तुम्हाला हे खुपते का?

हल्ली दूरचित्रवाणीवरून जे मराठी ऐकू येते ते बरेचसे हिंदी किंवा इंग्रजीचे भाषांतर असते. अशा वाक्यरचना कृत्रिम तर वाटतातच पण कधी कधी अर्थाच्या दृष्टीनेही चुकीच्या असतात.

उदाहरणार्थ:
 
१. जागो ग्राहक जागो  चे जागा ग्राहक जागा.
२. तू माझी  मदत करशील का?

३. तू असं काही करणार नाहीस!
यू आर नॉट गोइंग टू डू एनिथिंग लाइक धिस ह्याचं हे शब्दश: भाषांतर मला तरी कृत्रिम वाटतं. तू असं काही करायचं नाहीस. किंवा संदर्भानुसार थोडी रचना बदलून तुला मी असं काही करू देणार नाही. अशा वाक्यरचना मराठीत चांगल्या वाटतील.

३. निरनिराळे सेवादाते दिलगिरी व्यक्त करताना ’आम्ही क्षमस्व आहोत.’ असे म्हणतात. ’क्षमस्व’ शब्दाचा अर्थ ’क्षमा करा(वी)’ असा आहे. त्यामुळे हे वाक्य हास्यास्पद होते.

पण ह्या सर्वांवर कडी करणारे भाषांतर नुकतेच ऐकले. एका व्यक्तीचा गौरव करताना ’आपण तीन वेळा अमेरिकेला जाऊन आले आहेत.’ असे वक्त्याने म्हटले.
मी जे मराठी व्याकरण शिकले आहे त्यानुसार हे वाक्य चूक आहे. मराठीत ’आपण’ हे द्वितीयपुरुषी बहुवचनी सर्वनाम आहे आणि ते आदर दाखवण्यासाठी वापरले जाते. ’आपण’ हे प्रथमपुरुषी बहुवचनी सर्वनाम पण आहे. त्यावेळी ज्याच्याशी बोलणे चाललेले असते त्याचा समावेश त्यात केलेला असतो. उदा. : आपण फिरायला जाऊया. पण मराठीत ’आपण’ हे तृतीयपुरुषी सर्वनाम नाही. हिंदीमध्ये द्वितीयपुरुषाप्रमाणेच तृतीयपुरुषातही  आदर दाखवताना ’आप’ वापरतात. पण मराठीत तसे नाही (माझ्या माहितीप्रमाणे).
(महात्मा गांधींचा उल्लेख he  असा एकेरी कसा करायचा असे वाटून they असा उल्लेख करणारी माणसे मला माहीत आहेत. हे मला थोडे फार तसेच वाटते.)

असे आणखीही बरेच आहे. मला हे खुपते, तुम्हाला?