वाटाः खारीचा किंवा सिंहाचा

मंडळी,


हल्ली देशांतर, देशाभिमान, आरक्षण अशा अनेक विषयांवरच्या चर्चांमधून "देशसेवा" हा विषय कधी निसटतेपणी तर कधी रोखठोकपणे ऐरणीवर येत आहे. त्यातून विचार आला की पाच हजारांच्या आसपास संख्या असलेले मनोगती व्यक्तिशः देशासाठी काही करतात का आणि केलं तर काय काय करतात याचीच चर्चा केली तर? मला अशा चर्चेचे खालील फायदे वाटतातः



१. इतरांच्या उपक्रमांपासून प्रेरणा घेऊन कदाचित नवीन सेवेच्छु प्रव्रृत्त होतील ("अरेच्चा! हे तर मीही करू शकेन की!").


२. काही नव्या कल्पना समोर आल्याने एखाद्या सेवाभावी व्यक्तीला सेवेचे नवे मार्ग सापडतील.


३. कोणी आधीच एखादा उपक्रम राबवीत असेल तर त्या कार्यात अन्य मनोगतींची मदत होऊ शकेल.


४. अगदीच काही नाही तर पुन्हा वायफळ चर्चा करायला आपण मोकळे होऊ ;)


चर्चेचे काही ढोबळ नियम करू या का?



१. कितीही लहान प्रमाणावर असला तरीही तुमचा स्वतःचा सहभाग किती आणि काय हे सांगायचं आहे.


२. उपक्रम शक्यतो "देशसेवा"/"समाजसेवा" अशा कप्प्यांत बसणारा असावा (म्हणजे "ग्रंथचर्चा"/"नाट्यरजनी"/"पक्षीनिरीक्षण शिबीर आयोजन" वगैरे नको ). याउप्पर तुम्ही तुमच्या व्याख्या वापरा.


३. तुमचा सहभाग हा अन्य एखाद्या संस्थेमार्गे होत असेल तरीही हरकत नाही. मात्र "शाखेत जातो" किंवा "लायन्स क्लबचा मेंबर आहे" यापुढे जाऊन नक्की करता काय ते सांगा.


४. तुमच्या मनात घोळत/शिजत असलेल्या नव्या कल्पना मांडायला हरकत नाही.


५. गुजरात भूकंपानंतर जुजबी आर्थिक मदत, सुनामीच्या वेळी जुन्या कपड्यांचे दान - ही स्तुत्य असली तरीही सर्वसामान्य "प्रतिक्षिप्त" क्रिया झाली. त्याहून थोडी वेगळी उदाहरणे अपेक्षित आहेत.


६. काहीही करत नसाल, तर बेलाशकपणे तसं लिहून मोकळे व्हालच (माझ्यासारखे).


मीच पहिली उतारी करायला हवी, पण टाकण्याजोगं एकही खास पान माझ्याकडे नाही. भारतीय संस्कृती जपणाऱ्या अमेरिकेतील एका संस्थेच्या कामात काही वर्षे सक्रिय सहभाग एवढेच माझे श्रेय. त्याचा भारताला थेट काही फायदा होत असेल असे मला वाटत नाही.


आता तुमची खेळी.


- कोंबडी