जुने घर
गावातले जुने घर अगदीच आडनिडे होते. त्याला ना आकार, ना उकार. म्हणायला त्याला वाडा म्हणत आणि बाहेरून दिसायलाही ते दुमजली घर तालेवार दिसे, पण आत कशाचा कशाला मेळच नव्हता. बांधणार्याने अगदी ऐदीपणाने गवंड्याला बोलावून 'इथे चार खण काढ, इथे एक ठेप दे, इथे एक मोरी बांध, इथे माळवदावर जायला जिना काढ' असले काहीतरी सांगून ते बांधवून घेतले असावे. गवंड्यानेही काही पुढचा-मागचा, सोयी-गैरसोयीचा विचार न करता अगदी हुंबपणाने हाताला येईल ते सामान घेऊन दिवाळीतला किल्ला बांधावा तसे ते दणकट, ऐसपैस पण अत्यंत गैरसोयीचे घर बांधून टाकले असावे. जुने घर शाळेपासून, गावंदरी मळ्यापासून लांब वाटत असे. मळा अगदी गावाच्या कडेला लागून एस टी स्टँडजवळच होता. मळ्यातल्या घरासमोर एक प्रचंड मोठे वडाचे झाड होते. मळ्यात विहीर होती आणि विहिरीला भरपूर पाणी असे. मळ्यातल्या घराभोवती भरपूर रिकामी जागा होती आणि मळ्यात बैल, गायी, म्हशी, वासरे आणि रेडके असत. त्यामुळे मळ्यात जायला अगदी मजा येत असे. गावातले घर हे या सगळ्यांपासून दूर, वेड्यावाकड्या अरुंद आणि खडबडीत रस्त्याने बरेच अंतर चालून गेले की एका गल्लीवजा रस्त्यावर गचडीत बसलेले होते. जुन्या घरासमोरचा रस्ता अगदीच निरुंद होता आणि त्यावर कधीच डांबराचा थर पडलेला नव्हता. त्यामुळे जुन्या घरासमोरच्या रस्त्यावरून एका वेळी दोन एक्क्या बैलगाड्या काही जाऊ शकत नसत. मग ही गाडी डाव्या अंगाला घे, ती उजवीकडे वळव असे करावे लागत असे. त्यात कधीकधी त्या गाड्यांची चाके रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या गटारात जात आणि वेसणीचा फास बसून फुसफुसणार्या बैलांचे डोळे टरारल्यासारखे होत. एखाद्याने अंग मोकळे करण्यासाठी हातपाय ताणून अंगाला डाव्या-उजव्या बाजूने झोले द्यावेत तसा तो रस्ता इकडे तिकडे मनाला येईल तसा वळत वळत गेलेला होता आणि त्याला उतारही फार होता. जैनाच्या बस्तीपाशी दोन चार जोराचे पायडल मारले की मग पाय वर घेतले तरी सायकल त्या रस्त्याने खडखडत, उसळ्या घेत थेट पेठेपर्यंत जात असे.
जुने घर रस्त्याच्या पातळीपासून हातभर उंचीवर होते आणि दोन पायर्या चढूनच घरात जावे लागे. या पायर्यांचे दगडही निसटायला आले होते. गावातल्या सगळ्या घरांसारखे या घराच्या दारातूनच ग्राम पंचायतीचे गटार गेले होते. ते सदा तुंबलेले असे. कधीतरी ग्राम पंचायतीचा एखादा सफाई कामगार येऊन हातातल्या लोखंडी फावड्याने त्या गटारातली गदळ काढून त्याचे त्या गटारालगतच बारके बारके ढीग घालत असे. चार दिवस गटारातून काळे पाणी वाहत राही. मग वार्या-पावसाने, येणार्या-जाणार्या बैलगाड्या, माणसे यांच्या वर्दळीने आणि गल्लीत सदैव चालत असलेल्या कुत्र्यांच्या दंगलीने हे कचर्याचे ढीग पुन्हा विस्कटून गटारातच पडत आणि गटार पुन्हा तुंबत असे.
घराचा मुख्य दरवाजा चांगला बारा फूट उंचीचा होता. कोणे एके काळी त्याला चांगली मजबूत लाकडी दारेही असतील. पण मला आठवते तसे ती दारे अगदीच खिळखिळी झालेली होती. दोन्ही दारे चिरफाळलेली होती आणि त्या दारांच्या लाकडांना कीड लागलेली होती. दरवाजा लावताना दरवाज्यांवरच्या बारीक भोकांमधून पिवळसर भुक्की भुरुभुरू पडत असे. दाराच्या आतल्या बाजूला असलेल्या लोखंडी कडीला तर काही अर्थच नव्हता. दरवाज्यातल्या फटीतून हात घालून बाहेरच्या माणसाला ती सहज काढता येत असे. दाराच्या दोन्ही बाजूला बसण्यासाठी म्हणून बसवलेले घडीव आयताकृती दगड बाकी अगदी ठसठशीतपणाने टिकून होते. त्यातल्या उजव्या बाजूच्या दगडावर बसून आजी समोरच्या घरातल्या धनगराच्या म्हातारीबरोबर गप्पा मारत असे. दरवाजाच्या आत गेल्यागेल्या दोन्ही बाजूला दोन ढेलजी होत्या. एका बाजूच्या ढेलजीवरचे छप्पर काही दिवस शाबूत होते आणि त्या ढेलजीतल्या अंधार्या कोंदट खोलीत काही दिवस कल्लव्वा आणि तिची अकरा का बारा मुले भाड्याने राहात होती. दुसर्या बाजूची ढेलज बाकी अगदी पडून गेली होती. तिच्यात गाईची वाळलेली वैरण नाहीतर शेणकुटे, तुरकाट्या असले काहीतरी जळण कसेतरी ठेवलेले असे.
आत गेल्यावर खडबडीत आणि उंचसखल असे चिंचोळे अंगण होते. वर्षातून एकदा पायाला अगदीच खडे टोचायला लागले की चार पाट्या मुरुम टाकून धुमुसाने नाहीतर बडवण्याने बडवून ते अंगण जरा त्यातल्या त्यात सपाट केले जाई. पण चार दिवस गेले की पावसापाण्याने वरची माती वाहून जाई आणि परत पायाला खडे टोचायला लागत. रोज अंगण झाडून काढणे आणि शेणकाल्याचा सडा टाकणे हे एक नित्याचे काम होते. अंगणात एक तुळशीवृंदावन होते . रोजची रांगोळी त्या वृंदावनापुरती असे. पण दिवाळीत बाकी अंगणभरच नव्हे, तर रस्त्यापर्यंत रांगोळ्या काढल्या जात. त्या अंगणाच्या मधूनच सांडपाण्याचा एक ओहोळ दरवाज्याकडे गेलेला होता. त्या ओहोळाला बाहेरच्या गटारात जायला काही साधन ठेवलेले नव्हते. एखाद्या बेवारशी कुत्र्यासारखा तो ओहोळ इथे-तिथेच पडलेला असे. अंगणात डाव्या हाताला पाण्याचा हौद होता. ग्राम पंचायतीचे पाणी अगदी कमी दाबाने यायचे, म्हणून त्या पाण्याची तोटी जमिनीपासून अगदी कमी उंचीवर होती. तिच्याखाली एक लहानशी बादली किंवा कळशी कशीबशी मावत असे. त्या कळशा, घागरी भरभरून तो अंगणातला पाण्याचा हौद भरणे हे एक मोठे काम होऊन बसले होते. ग्राम पंचायतीच्या पाण्याचा काही भरवसा नसे. ते कधी येई, कधी येत नसे. आले तरी किती वेळ टिकेल हेही काही सांगता येत नसे. उन्हाळ्यात तर आठवडाच्या आठवडा नळाला पाणी नसे. मग मळ्यातल्या विहिरीतून पाण्याचा मोठा हौद भरून तो बैलगाडीत घालून गावातल्या घरात आणावा लागे. ते पाणी बादल्याबादल्याने अंगणातल्या हौदात भरावे लागे. त्या बाहेरच्या हौदातून घराच्या परसात असलेल्या हौदात पाणी नेऊन टाकणे हे तर महाकठीण असे काम होते. घरात जायचे म्हणजे दगडी पायर्या, उंच उंबरे, जाती, उखळे,लहानमोठे कट्टे असे असंख्य अडथळे पार करत जावे लागत असे. त्यात घरातली एक चौकट काही दुसरीच्या आकाराची नव्हती. त्यामुळे सतत कुठे कमी तर कुठे जास्त वाकूनच एका खोलीतून दुसर्या खोलीत जावे लागे. पण त्याची इतकी सवय झाली होती की न चुकता त्या त्या दारातून कमीजास्त वाकून लोक भराभरा दुसर्या खोलीत जात असत. कुणाला चौकट डोक्याला लागून जखम झाली आणि खोक पडली असे मला तरी आठवत नाही. पाणी भरण्याचे काम आम्ही लहान असताना गडीमाणसे करत. हे गडीही बहुदा वर्षाच्या कराराने बांधून घेतलेले असत. एक पोते जोंधळे आणि अकराशे-बाराशे रुपये यावर तो गडी वर्षभर पडेल ते काम करत असे. माझ्या वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षापासून अशी कामे करायला माणसे मिळेनाशी झाली, तेव्हा हे काम आमच्यावर आले. सकाळी बाहेरचा हौद भरणे आणि रात्री तेच पाणी आतल्या हौदात नेऊन टाकणे हे काम अत्यंत उत्साहाने कितीतरी वर्षे केल्याचे मला आठवते. नंतर नंतर तर दोन्ही हातात भरलेल्या कळशा घेऊन जवळजवळ धावतच अंगण, पडवी, सोपा, माजघर, स्वयंपाकघर ओलांडून जागोजागी वाकत वाकत परसात जायचे आणि तिथल्या हौदात धबाल करून त्या कळशा ओतायच्या यात मजाच मजा वाटत असे. बाहेरच्या हौदापासून आतल्या हौदापर्यंत एक पाईप आणि अर्ध्या हॉर्सपॉवरची एक मोटार यासाठी पैशाची जुळवाजुळव करायला माझ्या वडिलांना कित्येक वर्षे लागली. एकूणातच पाणी हा जुन्या घरातला एक फारच मोठा प्रश्न होता. घरातल्या बर्याच लोकांचा दिवसातला बराच वेळ पाण्याची व्यवस्था करण्यातच जात असे.