भातुकलीचा डाव
"मी डॅडबरोबर दोन दिवस बीचवर जाणार आहे. मी मोठा सॅंडकॅसल करेन, तुझ्याकरता शिंपले आणेन."
"सोहन एकटाच आहे. तू येशील? निळंशार पाणी, लाटा, सूर्यास्त सगळं मला खूप आवडतं. आय नो, तुला पण आवडेल. "
"मी योसेमिटी पार्कला जाणार आहे. शिवाय नंतर एका कंपनीत जॉब इंटरव्ह्यू पण आहे."
"म्हणजे प्लॅन बदलता येणारच नाही का? "
थोडे थांबून तिच्या नजरेला नजर देत ते म्हणाले, "पाण्यामध्ये एकमेकांच्या सोबतीने जाणारे, एकमेकांशी खेळणारे, पाण्याबाहेर उड्या मारत नक्षी काढणारे, डॉल्फिन आहेत तिथे."
ती काही बोलली नाही.
"सोहनशी खेळायला नाही, तर चित्रांकरता ये."
सोहनच्या क्लासचे निमित्त करून ती त्याला घेऊन गेली. पण समुद्राचे पाणी , सूर्यास्त आणि डॉल्फिन, इतकेच सोहनच्या बाबांचे बोलणे तिच्या लक्षात राहिले.
"मला सुटी लागणार आहे या शुक्रवारपासून. मी महिनाभर कराटे कॅम्पला जाणार आहे. मला चॉकलेट हवं आहे. तुला माहिती आहे पुढच्या महिन्यात मी आईबरोबर वेकेशनला जाणार आहे डिस्नेवर्ल्डला. तू आईकडे सोडणार आहेस ना मला आज? "
कारमधे सोहनची बडबड सुरु होती. सोहनच्या क्लासनंतर तिने त्याला फिरायला नेले. दोघांनी आईसक्रीम खाल्ले.
संध्याकाळी ती सोहनला रेवतीकडे सोडून आली. किती उत्साह आहे सोहनच्या अंगात. किती गोष्टी करायच्या आहेत त्याला. पण सोहनसारख्या अनेक मुलांचे आयुष्य हे असेच आईकडून बाबांकडे आणि परत अशा फेर्या मारण्यात जाते. मोठे झाल्यावर काय वाटत असेल यांना? कोणते नाते आणि कसे सहजीवन असेल यांच्या स्वप्नांत? अर्धीच माया, अर्धेमुर्धे प्रेम त्यांच्या वाट्याला येते. समुद्र आणि धरतीला मिळणारे क्षितिज यांच्या वाट्याला येतच नाही? तिच्या मनात एक नवे चित्र आकार घेत होते.
सुनीताच्या अभ्यासिकेत बरीच चित्रे होती, काही चौकटीत बसवलेली तर काही नुसतीच. प्रदर्शनाची तारीख ठरली होती, आर्ट गॅलरी ठरली होती. त्याआधी तिला बरीच कामे पूर्ण करायची होती.
"आई-बाबा, तुम्हाला येता येईल का त्यावेळी?"
गेल्या तीन वर्षांत ती भारतात गेली नव्हती, तसेच आई-बाबाही तिच्याकडे आले नव्हते.
"एवढा मोठा खर्च करते आहेस? तुझ्या मनांत काय आहे नक्की?"
"नोकरी सोडणार आहेस का? विचार करूनच निर्णय घेशील, माहिती आहे मला." दोघांच्याही स्वरात काळजी डोकावत होती.
"नोकरी सोडणार नाहीये, कंपनी बदलते आहे, म्हणून शहर आणि घर पण..."
"आजीकडे बघायला कुणीतरी हवं इथे. आजकाल तिची तब्येत ठीक नसते. गेल्या महिन्यात हॉस्पिटलमधून आल्यापासून जरा जास्तच. आमची तब्येतही.. आता प्रवास मानवत नाही."
तिने पुन्हा इथे या असा विषय काढला नाही. त्यांच्या अडीनडीला आपण नसतो तसे आपल्याला हवे तेव्हा ते सुद्धा नसतील.. आज आहेत उद्या कदाचित.....
"आणखी पैसे नकोत, लागले तर सांगूच. आजकाल महागाई...."
आईने सांगितलेले भाज्यांचे, डाळ-तांदळाचे भाव तिने ऐकून घेतले. डॉक्टरकी कसा व्यवसाय झाला आहे म्हणत बाबांनी चिडचिड केली. त्याकडे तिने नीट लक्ष दिले.
"अंजू कशी आहे?" आईने विचारले.
आईला अंजू कशी आहे यापेक्षा काय विचारायचे आहे ते तिला कळले नव्हते असे नाही.
"आई, मी तिने सुचवलेल्या मुलांशी बोलले, पण पुढे नाही काही."
"इंजिनीयर, डॉक्टरच मुलगा हवा असं डोक्यात ठेऊ नकोस. चित्राच्या कामाने कुणाशी ओळख? मुलगा तुला पसंत असला की झालं. "
"माझा लग्नाला नकार नाहीये. बघते" पुढचे अनेक पण,परंतु, म्हणून, हे सर्व शब्द तिने मनातच ठेवले.
तिच्या मनात आईविषयी कणव दाटून आली. आपण तिच्याकरता काहीच करू शकत नाही. जे आपल्याला मिळत आहे त्याचे तिला समाधान नाही. आपलेच सख्खे आईबाप खूप दूर राहतात असे तिला प्रथमच वाटले. आपणही त्यांच्यापासून दुरावलो आहोत या जाणिवेने मन भरून आले.
"तुम्हाला डिव्हीडी पाठवेन प्रदर्शनानंतर." सुनीताने फोन ठेवला. भारत आणि अमेरिकेच्यामध्ये; महासागरात, डोक्यावरच्या आकाशात, तिच्या आईवडिलांच्या अपेक्षा हेलकावत राहिल्या. ठिपका ठिपका होत, दूरवर जाणार्या विमानासारख्या, बोटीसारख्या दिसेनाश्या झाल्या.
सोहनला क्लासला न्यायला ती सकाळी उशिरा आली. चेहर्यावर थकवा दिसत होता.
"मला वाटलं तू येणार नाहीस." रेवतीचा स्वर बदलला होता.
"मला बाहेर जायचं होतं." तिच्याकडे बघूनच तसा अंदाज येत होता.
"तू सिक आहेस का? काय झालं? ताप आहे तुला?" सोहन सुनीताकडे बघून म्हणाला.
"माझं मेडिसीन घे पटकन बरी होशील." औषधे आणायला सोहन आत पळाला.
"तुला सांगणार होते मी, मी आय ऍम गेटिंग एन्गेज्ड. लग्नाचं अजून ठरलं नाही. सोहनला अजून कल्पना दिलेली नाही."
लग्न ठरले म्हणून हिचे अभिनंदन करावे असा विचार सुनीताच्या मनात डोकावला नाही. उमटली ती असूयेची एक बारीक कळ. त्याहूनही जास्त विचार आला तो सोहनचा, सोहन कसं जुळवून घेईल याचा.
"सोहन माझ्याकडे येईलच. हिज डॅड इज थिकिंग ऑफ रिमॅरिइंग. मी तरी कशाला एकटं राहायचं? त्याला एक सोडून दोन दोन आईबाबा मिळतील." रेवती स्वत:च विनोदावर हसली.
त्यादिवशी सोहनने सुनीताकडे कोणताही हट्ट केला नाही.
"तुला बरं वाटलं की मग मला नवा सिनेमा बघायला ने थिएटरमधे. तुला बरं वाटलं की आपण झूमधे जाऊ." त्याची यादी वाढतच होती.
रात्री सोहन झोपला आणि ती घरी जायला निघाली. सोहनचे बाबा दार लावायला उठले.
"तू खूप सुंदर दिसतेस." ते हळूच तिला म्हणाले.
"असा विचार करणंच चुकीचं आहे. मी सोहनची टीचर आहे, बेबीसिटर आहे." तिने कापर्या आवाजात उत्तर दिले.
"माझ्याशी लग्न न करण्याला ही कारणं पुरेशी नाहीत."
"तसं नाही."
"काय अपेक्षा आहेत तुझ्या? काय करू मी?"
"नाही, ..प्लीज मला नका अडवू." त्यांच्या हातातून हात सोडवून घेत ती बाहेर पडली.
आर्ट गॅलरीत सुनीताच्या चित्रांचे प्रदर्शन झाले. तिला खूप चांगला प्रतिसाद मिळाला . तिला नवी ओळख मिळाली होती . सगळी आवराआवर करून ती नव्या जागेत गेली. नव्या कंपनीत रुजू झाली. पण तिने चित्रे काढणे थांबवले नव्हते. सोहनकडे तिचा नंबर होता, एक दोनदा त्याने रेवतीच्या सेलने तिला फोन केला.
"तू आर्टस्कूलला जातेस? दुसर्या कुणाला बेबीसिट करतेस? तुझं चित्रांच एक्झिबिट मला बघायचं आहे." सोहनचे बोलणे सुरु होते.
"नाही, अजून नाही. थोडी जास्त बिझी आहे कामात. पण यावेळी नक्की बोलवेन तुला प्रदर्शनाकरता."
"माझा डॅड आता बाहेरगावी जात नाही. दोन दिवस तर घरातूनच काम करतो."
"टेक केअर सोहन!" असे म्हणून तिने फोन बंद केला होता.
चित्रे, नोकरी, भटकंती, यात तीनचार महिने गडबडीचे गेले. एका संध्याकाळी ती कोचावर बसून आलेली बिले, पत्रे बघत होती. एवढ्यात तिच्या नावाचे एक पार्सल तिला दिसले.
तिने उत्सुकतेने ते उघडले. त्यात एक 'रशियन बाहुली' होती. त्या रशियन बाहुलीतून आणखी तीन बाहुल्या निघाल्या. त्यातला एकीचा चेहरा अगदी तिच्यासारखा होता, एक सोहनसारखी होती, एक अगदी छोट्या मुलीएवढी लहान! तिने मोठ्या बाहुलीकडे बघितले. त्या बाहुलीचे डोळे अगदी सोहन सारखे होते. सगळ्या बाहुल्यांवर केलेली कारागिरी अप्रतिम होती. तिला तिने काढलेले रशियन बाहुल्यांचे चित्र आठवले. पण प्रत्यक्षात समोर असणार्या त्या बाहुल्या बघून ती सुखावली होती, आश्चर्यचकित झाली होती.
बाहुलीच्या आत एक चिठ्ठी होती.
"जस्ट डिसायडेड टू गिव्ह फिनिशिंग टचेस टू युवर वर्क...तुला आवडेल अशी आशा करतो..वेटिंग फॉर ..."
तिला पुढचे काही वाचायचा धीर झाला नाही. तिचे हात थरथरत होते, बाहुल्यांना ती थरथर जाणवत होती.