देवनागरी लिपीतील अनावश्यक उर्ध्वरेषा

देवनागरी लिपीतील अनावश्यक उर्ध्वरेषा

शालान्त परीक्षा जवळ आली आहे.अशा वेळी मला माझा दहावीचा मराठीचा पेपर आठवतो. मराठीचा पेपर म्हणजे खूप लांबलचक, संपता न संपणारा, भरपूर पुरवण्यांची गरज भासणारा,पुन्हा तपासून बघण्याची संधी न देणारा व लिहून लिहून हात दुखवणारा विषय अशी एक कायमस्वरूपी प्रतिमा मनावर ठसलेली आहे. देवनागरी भाषेतील मजकूर `हाताने' लिहिण्यास जास्त वेळ लागतो का? तो कमी करता येईल का? या अनुषंगाने एका वेगळ्या पण दुर्लक्षित मुद्यावर मला चर्चा करायची आहे.

माझ्या अंदाजाने देवनागरी लिपी सोडल्यास अन्य कोणत्याही लिपी मध्ये अक्षरावर ओळ आखण्याची पद्धत नाही. (पंजाबी- गुरमुखी आणि बंगाली सोडून)

इंग्रजी तसेच युरोपातील अन्य भाषांची रोमन लिपी तसेच भारतातील गुजराती,कन्नड,तेलुगु,मलयालम, तमिळ या लिपींमध्ये अक्षरांवर वा अक्षराखाली रेघ ओढावी लागत नाही.उर्दू / सिंधी भाषांची लिपी, चिनी/जपानी चित्रलिपी तसेच जगातील अन्य कोणत्याही लिपीच्या बाबतीतही हेच आढळून येईल. आपल्याकडील कोणत्याही चलनी नोटेवर हे पडताळून पाहता येईल. 

देवनागरी लिपी ज्या भाषांना लागते त्या संस्कृत,मराठी, हिंदी, नेपाळी अशा सर्व भाषांना मात्र अक्षरांवरील रेघ आवश्यक ठरते. वास्तविक पाहता या रेघेमुळे अक्षराच्या आकारात, अर्थात,व्याकरणात काहीच बदल घडत नाही. अनेक कवी आणि लेखकांची हस्तलिखितं पाहिल्यास ते उर्ध्वरेषविरहित आढळतील.

थोडक्यात अक्षरावरील रेषा ही अत्यावश्यक नाही. वहीच्या पानांवर तर ओळी आखलेल्या असतातच. त्या रेषेखाली शब्द लिहून आपण पुन्हा त्यावर रेघा मारत जातो ते केवळ दोन शब्द विलग दिसावेत म्हणून. इंग्रजी लिहिताना संदर्भासाठी ओळींवर लिहित जातो पण पुन्हा वेगळी रेष ओढत नाही.असे असूनही लहानपणापासून श्री गणेशा किंवा ग म भ न  हे अक्षरावरील रेषेसह गिरवण्यास शिकवले जाते.मग हाताला तीच सवय जडते.मराठीत एखादे पत्र लिहायचे झाले तर मला वाटते १० ते २० टक्के वेळ हा शब्दांवर रेघ मारण्यात खर्ची पडतो.मोठी उत्तर पत्रिका लिहिताना हा मुद्दा  विचारात घेतला तर एकूण मिळून ३ तासंपैकी १५ मिनीटे तरी निरर्थक अशी रेघ मारण्यात जातो.ही रेघ मारली नाही तर परीक्षेत गुण कमी केले जातात का? याबद्दल काही लिखित नियम आहे का  की देवनागरीचे एक अपवादात्मक वैशिष्ट्य म्हणून अक्षरांवर रेषा असावी? 
  कोणतेही वर्तमानपत्र वा छापील पुस्तकामधील अक्षरे पहिल्यापासून अशीच असतात.आता तर अक्षरजुळणी संगणकावरच होत असल्याने फॉण्ट सुद्धा पारंपारिक ओव्हरलाईन असलेलेच असतात.ही रेषा काढून टाकल्यास छपाईसाठी लागणाऱ्या शाईची बरीच बचत होऊ शकेल.

 तार्किक दृष्ट्या हे पटणारे वाटले तरी प्रश्न नजरेला झालेल्या सवयीचा आहे. उर्ध्व रेषाविरहित देवनागरी अक्षरे पाहायला कसेसेच वाटेल. पण काही दिवसच. नेहमी जाड मिशी ठेवणाऱ्या माणसाने एकेदिवशी मिशी कापून टाकली तर कसे दिसेल? (उदा. गोलमाल चित्रपटाच्या अखेरीस दिसणारा उत्पल दत्त)तसेच ते वाटेल.नंतर हळुहळू सवय होईल.

लिपीतज्ञ याबाबतीत काही मार्गदर्शन करू शकतील का? तसेच फॉण्टतज्ञ श्री शुभानन गांगल यांचे याबद्दल काय मत आहे? असा एखादा ओव्हरलाइन विरहित फॉण्ट अस्तित्त्वात आहे का? नसल्यास असा नवा फॉण्ट उपलब्ध होईल का?

अर्थात ही काही मोठी समस्या नाही. ज्यांना जसे आवडेल तसे लिहू शकतात. हा ज्याच्या त्याच्या आवडीचा वा सवयीचा प्रश्न आहे. फक्त शाळा-महाविद्यालयात वा अन्य ठिकाणी असे उर्ध्वरेषाविरहित लेखन केलेले चालते का आणि चालत नसेल तर का? एवढाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे.

मनोगतींचे याबद्दल काय मत आहे?