की पुन्हा एक कोरडा व्यवहारी दिवस तिच्या समोर उभा राहणार होता....ती व्यवहारी होऊन त्याला सामोरे जाणार होती.

सोमवारी ती ऑफिसात उशिरा आली. सावकाशपणे ती एक एक काम पूर्ण करत राहिली. संध्याकाळी नेहमीपेक्षा लवकर घरी आली. खेळणार्‍या मुलांची कल्पना तिच्या मनांत होती. तिने तशा रशियन बाहुल्या काढल्या. मनासारखे चित्र झाल्याचा आनंद तिच्या चेहर्‍यावर होता. ऑफिसातून बाहेर पडून ती शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरली. एका आठवड्याची सुटी काढून जमेल तेवढा पूर्वकिनारा (इस्टकोस्ट) बघून आली. बोस्टन, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डीसी, फिलाडेल्फिया इथली सर्व प्रसिद्ध संग्रहालये पाहिली. चित्रांचे प्रदर्शन भरवायचे या तिच्या विचाराने पक्के स्वरूप घेतले होते. वेळ काढून तिने चित्रे पूर्ण केली. त्याच उत्साहाने तिने आर्टस्कूलच्या मुलांना शिकवले. बुधवारी रात्री सोहनच्या आईने, रेवतीने तिला फोन केला.

"तू खूप बिझी दिसतेस. प्रदर्शन भरवणार आहेस ना? सोहन म्हणत होता."

"हो , लगेच नाही अजून वर्ष आहे प्रदर्शनाला."

"येत्या वीकेंडला सांभाळशील का सोहनला? त्याला तुझी खूप आठवण येते."

"पूर्ण वीकेंड शक्यच नाही. काही कमिटमेंटस आहेत."

"शुक्रवारी तरी?"

"मी पाहते."

मागे सोहनचा आरडाओरडा चालू होता.

"सोहन खूप मनस्वी आहे, चटकन चिडतो सुद्धा. त्याला सांभाळणं अवघड आहे माहिती आहे मला." तेवढयात "यू सेड यू लाईक मी.." सोहनने फोन हातात घेऊन विचारले.

"हो , खरं आहे. यू आर व्हेरी स्वीट, आईला फोन दे प्लीज!" सुनीता म्हणाली.

"शुक्रवारी रात्री दहाच्या आत घरी जायला हवं. सोहनला चित्रं आवडतात, तो शांत बसला तर एक पोर्ट्रेट काढायचं आहे मला."

"शुअर. पण ये नक्की."

रेवतीच्या आवाजात थोडे कुतूहल, थोडे आश्चर्य आणि आश्वस्त झाल्याचे मिश्रण होते. सुनीताच्या डोळ्यांसमोर कोणतीही जबरदस्ती नव्हती, त्याउलट एकटक तिच्याकडे बघणारा, खुदकन हासणारा, निरागसपणे खेळणारा सोहन होता. सोहनचे सर्व भाव आपल्या कागदावर रेखाटायला ती आतूर होती.


क्लासला नेता-आणताना, खेळताना, जेवताना, ती सोहनकडे पहात होती. त्याचे हट्ट, त्याचा आरडाओरडा, त्याचे हासणे, रुसणे, सगळे डोळ्यात साठवत होती, भराभरा कॅमेरात बंद करत होती. तिने त्याला पुस्तक वाचून दाखवले, ती त्याच्याशी पत्ते खेळली, लपाछपी खेळली. मॅगी न देता तिने त्याला छोले आणि भात वाढला, खायला लावला. ती एकदाही त्याला रागावली नाही. मोठ्या डोळ्यांनी तिच्याकडे बघणारा, क्षणभरही शांत न राहणारा, अशा सोहनचे चैतन्य कागदावर कसे रेखाटता येईल, कुठल्या रंगाने जिवंत करता येईल याचा विचार तिच्या डोक्यात सुरू होता. साडेआठला सोहन झोपला. तिने काढलेले फोटो अनेकदा पाहिले. नेमके कोणत्या सोहनला रेखाटावे याचा निर्णय तिला घेता येईना. थोड्या वेळातच तिचा डोळा लागला. रात्री तिला जाग आली . दचकून ती उठली.

"काही नाही. तुझी झोपमोड केली मी. सॉरी. कॅमेराचा थोडा आवाज झाला."

सोहनच्या बाबांनी उत्तर दिले. त्यांच्या हातात कॅमेरा होता.

"कॅमेरा..."

"सोहनचे फोटो छान आले आहेत." त्यांनी तिचा कॅमेरा परत केला.

ती घरी आली. झोपण्याचा प्रयत्न करूनही तिला झोप लागली नाही. कितीतरी वेळ ती सोहनचे फोटो बघत होती. सोहनच्या डोळ्यांकडे पाहताना तिला एकदम त्याच्या वडिलांची आठवण झाली. ते विचार बाजूला करून ती सोहनचे चित्र रेखाटू लागली.

पुढच्या महिन्यात दोन फेर्‍या करून ती कॅलिफोर्नियाला गेली. तिथले प्रेक्षणीय रस्ते, समुद्रकिनारे, गोल्डन गेट पूल तिने कागदावर उतरवले. योसेमिटी नॅशनल पार्कमधले दगडाचे सुळके, मोठ्या पर्वतरांगा तिने कागदावर जिवंत केल्या. झुळझुळणारा झरा, कोळसणारा धबधबा, रिमझिम पाऊस तिला खुणावत होता. आपला कुंचला आणि रंग घेऊन ती त्यात चिंब भिजली. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेचे निळे-जांभळे तर संध्याकाळचे केशरी-सोनेरी आकाश तिने रंगवले. सोमवार ते गुरुवार ऑफिसचे काम होतेच. शुक्रवारी आर्टस्कूलही. नवी संग्रहालये, प्रदर्शने, प्रसिद्ध ठिकाणांना तिने भेटी दिल्या. संध्याकाळी चित्रावर काम केले. तिला माणसांत, दगडांत, प्राण्यांत, झाडांझुडपांत दडलेले चित्र दिसत होते. पुढील काही महिने एकटेपणाची जागा या सर्वांनी व्यापली होती. शिवाय महिन्यातून एखादी शुक्रवार संध्याकाळ किंवा शनिवार सकाळ तिने सोहनबरोबर घालवली.