नशीब माझे . . . . भाग २

जन्मा आधी आणि नंतर आईच्या आहाराचे महत्त्व समजण्याकरिता मीच एक चांगले
उदाहरण होऊ शकेन. ह्याचे कारण घरातील बाकी भावंड आणि मी ह्यात जाणवेल इतपत
वेगळेपण होते. वयाच्या १४ वर्षापर्यंत मी रडक्या ह्याच नावाने प्रसिद्ध
होतो, ते का हे मी शोधून काढू शकलो.
ह्याच १४ वर्षात महिना दोन महिन्यात एक छोटी-मोठी जखम जरुर होत असे आणि ती
जखम चिघळायची, मग वाळून बरी होण्यात महिना दोन महिने जायचे.  त्यामुळे
माझ्या वर प्रत्येक जण नाराज असे. त्यात ती औषध, पट्ट्या, जखमा धुताना
माझे ओरडणे, मी तासनतास  रडत बसत असे. तुमचाच काय कोणाचाच विश्वास बसणार
नाही पण खरंच घडले होते, कमीत कमी १२ - १५ वेळा मला कावीळ झाली होती.
कावीळ झाली की आधी डॉक्टरकडे जायचे तीन दिवस ते कडवट औषध रडत, मार खात
प्यायचे, मग आमची भांडी घासणारी सखूबाई एका तांत्रिकाला घेऊन यायची,
त्याचा पत्ता फक्त तिलाच माहीत होता. पत्ता विचारण्याचा भोचकपणा कोणालाच
मान्य नव्हता. हा बाबा कुठल्याशा तंद्रीत असायचा. मी पाटावर बसायचो तो
जमिनीवर बसायचा. आई एक शेराच भांड भरून फक्त ज्वारी त्याला द्यायची.
माझ्या समोर पाण्याने भरलेली एक थाळी असायची, बाबा त्याच्या दोन्ही हातात
चिमूटभर ज्वारीचे दाणे घ्यायचा, माझ्या अंगाला स्पर्श न करता त्याच्या
दोन्ही मुठी माझ्या खंद्यांपासून खाली जमिनी पर्यंत न्यायचा, त्याचे डोळे
बंद व तोंडाने काहीतरी पुटपुटणे चालू असायचे. असे तीन वेळा केल्यावर
मुठीतले ते ज्वारीचे दाणे माझ्या हातात टाकायचा, दोन्ही हाताने मी ते दाणे
खूप रगडायचे मग त्या पाण्यात टाकून द्यायचे. थाळीतले ते पाणी गडद पिवळ्या
रंगाचे होत असे. ही क्रिया तीन वेळा होत असे. बाबा त्या पाण्याचे निरीक्षण
करायचा, जरूरीचे असल्यास पुन्हा त्या सगळ्या क्रिया केल्या जात असत. पण
सारांश काय तर मी ठणठणीत काविळीतून बरा होत असे.
डॉक्टरला ही धूळफेक वाटली म्हणून पुढील दोन कावीळ आजारात प्रयोग म्हणून
औषध न देता आधी तांत्रिकाला बोलावले, मी दोन्ही वेळा बाबाच्या एकाच बैठकीत
आजारातून बरा झालो. डॉक्टरच्या औषधाने आजारातून बाहेर येण्यास जास्त वेळ
लागत असे.
श्रद्धा असणारे व अंधश्रद्धा म्हणत नगारे वाजवणाऱ्यांनी एकमेकांची डोकी
फोडावीत, कदाचित तो त्यांचा अस्तित्वाचा भाग असेल. परंतु त्या तांत्रिक
बाबा च्या मदतीने मी काविळीतून धडधाकट बरा होणे हा माझा अनुभवलेला
प्रात्यक्षिक परिणाम होता.
विद्युत-चुंबकीय लहरी व रिझोनन्स ह्या शास्त्राशी ह्याचा काहीस संबंध
असावा असे माझे मत आहे, ह्या विषयी जी माहिती मी वाचली, मिळवली त्या वरून
मला असे वाटते. संबंधीत शिकवलेल्यांनी विचार करावा.
एकदा एका घटनेने माझी रडक्या ही छबी संपुष्टात येण्याची चिन्हे दिसू
लागली. कबड्डीच्या एका खेळीत माझ्यापेक्षा ८ – १० वर्षाने मोठा असलेल्या
मुलाला मी एकट्याने घट्ट पकडून बाद केले. मला हे शक्य असण्याचा
आत्मविश्वास निर्माण करणारा तो क्षण होता. खऱ्यात अर्थाने आत्मविश्वासाने
जगाला सामोरे जाण्याला अजून बराच लांबचा पल्ला गाठणे हेच समोर दिसत होते -
- - - नशीब माझे - - - - भेटू  भाग - ३