जुने घर

पृष्ठ क्रमांक

संजोप राव

जुन्या घराचे अंगण काही फार मोठे नव्हते, पण त्यात एक बाग असावी अशी माझी शाळकरी महत्त्वाकांक्षा होती. बाग करण्याचे माझे लहानपणीचे कितीतरी प्रयत्न वाया गेले. शेवटी दांडगाईने मुर्दाडासारखी वाढलेली काही कर्दळीची झाडे एवढेच त्या बागेचे स्वरुप शिल्लक राहिले. बाकी मी लावलेली रोपे म्हणजे तरी काय म्हणा, कुणीतरी दिलेल्या गावठी गुलाबाच्या फांद्या, मळ्यातूनच आणलेले एखादे मोगर्‍याचे रोप किंवा शाळेतूनच उपटून आणलेले एखादे चिनी गुलाबाचे झुडूप. पण यातले काही म्हणजे काही त्या बागेत जगले नाही. पण एकदा कसे कुणास ठाऊक, माझ्या चुलत आत्याने मठातून आणलेले एक पारिजातकाचे झाड त्या बागेत रुजले आणि हां हां म्हणता ताडमाड वाढून बसले. मोजता येणार नाही इतक्या फुलांनी ते झाड फुलत असे आणि दर वर्षी श्रावणात आजी त्या फुलांचा लक्ष करत असे. त्या झाडाच्या भिंतीपलीकडे गेलेल्या फांद्या सावरायला म्हणून मी भिंतीवर चढलो आणि पायाखालची वीट फुटून धाडकन खाली कोसळलो होतो. मला लागले फारसे नव्हते पण घाबरून आणि मुक्या माराने मला हबक भरल्यासारखे झाले होते. सकाळी उठून ते पारिजातकाचे झाल हलवणे आणि त्याची परडीभर फुले गोळा करून ती परडी देवघराच्या कट्ट्यावर आणून ठेवणे हे घरातल्या मुलांचे आवडीचे काम होते. पुढे एका पावसाळ्यात रपारपा पाऊस पडत होता आणि नेहमीसारखेच दिवे गेलेले होते. एकदम वीज कडाडली आणि तसलाच काहीसा आवाज अंगणातूनही आला. अंधारात काही दिसले नाही पण 'झाड पडलं जणु' असे कोणीसे म्हणाले. दुसर्‍या दिवशीसकाळी बघतो तर खरेच तो पारिजातकाचा वृक्ष उन्मळून पडला होता. मग कुर्‍हाडीने तो तोडला आणि एखादे मेलेले जनावर गावाबाहेर नेऊन टाकावे तसे त्याचे रुक्ष खोड आणि खरखरीत फांद्या उकीरड्यावर नेऊन टाकल्या. घरातले एखादे माणूस जावे तसे काहीसे त्यावेळी झाल्याचे आठवते. त्या भुंड्या जागेकडे बरेच दिवस बघवतही नव्हते.

अंगणातल्या उजव्या बाजूला गुरांना दिवसा बांधायची जागा होती. कधी गाय, कधी म्हैस असले काहीतरी दुभते जनावर आणि त्याचे एखादे वासरु, रेडकू तेथे दिवसा बांधलेले असे. बर्‍याच वेळा भाकड जनावरे मळ्यातच असत. एखादी गाय किंवा म्हैस व्याली आणि तिच्या चिकाचे दिवस संपले की मग तिला घराकडे दुभत्यासाठी आणले जाई. काही वेळा घरातही गाईचे वेत होई. गाईचा पाडा असला किंवा म्हशीची रेडी असली तर त्यांना गाई-म्हशीचे थोडे दूध राखून ठेवलेले असे, म्हणून ती जरा तजेलदार दिसत. कालवडी किंवा रेडे पाळणे बाकी परवडत नसे. कालवडींचे दूध तुटले की त्या कुठल्या तरी कुळवाड्याकडे अर्धलेनी म्हणून दिल्या जात. मग अशा कालवडी मोठ्या होऊन गाभण राहिल्या की मग घरी परत येत. मग त्यांची अंदाजे काहीतरी किंमत ठरवून त्या किंमतीचा निम्माभाग त्या कुळवाड्याला दिला जाई, म्हणजे बहुतेक वेळा त्यांनी अंगावर घेतलेल्या उसनवारीतून वळता केला जाई. वासरांचा बाकी घरातल्या लहान मुलांना लगेच लळा लागे. बारके नुकतेच जन्मलेले वासरू धडपडत आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत असताना घरातली मुले त्याच्या अवतीभवती असत. त्या वासराची नाळदेखील पूर्ण सुकलेली नसे. आपल्या मोठ्या, काळ्याभोर डोळ्यांनी ते वासरू टुकुटुकू इकडे-तिकडे बघत असे. मधूनच 'बें.. ' असा काहीतरी आवाज काढी. शेजारीच बांधलेली त्याची आई घशातल्या घशात 'डुर्र..' असे काहीतरी करी. वासराच्या तोंडावरुन, पाठीवरून हात फिरव, त्याच्या ओलसर नाकाला हात लावून बघ, त्याच्या कानात बघ, असे तासनतास निघून जात. वासरे मोठी होऊन एखादे पान चघळायला लागली की त्याला वैरण भरवण्याची चढाओढ लागे. ते वासरू बाकी दिवसदिवस एकच पान चघळत बसलेले असे. रेडे बाकी त्यामानाने मठ्ठ असत. त्यांच्याकडे मोठ्या माणसांप्रमाणे मुलांचेही दुर्लक्षच होत असे. थंड, भावशून्य नजरेने आयुष्यात कसलीही उमेद नसलेल्या माणसासारखे ते तासनतास उभे असत. नुकत्याच जन्मलेल्या रेड्यालासुद्धा जन्मल्याचा आनंद असा काही होत असेल, असे त्याच्या चेहर्‍यावरून वाटत तरी नसे. पुढे म्हैस परत गाभण राहिली आणि तिचे दूध खारट व्हायला लागले की ते रेडे एक दिवस दिसेनासे होत. ते कुठे जात हे त्या वेळी कळत नसे. ते कापायला जात हे आज ध्यानात येते.

अंगण ओलांडले की घराचे मुख्य दार होते. त्याला 'पत्र्याचे दार' म्हणत. ते दार काही पत्र्याचे नव्हते, पण त्या दारानंतर जी पडवी होती, तिच्यावर पत्रा घातलेला होता. म्हणून त्याला पत्र्याचे दार म्हणत असावेत. पडवीत दगडी फरशी घातलेली होती. पडवीतच एका बाजूला गोठा होता. दुभते जनावर आणि तिचे वासरु, रेडकू जे काय असेल ते रात्री या गोठ्यात बांधले जाई. पडवीत मधोमध एक हातपंप होता. फार पूर्वी त्याला कधीतरी भरपूर पाणी होते म्हणे. पण आता वापरात नसल्याने त्याच्या जमिनीखालच्या सगळ्या नळ्या गंजून गेल्या होत्या. कधीतरी उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीत त्या हातपंपाशी खेळण्याची लहर येई. त्या पंपाचा लांब, लोखंडी दांडा कुठेतरी इकडेतिकडे ठेवलेला असे. तो शोधून काढून तो त्या पंपाला बसवून त्याच्याशी चांगली अर्धा पाऊण तास झटापट केली की मग तो दांडा जड लागायला लागे आणि मग एकदम त्या नळातून गंजलेले लालभडक पाणी यायला लागे. ते काही म्हणजे काही कामाचे नसे. मोरीतून बाहेर जाऊन ते पाणी अंगणात पसरे आणि अंगण लालेलाल दिसायला लागे. गंजक्या लोखंडाचा वास पडवीभर पसरलेला असे आणि घरातली मोठी माणसे वैतागलेली असत.

पडवीच्या वर दोन पायर्‍या चढून सोपा होता. हा सोपाही सगळ्या घरासारखा दणकट, पण ओबडधोबड होता. मोठमोठे खांब, तुळ्या, त्या तुळ्या खचू नयेत म्हणून त्यांना आधारासाठी दिलेल्या ठेपा, असला सगळा हुमदांडगा कारभार होता.सोप्याच्या एका कोपर्‍यात एक लोखंडी हौद होता. हा हौद धान्याच्या साठवणीसाठी होता. ही धान्येही बहुदा जोंधळे किंवा खपली अशीच असत. क्वचित भात असे. भात म्हणजे न सडलेला तांदूळ. हे जोंधळे निवडून पिठाच्या गिरणीतून त्याचे भाकरीसाठी पीठ करून आणणे, खपली भरडून त्याचे गहू करून आणणे, ते गहू पाखडून, निवडून त्याचे परत गिरणीतून पीठ करून आणणे, भात मिठाच्या पाण्यात भिजत घालून ते दुसर्‍या दिवशी पाण्यातून उपसून लहानशा पोत्यांमध्ये घालून सायकलवरून शेजारच्या शहरातल्या पोह्याच्या भट्टीत घेऊन जाणे आणि त्याचे पोहे करून आणणे, असली प्रचंड कष्टाची कामे करण्यात घरातल्या लोकांचा बराच वेळ जात असे. हौदाच्या शेजारच्या कोनाड्यात कंदील, चिमण्या, सुंदर्‍या असा उजेडाचा जामानिमा असे. रोज संध्याकाळी कंदिलांच्या वाती साफ करणे, चिमण्यांत रॉकेल भरणे आणि मुख्य म्हणजे रांगोळीने कंदील आणि सुंदर्‍यांच्या काचा साफ करणे हे न चुकता करायचे काम असे.