परिवर्तन!

पृष्ठ क्रमांक

श्रावण मोडक

आत्मविश्वास आणि उद्दामपणा यातील सीमारेषा बहुधा अत्यंत धूसर असते. एखाद्याच्या आत्मविश्वासाचा आधार पुरेसा पक्का नाही असे समोरच्याला वाटत असेल तर तो आत्मविश्वास त्याला उद्दामपणा वाटू शकतो. त्याचवेळी तो आत्मविश्वास पक्क्या आधारावर आहे, असे पहिल्याला वाटत असेल तर तो त्याच्यालेखी पक्का आत्मविश्वासच असतो. यात वास्तव किती असतं आणि किती अंदाज-अटकळी असतात हे प्रकरणानिहाय बदलू शकतं. बदलांची ही शक्याशक्यताच माणसांच्या नातेसंबंधांतील गतिशीलता ठरवत असते. हरिभाईंना हे सारं ठाऊक होतंच असं म्हणता येणार नाही. स्वामीजींना मात्र ते पक्कं ठाऊक होतं. त्या स्थानावर ते पोचले ते अशा चाणाक्षपणामुळेच, पण तो त्यांचा छुपा गुण होता. हरिभाईंनाही तो पुरेसा ठाऊक नव्हता. पण ते नंतर सिद्ध होणार होतं.

स्वामीजींच्यालेखी संघटनाविश्वाचं संकल्पचित्र हरिभाईंच्या राज्यात तंतोतंत उतरत होतं का? याचं उत्तर हरिभाईंनी कधी शोधलं नाही. संकल्पचित्राचं त्यांचं फक्त राजकीय अंगानं झालेलं आकलन ते गृहीत धरून चालले होते. स्वामीजींचं आकलन थोडं वेगळं होतं. त्यांच्या या आकलनात संकल्पचित्राला एक गहिरा सांस्कृतिक रंगही होता. संघटनाविश्वाच्या व्याख्येतील 'सुसंस्कृतपणा'ही त्यात बराचसा होता. हे वेगळेपण असेल थोडंसंच, पण कळीचं. संघटनाविश्वाच्या या संकल्पचित्रात सातत्यानं हल्ला आणि दंगल आणि त्यानंतरची उभी फूट यांच्या चर्चेला वाव नव्हता. तो टाळणं हरिभाईंना जमत नव्हतं हे ध्यानी न येण्याइतके स्वामीजी भोळे नव्हते. ते राजकारणात नव्हते. पण राजकारण त्यांच्याभोवतीच फिरायचं, किमान संघटनाविश्वातलं तरी नक्कीच.

"हरिभाई, जे झालं ते झालं. ते मागे टाकणं गरजेचं आहे. कारण आपल्या संकल्पचित्राला त्यामुळं फटका बसतोय..." स्वामीजी हरिभाईंना म्हणाले.

"शंभर टक्के बरोबर. माझा तोच प्रयत्न सुरू आहे. म्हणून मी सातत्याने राज्यात झालेल्या भौतिक प्रगतीचा विषय बोलतो..." हरिभाई म्हणाले. पण ते तितकंसं बरोबर नव्हतं.

"तुमच्या भाषणात अनेकदा उग्र प्रतिकाराचे मुद्दे असतात. तेही कमी केले पाहिजेत."

पेच इथेच होता. स्वामीजींना ते मुद्दे कमी करून हवे होते, त्यांच्या दृष्टीने व्यापक हेतूसाठी. हरिभाईंना ते मुद्दे तसेच ठेवायचे होते ते त्यांच्या दृष्टीने असलेल्या व्यापक हेतूसाठी.

हरिभाई आणि स्वामीजी यांच्या व्यापक हेतूंमध्ये कळीचा फरक होता. तोच त्यांच्या आकलनातील फरक. हरिभाईंच्यालेखी संघटनाविश्वाचं संकल्पचित्र राज्यासारखंच देशाच्या स्तरावरही नेता येत होतं. स्वामीजींच्या लेखी ते तसं न्यायचं असेल तर हल्ला आणि त्याचे परिणाम हे मात्र त्यातून बाजूला काढणं गरजेचं होतं. हरिभाई त्या संकल्पचित्रात स्वतःला पहात होते. स्वामीजींच्या चित्रात अशा व्यक्तींना थारा नव्हता. ते चित्र व्यक्तिनिरपेक्ष होतं. त्या चित्रातील सांस्कृतिक एकात्मता हरिभाईंच्या लेखी राज्यासारख्याच परिस्थितीतून येऊ शकत होती. स्वामीजींना त्याची गरज वाटत नव्हती. सांस्कृतिक एकात्मता वेगळ्या पद्धतीनं इतर एका राज्यात आली होती हा त्यांचा दाखला होता.

हरिभाईंना बाजूला करणं मात्र त्या घडीला कठीण होतं. संघटनाविश्वात हरिभाई यशस्वी होते. त्यांच्यामुळं संघटनाविश्वाच्या बाहेर मात्र साथ मिळत नव्हती. ती साथ नसेल तर सत्ता दूर. म्हणजे, हरिभाईंना दूर केल्याशिवाय ही साथ मिळणार नाही आणि ती नाही तोवर सत्ता नाही. हरिभाईंना दूर करूनही संघटनाविश्व स्थिर ठेवायचं असेल तर तसं सबळ कारण हवं. म्हणजे मग हरिभाई अयशस्वी ठरले पाहिजेत. अपयशी माणसाला संघटनाविश्वात स्थान नसतं. पन्नास वर्षांचा इतिहास किमान तेवढं शिकवत होता. ते ध्यानी घेऊन तशी पावलं टाकणं गरजेचं होतं.

चर्चा संपली तेव्हा स्वामीजींनी अंतिम स्वरूपात आपला निर्णय दिला होता - हरिभाईंनी सारेच पवित्रे टोन डाऊन करावेत. हरिभाईंनी त्याला होकार भरला.

पण त्यांना स्वतःलाच खात्री नव्हती हे कितपत जमेल याची. त्यांचा आता तो पिंडच झाला होता आणि म्हणूनच टीकेकडे दुर्लक्ष करून आपली रेष फक्त मोठी करणं त्यांना जमत नव्हतं. त्यांचे अंतर्गत टीकाकार म्हणायचेच नाही तरी, "त्यांचा 'मी' खूप मोठा आहे!"
---

आपला कोणताही अंदाज चुकू नये यासाठी दक्षता घ्यायचं स्वामीजींनी ठरवलं तेव्हा सार्वत्रिक निवडणूक वर्षावर आली होती.
या दोन वर्षांत संघटनाविश्व, पक्ष, हरिभाई आणि इतर मंडळी यांची प्रतिमा, स्वामीजींच्या सल्ल्याविपरित हरिभाईंमुळेच अधिक उग्र होत गेली आणि संघटनाविश्वाचं समाजघटनेविषयीचं संकल्पचित्र भडक ठरू लागलं होतं. परिस्थिती दुरूस्त करावी लागणार होती.

संघटनाविश्वाला प्रत्येक निवडणूक जिंकण्याची घाई नसते. आपली वेळ येईतोवर थांबण्याची तयारी असते. स्वामीजींनाच हे फक्त पक्कं ठाऊक होतं. त्यांना आणि त्यांच्या नियामक मंडळाला. हरिभाई वगैरेंचं तसं नसतं हेही त्यांना ठाऊक होतं. संकल्पचित्राविषयी परिस्थिती दुरूस्त करायची असेल तर एखादी निवडणूक न जिंकता पुढच्या दिशेचा विचार करूनच पावलं टाकावी लागतील हे त्यांना ठाऊक होतं. निर्णय घेण्याची वेळ आली होती.
---

पक्षाच्या नेतृत्वाचा चेहरा म्हणून हरिभाईंचं नाव माध्यमांमध्ये झळकू लागलं. निवडणुकीत विजय मिळाला तर पक्षाचं नेतृत्त्व त्यांच्याकडंच येईल हे बोललं जाऊ लागलं.

हरिभाई प्रचाराचा आधारस्तंभ मानले जाऊ लागले. हरिभाईंनी आपल्या भागात यावं या मागण्या सुरू झाल्या.

हरिभाईंनी प्रचारासाठी आपल्या भागात येऊ नये असं सांगणारे सहकारी पक्षही उभे राहू लागले.

राजकारणात असे पेच प्रत्येक घटकासाठी आवश्यक असतात. पेचावर तोडगा काढण्यात जी शक्ती खर्च होते, तीच शक्ती वास्तवात त्या पेचात गुंतलेल्या काही हिस्सेदारांना चार पावलं पुढं घेऊन जात असते. राजकारणात मुरलेल्या माणसाला ते ठाऊक असलं पाहिजे. नसेल तर तो अशा पेचापुढं हार खातो आणि कायमचा मागं फेकला जातो.

पेचावरचा तोडगा आधी टोकावर आणि मग सामोपचार या दिशेनंच येत असतो. हेही पक्कंच असतं. त्याची जाणीव मात्र प्रत्येक हालचाल करताना हवी.

हरिभाईंसाठी हा पेच होता. त्यांच्याबाबतची स्वीकृती आणि अस्वीकृती अगदी टोकाचीच होती. मध्य गाठणं म्हणजेच पेच सोडवणं. पेच सोडवणं म्हणजेच चार पावलं पुढे. पुढे जाण्यासाठी आवश्यक गोष्टी "भविष्याचं नेतृत्त्व" या प्रसिद्धीतून सुरू झाल्या होत्या. आता फक्त गरज होती ती त्यांच्याकडून त्याला चालना मिळण्याची.
---

मी आक्रमक आहे असं म्हणतात. मी तसा नाही. आक्रमक होऊ पाहणार्‍यांना मी रोखण्याचा प्रयत्न करतो. आत्मविश्वासाने. त्या आत्मविश्वासाला टीकाकार आक्रमकपणा म्हणतात. खरं तर, आज गरज आहे ती त्या आत्मविश्वासाची. तो नसेल तर पुढे सामर्थ्यशाली होणं या देशाला शक्य नाही. मी तेच सातत्यानं मांडत असतो. राज्यात आम्ही काही करू शकलो त्याचं कारण हा आमचा स्वतःतील आत्मविश्वास होता. तो राज्याबाहेरही लोकांना भावलेला आहे. मी लोकांमध्ये जातो, मिसळतो तेव्हा त्यांच्या मनातील भावना कळतात. त्या हेच सांगत असतात. पण...

...त्या समजून न घेणार्‍यांनीच याआधी नुकसान केलं आहे. आता चक्र उलट फिरवण्याची संधी चालून आली आहे.

राज्यात आम्ही गाठलेला विकासाचा नऊ टक्क्यांचा दर हेवा करावा असा आहे आणि त्यातून निर्माण झालेलं चित्र घेऊनच मी आता बाहेर पडलो आहे. पक्षाच्या नेतृत्त्वाचा चेहरा मी होऊ शकलो ते त्यामुळेच. देशातून राज्यासारखीच साथ मिळाली तर हे काम पुढे नेणं मुश्कील नाही.

राज्यात माझा आत्मविश्वास पक्षाला पुढे घेऊन गेला असेल तर तसंच देशातही घडेल.

मी फक्त ते राज्यात घडवलं तशा पद्धतीनं घडवण्याची गरज आहे.

टीकेला चोख प्रत्युत्तर द्यावंच लागेल. इतिहास सांगावा लागेलच. म्हणूनच मी तो सांगत जातोय. सभांमध्ये मिळणारा प्रतिसाद हेच टीकाकारांना उत्तर आहे.

निकालाच्या दिवशी ते दिसेलच.
---

सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा पक्षाला फटका बसला होता. आधीच्या निवडणुकीत मिळालेल्या जागाही पूर्ण संख्येत राखता आल्या नाहीत. सत्ता तर दूरच होती.

आदल्या दिवशीच हरिभाई म्हणाले होते, "माझ्या अंदाजानुसार आम्ही साध्या बहुमताच्या समीप पोहोचू. इतर पक्षांच्या साथीने सरकार आमचे बनेल."

हरिभाईंना पत्रकारांनी विचारलं होतं, "तुमची भूमिका काय असेल?"

"मी राज्यात समाधानी आहे." हरिभाई म्हणाले. ते उत्तर खरं नव्हतं हे त्यांच्या चेहर्‍यावरचं हास्य सांगत होतं.

निकालादिवशीची विश्लेषणं 'पक्षाला फटका बसला या वस्तुस्थितीला हरिभाई जबाबदार' अशी होती.

निकालादिवशीच्या संध्याकाळी हरिद्वारमध्ये स्वामीजींना मोजक्या पत्रकारांनी गाठलं.

"हरिभाईंचं कालचं विधान मी वाचलेलं नाही. पण ते तसं म्हणाले असतील तर त्यांचा अंदाज चुकला आहे इतकंच. त्यांचा अंदाज होता की त्यांच्या राज्याप्रमाणेच देशात प्रतिसाद मिळेल. तो मिळालेला नाही. म्हणजे तोही अंदाजच होता. पक्षाला अधिक परिश्रमांची गरज आहे इतकंच हा निकाल सांगतो. आम्ही शाश्वत स्वरूपाच्या परिवर्तनाचा विचार करत असल्याने आम्हाला या निकालाची चिंता नाही. कारण आमचं काम अधिक महत्त्वाचं आहे."

हरिभाईंच्या भवितव्यात 'परिवर्तन' आहे काय, या प्रश्नावर स्वामीजींनी, तो विषय पक्षाचा असल्याने त्याचा निर्णय पक्ष करेल, असं उत्तर दिलं. त्यांचा अंदाज चुकला आहे, ही पुस्ती मात्र त्यांनी आवर्जून जोडली!

...आणि, नंतरच्या भविष्यात खर्‍या ठरलेल्या, बातम्या झळकू लागल्या, "राज्यात परिवर्तनाची शक्यता!"

paNatee