फडफड

पृष्ठ क्रमांक

मनीषा साधू

एकाच रांगेत असलेल्या तीन खोल्या. एवढीशी समोरची खोली. जिथे एका भिंतीशी दाराजवळच मायची सतरंजी. दुसर्‍या भिंतीशी एक खाट. कोपर्‍यात, कोनाड्यात देवघर, आत एवढेसे स्वयंपाकघर. बायको आली तर झोपणार कुठे? घराला दोनच दारं, एक मागचं नि एक पुढचं. मधे दारंच नाहीत, फक्त चौकटी. पुढचं दार सदा उघडं, त्यामुळे रस्त्यावरुन कुणी दोन पायर्‍या चढल्या की पहिले मायची पावलंच दृष्टीला पडतात.

"चाल, हातपाय धू!" नाना म्हणाले तसा तो स्वैपाकघरात आला. खिचडीची ताटली हातात धरुन मधल्या खोलीत मायपाशी आला. दुसर्‍या भिंतीशी असलेल्या खाटेवर बसून खिचडी खाण्यापूर्वी त्यानं मायकडे पाहिलं. ती नेहमीच्याच करूण, अगतिक नजरेनं त्याच्याकडे पाहत होती. तो नजरेच्या टप्प्यांत आला की ती सतत त्याला बघतच असते. तो इकडून तिकडे जाताना झोपल्या-झोपल्या वरुन-खाली, खालून वर मान फिरवून तो दिसेस्तोवर त्याला बघते. कधी-कधी पडल्यापडल्या मान उंचावून बैठकीत बसलेल्या त्याला न्याहाळत असते. तिच्यात तेवढीच हालचाल नियमीत होते.

"खाती का?"त्यानं सवयीनं विचारलं आणि तिला नकोच आहे हे ठाऊक असल्यासारखं खायला सुरुवात केली. ती जरी त्याच्याकडे सतत बघत असली तरी त्याच्यानं तिच्याकडे जास्त बघवत नसे.

टप्कन आवाज करीत एक काळा कुळकुळीत मोठा किडा त्याच्या पानात पडला. ताटलीच्या मधोमध खिचडीचा ढीग आणि काठाशी गोलाकार फुळफुळ पाणी असल्याने त्याला किडा पटकन बाजूला करता येईना. गरम पाण्यात बुडून पाय फडफडवत किडा निपचीत पडला. मायच्या पायासारखाच किड्याचा उग्र घाण वास पसरला. खिचडी खाण्याची इच्छा होईना. परंतु अन्नाच्या नावावर हे एवढंच घरात शिजल्यानं आणि खायला सुरुवात केली असल्यानं उग्र झालेल्या त्याच्या भुकेनं त्याला तशी परवानगी दिलीच नाही. घ्राणेंद्रियांकडे दुर्लक्ष करीत त्यानं खिचडी पटापट गिळली. संपेपर्यंत ओकारी येईलसे वाटून तो लगबगीनं उठला. गटागटा पाणी पिऊन त्यानं ती संवेदना दाबली अन् खिचडीचा विचार मनातून जावा म्हणून बाबीचा चेहरा आठवला. पण नेमका त्यावेळी त्याला आठवला तो बाबीचा परवा तोंडाला लसणीचा वास येत असलेला चेहरा. पातेली परत करायला आली तेव्हा त्याच्या हाती देतांना ती काहीतरी बोलली अन् भपकन् वास नाकात शिरला, तिथून घशात उतरला, त्याला अधिकच मळमळलं. त्याने तिची पावले आठवली. नेलपेंट लावलेली छोट्या चणीची सुबक पावले गज्याला फार आवडायची. पण नेमकी यावेळी आठवली ती एकदा बाजारातून येतांना गू मध्ये बरबटलेली पावलं. त्याला उलटीची छोटीशी उबळ आली पण त्यानं अर्धवट तोंडात आलेली उबळ तशीच गटकन् गिळली. मघाचा दिवाबत्तीचा सुगंध आठवला. मोठ्ठा श्वास घेतला. त्या पाठोपाठ मघा हाताला लागलेल्या खरपूस कणकेचाही वास आठवला आणि त्याला एकदम बरे वाटले.

आज त्याला ओट्यावर झोपावेसे वाटेना. पोटात काहीतरी गडबड होतेय असं वाटल्यानं त्यानं बैठकीतच गोधडी अंथरली."म्या पडतो इथं, तुमी बाहेर झोपा."त्यानं नानाला सांगितलं. न बोलता वळकटी घेऊन नाना बाहेर गेले. संवादाची आवश्यकता नानांना कधीच भासली नव्हती. या घरात तीन माणसं वर्षानुवर्ष क्वचितच एखादं वाक्य बोलत वावरत होती.

डोळा लागला न लागला तोच गज्या धडपडत उठून बसला. मायची पावलं थडाथड जमिनीवर आपटत होती. अंधारात दिसली नाहीत पण जाणवली. म्हातारं पुन्हा झोंबलं वाटतं! निदान बरं नसताना तरी... मनात बडबडत तो गुमान पडून राहिला. पावसाळ्यात घरात झोपावं लागलं की रात्री मायची आपटत राहणारी, तडफडणारी पावलं निपचित पडेपर्यंत त्याला छातीत धडधडत राहातं. ती लवकर निपचित पडली की यालाच सुटल्यासारखं होतं. गजाची माय फार सुंदर होती असं सगळे म्हणतात. सारा गावच म्हणतो, म्हणून तो विश्वास ठेवतो. नाहीतर त्यानं सदा सतरंजीवर मरणाची वाट पहात असलेलं रोगट धूडच आई म्हणून पाहिलं समज आल्यापासून, घराला घरपण, नीटनेटकेपणा, टापटीप कधी परिचयाची झालीच नाही. नुसतं निभावणं चाललंय. आला दिवस, आला प्रसंग, आल्या भुका....
माय जगली, जगतेच आहे...

पहाट झाली तसा तो उठला. झोप नंतर लागलीच नव्हती. डोके जड झाले होते. गज्या आत आला. मायला ओलांडून जातांना त्याला प्रचंड संताप आला तिचा. हे गाठोडं असंच उचलून फेकून यावं बाहेर इतका रागराग आला अन् आत जाताजाता तिला त्याच्या पायाची जोरदार ठोकर लागली.

"अं, हातपाय काय मधे टाकतीस?"तो खेकसला. ती तळमळली पण पडूनच राहिली निपचित. चूळ भरेपर्यंत गज्याचं मन पश्चातापानं भरून आलं. त्यानं आत येऊन चहा टाकला. नाना पहाटेच घराबाहेर पडले होते. त्यानं दोन कपात काळा चहा ओतला. मायपाशी आला. तिला उठवून भिंतीशी बसतं केलं. चूळ भरायला पाणी दिलं. अन् तिनं भरलेली चूळ रिकाम्या तांब्यात घेऊन, तिच्या हाती चहाचा कप ठेवून तो अंगणात चूळ फेकून आला. मांडीवर असलेला चहाचा कप हाताच्या आधारानं धरून ठेवत माय तशीच बसली होती.

"पे"गज्याचा हात तिच्या डोक्यावरून फिरला. तिचे डोळे भरून आले, आणि आपण जवळजवळ आठ दिवसांनी तिला चहा दिल्याचे त्याला आठवले.

समोरच्या दाराकडून आवाज आल्यानं त्यानं तिकडं पाहिलं तर बाबीचं डोकं पायर्‍या चढून वर उठतांना दिसलं. तीन पायर्‍या चढल्यावर ती आतून अर्धी दिसली त्याला आणि तो क्षण त्यानं क्लिक करून ठेवला. अनेकदा अनेक प्रसंगात त्याला आवडलेली बाबी त्यानं अशी आठवणीत कैद करून ठेवलीय.

बाबी आत आली. मायनं तिच्याकडे मान वळवत अगतिक कण्हल्यासारखा आवाज काढला. बाबीच्या नजरेतून माय कशी दिसत असेल म्हणून गज्यानं पाहिलं अन् तो खूप ओशाळला. झिपर्‍या झालेला, पिवळा पडलेला, खालचा ओठ लोंबून आतला पांढूरका भाग किडल्या दाताजवळून दिसणारा, लाळ गळणारा चेहरा गज्याच्या मायचा म्हटल्यावर तिला गज्याबद्दल काहीही वाटण्याची सुतराम शक्यता त्याला वाटली नाही. बाबीनं मायची साडी नीट करून तिचे पाय झाकून दिले. तोवर तिचे पाय मांडीपर्यंत उघडेच होते हेही जाणवलं नाही त्याला. बाबीनं आईची साडी इकडून तिकडून परत झटकली अन् हातानं चाचपडत काळजीनं म्हणाली,"ह्ये काय मां?"तिच्या हाताला रक्त लागलेले दिसले. तू पुढे जाऊन बैस. तिनं त्याला बाहेर काढलं. जरा वेळानं रक्तानं भरलेलं गाठोडं घेऊन ती मागील अंगणात गेली. मायला तिनं व्यवस्थित निजवलं होतं. कृतज्ञतेनं पाहणार्‍या मायकडं बघून तिनं आपल्या येण्याचं प्रयोजन जाहिर केलं."पूजा घातलीय बानं. उद्या दोघांनाबी जेवायला बोलीवलंय". दोघे म्हणजे बाप लेक असल्यानं मायसाठी भात लावून दुधात कालवून ते डचकण तिच्यापुढे मांडून नानांसोबत जो जेवायला जाणार हे निश्चित होतं, पण हे कळूनही मायच्या चेहर्‍यावरची रेषादेखील बदलली नाही.

दुसर्‍या दिवशी त्यानं घाईनं अंघोळ आटोपली. मायच्या अंघोळीचा प्रश्नच नव्हता. नाना अधूनमधून ओढत नेऊन तिला मागल्या अंगणात बसवीत, अंगावरचे संपूर्ण कपडे काढून तिच्यावर बादलीभर पाणी ओतत. मग तिचे संपूर्ण कपडे बादलीत बुचकाळून दोरीवर वाळत घालत. घरात अगदीच वास सुटला तरच तिच्या दोन अंघोळीच्या वेळेतील अंतर कमी होत असे. हरी त्याच्या मोत्याला समोरच्या अंगणात बांधून त्याच्यावर पाणी ओततो, त्यावेळच्या मोत्यासारखा भेदरलेला निमूट भिजणारा चेहरा असतो गज्याच्या मायचा.

तसा तिला आज वास सुटला होता पण गज्यानं दुर्लक्ष केलं. त्याला नाक्यावरच्या दुकानात जाण्याची घाई झाली. नाना कधीचे मागे लागलेत त्याच्या, नोकरी धर म्हणून. आज बाबीकडं जायचं असल्यानं त्याला नोकरीची अधिकच गरज वाटली. नाही म्हटलं तरी नोकरी करणार्‍या तरूण मुलाकडे बघण्याची दृष्टी वेगळीच असते मुलीच्या माय-बापांची. नाक्यावरच्या दुकानात हिशोबासाठी आणि लागल्या सवरल्या सर्वच कामांसाठी एका माणसाची आवश्यकता होतीच. नाना म्हटले जाऊन पाहायला हरकत नाही, जमलं तर जमलं. गज्याला हुरूप आला. नोकरी केलीच पाहिजे म्हणजे निदान काहीतरी बदल होईल या आयुष्यात.

गज्या दुकानावर जाऊन तिकडून परस्पर बाबीकडे गेला. हरी, गोट्या आणि रमाकांत अगोदरच पोहोचले होते. दाराबाहेर खाटेवर चौघे बसले. मोठी पुरूष मंडळी बैठकीत बसली होती. महिलामंडळ माजघरात होते. मधल्या खोलीत पूजेची गडबड.