आठवणी आत्याच्या...

पृष्ठ क्रमांक

डॉ. रवींद्र किंकर

रशियन बाहुल्या बहिणाबाई हे नाव घेतले की 'अरे संसार संसार ...' ह्या गाण्याचे सूर आपोआप मनात फेर धरतात. पण या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवयित्रीच्या गाण्यांबाबत माझ्या आठवणी खूपच वेगळ्या आहेत. अनन्वय फाउंडेशन, पुणे, यांनी या कवयित्रीच्या रचनांची एक अतिशय सुंदर कॅसेट सन २००० मध्ये काढली होती. त्यातील त्यांची जगण्याकडे बघण्याची डोळस वृत्ती दर्शवणारी -

आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर,
अरे जगन मरन एका सासाचे अंतर

ही कविता मनात घर करून राहिली. माणूस आहे आणि माणूस नाही यात फक्त एका श्वासाचे अंतर असते, हे प्रखर सत्य किती सहजपणे आणि अचूकतेने शब्दबद्ध केले आहे ते वाचून मन अंतर्मुख झाले. पुढे एका आत्मचरित्राचे 'एका श्वासाचे अंतर' हे नाव देखील पाहण्यात आले. त्यानंतर या कवयित्रीच्या कविता केवळ सूर तालाकरता न ऐकता त्यापलीकडे जाऊन जीवनाचा संदेश देणारे काव्य म्हणून त्याचा पुनःप्रत्यय घेण्याची सवयच लागली. अशीच एकदा त्यांची शब्द्दोचार आणि नात्याचे पदर उलगडवून दाखवणारी ही कविता ऐकली -

माय म्हनता म्हनता ओट ओटालागी भिडे
आत्या म्हनता म्हनता केवडे अंतर पडे
माय म्हटली म्हटली जशी तोंडातली साय
बाय म्हटली बिरानी जसी भरडली दाय
तात म्हनता म्हनता दातंमदी जिब अडे
काका म्हनता म्हनता कसी मांगे मांगे दडे
जीजी म्हनता म्हनता झाले जीभेले निवारा
सासू म्हनता म्हनता गेला तोंडातुनी वारा

या कवितेने मला वेगळाच छंद लावला. तो म्हणजे, या थोर कवयित्रीस प्रत्ययास आलेली नाती आणि आपण अनुभवलेली नाती यातील सत्य, याचा ताळेबंद मांडणे. त्याचा लेखाजोखा घेणे शक्य होईल का, या विचारांनी मनात थैमान घातले. मन स्वसंवाद करू लागले आणि शेवटी निर्धार केला की भले आपल्या शब्दांत तेवढे सामर्थ्य नसेल, पण अनुभव सूत्रबद्ध होतात का याचा तरी प्रयत्न करू. वरील कवितेतील शब्दांभोवती रुंजी घालता घालता मन ३५/४० वर्षे मागे गेले.

वार होता सोमवार आणि तारीख होती ३० जून १९७५. पुण्यातील सिमला ऑफिसच्या चौकात सकाळी आठ-साडेआठ वाजताच नवी स्वप्ने बघणारी पंधरा-सोळा वयोगटातील मुले-मुली आणि त्यांचे पालक यांच्या गर्दीचा पूर उसळला होता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालान्त परीक्षा मंडळाचे कार्यालय तिथे होते आणि त्या दिवशी मंडळाने एस.एस.सी. (त्यावेळची अकरावी) परीक्षेचा निकाल जाहीर केला होता. आजच्या सारखे इंटरनेट किंवा मोबाईल या सुविधा त्या काळी उपलब्ध नसल्याने परीक्षेचा निकाल पोस्टाने शाळांकडे जात असे किंवा संपूर्ण राज्यभरचा निकाल मंडळाच्या कार्यालयात, नव्हे कार्यालयाबाहेर, पाहण्यास उपलब्ध असे. प्रत्येक परीक्षाकेंद्रानुसार निकालाची यादी बोर्डावर चिकटवून असे बोर्ड पदपथावर ठेवले जात. याठिकाणी निकाल पाहण्यास जमलेल्या मुलांची भीतीयुक्त उत्सुकता व पालकांची 'यंदाच्या अकरावीतून झाली आता सुटका!' अशी छाप गर्दीवर स्पष्ट दिसत होती.

त्या गर्दीत मी ही होतो, पण माझ्याबरोबर मात्र कोणीच नव्हते. वडिलांचे नुकतेच निधन झालेले. आई नव्या नोकरीमुळे रजा घेऊ शकली नव्हती. माझ्या पुढे एक वर्ष शिकणारा मोठा भाऊ, असे निकाल नेहमीच धक्कादायक असतात हे गृहित धरून तिकडे न फिरकणारा. एखाद्या वर्गमित्रास म्हणावे - चल, तुझा माझा काय निकाल लागलाय ते पाहू - तर मी माझ्या मामाकडे, सांगलीजवळच्या इस्लामपुरात राहून शिकल्याने पुण्यात तसे फारसे मित्रही नव्हते. नेमके वातावरण कुंद,पावसाळी हवा. एखादी दुसरी सर येऊन जात होती. हवेत थंडीची व मनात भीतीची झोंबरी लाट उठली होती. अखेर माझ्या परीक्षा केंद्राचा बोर्ड सापडला. केंद्र ग्रामीण भागातील असल्याने परीक्षार्थी कमी होतेच शिवाय थोडे हटके आडनाव -किंकर- असल्याचा फायदा म्हणजे शोधाशोध थोडी सोपी होती . धडधडत्या अंत:करणाने बोट आणि नजर 'क' च्या बाराखाडीवर फिरवली आणि अचानक कुंद पावसाळी वातावरण झपाट्याने बदलत मळभ दूर होऊन सोनेरी किरणांची एक तिरीप त्या बोर्डावर आणि मनावर एकाच वेळी उमटली. कारण चक्क निकालाच्या यादीत नाव सापडले. वरती नाव होते कुलकर्णी सीमा गजानन आणि पाठोपाठ माझे नाव. वर्गातील त्या सीमानेच इंग्रजीतील व्याकरणाचा प्रश्न सोडवण्यास मदत केली होती. अर्थात इंग्रजीबरोबर 'अकरावी पास' ही बिरुदावली कायमची माझी झाली.

आज देखील मनाने पुन्हा त्या परीक्षाकेंद्रावरती नेऊन पोहोचविले. किती भारलेले वातावरण असे! आम्हा मुलांचे पालक दोन पेपरच्या मध्ये येवून थंड ताक किंवा दही भात घेऊन भर उन्हात पेपर संपण्याची वाट पाहत थांबल्याचे आज सुद्धा स्पष्ट आठवते. माझी मामी देखील माझ्यासाठी अशीच डबा घेऊन येत असे. दोन पेपरच्या मधल्या वेळेत आमच्यासाठी त्यांनी केलेली धावपळ आठवली की आजही मन थरथरते आणि पापणीच्या कडा ओलावतात. त्या मामा-मामींकडे धावत जाऊन पास झाल्याचे सांगावे तर ते दोघेही १२५ मैलावर! आई नोकरीवर, घरी कोणी नाही. अशा वेळी ही परमानंदाची बातमी कोणाला सांगावी तेही सुचेना. आणि अचानक आठवण झाली माझ्या डेक्कनच्या आत्याची. आम्हाला डेक्कनची एक आणि सातारची एक, अशा दोन आत्या. आमच्याकडे आई आणि बाबा अशा दोन्ही बाजूंकडे नातेवाईक थोरला, मधला, धाकटा अशा वर्गवारीत न मोडता त्यांची गावे, ठिकाणे या वरूनच ओळखली जात. त्यामुळे मुंबईचा मामा, पुण्याचे दादा, अष्ट्याची आत्या, नाशिकचे काका हीच वर्गवारी आम्हास तोंडपाठ. मग ठरवले, धावत जाऊन पहिली आनंदाची ही बातमी सांगायची माझ्या डेक्कनच्या आत्याला.

खरोखरच धावत निघालो, कारण त्यावेळी जवळ रिक्षाच काय, बसला देखील पुरेसे पैसे नव्हते. मग काय करणार? पण त्यावेळचे वय आणि त्यादिवशीचे कारण, यामुळे मंडळापासून फर्ग्युसन रोड, वैशाली समोरची गणेशवाडी कधी आली तेही समजले नाही. सकाळचे अकरा वाजत आले होते. पहाटे चार ते दहा या सहा तासांच्या दगदगीतून मोकळी होऊन आत्या नुकतीच कोठे हुश्श करून बसणार, तोपर्यंत मी समोर हजर. नक्की कसे सांगावे कळत नव्हते, तोंडातून शब्द फुटत नव्हते. मी सरळ पायावर डोके ठेवले आणि कसेबसे म्हणालो "मी पास झालो."

त्यावेळी आत्याने उठवून मला जवळ घेतले. मायेने पाठीवरून हात फिरवला आणि "बापाविना पोर, पण एक दिवस मनुचे नाव काढील!" (माझ्या बाबांना आम्ही अण्णा म्हणत असू, तर बाकीचे त्यांना मनु म्हणत) असे पुटपुटत तोंडभर आशीर्वाद देताना माझ्या बाबांच्या आठवणींनी धाय मोकलून रडली. मला कळेचना की मी तिला पास झाल्याचे सांगून समाधान दिले की त्रास दिला. पण नंतर फडताळातल्या तिच्या आपत्कालीन राखीव निधीतून रु. १०१ काढून देताना जो आनंद तिच्या चेहर्‍यावर होता तो पाहता माझी शंका आपोआप दूर झाली. आज पस्तीस वर्षांनंतर मागे वळून पाहताना जाणवते ती तिच्या कृतीतील माया आणि आशीर्वादातील ताकद.

माझ्या या आत्याचे माहेरचे नाव कुसुम शंकर किंकर. अगदी चार चौघांसारखे साधे नाव. कराड, जि. सातारा या तालुक्याचे गावी तिचे बालपण गेले. तो काळ अगदी 'सोन्याचे दिवस ' म्हणावेत अशा ऐषारामातील नसला तरी वडिलांचा भागीदारीतील असणारा सराफीचा व्यवसाय हा भरले घरदार म्हणवणारा नक्कीच होता. तिचे वडील, माझे आजोबा, हे ज्योतिषी व रत्नपारखी म्हणून परिसरात नावाजलेले. पण व्यवसायातील हे यश दृष्ट लागावी तसे बघता बघता दूर गेले. भागीदारीचा शाप खरा ठरला. रोलर कोस्टर प्रमाणे यशाचे शिखर ते रसातळ हा प्रवास काही कळायच्या आत पूर्ण झाला. घरातील लक्ष्मी आणि गृहलक्ष्मी दोघींनी एकाच वेळी पाठ फिरविली. माझ्या आजीने हाय खाऊन मृत्यूस जवळ केले. आत्या तेरा वर्षांची असताना तीन लहान भावंडे व देशोधडीला लागलेला वडिलांचा संसार मागे टाकून तिने अज्ञाताचा मार्ग धरला. या परिस्थितीत एखादीने लग्नानंतर माहेर नशिबात नव्हतेच असे म्हणत जबाबदारीतून सुटका करून घेतली असती. पण माझ्या आत्याने किंकारांची चंद्रमौळी झोपडी सोडताना तेथली कष्टाची सवय आणि परिस्थितीवर मत करण्याची जिद्द बरोबर घेत, नवर्‍याचे सुख व भावंडांची जबाबदारी हेच आपल्या पुढील जीवनाचे ध्येय मानले.

किंकरांची कुसुम सौभाग्यवती इनामदार झाली. कलेढोण येथे गाईगुरे, शेतीवाडी अशा राबत्या घराची लक्ष्मी झाली. अर्थात माहेरी वडील-भावंडांसाठी राबणारे हात आता इनामदारी थाटासाठी राबू लागले. आत्याचे यजमान राजारामपंत हे नेहमीच नाकासमोर सरळ चालणारे व शिस्तप्रिय. मामांच्या ओळखीने मिळालेली लष्करातील नोकरी त्यांनी लष्करी शिस्तीने टिकवली. बघता बघता संसारात तीन मुलांचा समावेश झाला. राजारामपंतांनी आत्यास स्वातंत्र्य दिले आणि सर्व जबाबदारीपण दिली. त्यामुळे आत्या जणू तीन नव्हे चार मुलेच सांभाळत होती. 'काटकसरीने संसार' हा शब्दप्रयोग आपण नेहमी वापरतो. पण दर महिन्याला धान्य भरल्यावर पुड्यांचे कागद साठवून रद्दी घालणे आणि पुडीचा दोरा जपून ठेवून त्याचा पडदा करणे हे काटकसरीचे आत्याचे मार्ग म्हणजे आभाळाला ठिगळ लावण्याचा खराखुरा प्रयास होता. पुढे मुले वयाने मोठी झाली, दिवस पालटले तसे तिने सुना,नातवंडे या पुढच्या पिढ्यांना आपलेसे करताना न आपण भोगलेली दु:खे उगाळली, ना कोणास अडचण होईल असे वागली.

आत्याचे वयाच्या पंधराव्या वर्षी लग्न झाले. माहेरी ती चार भावंडातील सर्वात थोरली. तिच्या पाठोपाठ माझे वडील यशवंत, काका व्यंकटेश, व आत्या निर्मला. आत्या थोरली म्हणून ती 'आक्का'. पण आपल्या प्रेमाने व मायेने ती आपल्या धाकट्या भावंडांची आणि आम्हा सर्व भावंडांसाठी जणू ती दुसरी आईच होती.

माझे वडील महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्यात नोकरी करत होते. जर त्यांनी सहकाराचा (!) मंत्र जपला असता तर कदाचित सहकार आयुक्त किंवा सहकारसचिव पदापर्यंत पोहोचून सेवानिवृत्त झाले असते. पण त्यांच्या मानी, नव्हे स्वाभिमानी वृत्तीमुळे त्यांच्या वाट्याला आली सक्तीची सेवानिवृत्ती. तो काळ होता सन १९६८/६९ चा. कोल्हापूर येथील भाड्याच्या जागेचे दरमहाचे घरभाडे रुपये चाळीस, थकू लागले. नोकरी नाही म्हणून शेवटी त्यांनी पुण्यास मुक्काम हलवण्याचा निर्णय घेतला.