इंग्रजी शब्दांचे मराठी उच्चार

भारतातल्या भारतात एका इंग्रजी शब्दाचे उच्चार विविध प्रकारे व्हावेत ही गमतीची आणि काही वेळेला गंभीरपणे विचार करायला लावणारी गोष्ट आहे.


मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्यांना भूगोलाच्या पुस्तकात विविध हवामानांच्या प्रदेशांची माहिती वाचताना टुंड्रा (Tundra) प्रदेशाची ओळख झाली. ह्या टुंड्रा शब्दाला भारतीय भाषांत प्रतिशब्द नाही. भारतातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून Tundra चा उच्चार टंड्रा असा शिकवला जातो, जो उच्चार योग्य आहे. अमेरिका व युरोपात टंड्रा असाच उच्चार केला जातो. मग असे असताना मराठी शाळा विद्यार्थ्यांना चुकीचा उच्चार का शिकवत असतील? पाठ्यपुस्तकात चुकीचा उच्चार का लिहिला जातो? अमेरिकेत येऊन टंड्रा हा शब्द ऐकेपर्यंत मला मी टुंड्रा असा चुकीचा उच्चार शिकले ह्याची कल्पनाच नव्हती.


मराठी शाळांमधून v/w चा उच्चार व्ह असा शिकवला जातो. व्हॉट, व्हाय, व्हेन, व्हेअर, व्हॉइस, व्हर्च्युअल असे उच्चार शिकवले जातात. v/w चा उच्चार व असा आहे. वॉट, वाय, वेन असे उच्चार इंग्रजी माध्यमातून शिकलेली भारतीय मंडळी व अमेरिका-युरोपातील जनता करत असताना मराठी माध्यमात व वर जोर देऊन त्याचा व्ह उच्चार का शिकवला जात असावा? जसा h ला हेच् म्हणणारा भारतीय बहुतेक आंध्रप्रदेशी असतो, तसाच v/w चा उच्चार करणारा भारतीय बहुतेक मराठी असतो.


गेल्या काही दिवसांत लोकसत्ता व महाराष्ट्र टाईम्स मध्ये 'सर्व्हेक्षण' असा गमतीशीर शब्द वाचायला मिळाला. survey ला सर्वेक्षण हा मराठी प्रतिशब्द आहे. ह्या दोन्ही उच्चारांचे एकत्रीकरण होऊन सर्व्हेक्षण हा नवीन पण चुकीचा शब्द हल्ली सर्रास वापरला जातो असे दिसते.


असे आणखीही काही शब्द असू शकतात. अशा शब्दांची उच्चारांसहित यादी करून शिक्षणखात्याकडे पाठवावी का?