जुने घर

पृष्ठ क्रमांक

संजोप राव

सोप्यातली सगळ्यात सुखाची जागा म्हणजे सोप्यातला झोपाळा. त्या झोपळ्याच्या मागे लगेच वर माडीवर जाणारा लाकडी जिना होता, म्हणून झोपाळ्याचा झोका काही फार मोठा घेता येत नसे. पण त्या झोपाळ्यावर जेवणाच्या आधी पोटात भुकेने कासावीस होत असताना आणि पोटभर जेवणानंतर डोळ्यावर झोपेची सुरेख गुंगी येत असताना बसून हलके हलके झोके घेणे यात अपार आनंद वाटत असे. झोपाळ्यावर एका कडीला टेकवून ठेवलेला एक घट्ट तक्क्या होता. त्याला टेकून पायाने जमिनीला रेटा देऊन झोका घेतला की मग तर आपण एखाद्या लहानशा राज्याचे सम्राट आहोत असेच वाटत असे. त्या झोपाळ्याखाली जमिनीत एक पेव आहे, असे आजी सांगत असे.
झोपाळ्याशेजारच्या भिंतीत एक अतिशय खोल असा कोनाडा होता. त्यात जुना व्हॉल्वचा रेडीओ होता. त्यावर रेडीओ सिलोन आणि आकाशवाणी पुण्याचे सहक्षेपित होणारे कार्यक्रम अजूनही लक्षात आहेत. 'आपली आवड' नावाचा मराठी गाण्यांचा एक फर्मायशी कार्यक्रम त्या काळात फार प्रसिद्ध होता. त्या कार्यक्रमापेक्षा त्याचे'टायटल म्यूझिक'च अधिक आकर्षक वाटत असे. सिलोनवर 'पुरानी फिल्मोंके गीत','सदाबहार नग़मे', 'बदलते हुए साथी', 'जब आप गा उठें' असे कार्यक्रम ऐकायला मजा येत असे. 'गैरफिल्मी नज़में और गज़लें' लागली की बाकी कंटाळा येत असे.

पडवीच्या भिंतींच्या वरच्या अर्ध्या भागात लोखंडी गज बसवलेले होते. त्यामुळे सोप्यात तसा बर्‍यापैकी उजेड येत असे. दारासमोर बसले की थेट रस्त्यावरून येणारी जाणारी माणसे दिसत. सोप्यातल्या भिंतींवर रविवर्म्याच्या चित्रांच्या स्वस्तातल्या प्रतींच्या मोठमोठ्या चौकटी होत्या. तिथेच दारासमोर हरणाच्या कातड्यावर बसून आजोबा गुरुचरित्राची पोथी वाचत असत.रविवारी येणारा जानबा न्हावी तिथेच बसून आजोबांची दाढी करत असे. मळ्यात जाताना हातात धरायची आजोबांची काठी तिथेच ठेवलेली असे.दसर्‍याला सोने द्यायला आजोबांकडे खूप लोकांची गर्दी होत असे. कोट-टोपी घालून आजोबा त्यांच्या त्या बैठकीवर बसलेले असत. त्यांच्या शेजारी चवल्या-पावल्यांनी भरलेले एक ताट असे. सोने देऊन वाकून नमस्कार करणार्‍यांना आजोबा हाताला येईल ते नाणेही देत असत. पुढे आजोबांना दिसायचे कमी झाले तेव्हा अक्षराला अक्षर लावून सोप्यात बसून मी आजोबांना 'सत्यवादी' वाचून दाखवत असे. पुढे काही वर्षांनी आजोबा गेले तेव्हा त्यांचे पार्थिव याच सोप्यात ठेवले होते. पूर्ण कावर्‍याबावर्‍या झालेल्या माझ्या वयाच्या घरातल्या मुलांना कुणीतरी घाईघाईने 'आजोबांना नमस्कार करायला चला' म्हणून सोप्यात नेले आणि तितक्याच घाईने दुसरीकडे घेऊन गेले, ते सगळे याच सोप्यात.

जुन्या घरातल्या भिंती चांगल्या तीन-तीन फुटी रुंद होत्या. घराच्या दोन्ही बाजूला चिकटूनच दुसरी घरे असल्यामुळे आतल्या खोल्यांना खिडक्या वगैरे असणे शक्यच नव्हते. सोप्यातून माजघरात गेले की एकदम गार वाटत असे. माजघर प्रचंड अंधारे होते. दिवा लावला नसेल तर माजघरात डोळ्यांत बोट घातले तरी दिसणार नाही इतका काळोख असे. सोप्यातून माजघरात जाताना वाटेत एक अतिशय उंच असा उंबरा होता. तो इतका उंच का होता आणि माजघरातून स्वयंपाकघरात जाणारा दरवाजा इतका बुटका का होता हे मला आजपर्यंत कळालेले नाही. माजघरातून माडीवर जाणारा दुसरा दगडी जिना होता. तोही असाच एखाद्या गडाच्या पायर्‍या असाव्या तसा भक्कम, पण ओबडधोबड होता. त्याला काही कठडाबिठडा नव्हता, त्यामुळे त्यावरून जाताना जपून जावे लागे. तो जिनावरून बंद करता येईल असे एक छतातले दार होते. ते कशासाठी होते हेही कधी कळाले नाही. दोन्ही जिन्यांमधून पळापळी करताना पाय घसरून गडगडत खाली आल्याचे बाकी मला चांगले आठवते.

जुन्या घरातले स्वयंपाकघरही असलेच गैरसोयीचे होते. बराच काळ स्वयंपाक चुलीवरच होत असे. चुलीच्या जळणाची व्यवस्था करणे हे एक मोठे काम होते. शेतात तोडलेल्या झाडांच्या लाकडांचे लहानमोठे ढलपे, शेणकुटे,मक्याची बुरकुंडे, तुरकाट्या असले काहीबाही सरपण शेतावरून गाड्याच्या गाड्या भरून घरी येत असे. ते सरपण स्वयंपाकघराच्या माळ्यावर रचून ठेवलेले असे. आठ-पंधरा दिवसांतून हारेच्या हारे भरून ते सरपण खाली काढून द्यावे लागे. मग त्यावर स्वयंपाक आणि अंघोळीचे पाणी तापवले जाई. स्वयंपाकघरात चुलीवर बडवल्या जाणार्‍या गरम भाकरी, वाईलीवर उकळणारी मुगाची उदंड देशी लसूण घालून केलेली उसळ आणि घरच्या तांदळाचा भात हे म्हणजे 'त्रैमूर्ती अवतार मनोहर' वाटावे असे जेवण असे. जुन्या घरात जसे जेवलो, तसे पुढे आयुष्यात कुठेच मिळाले नाही. ताटभर गरमागरम माडगे ताट तोंडाला लावून प्यालो. गणपतीच्या एकवीस मोदकांचे ताट प्रत्येक मोदकावर एक चमचा तूप घालून संपवले. घरच्या आंब्यांचा आमरस बरोबरीने आसके दूध घालून वाडग्याने प्यालो. गरम भाकरीवर भरलेल्या दोडक्याची भाजी घालून तिचा काला करून जिभेला चटके देत चटकपटक खाल्ला आणि देशी रव्याचा गूळ, सुंठ आणि वेलदोडे घालून केलेला सांजा दूध-तूप घालून पोटाला तडस लागेपर्यंत खाल्ला. जुने घर पूर्ण शाकाहारी होते. जुन्या घरात साधे एक अंडेही कधी फुटले नाही. पण खाण्यापिण्याच्या बाबतीत मात्र 'लुटुनी काय नेशी काळा, भाग्य माझे मागले, भोगले ते भोगले ' अशी माझी भावना आहे. दूध-दही-तूप तर घरचेच असे. स्वयंपाकघरात दुभत्याचे एक भिंतीतले फडताळ होते. दूध, ताक, झाकपाक केलेले अन्न हे गार पाण्याच्या भांड्यांमध्ये घालून त्या फडताळातच ठेवलेले असे. फ्रीज ही वस्तू गावातच कुणाकडे नव्हती.

स्वयंपाकघरातच एका बाजूला घरातील इतर सर्व जागांप्रमाणे अतिशय गैरसोयीचे असे देवघर होते. एका जुन्या देव्हार्‍यात असंख्य देवांच्या मूर्ती, शाळीग्राम, लंगडा बाळकृष्ण, शंख, देवांचे टाक असे गचडीने ठेवले होते. देवपूजेला वेगळा पुजारी वगैरे ठेवण्याची पद्धत नव्हती किंवा ऐपत नव्हती म्हणा. पूजेचे शास्त्र बाकी काटेकोरपणे पाळावे लागे. चंदनाचे खोड, सहाण,पूजेचे वस्त्र हे सगळे जागच्या जागी ठेवावे लागे. गणपतीला दुर्वा, द्राशाळाचे फूल, शंकराला पांढरे फूल हे चुकवून चालत नसे. परसात दगडाची एक प्रचंड पिंड होती. तिच्यावर एरवी उन-पावसाचाच अभिषेक होत असे. पण शिवरात्रीला तिच्यावरही पांढरे फूल चढत असे.

स्वयंपाकघरातून परसात गेले की तिथे न्हाणीघर होते. त्या अंधार्‍या,दिव्याची आणि उजेडाची सोयसुद्धा नसलेल्या जागेला मला दुसरा शब्द सुचत नाही. वर्षानुवर्षे त्या न्हाणीघरातल्या चुलवणावर काळ्याकुट्ट पडलेल्या एका जुनाट हंड्यात अंघोळीचे पाणी तापवले जाई. पाणी तापवायचा बंब आला तोही फार नंतर. न्हाणीघर सतत ओले आणि अंधारे असे आणि त्याच्या कोपर्‍यात लठ्ठ,किळसवाण्या बेडक्या बसलेल्या असत.परसात एका कोनाड्यात दोन वरवंट्यासारखे दगड होते. त्या 'ताईबाई' आहेत असे म्हटले जाई. दर अमावस्येला ताईबाईला नारळ वाढवावा लागे.

जुन्या घराला अत्यंत बेंगरुळपणाने बांधलेली माडी होती. सोप्यावरच्या माडीला 'बाहेरची माडी' आणि माजघरावरच्या माडीला 'आतली माडी' असे नाव होते. दोन बहिणींपैकी झकपक असणार्‍या एकीने शिकून-सवरून नोकरी करावी आणि शहरात राहणारा सुशिक्षित नवरा पटकवावा आणि दुसरीने आपली बेताची बुद्धी आणि सामान्य रुप याची जाण ठेवून खेड्यातल्या एखाद्या शेतकर्‍याच्या गळ्यात माळ घालावी तसे या दोन माड्यांचे झाले होते. बाहेरच्या माडीवर नंतर फरशी केली, भिंतींना गिलावा केला आणि घरातला एकुलता एक सीलिंग फॅनही बाहेरच्या माडीतच लागला. आतली माडी ही बाकी वर्षानुवर्षे तशीच बिनगिलाव्याची, खडबडीत आणि पोपडे उडालेल्या जमिनीची आणि कोंदट राहिली होती. बाहेरच्या माडीला समोर पत्र्याची का असेना, पण एक गच्ची होती आणि कोजागिरीला आटवलेले दूध प्यायला किंवा चंद्रग्रहण बघायला ही गच्ची वापरली जात असे. आतल्या माडीत एका बाजूला ज्वारीची पोती रचलेली असत आणि एका कोपर्‍यात साठवणीचे कांदे ठेवलेले असत. बाहेरच्या माडीत आमच्या अभ्यासाच्या पुस्तकांचे कपाट होते, तर आतल्या माडीच्या छतांच्या वाशांना लसणाच्या माळा टांगलेल्या असत. आतल्या माडीत नाही म्हणायला उन्हाळ्यात आंब्याची अढी घातली जात असे तेव्हा ती माडी पिकलेल्या आंब्यांच्या सुवासाने दरवळून जात असे. उन्हाळ्यात दोन्ही माड्या चरचरीत तापत आणि पावसाळ्यात गच्चीतल्या पत्र्यावर जोराचा तडतड पाऊस वाजू लागला की छपरांतून सुरवंट टपटप अंथरुणात पडत.

त्या रानवट, गावठी जुन्या घरात, असल्या सगळ्या वेड्यावाकड्या,गाठीगाठीच्या आयुष्यात धडपडत, मिळेल तशी मुसंडी मारत, प्रसंगी अंग चोरून घेत माझे बालपण जगण्याचा प्रयत्न करत होते!

पणती