पैज

पृष्ठ क्रमांक

नंदन होडावडेकर

त्या वृद्ध सावकारांना हे सारं आठवलं, आणि वाटलं, "उद्या दुपारी बारा वाजता तो मोकळा होईल. कराराप्रमाणे मी त्याला दोन लाख देणं लागतो. ते पैसे मी त्याला दिले, म्हणजे माझा सर्वनाश हा अटळ!"

पंधरा वर्षांपूर्वी सावकारांच्या संपत्तीची मोजदादच शक्य नव्हती; पण आता देणी अधिक आहेत की जमाखात्यातली रक्कम, हा प्रश्नदेखील ते स्वत:ला विचारण्यास भीत होते. शेअरबाजाराच्या सट्ट्यावर खेळलेला जुगार, मन मानेल तशा अटकळी बांधून केलेली गुंतवणूक आणि वय वाढत चाललं तरी या सार्‍याची न उतरणारी झिंग; यामुळे हळूहळू त्यांच्या वैभवाला उतरती कळा लागली होती. एकेकाळचा धनाढ्य, गर्विष्ठ सावकार आता फक्त एक छोटा, कुडमुड्या गुंतवणूकदार म्हणून उरला होता. शेअरबाजारातल्या चढउतारांसोबत त्याचं काळीजही गोते खाई. "खड्ड्यात गेली ती पैज!" वैफल्याने आपलं डोकं धरून तो वृद्ध सावकार म्हणाला, "मेला का नाही तो आतापर्यंत? जेमतेम चाळिशीत असेल तो. जे काही उरलंसुरलं आहे, ते हिरावून घेईल माझ्यापासून आणि आपलं बाकीचं आयुष्य सुखात घालवेल. लग्न करेल, चैन करेल, शेअरबाजारात आपलं नशीब आजमावेल; आणि मी मात्र एखाद्या भिकार्‍यासारखा त्याचा मत्सर करत राहीन. 'माझ्या आयुष्यातलं हे सारं सुख तुमच्याचमुळे आहे, मी तुम्हांला मदत करतो.' असं रोज म्हणून तो मला खिजवत राहील. नाही! हे सोसायचं नाही मला! आता या नामुष्कीतून वाचण्याचा एकच मार्ग आहे - त्याचं मरण!"


घड्याळात तीन ठोके पडलेले सावकारांनी ऐकले. वाड्यात सगळे झोपले होते. गोठलेल्या झाडांची मंद सळसळ सोडली तर बाहेरही सामसूम होती. अजिबात आवाज न करता त्यांनी आपल्या तिजोरीतून पंधरा वर्षं बंद असणार्‍या त्या बंगलीच्या दाराची किल्ली काढली आणि कोट चढवून ते घराबाहेर पडले.

बाहेर थंड, मिट्ट अंधार होता. झिमझिम पाऊस पडत होता. गार, झोंबरा वारा भणभणत वाहत होता आणि झाडांना क्षणाचीही उसंत देत नव्हता. सावकारांनी डोळे फाडफाडून पाहण्याचा प्रयत्न केला पण जमीन, बागेतले सफेद पुतळे, ती बंगली, झाडं - काही म्हणता काही त्यांना दिसलं नाही. अंदाजाने बंगलीच्या दिशेने जाऊन त्यांनी दोनदा रखवालदाराला हाळी घातली. उत्तर आलं नाही. बहुतेक थंडीपासून बचाव करण्यासाठी त्याने घरात आश्रय घेतला असावा, आणि आता कुठेतरी तो घोरत पडला असावा.

"मी ठरवलेली गोष्ट करण्याइतपत धैर्य गोळा करू शकलोच, तर पहिला संशय त्या रखवालदारावर येईल." सावकारांनी स्वत:शीच विचार केला.

अंधारात चाचपडत, बंगलीच्या पायर्‍यांचा व दाराचा अंदाज घेत ते आत आले. काडी पेटवून त्या प्रकाशात त्यांनी बाहेरच्या खोलीत पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं. गादी नसलेला एक पलंग आणि एक जुना स्टोव्ह एवढंच सामान तिथे होतं. कैद्याच्या खोलीकडे जाणारं कुलूप अजूनही सीलबंद होतं.

हातातली काडी जळून गेल्यावर, भावनावेगाने थरथरत सावकार छोट्या खिडकीपाशी गेले आणि त्यांनी आत डोकावून पाहिलं. कैद्याच्या खोलीत फक्त एक मेणबत्ती मंदपणे तेवत होती. तो आपल्या टेबलापाशी बसला होता. त्याची पाठमोरी आकृतीच तेवढी त्यांना दिसत होती. टेबलावर, जवळच्या दोन आरामखुर्च्यांत, गालिच्यावर - सगळीकडे उघडून ठेवलेली पुस्तकं पसरली होती.

पाच मिनिटं झाली तरी कैदी एकदाही हलला नाही. पंधरा वर्षांच्या कैदेमुळे असं स्थिर बसून राहणं त्याच्या चांगलंच अंगवळणी पडलं होतं. सावकारांनी खिडकीवर बोटाने हळूच टकटक केली, तरी त्याचा काही प्रतिसाद नव्हता. मग अत्यंत काळजीपूर्वक सावकारांनी दाराचे सील फोडून चावी कुलपात घातली. ते जुने गंजलेले कुलूप कर्कश आवाज करत उघडले. दरवाजा करकरत थोडा किलकिला झाला. हा आवाज ऐकून कैदी आश्चर्याने ओरडत बाहेर येईल, अशी सावकारांची अपेक्षा होती; पण तीन मिनिटं झाली तरी खोलीत पूर्वीइतकीच शांतता होती. अखेर मनाचा हिय्या करून त्यांनी आत जायचा निर्णय घेतला.


टेबलापाशी अजिबात न हलता स्थिर बसलेला माणूस फार वेगळा होता. हाडांचा सापळा झालेला, खुरटी दाढी आणि एखाद्या स्त्रीचे असावेत तसे केस लांबसडक वाढलेला. त्याचा निस्तेज चेहरा फिकट पिवळा दिसत होता; गाल खपाटीला गेले होते; पाठ निमुळती, लांबोडकी दिसत होती आणि ज्या हातावर तो डोकं ठेवून बसला होता, तो इतका बारीक आणि नाजूक होता की त्याकडे पाहवत नव्हतं. त्याचे केस पिकू लागले होते आणि त्याचा ओढलेला, वृद्ध चेहरा पाहून कुणाचाही तो फक्त चाळीस वर्षांचा आहे, यावर विश्वास बसला नसता. कैदी गाढ झोपेत होता. टेबलावर कागदांची एक चळत होती. सुरेख हस्ताक्षरात त्यांवर काही लिहिलेलं दिसत होतं.

"बिच्चारा!" सावकार स्वत:शी म्हणाले, "लाखांची स्वप्नं बघत गाढ झोपला आहे. या मरतुकड्या माणसाला संपवायला फार कष्ट पडणार नाहीत. पलंगावर फेकून देऊन, उशीने जरा वेळ तोंड दाबून धरलं तरी याचा जीव जाईल आणि अगदी चाणाक्ष तज्ज्ञालाही हा हिंसक खून आहे, हे सांगता यायचं नाही. पण, हे काय लिहिलंय याने?"

सावकारांनी टेबलावरचं पान उचललं. त्यातला मजकूर असा होता-

"उद्या दुपारी बारा वाजता मी कैदेतून मोकळा होईन. जगात पुन्हा मिसळू शकेन. या खोलीबाहेर पडून पुन्हा एकदा सूर्यप्रकाश पाहू शकेन. पण त्याआधी तुम्हांला काही सांगणं आवश्यक आहे. देवाला आणि माझ्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून सांगतो की मला आता स्वातंत्र्य, जीवन आणि आरोग्य ह्या सगळ्या गोष्टींची घृणा येऊ लागली आहे. तुमची एकजात सगळी पुस्तकं याच गोष्टींचा उदोउदो करत असतात.

गेली पंधरा वर्षं मी निष्ठेने या पृथ्वीवरच्या जीवनाचा अभ्यास केला. मी जग पाहिलं नाही किंवा कुणाला भेटलो नाही हे खरं आहे, पण ही पुस्तकं वाचताना मी सुगंधी मदिरेचा आस्वाद घेतला, गाणी गायली, अरण्यात जाऊन हरणांची आणि रानडुकरांची शिकार केली, अनेक स्त्रियांवर प्रेम केलं. तुमच्या यच्चयावत कवींनी आणि प्रतिभावंतांनी जादूने निर्माण केलेल्या दैवी सौंदर्याच्या स्त्रिया रात्री पृथ्वीवर येऊन माझ्याशी हितगुज करत. त्यांनी सांगितलेल्या अद्भुत गोष्टी ऐकून माझं डोकं चक्रावून जाई. तुमच्या पुस्तकांतूनच मी उंच, हिमाच्छादित शिखरं सर केली आणि तिथून सूर्य उगवताना पाहिला; मावळताना त्याने जगावर केलेली रंगांची उधळण पाहिली. समुद्र आणि शिखरं सोनेरी-तांबड्या रंगांत नाहून निघालेली पाहिली. तिथूनच मी डोक्यावरच्या गर्द वादळी ढगांना भेदून कडाडणारी विद्युल्लता पाहिली. हिरवी रानं पाहिली. शेतं, नद्या, तलावं, शहरं - सारं सारं पाहिलं. शहरातले भोंगे ऐकले तसंच कुणा मेंढपाळाचा पावाही ऐकला. अगदी देवाबद्दल माझ्याशी हितगुज करायला येणार्‍या त्या आकर्षक सैतानांच्या पंखांनाही स्पर्श केला...तुमच्या ह्या पुस्तकांतून मी स्वत:ला तळ नसणार्‍या खोलच खोल दरीत स्वत:ला झोकून दिलं आहे, चमत्कार घडवले आहेत, युद्धं लढलो आहे, शहरं बेचिराख केली आहेत, नवीन धर्माचा प्रसार केला आहे, साम्राज्यच्या साम्राज्य पादाक्रांत केली आहेत...


....तुमच्या पुस्तकांनी मला ज्ञान दिलं. इतक्या शतकांत माणसाने आपल्या ज्या खदखदत्या विचारांना मूर्त रूप दिलं, ते सारं काही आता माझ्या या छोट्याशा मेंदूत सामावलेलं आहे. तुम्हां सर्वांपेक्षा मला अधिक ज्ञान आहे, याची मला जाणीव आहे.

पण तरीही मी तुमच्या पुस्तकांचा तिरस्कार करतो, ज्ञानाचा तिरस्कार करतो आणि सगळ्या ऐहिक सुखांचाही तिरस्कार करतो. हे सगळं वृथा आहे; क्षणभंगुर आहे; फसवं, खोटं आहे हे सारं - एखाद्या मृगजळासारखं. तुम्ही आज मोठे अभिमानी आणि ज्ञानी असाल; पण मृत्यू एका क्षणात तुमचं अस्तित्व मिटवून टाकेल. त्याच्या दृष्टीने एखाद्या खुडबुडणार्‍या उंदराहून तुम्हाला अधिक महत्त्व नाही. तुमची संस्कृती, तुमचा इतिहास, तुमचे कालातीत प्रतिभावंत - या पृथ्वीबरोबरच सारे एक ना एक दिवस जळून किंवा गोठून नष्ट होतील.

तुम्ही सगळेच सारासार विचार करण्याची शक्ती गमावून बसला आहात. चुकीच्या रस्त्याने चालला आहात तुम्ही. खोटं ते खरं आणि कुरुप ते सुंदर, अशी तुमची समजूत आहे. समजा, उद्या अचानक सफरचंदांच्या आणि संत्र्यांच्या झाडावर फळांऐवजी बेडूक आणि पाली उगवू लागल्या; किंवा गुलाबांतून असह्य दुर्गंध येऊ लागला तरी तुम्ही त्याचा आस्वाद घ्याल. स्वर्गाऐवजी पृथ्वी पसंत करण्यामागचं तुमचं कारण काही मला उमगत नाही; नव्हे तुम्हांला समजून घेण्याची इच्छाच मला उरलेली नाही.

मला ह्या गोष्टींबद्दल किती तिरस्कार वाटतो हे कृतीने सिद्ध करण्यासाठी, मी पैजेच्या दोन लाखांवर पाणी सोडायला तयार आहे. एकेकाळी स्वर्गाची वाट पहावी तशी मी या रकमेची वाट पाहत होतो, पण आता मला या पैशांबद्दल फक्त घृणाच वाटते. ठरलेल्या वेळेच्या फक्त पाच तास आधी मी इथून निघून जाईन; म्हणजे कराराचा भंग होईल आणि त्या पैशांवर माझा कोणताही हक्क उरणार नाही."

पान वाचून झाल्यावर सावकारांनी ते सावकाश पुन्हा टेबलावर ठेवलं. मनोमन ह्या अवलियाचा निरोप घेऊन ते बंगलीबाहेर आले. त्यांच्या डोळ्यांतून आसवं वाहत होती. आजवर आयुष्यात कधीही - अगदी शेअरबाजारात दिवाळं निघालं तेव्हाही - वाटली नव्हती, इतकी त्यांना आज स्वत:चीच घृणा वाटत होती. घरी येऊन ते बिछान्यावर पडले, पण कितीतरी तास त्यांना झोप लागली नाही.

दुसर्‍या दिवशी सकाळी रखवालदार पडलेल्या चेहर्‍याने धावत आले. बंगलीतल्या कैद्याला खिडकीवाटे बाहेर पडून, निघून जाताना त्यांनी पाहिलं होतं. तातडीने सावकार नोकरांसोबत बंगलीवर गेले आणि त्यांनी कैद्याच्या पलायनाची खातरजमा केली. उगाच गावगप्पा नकोत, म्हणून त्यांनी लाखो रूपयांवर पाणी सोडणारे ते कागद उचलले आणि घरी येऊन आपल्या तिजोरीत बंद करून ठेवून दिले.

paNatee