परिवर्तन!
निवडणुकीत राज्यातील मतदानाचा टक्का प्रथमच त्र्यहात्तरवर गेला तेव्हाच निकाल कसा असेल ते सत्ताधार्यांच्या आणि हरिभाईंच्याही ध्यानी आलं. सत्ताधारी विरोधी बाकांवर जाणार हे पक्कं होतंच. हरिभाईंचा अंदाज तोच होता, पण निवडणुकीच्या आधीचाही पासष्ट टक्क्यांपर्यंत मतदान होईल हा त्यांचा अंदाज होता आणि तेवढं मतदान या सत्तांतराला पुरेसं आहे असं त्यांचं मन सांगत होतं. त्या आधारे काही अपक्षांची साथ घेत सत्ता काबीज करता येईल आणि असल्या गोष्टी करण्यात रामकृष्ण देसाई तरबेजच. आपण पुन्हा दिल्लीत माघारी, पण उंचावलेलं प्रोफाईल घेऊन. हरिभाईंची कल्पना. उंचावलेलं प्रोफाईल सोडून बाकी गोष्टी त्यांनी पक्षाध्यक्ष, तिन्ही माजी अध्यक्षांसह असणारा पॉलिटब्यूरो, आणि अर्थातच स्वामीजी यांना सांगून ठेवल्या होत्या. स्वामीजींना सांगणं महत्त्वाचं. कारण अंतिम वेळ येते तेव्हा पक्ष, संघटना, इतर संघटना आणि संस्था अशा विश्वाचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडेच धाव घ्यावी लागते आणि एवीतेवी आपण तर मूळचे पक्षाचे नाहीच. संघटनेकडून पक्षात आलो ते पक्षाचं काम संघटनेनुरूप चालावं यासाठीच. या सर्व मंडळींचाही हरिभाईंच्या निर्णयाला होकार होताच. हरिभाईंच्या हुशारीचा प्रश्न नव्हता. "हरिभाई, सत्ता पदरी आलीच तर हे राज्य आपल्या सत्ताकारणाचं मॉडेल म्हणून पुढे आणता येणार आहे, त्या दिशेने पडणारं तुमचं प्रत्येक पाऊल महत्त्वाचं," स्वामीजी म्हणाले होते. स्वामीजींचा पक्षाशी थेट संबंध नव्हता, पण तो नाहीच असंही म्हणता येत नव्हतं. स्वामीजी आणि त्यांचा अनुयायीपरिवार हा पक्षाचा कणा होताच नाही तरी.
ठरल्यासारखं सारं काही चाललं होतं, अपवाद एका गोष्टीचा. निर्णायक गोष्ट. निकालाच्या दिवशी दोनशे अठ्ठावीस जागांच्या विधानसभेत पक्षाला एकशे वीस जागा मिळाल्या तेव्हा त्यांत देसाई नव्हते. रामकृष्ण देसाई पराभूत होऊ शकतात हे कुणाच्याच हिशेबात नव्हतं. हरिभाईंच्याही. आणि त्यामुळं देसाईंनंतर कोण याचा विचार त्यांनीही केला नव्हता, आणि पक्षानंही. देसायांचा पराभव आणि पक्षाला सत्ता मिळणं याचा अर्थ मात्र हे हरिभाईंमुळंच घडलं असा मांडला गेला आणि पाहता-पाहता त्याने जोर धरला. आपला अंदाज चुकला तो हा, हे हरिभाईंना उमगलं ते काही काळानेच.
"हरिभाई, तुम्ही आता परत प्रदेशात जाणं गरजेचं आहे. तिथे त्या क्षमतेचं कोणीही नाही. पराभूत असल्यानं देसायांना विधान परिषद वगैरेंतून पुढं आणणं आपल्या पद्धतीत बसणार नाही..." स्वामीजींच्या एकेका शब्दाची गती अत्यंत संथ असते. ही वाक्यं पूर्ण उच्चारायला त्यांना पूर्ण मिनिट लागलं होतं. पण त्यामुळंच त्यांच्या त्या बोलण्यातील आदेश अधिक स्पष्टपणे व्यक्त होत होता. हरिभाईंना ते जाणवलं तसं ते एकदम सावध झाले. कुठं तरी मनाच्या कोपर्यात त्यांना जाणवलं की, आपलं बोलणंही तसंच संथ असतं नाही तरी... पण, स्वामीजींशी स्वतःची तुलना? क्षणांत त्यांनी तो विचार बाजूला सारला. मुख्य मुद्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं.
"पण स्वामीजी, मी तिथली आत्ताच्या घडीची कामगिरी पूर्ण केली आहे. आता मला इथलं काम करायचं आहे..."
"कामगिरी पूर्ण झालेली नाही. ती तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तिथे स्थिर सरकार असेल आणि आपल्या कल्पना प्रत्यक्षात येऊ लागतील. ते काम तुम्हालाच करावं लागेल."
"पक्षांतून त्याला साथ मिळणार नाही. देसाई आहेतच." हरिभाईंनी सुरात विश्वासाचा मोकळेपणा आणला.
"देसाईंची व्यवस्था करता येईल. राज्यात ते नकोत. पराभवाची कारणं कोणाला माहिती नाहीत, असं नाही. त्यामुळं त्यांचं तिथे असणं मारक असेल. पक्षातून तुम्हाला साथ मिळेल, एवढं कठीण नाही ते..." स्वामीजींच्या सुरात आश्वासकता होती.
एकूणच आपण मुद्दा थोडा अधिकच ताणला की काय असं हरिभाईंना 'एवढं कठीण नाही ते' या शब्दांतील सुरावरून वाटून गेलं. मुळात असे शब्दही स्वामीजी वापरत नाहीत. ते ज्याअर्थी आले त्याअर्थी त्यांचा आणि इतर प्रमुखांचा निर्णय आधीच झाला असावा हे त्यांच्या ध्यानी आलं आणि त्यांनी शरणागतीचा सूर लावला.
"स्वामीजी, तुमचा कोणताही आदेश मी जमिनीवर पडू दिलेला नाही. हाही पडणार नाही..."
स्वामीजींच्या मंद हसण्याचा आवाज आला आणि फोन बंद झाला.
---
कायद्याने चौतीस सदस्य मंत्रिमंडळात सामावणं शक्य असतानाही हरिभाईंच्या नेतृत्वाखाली बावीस सदस्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा उर्वरित बारा जागांचं काय हा प्रश्न अनेकांच्या मनात होता. या बारा जागा रिक्त राहण्याच्या अनेक कारणांची चर्चा सुरू झाली तेव्हा हरिभाई मनातल्या मनात हसत होते. पक्षनेतृत्वाची साथ नसणे येथपासून ते पक्षांतर्गत राजकारणात देसायांचा प्रश्न येथपर्यंतचे कयास झालेच. माध्यमं त्यात आघाडीवर. प्रत्यक्ष सत्ताकारणातला अनुभव हरिभाईंना नाही, त्यामुळं त्यांना हे निभावणं मुश्किल जाईल वगैरे अटकळी बांधल्या जाऊ लागल्या. हरिभाई हसायचे, कारण स्वामीजींच्या जोरावर मंत्रिमंडळाचा आकार त्यांनीच लहान ठेवला होता. मुद्दाम. कमीतकमी मंत्र्यांच्या जोरावरच उत्तम सरकार, जे सरकार प्रशासनाचा आदर्श ठरेल, हे त्यांना दाखवायचं होतं. आणि त्या दिवसानंतर ते तसं दाखवत गेले. सार्वजनिक-खासगी भागिदारी, प्रत्येक खात्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील एक व्यावसायिक तज्ज्ञ सल्लागार, नोकरशाहीतील मोजक्या अधिकार्यांच्या समित्या आणि आपल्याकडे व आपल्या सहकारी मंत्र्यांकडं केवळ नेतृत्वाची भूमिका अशी घडी बसवण्यासाठी त्यांना पहिले तीन महिने लागले. पण मग मागे वळून पाहण्याची वेळ आली नाही. सरकारी महामंडळांवरच्या राजकीय नेमणुका करताना कटाक्षाने किमान तीन व्यावसायिक तज्ज्ञ घेण्याची पद्धत त्यातूनच पुढे आली. हरिभाईंच्या मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या वर्षपूर्तीपर्यंतच राज्यानं औद्योगिक विकासात सहाव्या क्रमांकावरून दुसर्या क्रमांकावर उडी घेतली तेव्हा हरिभाईंकडे पाहण्याचा माध्यमांचा दृष्टीकोन बदलून गेला. 'नवे नेतृत्त्व', 'नव्या जगाचे नवे नेतृत्त्व' वगैरे मुखपृष्ठकथा होऊ लागल्या आणि हरिभाईंना आपल्या चुकलेल्या अंदाजाचं समाधान वाटू लागलं.
---
आपल्या संघटनाविश्वाच्या संकल्पचित्रातली व्यवस्था उभी करावयाची असेल तर काही गोष्टी कराव्याच लागणार होत्या. त्या दिशेने पावलं टाकताना काही गोष्टी अटळपणे घडणार. तशी ही घटना. घटना म्हणा किंवा घटनाचक्र म्हणा. पहिला दहशतवादी हल्ला झाला तेव्हा कोणतीही प्रतिक्रिया राज्यात उमटली नव्हती. ती आम्ही येऊ दिली नाही. माझ्या सूचना स्पष्ट होत्या. सूचना किंवा आदेश. पोलीस महासंचाक आणि तीन मुख्य शहरांच्या पोलीस आयुक्तांशी मी बोललो. एकाचवेळी. "रिमेंबर, वन थिंग आय वॉण्ट फॉर शुअर अँड दॅट इज पीस." माझं हे एकच वाक्य होतं, पण त्याची पार्श्वभूमी आधीच्या काळात मी दाखवून दिली होती. कायद्याच्या आड येणार्यांना नीट बांधून घालण्याचं स्वातंत्र्य मी त्यांना दिलं होतं. आमच्याच पक्षाचे लोक असले तरीही तिथे हस्तक्षेप नाही. नंतरच्या काळात पक्षातील लोकांना त्याची कल्पना आल्यानंतर त्यांनी पक्षच बदलला. कार्यकर्त्यांमधील हा बदल पुरेसा विश्वासार्ह असल्यानं त्या पहिल्या हल्ल्यानंतर राज्यात काहीही झालं नाही. हल्ला राज्याचा मानबिंदू मानल्या जाणार्या संग्रहालयावर होता. तरीही. दुसरा हल्ला मात्र प्रच्छन्न होता. त्यात असं विशिष्ट लक्ष्य नव्हतं. थेट बाजारपेठेत घुसून गोळीबार. दुसर्या क्रमांकाचं शहर. हा झाला तेव्हा मात्र त्यावरची प्रतिक्रिया आटोक्यात ठेवणं शक्य नाही हे माझ्या ध्यानी आलं. त्यावेळीही मी अधिकार्यांशी बोललो. सूचना एकच होती - "लोक बिथरले असतील. त्यांना काबूत आणणं पहिल्या दोन दिवसांत शक्य होणार नाही. तिसर्या दिवसापासून लोकच शांत होऊ लागतील तेव्हा पोलिसांना वरचष्मा मिळेल."
मी फिरतो. राज्यभर. मुख्यमंत्री असलो तरी लोकांमध्ये थेट मिसळतो. परिणामी म्हणजे जनमनाची नाडी मला कळते. मला एकट्यालाच नव्हे. माझ्यासारखं फिरणार्या प्रत्येकाला ती कळू शकते. फक्त त्या आकलनाला नेमकेपणा प्राप्त होतो तो सत्तेचं पद असल्यानं. त्या पदाचा परिणाम म्हणजे लोकांना समजून घेतल्यानंतर कामं करणं शक्य होतं. त्यानंतर लोकांशी एक वैयक्तिक नातं जोडलं जातं. त्यातून त्यांच्या भावना आपल्याकडे नेमक्या व्यक्त होऊ लागतात. मग जनमन अधिक नेमकेपणानं कळत जातं. गेल्या काही वर्षांतील आंतरराष्ट्रीय आणि त्याही आधीपासून देशातील परिस्थिती ठाऊक असल्याने लोकांमध्ये असंतोष होताच हे माहीत होतं. पहिला हल्ला झाला त्यानंतरच्या काळात मी जिथं - जिथं गेलो तिथं तो होता. त्या असंतोषालाच दुसर्या हल्ल्यानंतर वाचा फुटली. राज्य पेटलं. आमच्या संकल्पचित्रातली व्यवस्था आकारायची असेल तर जनमन माझ्या पाठीशी असलं पाहिजे आणि ते तेव्हाच येऊ शकतं जेव्हा त्याला त्याची अस्मिता गवसते. उभं राहण्याचा समाजाचा विचार असणं आणि तशी तयारी होणं यात अंतर असतं. ते या दुसर्या हल्ल्यानं मिटवून टाकलं. प्रतिक्रियाच अशी होती की, पोलीस काहीही करू शकणार नव्हते. आणि ती प्रतिक्रियाच होती. कोणी त्याविषयी काहीही म्हणोत. ही प्रतिक्रिया रोखणं ही पोलिसांची जबाबदारी होती वगैरे सारं खरं. पण पोलिसांनी तसं करायचा प्रयत्न केला असता तर प्रचंड हानी झाली असती. पोलिसांचीही, लोकांचीही. त्यापेक्षा हल्ल्याचं प्रत्युत्तर या स्वरूपात झालेली हानी कमीच. मला ठाऊक आहे, हे पटणार नाही काहींना. पण मला पोलिसांना आपल्याच लोकांविरुद्ध उभं करायचं नव्हतं. राष्ट्राच्या उभारणीची एक किंमत म्हणूनच मी या प्रक्रियेकडे पाहतो. संघटनाविश्वाच्या संकल्पचित्रात ते बसत नसलं तरी संकल्पचित्राची तयारी म्हणून ते आवश्यक आहे इतकंच. संकल्पचित्र पूर्ण निरोगी व्यवस्थेत आकाराला येऊ शकतं. त्यासाठी आधी सध्याच्या स्थितीत देशाला झालेल्या आजाराचं निदान करावं लागतं. ते आम्ही केलं होतं. समाजात भिनलेला धारिष्ट्याचा अभाव हा एक रोगच होता. आपल्यावर होत असलेल्या अन्यायावर किंवा हल्ल्यावर प्रतिहल्ला करण्यासाठी एक राष्ट्र म्हणून एकत्र येणं हे या समाजाच्या ध्यानी नव्हतं. त्या दिशेनंच जाणं गरजेचं होतं. हल्ल्यानंतरच्या प्रतिक्रियेतून ते उमटून दिसलं, स्पष्टपणे.