परिवर्तन!

पृष्ठ क्रमांक

श्रावण मोडक

हल्ल्यानंतरच्या घडामोडींबद्दल मी टीकेचा धनी झालो आहे हे खरं आहे. पण या टीकेला आता लोक उत्तर देतील हे मला पक्कं ठाऊक आहे. लोक. माझ्या राज्याचे लोक. गेल्या तीन वर्षांत माझ्या सरकारनं काय केलं आहे, हे राज्यातील लोकांना पुरतं ठाऊक आहे. राज्य भारनियमनमुक्त झालं आहे. राज्यातील गुंतवणूक देशात सर्वाधिक झाली आहे. औद्योगिक विकासात राज्य सातत्यानं दुसर्‍या क्रमांकावर राहिलं आहे. राज्यातील सामान्य जीवन इतरांनी हेवा करावा असं आहे. हे खरं आहे की दारिद्र्य निर्मूलनात आम्ही अजून इतर आघाड्यांइतके यशस्वी झालो आहोत असं आकडेवारीवरून दिसत नाही. पण हे आकडे नेहमीच शेवटाला फुलत असतात. आधी इतर आकडेच मोठे होत जातात. त्यात पायाभूत संरचना, वीज, पाणी, उद्योग हे आधीचे आकडे. शेतीचा आकडा शेवटून दुसरा आणि दारिद्र्य निर्मूलनाचा शेवटचा.

हल्ला आणि त्यावरची प्रतिक्रिया आणि त्यानंतर राज्यात जे झालं त्याचं शिरकाण वगैरे वर्णन करत होणारी टीका एकीकडे आणि दुसरीकडे हे वास्तव प्रगतीचं चित्र.

हे घडणं अशक्य नाही. लोकमानस तसं घडवण्याचं काम होत गेलं पाहिजे. एक राष्ट्र म्हणून विचार करणं वेगळं आणि तशा रीतीनं उभं राहणं वेगळं. हे उभं राहण्याचं काम आमच्या राज्यात झालं. समाज एकगठ्ठा झाला. राज्यातील दोन तृतीयांश ग्रामपंचायती आमच्या पक्षाच्या ताब्यात आल्या. जवळपास तसेच आकडे इतर स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतचे आहेत. हे बोलकं आहे.

हल्ला, त्यावरची प्रतिक्रिया आणि नंतरचा हा काळ विचारात घेतला तर आता टीकेला नुसतंच उत्तर देण्यात अर्थ नाही हे माझ्या ध्यानात आलं आहे. हे उत्तर जनतेकडूनही गेलं पाहिजे. गेल्या तीन वर्षांत केलेली कामगिरी जनतेची साथ मिळवण्यास पुरेशी आहे. मला खात्री आहे की, पुढच्या विधानसभेत मी दोन तृतियांश बहुमताचा मुख्यमंत्री असेन.
---

दिल्लीत बसून पुन्हा एकदा आपल्या राज्याकडे पहायचं हे शिशिरच्या किती नाही म्हटलं तरी जिवावर आल्यासारखंच होतं. म्हणजे, त्याला प्रत्यक्षात राज्यात जायचं होतं. संपादक नाही म्हणणार नाहीत हे निश्चित. पण शिशिरलाच कार्यक्रम ठरवता येत नव्हता. हरिभाईंशी परिचय असला तरी, गेल्या काही काळात आपण केलेल्या लेखनामुळे त्यांच्याकडं किती वाव मिळेल याची खात्री नसल्यानेच त्याचा कार्यक्रम ठरत नव्हता. हल्ल्यानंतरच्या दंगलींबद्दल हरिभाईंना थेट जबाबदार ठरवणारं त्याचं लेखन टोकदार होतंच. वेळ अशी आली की, संपादकांनीच शेवटी विचारलं, "नो प्लॅन्स टू गो टू होम स्टेट?" मग मात्र थोडं अवघड झालं आणि शिशिरने हात-पाय हलवण्यास सुरवात केली. पहिला कॉल हरिभाईंच्या कार्यालयाला.

"धिस इज शिशिर फ्रॉम एक्स्प्रेस, देल्ही. मे आय टॉक टू हरिभाई, प्लीज..."

हरिभाईंचा प्रधान सचिव यतींद्र जाधव. शिशिर म्हटल्यावर फारसं काही करण्याची गरज नाही. हरिभाईंनाच विचारावं लागेल. त्यानं तसं स्पष्ट ऑपरेटरला सांगितलं आणि काही क्षणांनी आत फोन गेला.

"हरिभाई, शिशिर बात कर रहा हूं..."

"अरे हां शिशिर. कैसे हो? बहुत दिनोंके बाद याद किया! फर्माओ..." हरिभाई. जुन्या ओळखीशी प्रामाणिक राहात.

"कुछ नही. आनेका सोच रहे है. सो थॉट दॅट आय शुड फर्स्ट टॉक विथ यू अँड सी हाऊ थिंग्ज आर..."

"जस्ट टेल युवर प्लॅन टू जाधव. ही वुईल एन्शुअर दॅट यू गेट माय टाईम. नो इश्यूज. यू वॉण्ट टू अकंपनी मी इन टुअर्स? इफ दॅट इज द केस, देन गेट इन्फर्मेशन फ्रॉम जाधव अँड फिक्स युवर प्रोग्राम. अँड मेक इट अ पॉईंट, व्हेन यू रीच हिअर, कम ओव्हर फॉर अ डिनर फर्स्ट. आय जस्ट वॉंट टू गो बॅक टू माय देल्ही डेज..."

हरिभाईंचा हा एवढा संदेश शिशिरला पुरेसा होता. सारं काही आलबेल असल्याचं सांगणारा. मुलाखतीची सुरवात कशी करायची हाही प्रश्न राहिला नव्हता. पण त्याला अपेक्षित नव्हता इतका बदल हरिभाईंमध्ये झाला होता. दिल्लीतील दिवसांत ते नेहमी पटवून देण्याच्या भूमिकेत असायचे. आता ते नव्हतं. ही माझी भूमिका आहे आणि ती राज्यातील जनतेनं स्वीकारली आहे, एवढ्यावर ते ठाम होते. त्यापलीकडे उत्तर नाही.

मुलाखत म्हणजे थोडी चकमकच झाली.

"हल्ला, दंगली या दोन्ही घडामोडींमध्ये तुम्हाला मोठा फटका बसला..."

"नाही. हा तुम्हा मंडळींचा तर्क आहे फक्त. तसं काही घडलेलं नाही. माझ्यासमवेतच्या दौर्‍यात तुला तसं दिसलं? लोकभावना माझ्या माग्गे आहे. हल्ल्यानंतर घडलेल्या घटना या केवळ प्रतिक्रियेच्या स्वरूपाच्या होत्या. प्रतिक्रियाच, पण त्यांचं प्रमाण मोठं. कारण वर्षानुवर्षं दबलेल्या भावनांचा तो स्फोट होता..."

"प्रश्न तो नाही. सरकार म्हणून, मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कमी पडलात. नियंत्रण नव्हतं परिस्थितीवर."

"हाही तुमचा समज आहे. तसं नाही. पहिले दोन दिवस परिस्थिती नियंत्रणात नव्हतीच. येणारही नव्हती. कोणीही असतं तरी. लष्कर आणलं चौथ्या दिवशी. पण त्याआधी पोलिसांनी परिस्थितीवर ताबा मिळवला होता."

"ही तुमची बाजू झाली. पण अनेक ठिकाणी पोलिसांनी बघ्याची भूमिकाच घेतली. हल्लेखोरांबाबत कळवूनही हालचाल झाली नाही."

"अपवादात्मक एक-दोन ठिकाणी हे झालेलं असू शकतं. बट यू काण्ट अ‍ॅक्यूज ऑफ अ डिझाईन देअर. सिन्स द सिच्युएशन वॉज एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी."

"इट मीन्स दॅट यू वेअर नॉट प्रिपेअर्ड फॉर सच अ सिच्युएशन."

"आयल अ‍ॅडमिट इट. बट, विथ फेअर रीझन्स. गेल्या काही वर्षांपासून राज्यात ज्यांची सत्ता होती, त्यांनी समाजात असं काही उद्भवेल याचा विचारही न करता सत्तेचा गैरवापर केला. त्यातून ही स्थिती निर्माण झाली. ती प्रशासनातही घुसलेली होती. तिच्यावर एका झटक्यात अशी मात करणं शक्य नाही हे दिसून आलं इतकंच. आयम शुअर, द पीपल ऑफ द स्टेट डू नॉट सी थिंग्ज इन द वे यू सी देम..."

"लोकांना असं का वाटत नाही?"

"कारण ते आमच्या विचारांचेच आहेत."

"हा सारा तुमच्या विचारसरणीचा दुष्पपरिणाम आहे असं तुम्हाला अजिबात वाटत नाही? इथं समाजात फूट पडली आहे. तो विचारसरणी लादण्याचा परिणाम आहे? इथल्या सरकार नामक व्यवस्थेला रंग दिला गेलाय?"

"म्हणजे? तसं का वाटावं? सरकार आम्ही स्थापन केलं ते आमच्या विचारांचा निवडणुकीच्या रिंगणात पुरस्कार करत. व्यवस्थेला रंग आधी नव्हता? प्रत्येक ठिकाणी होता. नावं असोत वा आणखी काही. ते चित्र बदलतंय हे खपत नाही विरोधकांना. त्यातून ही टीका होतेय. हे तुम्ही समजून घ्या. कारण, राज्यातील जनतेनं ते समजून घेतलं आहे. तीच त्या टीकेला उत्तर देईल..."

शिशिरला विचारांत सोडूनच हरिभाईंनी मुलाखत संपवली होती. हा माणूस असा उद्दाम किंवा ताठर कसा झाला हे कोडं होतं.
पण हरिभाईंच्या लेखी तो आत्मविश्वास होता आणि हा आत्मविश्वास फुका नव्हता हे निकालाने सिद्ध केलं. विधानसभेच्या दोनशे अठ्ठावीसपैकी एकशे साठ मतदार संघांमध्ये पक्षाचा विजय झाला, तेव्हा हरिभाई अत्यंत ताठ चेहर्‍याने पत्रकारांना सामोरे गेले. पहिल्या रांगेत शिशिर होता. त्याच्याकडे त्यांनी फक्त एक कटाक्ष टाकला. गेल्या तीन वर्षांतील सरकारचं प्रभावी कामकाज, आपली निष्कलंक प्रतिमा आणि पक्षाबरोबरच समितीकडून मिळालेली साथ या तीन मुद्यांवर भर देणारं त्यांचं निवेदन झालं. पुढं झालेली प्रश्नोत्तरं त्या दिवशीच्या बातमीच्या दृष्टीनं निरर्थकच होती.
---

हल्ला आणि दंगली यामुळं, आधीच्या अडीच वर्षांत कमावलेलं गमावण्याची वेळ किमान प्रतिमेच्या संदर्भात आली आहे हे हरिभाईंच्या ध्यानी आलं होतंच. त्यांनी त्याच आघाडीवर काम सुरू केलं.

राज्याला पहिल्या क्रमांकावर नेण्याची माझी जबाबदारी आहे, असं ते सांगू लागले. नुसतं सांगू लागले नाही, तर त्यासाठी कष्ट उपसू लागले. पहिल्या अडीच वर्षांतील शासनव्यवस्थेचं सूत्र आता त्यांनी अधिक बळकट केलं. मंत्रिमंडळाचा आकार पुन्हा लहानच राहिला. महामंडळं व्यावसायिकच होत गेली. काही महामंडळांची भूमिका संपल्यानं ती खारीज झाली. काही खात्यांचं विलीनीकरण झालं. प्रशासनाची जणू नवी व्याख्या मांडायलाच त्यांनी सुरवात केली.

राजकीय आघाडीवर हरिभाईंना कोणाचंच आव्हान नव्हतं. जणू एकहाती, हिंमतीवरच त्यांनी राज्यात दोन तृतियांश बहुमत मिळवलं होतं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला नियंत्रण मिळवून दिलं होतं. समाज दुभंगलेला होता त्याचा हा लाभ असला तरी, त्याऐवजी पक्षाची सत्ता हाच मुद्दा प्रकाशात राहील इतकी दक्षता घेणं अवघड नव्हतं. माध्यमांमध्ये राज्यात त्यांना कोणीही आव्हान देण्याच्या स्थितीत नव्हता. पूर्वी विरोधकांच्या हातची असणारी माध्यमंही आता त्यांच्या बाजूला आली होती. दिल्लीतून जो विरोध व्हायचा, टीका व्हायची ती तेवढीच. हरिभाईंभोवतीचा गटच असा होता की, सत्तेतील ताकद लीव्हरेज करणं हरिभाईंना सहज शक्य होत गेलं.

त्याच ताकदीच्या जोरावर मग परकीय गुंतवणूक राज्यात येत गेली.

मोठ्या उद्योगांनी आणखी काही वाटा मोकळ्या करून दिल्या.

"हरिभाई दिलेली वचनं पाळतात." उद्योजकांची भाषा ठरून गेली.

रस्ते, वीज, पाणी या तिन्ही आघाड्यांवर जवळपास शून्य अनुशेषापर्यंत राज्य येऊ लागलं.

दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींची संख्या एकूण लोकसंख्येच्या पंधरा टक्क्यांच्या आसपास आली.

संघटनाविश्वाच्या संकल्पनेतील समाजघडण राज्यात होऊ लागली.

स्वामीजींकडे स्थान उंचावत गेलं तसं संघटनाविश्वात एक संदेश जाऊ लागला - हरिभाई हेच पुढचं नेतृत्त्व आहे.

याच काळात पक्षातही बदल झाले. स्वामीजींनीच त्यासाठी पुढाकार घेतला. तरुण नेतृत्त्व पुढं आणण्याचं पहिलं पाऊल टाकलं गेलं. सहाही सरचिटणीस चाळीशीतले निवडले गेले. त्यापैकी दोन हरिभाईंसमवेत पूर्वी चिटणीस होते. एक उपाध्यक्ष हरिभाईंबरोबरच सरचिटणीस होते.

दुसर्‍या टर्ममधील पहिले सहा महिने संपले. शिशिर आणि आणखी काही जुने दिल्लीकर मित्र जेव्हा राज्यात पुन्हा आले तेव्हा त्यांना परिस्थितीतील हा बदल जाणवेलसा दिसून आला.

मग पुढचं काम सोपं होतं.

"हे सारं आपण करू शकतो, फक्त तशी दिशा धरण्याची आणि धीर ठेवून काम करण्याची गरज आहे... संपूर्ण देशात हे करणं आव्हानात्मक नाही..." इतर काही भागातील भीषण परिस्थितीच्या तुलनेत हे इतकं उजवं चित्र पाहूनच प्रभावित झालेल्या दिल्लीकर पत्रकारांच्या समूहाला हरिभाई सांगत होते.

"मी व्यावसायिकता आणली प्रशासनामध्ये. आमच्या संघानं इथे लाल फीत जवळपास संपवण्यात यश मिळवलं. माहिती तंत्रज्ञानाचा आमच्या इतका शासनव्यवस्थेतील वापर आज इतर कोणत्याही राज्यात होत नसावा. ई-प्रशासन हा आमचा कणा आहे. तोच कणा या व्यवस्थेतील प्रत्येक हिस्सेदाराला लाभ देतो. त्यांचा आणि सरकारचा संबंध भौतिक स्वरूपात जवळपास संपला, परिणामी भ्रष्टाचाराला चाप बसला, त्याच्याच परिणामी निर्णय प्रक्रिया गतीमान झाली. पारदर्शकही झाली..."

संघटनाविश्वाच्या संकल्पचित्रात हे तर होतंच, पण आणखी एक गोष्टही होती. सांस्कृतिक अस्मिता. तीही राज्यातील परिस्थितीत होती. म्हणजे प्रयोगाला पूर्णत्व येत होतं. हरिभाईंच्या आत्मविश्वासाला एक धार होती, तिचं तेच कारण होतं.

हरिभाईंचा अंदाज होता. मुखपृष्ठकथा येतीलच. त्यापलीकडे आपल्यावरही लक्ष केंद्रित झालं असेल.

तसं होणारच होतं. आणि हरिभाईंना पुन्हा दिल्ली दिसू लागली.

सार्वत्रिक निवडणूक आणखी अडीच वर्षांनी होती. पुरेसा वेळ हाती होता.

'नर्मदा' या अधिकृत निवासस्थानी एका संध्याकाळी हरिभाई पुढचे अंदाज करू लागले...
---