फडफड
"काल कट्ट्यावर आला नाहीस?", हरीनं विचारलं. हरीचं शुद्ध बोलणं गज्याला आवडतं, पण त्याला प्रयत्न करूनही तसं जमत नाही. तो नको तिथे "न"ला "ण"म्हणतो, "च", "ज"चे उच्चार कोठे कसे करावे ते आपल्याला बापजन्मात कळणार नाही याची त्याला खात्रीच आहे. मात्र कल्पनेत बाबीशी बोलताना तो एकदम हरीसारखं बोलत असतो. हरी त्यांच्या कल्पनेत बाबीशी तिच्यासारखंच अशुद्ध बोलत असेल का? हा प्रश्न त्यानं मनात येताक्षणीच झटकला.
"छे! हरीनं का म्हणून बाबीची कल्पना करावी?"
"कालबी गज्याकडं बाबी गेल्ती!", गोट्यानं खडा मारला.
"खूब येते आजकाल, कावून गा?", रम्यानं गज्याच्या खांद्यावर थाप दिली.
"येऽऽ बाबीचा ऋसीकपूर (रूसीकपूर) बनू नगं बे!", गोट्यानं खसखस पिकवली.
"अरे जाने दो यार, छोडो मजाक! बाबी काय छान दिसतेय नाही आज! तू बघितलंस गज्या?"हरीच्या या बोलण्यातून निदान तो तरी तिच्यावरचा दावा असा सोडणार नाही हेच त्याला दाखवायचं असावं असं वाटलं गज्याला.
पण गज्या काही बोलला नाही. सगळेच बाबीबद्दल काहीबाही बोलतात. गावात बर्या दिसणार्या चार-दोनच पोरी. त्यातही बाबी उजवी. एकदम तिच्यावर हक्क सांगणं शत्रुत्व घेण्यासारखंच.
बाबीला पाहायला मिळावं म्हणून गज्या उठला."काकीनं गौर्या सांगितल्या व्हत्या काल. मिळाल्याका पाहून येतो."असं म्हणत तो थेट आत निघाला. या कृतीतून आपण काम सांगण्याइतके आत्मीय आहोत, हे तर दाखवायचे होतेच शिवाय बेधडक घरात जाण्याइतके त्यांच्या जवळचे हेही सुचवायचे होते. हरीला या गोष्टीनं फारसा फरक पडलेला दिसला नाही. मात्र रम्या, गोट्या जरा वेगळे बघत असावेत, असा त्यानं अंदाज बांधला. आत जाताना बाबीच बाहेर येताना त्यानं पाहिली. पण आता थांबताही येईना. तो आत गेला नि बाबी बाहेर येवून सगळ्यांशी बोलली. तो बाहेर येईस्तवर बाबी आत कामाला लागली होती. त्यानं आपल्यालाही काही फरक पडला नाही असं दाखवणं गज्याला जड जावू लागलं. मनातल्या मनात तो स्वत:च्या आगावूपणावर शिव्या घालू लागला.
बाबीच्या दारात पोपटाचा पिंजरा होता. सगळ्यांना वाढून झाल्यावर तिनं पिंजरा साफ केला. वाटीत दूध-भात कालवून आत सरकवला आणि मायेनं पिंजर्याचं दार लावलं. गज्याला मायला साफ करणारी बाबी आठवली अन् इथे येण्यापूर्वी नानानं मायसमोर सरकवलेलं दूधभाताचं कटोरंही आठवलं. खाल्ला असेल का मायनं भात? जेवतांना त्याच्या हातात जिलबी बराच वेळ घोळत राहिली. घरी आल्यावर त्यानं बघितलं तर मायचं अंथरूण खराब झालेलं. घरात घाण सुटलेली. न काढून चालण्यासारखं नव्हतं. काढण्याची इच्छा होईना. अन्न पोटात डचमळू लागलं. त्यानं कसंबसं नाक दाबून मायच्या खालून अंथरुण ओढलं. घाणीनं, रक्तानं भरलेलं ते अंथरुण मागील अंगणात टाकलं. तिच्या अंगाखाली पोतं सरकवून तो दार लोटून ओट्यावर पडून राहिला.
दुसर्या दिवशी नाना सकाळीच गावी गेले. मायकडे लक्ष ठेव म्हणून गज्याला सांगून गेले. आंघोळ आटपून गज्या गावाबाहेर फेरफटका मारायला गेला. गावाच्या वेशीनजीक असलेल्या मारवाडी मंदिराच्या पारावर कितीक वेळ बसून राहिला. एवढी शांती आयुष्यात प्रथमच भोगतोयसं वाटलं त्याला. डोक्यावर, खांद्यावर पदर घेतलेल्या आणि शांतपणे नाजूक टाळ वाजवीत किनर्या आवाजात भजन गाणार्या मारवाडी बायकांचा हेवा वाटला त्याला. उन्हं वाढल्यावर भुकेची जाणीव झाली. परंतु घराकडे पावलं वळेना. नाना गावी गेलेत हे विसरूनच गेला तो. गावाबाहेरच्या धाब्यावर खाटेवर टेकला तसा एक ओळखीचा चित्कार ऐकू आला त्याला. त्याचा जुना मित्र शेखर गज्याला बघून ओरडलाच. शेखर जवळच्या तालुक्यात शिकायला होता. नुकतीच त्यानं गावात शेती घेतल्याचं ऐकलं होतं गज्यानं. शेखरनं दोघांच्या जेवणाची ऑर्डर दिली. गप्पा-टप्पा झाल्यावर शेखर त्याला बाईकवर बसवून शेत दाखवायला गेला. आपणही नोकरी लागल्यावर शेतीचा एखादा तुकडा घेवून टाकायचा असं मनोमन ठरवलं गज्यानं. संध्याकाळी घराकडच्या गल्लीत शिरताच घराभोवती गच्च गर्दी पाहून, त्याच्या काळजात धस्स्कन हाललं.
"माय वोऽऽऽ"आतल्या आत अस्फुट स्वर निघाला. क्षणभरच तो जागच्या जागी स्तब्ध झाला. अंगात बधिरता पसरली. डोकं शांत जड पडलं आणि अचानक काही क्षणातच परिवर्तन झाल्यासारखं त्याला एकदम हलकं वाटलं. रिकामी झालेली मधली खोली त्याच्या डोळ्यापुढे आली. चार दिवस राहतील पाव्हणे-रावळे. गेले की मग चुना घेवू मारून सगळ्या घराला. किती वर्षं झाली भिंतीवरून हात फिरला नाही कशाचा. चुन्यात चिमूटभर हिरवा किंवा निळा रंग मिसळला तर अगदी हरीच्या बैठकीसारखा जरी नाही तरी जवळपास जाणारा रंग निश्चितच होईल. बैठकीतही जरा एक-दोन खुर्च्या जुन्या बाजारातून आणता येतील. त्याला घरातली सगळी अडगळ माय बरोबरच तिरडीवर चढवून पाठवून द्यावीशी वाटली. अन् या विचाराने एकदम उत्साह संचारला. नाना बाहेर गावाहून आले नसतील अजून. त्यांना निरोप द्यावा लागेल. काकीला बाबीसोबत आत बायकांची व्यवस्था बघायला सांगता येईल. त्याला एकदम कर्ता झाल्यासारखे वाटले. अन् आतून सळसळणारी काम करण्याची ऊर्मी बघून स्वत:चंच आश्चर्य वाटलं. ओशाळंही वाटलं त्याचवेळी. आजवर बठ्यासारखे घरात-दारात बसून राहणारे आपणच कां? माय सतरंजीवर पडलेली असते आणि आपण ओट्यावर, एवढाच काय तो फरक. आज आपले हातपाय चालतात, काम करू शकतात. हा नवाच साक्षात्कार झाला त्याला.
लगबगीनं गज्या गर्दीत शिरला."गज्या रं...."एकानं पाठीवर करूण थाप दिली. गजानं चेहरा अधिकच गंभीर केला. आता त्याला वाईट वाटायलाच हवे होते. गर्दीनं त्याला वाट करून दिली. जवळपास प्रत्येकजण त्याच्याचकडे पहात होता. बरं झालं आज चौकड्याचा शर्ट घातला ते, तो मनात म्हणाला. आता गज्या जुने क्षण आठवू लागला की ज्यामुळे त्याला रडू येईल. परंतु आठवत आठवत बालपणीच्या धूसर आठवणींपाशी पोहोचल्यावरही डोळे किंवा हृदय भरुन यावं असं काहीच गवसलं नाही त्याला. तोवर तो दाराशी पोहोचला होता. मायला दोन्हीकडून धरून दोघी बाया आत नेत होत्या.
बाबी दाराशीच उभी होती. गज्याच्या कारभारणीसारखी ती गर्दीवर देखरेख करीत होती.
"कुठं व्हता गज्या? नानांबी न्हाईती गावात. मायबाईला टाकून कुठं हिंडत व्हता?"तिनं बोलून दाखविलं अन् गर्दीतून अनेकांनी नजरेनं तेच दाखवलं. तिचं असं सगळ्यांदेखत आरोप करणं आणि गर्दीला चुकीची दिशा देणं आवडलं नाही त्याला.
"कवा झालं?"त्यानं घसा खाकरून बाबीच्या जवळ सरकून गंभीर स्वरात विचारलं. गर्दीत गोट्या आणि रम्यालाही पुसटसं पाहिलं होतं त्यानं. बायकोशी घरातील गंभीर विषयावर चर्चा करावी व आता पुढं कसं काय करावं असं कारभारणीला विचारावं त्या अविर्भावात तो तिच्याशी बोलला.
"काय कवा झालं?"बाबी खेकसली."कवा बी घासत येतीय मायबाई तुहीवाली. बाहीर पडलीनं धाडकन्! ह्यो जोरात आपटलीन्. ह्ये मंगल काकी वाळवून लावीत व्हती ओट्यावर. तिनंच पाह्यलं पयल्यांदा. धावत आली अन् ज्ये ओरडली की आमी धावलो समदे. हरीचतं आला पयल्यांदा धावून! लय मदत केली त्यानं. डॉक्टरले आनालेबी गेलाय त्थ्यो?"एका श्वासात तिनं सांगितलं."तुले तं कायबी काम करायला नको. नुसता पडलेला आसतोय हाती-पायी धड असून. "म्हणजे?... माय जित्ती हाय?" तो तिरासारखा आत घुसला. माय फरशीवर कण्हत पडली होती. पावले थरथरत होती तिची. चेहरा पांढराफट पडला होता.
"कायले हालतीस वं जागची?"तो हळूच खेकसला. त्याच्या या क्षणीच्या संपूर्ण दुर्दशेला तिच कारणीभूत आहे याची खात्री पटली त्याला. एका बाईनं पाणी पाजलं मायला. ती गटागटा पाणी प्यायली आणि पहाटेपासून तिला आपण पाणीही दिलंनाही हे आठवलं त्याला.
पुढं काय करावं हे न सुचून तो परत बाहेर आला. हरीसोबत डॉक्टर आले. गज्यालाही गर्दीतलाच एक समजून, दम देवून त्यांनी बाजूला केलं आणि हरीसोबत आत गेले. घर आता इतरांच्या ताब्यात होतं. सगळं उध्वस्त झालं गजासाठी. क्षणात तो नायकाचा खलनायक झाला.
हळूहळू गर्दी पांगली. अगदी सगळेच निघून गेले. खूप रिकामा गज्या ओट्यावर बसून राहिला. अंधार दाटून आला. हातापायाला चावू लागल्यावर आत जाण्याचा विचार गज्याच्या मनत आला. परंतु त्याने नुसतेच आत पाहून घेतले. मायची पांढुरकी फिक्की पावले तशीच त्याच जागी निपचित पडलेली पाहून व आपल्या घरातील सर्व वस्तू परिस्थितीसकट तशाच पूर्वीसारख्या असलेल्या बघून एक जुनाट समाधानाची कळ निघाली. पोटात भूक भडकूनही तो खिचडी टाकण्याच्या भानगडीत न पडता डास मारीत तसाच ओट्यावर बसला.