आज शब्द साधनेच्या मागील माझ्या भूमिकेबद्दल सांगण्याची वेळ आली आहे. व्यवहारात सर्वसाधारण पणे सिद्धांत हा अगोदर मांडला जातो आणि कृती / प्रात्यक्षिक नंतर केले जाते. सुदैवाने शब्द साधनेमध्ये प्रयोग अगोदर केला गेला आणि त्यामागील तत्त्व अथवा भावना नंतर सांगण्यात येत आहे हा मी माझा आणि यात भाग घेणाऱ्या सर्व मनोगतींचा बहुमान समजतो.
सर्वात प्रथम हे समजून घेतले पाहिजे की शब्द साधना या उपक्रमामागे काही ऐताहासिक भूमिका दडलेली आहे. मराठ्यांच्या इतिहासाचा मागोवा घेतला तर भोसले घराण्याचे उत्तर दायित्व मान्य करावेच लागेल. त्यात वेळोजी, शहाजी, शिवाजी, संभाजी, राजाराम आणि ताराबाई यांचा कृतज्ञतापुर्वक उल्लेख करावाच लागेल.
वेळोजींनी शहाजीला एका सरदाराच्या अथवा ज्याचा शब्द तत्काळीन सर्वच राज्यकर्त्यांना मान्य करावाच लागेल अश्या पातळीपर्यंत आणले. शहाजी आणि जिजाबाई यांनी आपले एक सुराज्य होईल असा प्रयत्न केला. शिवाजी बद्दल मी काय बोलावे? त्यानंतर संभाजी महाराजांनी उघड उघड संघर्ष सुरू करून मोगलांना सरळ सरळ शह दिला आणि मराठ्यांच्या स्वातंत्र्याला स्वतःच्या बलिदानाने वेगळे परिणाम प्राप्त करून दिले. त्यानंतर मात्र राजारामाबद्दल फारसे लिहिले गेले नाही अथवा समजून घेतले गेले नाही.
अगदी स्पष्ट बोलायचे म्हणजे आमच्या या प्रयोगामागे राजाराम महाराजांचीच प्रेरणा आणि आदर्श आहे.
राजाराम महाराज छत्रपती झाल्यानंतर राज्य नाही, राजधानी नाही, सेना नाही, सेनापती नाही, किल्ले नाही, काहीच नाही असे असतानाही यशस्वी झुंज दिली आणि आपले राज्य राखण्याचे कसब दाखवले.
मराठ्यांना आपण मोगला विरुद्ध लढू शकतो प्रसंगी वरचढही ठरू शकतो हे शिवाजी आणि संभाजीच्या काळात लक्षात आले होतेच. राजारामाच्या वेळी परिस्थिती थोडी बिकट झाली हे खरे. पण राजारामांनी वेगळा मार्ग आखला. त्यांनी सगळ्या मराठ्यांना सांगितले की तुम्ही सैनिक म्हणून स्वतंत्र आहात, फक्त त्यांनी मोगल प्रांतांत बंडाळी करावी, लूटमार करावी. त्याबद्दल प्रत्येक दसऱ्याला एक पोषाख, एक कडे आणि सात होन मिळतील. त्यांना बारगीर असे संबोधन मिळेल. त्यामुळे असे झाले की मोगलाविरुद्ध एकाच वेळी इतके मराठे लढू लागले आणि थोड्याच काळात मोगल साम्राज्य अस्तंगत झाले. विशेष म्हणजे राजारामाच्या वेळी जितके मराठे लढत होते तितके कधीच (पूर्वी आणि त्यानंतर्ही) लढत नव्हते. राजारामाच्या या पावित्र्यामुळे मोगल साम्राज्य खऱ्या अर्थाने रसातळाला गेले.
आज मराठीची स्थिती तशीच आहे. शाळा ओस पडतात आहे, शिक्षणात इतर भाषांना प्राधान्य मिळत आहे, लोकाचार इतर भाषेत होत आहे, मराठीजनांना आज जितकी मराठीची काळजी आहे तितकी कदाचितच कधी काळी आली असेल. सर्वात दुर्दैवाने म्हणजे मराठीत इंग्रजी भाषेचा जो सुळसुळाट चालला आहे ते बघितले म्हणजे संताप आणि चीड आल्याशिवाय राहत नाही.
अर्थातच अशावेळी संताप आणि रागावून काही साध्य होत नाही. इतिहासाचा मागोवा घ्यायचा आणि आपल्या शक्तीला साधेल असे प्रारूप शोधायचे हाच मार्ग असतो आणि हीच खरी साधना असते.
शब्द साधना ही तळमळ आहे आणि कोणालाही जमण्या सारखे आहे. जेथे जेथे इतर भाषेतील शब्द दिसेल त्याला प्रतिशब्द सुचवायचा,सांगायचा आणि वापरायचा. हळूहळू मराठीसाठी खऱ्या अर्थाने मराठीत बोलले जाईल आणि भाषा म्हणून आपले अस्तित्वही टिकवले जाईल.
राजारामांनी जे करून दाखवले तेच आपल्याला करायचे आहे. प्रत्येक मराठी शब्दाला आपापल्या जागेवर न्यायचे आहे आणि बोलीभाषेत प्रचलित करायचे आहे.
हा प्रयोग कोणालाही जमण्यासारखे आहे आणि त्यात कोणताही भाषाविलास अथवा वाणीविलास ही अपेक्षित नाही.
सुदैवाने आजपर्यंत आपण जवळजवळ १७५ पेक्षा प्रचलित शब्दांना मराठीचाच समर्थ पर्याय दिला आहे हे कोणीही मान्य केल्याशिवाय राहणार नाही. आता आपल्याला हा प्रयोग जास्त व्यापक करता आला पाहिजे.
अर्थातच आपण जे काही करत आहोत त्याला ज्ञानेश्वरांपासून ते सावरकरांपर्यंतचे अधिष्ठान आहे. आवश्यकता आहे ती आपल्यासारख्यांच्या तळमळीची आणि सातत्याची.
साधना म्हणजे कोणतीही अपेक्षा नसताना केलेली कृती. ही साधना आपणा सर्वांना फलद्रुप होवो हीच त्या आई जगदंबेकडे प्रार्थना.
आपला,
द्वारकानाथ कलंत्री