आठवणी आत्याच्या...

पृष्ठ क्रमांक

डॉ. रवींद्र किंकर

त्यामागेदेखील नव्याने संसाराची जुळवाजुळव करताना आक्काचा आशीर्वाद व पाठिंबा राहील हाच विचार मनात असावा असे वाटते. पुण्यात जागा मिळणे अवघड व खर्चाच्या मर्यादा. यामुळे पुण्यास येऊनसुद्धा एक खोली चाळवजा वाड्यातील, कोथरूड येथे घेतली. त्याकाळी ते ठिकाण इतके दूर होते कि पालखी दर्शन किंवा गणेश उत्सव या करिता जिमखान्यापर्यंत येणारे कोथरूडकर 'पुण्याला चाललो' असे म्हणायचे. त्या कोथरूड येथे एका खोलीत बाबांनी नव्याने संसाराला सुरुवात केली. आर्थिक आघाडीवर मागील पानावरून पुढे चालूच होते. अशा वेळी स्वतःच्या संसाराची काडीकाडी जुळवताना आमच्यावर मायेची शाल पांघरणारी आत्याच होती.

आत्याचे यजमान कष्टाळू व आपण बरे आपला प्रपंच बरा अशा वृत्तीचे. त्यांनी कधी कोणाकडून मदतीची अपेक्षा केली नाही, ना त्यांच्या कडून मदतीची अपेक्षा होती. पण यामुळे आत्या उचलून काही थेट मदत करू शकत नव्हती. मग त्यावरही तिने उपाय शोधला. दरमहाचे वाणी समान भरताना यजमानांना कधी सण आहे, तर कधी पाहुणे येणार आहेत असे सांगत, गरजेपेक्षा थोडे जास्तीचे सामान आणवून घेऊ लागली. नंतर त्यातील थोडे थोडे सामान आमच्यासाठी बाजूला काढून ठेवी. मग ते सामान पोहोचवण्यासाठी ओझे हातातून वागवत ती डेक्कन ते कोथरूडचे आमचे घर असा ४ कि.मी चा प्रवास जाता येता पायी करी. आणि ही मदत कमी की काय, म्हणून माझ्या भावाला - जो त्यावेळी जिमखान्यावरच्या विमलाबाई गरवारे प्रशालेत शिकत होता - त्याला दररोज सकाळचे जेवण देण्याचे महत्पुण्य तिने कोणताही गाजावाजा न करता अनेक वर्षे पार पाडले. एखादे दिवशी काही कारणांनी यजमानांनी सुट्टी घेतली असेल व माझा भाऊ शाळेत जाण्यापूर्वी सकाळचे जेवणासाठी घरी आला, तर माझी आत्या इतकी समयसूचक वागत असे की रोजच येणार्‍या माझ्या भावास पाहून "अरे शेखर, आज इकडे कसा काय आलास? सर्व ठीक आहे ना?" असे विचारत, "बरं, आला आहेस तर आज जेवूनच जा." असे म्हणून आपले कर्तव्य न चुकता पार पाडत असे.

माझा थोरला भाऊ वडील गेले त्यावर्षी अकरावीत होता. त्यावर्षी वडिलांचे आजारपण, मृत्यू, त्यानंतर आईने सुरु केलेली नोकरी, या सर्वांमुळे माझ्या भावास एक शैक्षणिक वर्ष गमवावे लागले. पुढील वर्षी ऑक्टोबर मध्ये परीक्षा फॉर्म भरण्याचे शेवटचे दिवशी आई कामास गेलेली. आम्ही तीन भावंडेच फक्त घरी होतो. फॉर्म भरण्यासाठी घरी पुरेसे पैसे नाहीत, काय करावे हे मोठे प्रश्नचिन्ह. प्रथम आठवली ती आत्या. पण त्यादिवशी ती घरीच नव्हती. अडचण म्हटले की आत्या या उक्तीनुसार ते दार ठोठावूनच भाऊ घरी आला होता. मग काय करावे? मला आठवते आहे तेव्हा घरातील एक पितळी तांब्या मोडीत घालून तू फॉर्म भर असा पर्याय मी सांगितला. प्रथम त्यास भावाची तयारी नव्हती पण आईस सांगण्याची जबाबदारी माझी असा शब्द मी दिल्यानंतर दुपारी तीन पूर्वी सर्व सोपस्कार पार पाडून भावाने फॉर्म भरला. रात्री मोठ्या धीराने मी आईला भावाचे वर्ष वाचावे म्हणून घेतलेला निर्णय सांगितला. तेव्हा आईच्या डोळ्यांत पाणी आले. मला वाटले की तांब्या मोडला म्हणून आईस वाईट वाटले. पण ते अश्रू त्राग्याचे नव्हते, तर समाधानाचे होते. मुलांना वेळ आणि शिक्षण यांचे महत्व समजले, याचे होते. त्या वर्षी भाऊ परीक्षेत पास झाला. पुढे आय.टी.आय. मध्ये प्रवेश घेत पुढील शिक्षण पूर्ण केले. पण तो फॉर्म भरण्याचा दिवस आज ही जसाच्या तसा डोळ्यासमोर येतो. पुढे कित्येक दिवस माझी बहिण शेखरला “माहीत आहे, तांब्या मोडून अकरावी झालाय ते!” असे चिडवत असे.

अशी ही माझी आत्या दिसायला कशी होती? या प्रश्नाला देखील माझे उत्तर म्हणजे दुसरी बहिणाबाईच! तशीच नऊवारी साडी, मोठे कुंकू, डोळ्याला चष्मा, आणि कष्टाळूही बहिणाबाई या कवयित्रीसारखीच! तिचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बहिणाबाईंसारखा. कोणतीही गोष्ट तिच्या नजरेतून सुटत नसे. मला तीन आत्येभाऊ. त्यातील मधला सुभाष हा संघाच्या चळवळीतला व माझ्या बाबांशी सूर जुळलेला. त्यामुळे पुढे आमच्याही नियमित संपर्कातला. त्याने आत्याची सांगितलेली ही आठवण तिच्या या गुणाची साक्ष देते. लहानपणी त्याने एकदा घरातून चार आणे घेवून न सांगता बुंदीचा लाडू खाल्ला. ही गोष्ट आत्याच्या नजरेतून सुटली नाही. पण तिने ना मारझोड केली ना रागावली. त्याला देवासमोर उभे करून म्हणाली, “म्हण देवाला, मी चुकलो. पुन्हा असे करणार नाही.” आणि शब्दशः नाक घासायला लावले. तिच्या अशा संस्कारांमुळेच हाच आत्तेभाऊ प्रथम प्रचारक व नंतर थर्मेक्स, कल्याणी ग्रुप, अशा विविध कंपन्यात काम करत करत शेवटी एका बहुराष्ट्रीय कंपनीचा एम. डी. म्हणून निवृत्त झाला. आजदेखील निवृतीनंतर स्वस्थ न बसता त्याने समाजकार्यात स्वतःला पूर्णतः गुंतवून घेतले आहे. दरवर्षी त्याच्या घरी साजरी होणारी रामनवमी ही तर माझ्या आत्याच्या "सत्य बोला, सत्य चाला, राम तुमच्या पाठीला!" या संदेशाची आठवण करून देणारी एक संस्कारांची चळवळच झाली आहे.

माझा थोरला आत्येभाऊ सुधाकर यांनी कष्ट आणि बचत याचे बाळकडू आत्याकडून घेत बजाज ऑटो लि. येथे नोकरी करत ज्यादा वेळ काम, साप्ताहिक सुट्टीस काम करत स्वतःचे छोटेसे घर बांधले. तर सर्वात धाकटा आत्येभाऊ मुकुंद यास आत्याकडून हाताची चव आणि शीघ्र काव्य यांचे वरदान मिळाले. त्यामुळे आत्या सुगरण असल्याची साक्ष त्याचे घरी आजही सहज दिसते. मी आत्यास सुगरण म्हणताना आजही दिवाळी आली की तिचे पाकातले चिरोटे असे काही डोळ्यांसमोर येतात, की जर तिला आर्थिक पाठबळ असते तर प्रसिद्धीमध्ये तिच्या चिरोटयांनी चितळे बंधूंच्या बाकरवडीशीच स्पर्धा केली असती. त्याप्रमाणे पुरणपोळी, शंकरपाळी ही देखील तिची एक खासियत. हे सणासुदीचे पदार्थ सोडाच, पण रोजचे जेवण आणि चकोल्या, घवल्याची उसळ यांचे नुसते नाव देखील आत्या सुगरण असल्याची आठवण देते.

कष्ट आणि आत्या हे नाते तर इतके घट्ट होते, की पहाटे साडेचारला सुरु होणारा तिचा दिवस थेट रात्री दहा वाजताच संपत असे. माझा सर्वात थोरला आत्येभाऊ नाना उर्फ सुधाकर, हा आत्यासाठी धान्याची पोती निवडण्याकरिता सायकलवरून घरी आणत असे व दुपारच्या वेळेत 'कामातील बदल हीच विश्रांती ' ही तत्वप्रणाली वापरून आत्या बैठक मारून ते धान्य निवडून परत पाठवीत असे. पण या कष्टातून तिने इतकी बचत केली की दोन वर्षे सातत्याने हे ज्यादा काम करून जिद्दीने तिने चार सोन्याच्या बांगड्या केल्या होत्या. वकील लोक मिळकतीशी निगडीत कागद पत्रे बनवताना जो 'स्वकष्टार्जित मिळकत' हा शब्द प्रयोग वापरतात तो का, याचे ज्ञान मला त्या बांगड्या बघून झाले.

माझ्या आत्येभावांशी बोलतांना जेव्हा तिच्या आठवणी निघतात तेव्हा एकदा माझा एक आत्येभाऊ सहजच म्हणून गेला, की आमची आई म्हणजे काय, तिला कोणीही गंडवू शकत असे. ती भाबडी होती. पण मला आठवणारी माझी आत्या त्यांच्या चार भावंडात थोरली. या माझ्या आत्याबाबत मी तर असे म्हणेन की ती फक्त भाबडीच नव्हती तर तिने आयुष्यात पत्नी, आई, बहीण, नणंद, भावजय, आत्या, आजी, मावशी अशा प्रत्येक नात्याचा पदर इतका सुरेख जपला की प्रेम ,माया, आपुलकी, जिव्हाळा,उपकार, या शब्दार्थांसाठी शब्दकोश न बघता आत्याकडेच बघावे.

माझ्या वडिलांच्या डायरीतील पुढील परिच्छेद याचीच साक्ष देणारा आहे अशी माझी खात्री आहे. -

“मनातल्या विचारांबरोबर घराबाहेर पडलेले पाऊल आता पुढेच पडावयाचे होते. थांबायचे नव्हते, मागे वळून पहावयाचे नव्हते. आमची आई तशी लवकरच वारली. तिच्या मागे आमच्या थोरल्या बहिणीने आम्हा लहान भावंडांना आईचे प्रेम दिले. ती तर गावातच राहात होती . आमच्या सबंध घरादाराशी जवळीक राखून होती ती. तिची मुले - एक बंडखोर, तर एक अबोल-त्यागी, तर एकाचा स्वभाव माझ्या मोठ्या मुलासारखा गूढ. त्यांचा जिव्हाळा. पावले आपोआप नकळत तिच्या घराकडे वळली. तिचे घर तर मला परके नव्हतेच. आई गेल्यावर एकाकी पोरकेपणावर तिनेच फुंकर घालून दु:ख हलके केलेले. पण तिच्याशीही मोकळेपणे बोलावयाची चोरी. "जगावेगळा विक्षिप्तपणा" अशा शेलक्या शब्दात ती माझी संभावना करायला मागे-पुढे पाहणारी नव्हती. जितकी प्रेमळ तितकीच शिस्तीची भोक्ती. ती रागावणे शक्य होते, नव्हे तो तिचा हक्क होता. आणि मुख्य म्हणजे तिला हुकुमत गाजवायची नसली तरी तिच्या प्रेमळ परंतू हुकुमतीच्या शब्दांपुढे मी पांगळा होतो. तिचे सामर्थ्य शब्दातले नसून त्यागातले, आपलेपणातले. भावाचे कल्याण व्हावे या शुद्ध हेतूतून निर्माण झालेले. मी अशावेळी काय करणार ? मी एकटा आहे. निर्णयात कोणी सहभागी नाही. तुझा तू एकट्याने घ्यावयाचा म्हणजे जबाबदारी अधिकच वाढलेली. त्यातून ती एक स्त्री. ती माझ्या पत्नीचीच बाजू घेणार. मग चक्क उरावर धोंडा ठेवून तथाकथित मोकळ्या वातावरणात हवापाण्याच्या गप्पा मारून क्षेमकुशल विचारून तिची मूर्ती भक्तीयुक्त अंत:करणाने डोळ्यात साठवून निरोप घेतला.”

माझ्या वडिलांच्या या भावना म्हणजे त्यांतून त्यांचा माझ्या आत्याविषयी असलेला पराकोटीचा आदर व्यक्त होतो आणि खरोखरच, अशा आदरास ती पात्र देखील होती. अशा किती म्हणून आठवणी सांगू ? मी तर म्हणेन, मला माझ्या आत्याच्या रूपाने माणसांमाणसांतील चांगुलपण भेटले. आजही कोणी मला जेव्हा म्हणते, 'तुला काय माहित आम्ही किती कष्ट काढलेत?' तेव्हा मला म्हणावे वाटते, 'अरे बाबा असतील तुझे कष्ट मोठे, गेला असशील तूही दुर्दैवाच्या फेर्‍यांतून. पण हेही दिवस विसरून आनंदात कसे जगावे हे शिकायचे असेल तर मात्र तुला माझ्या आत्याचे परीक्षेतच पास झाले पाहिजे.'

paNatee