मासे पकडून सोडायचे
मी विचारलं माणसाला एका
तू रोज असं का करतोस
काय मिळतं तुला यातून?
तू मासे पकडतोस आणि सोडतोस
"मी मासे पकडतो आणि सोडतो,
यात मला काही मिळावं कशाला?
कर्म करत जगायचं आपण,
फळाची चिंता आपल्याला कशाला?
मी पोटासाठी नाही, तर
छंद म्हणून मासे पकडतो
बिचारे जाळ्यात अडकले की
त्यांना परत पाण्यात सोडतो"
मी पण कविता करताना
हे उदाहरण डोक्यात ठेवतो
म्हणून सकाळी मुक्त मनाचं
जाळं घेऊन जगात जातो
बरेच विचार अडकतात लगेच
काही श्वास सोडू लागतात
मनात ठेवता येत नाहीत सारे
काही आतल्या आत मरू लागतात
मग कविता करायची आणि
विचार जगात मुक्त सोडायचे
उद्या परत पकडून त्यांच्याकडे
वेगळ्या नजरेने बघायचे
माशांना जगू द्यायचं
त्यांना पकडायचं आणि सोडायचं
विचारांना पकडत आणि मुक्त करत
सगळ्यांनी निःस्वार्थीपणे जगायचं