नशीब हे शिकलो - ४९

चलचित्र, छायाचित्र व ध्वनी व्यवस्थेचे काम करताना माझी धावाधाव व जमावाने केलेले माझे कौतुक बघून माझ्या बायकोने एकदम छायाचित्रण शिकण्याचे मनावर घेतले. सुरुवात झाली चित्र रिळाचे प्रकार प्रतिमा ग्राहकात (कॅमेरा) कसे चढवायचे. मग प्रग्राचे प्रत्येक भाग काय / कसे काम करतात. केव्हा कोणत्या भागाचा का / कसा उपयोग करायचा असे प्रशिक्षण मी तिला देणे सुरू केले. रोज एक रीळ छायाचित्रण सवयी करता संपायचे. महाराष्ट्र मंडळाचे दर दोन तीन महिन्यातून कार्यक्रम होत असत त्यातून तिला छायाचित्रण करण्याची सवय झाली. त्या छायाचित्रांचे आम्ही दोघे विश्लेषण करायचो. छायाचित्राच्या चौकटीत महत्त्व वस्तूचे की व्यक्तीचे असावे, त्या करता चौकट पूर्ण भरण्या करता प्रतिमेचा आकार चौकटीत केवढा असावा, त्या करता फेरभिंग (झूम लेन्स) कसे हाताळावे. तिला फेरभिंगाची सवय होण्याकरता ३५ - १०५ चे फेरभिंग मी विकत घेतले.

एका ओमानी लग्नात तिला छायाचित्रणाचे पहिले काम मिळाले. निकॉन एफ ४०१ प्रग्रा - प्रतिमा ग्राहक (कॅमेरा), सनपॅक क्षप्र - क्षणिक प्रकाश (फ्लॅश) आणि फुजीची १०० ए एस ए ३६ चित्रफितीची चार रिळे तिला मी दिली होती. आईच्या मदतीला १० वर्षाचा आमचा मोठा मुलगा होता. मी व लहान ४ वर्षाचा मुलगा बाहेर गाडीत बसून होतो कारण ओमानी लग्नात कोणत्याही पुरुषाला आत मज्जाव होता. एकूण १४४ छायाचित्रां ऐवजी १०० च्या आसपास छायाचित्रांचा संच तयार झाला होता. बर्‍याच छायाचित्रांचा क्षप्रचा प्रकाश कमी किंवा जास्त झाला होता. छायाचित्रातील उभ्या - आडव्या वस्तू चित्र चौकटीला समांतर नव्हत्या त्यामुळे व्यक्ती डावीकडे नाहीतर उजवीकडे झुकलेल्या दिसत होत्या. व्यक्तिचित्रात हा दोष डोळ्याला खटकतो व छायाचित्राचा दर्जा खाली घसरतो, ग्राहकाला अशी छायाचित्रे आवडत नाही. हे टाळण्याकरता बायकोने प्रग्रातून (कॅमेरा) दृश्य बघताना उभ्या - आडव्या वस्तू चित्र चौकटीला समांतर ठेवण्याचा भरपूर अभ्यास केला. क्षप्र (फ्लॅश) उपकरणाला बाहेरुन जास्तीचा वीज पुरवठा देणारा संच विकत घेतला.  क्षप्र, झरोका (ऍपरचर) व पडद्याचा वेग (शटर स्पीड) ह्यांचा योग्य समतोल साधला गेला.

पुढील सहा महिन्यात ३ चित्ररिळातील १०८ छायाचित्र अचूक घेण्यात माझी बायको यशस्वी ठरली. तिला एका लग्नाच्या छायाचित्रणाचे १३० रियाल मिळत होते त्यातून ३० रियाल खर्च होता व १०० रियाल फायदा+मजुरीचे मिळत होते. महिन्यातून तिची एकटीची कमाई ५०० रियाल झाली. एका कार्यक्रमात ती छायाचित्रणाचे काम करीत असताना प्रग्राचे (कॅमेरा बॅक) मागचे झाकण एकदम उघडले. बायको अतिशय घाबरली होती. घरातला दुसरा प्रग्रा निकॉन एफ ८०१ तिला हवा होता. मी लगेच तो तयार करून १० मिनिटात त्या जागी गेलो. माझा मुलगा ८०१ प्रग्रा देऊन ४०१ कपड्यात घट्ट बांधून घेऊन आला. मी सर्वप्रथम अंधारात चित्रफीत परत फिरवून रिळात पूर्ण बंदिस्त झाल्याची खात्री केली, मग प्रग्राची तपासणी केली. मागील झाकणाला घट्ट धरून ठेवणारी प्लॅस्टिकची कळ तुटली होती. घरी न जाता काम संपेस्तोवर गाडीत बसून होतो. बायको फार काळजीत होती. त्या कार्यक्रमातल्या बायका तिला बाहेर सोडायला आल्या होत्या. दुसर्‍या दिवशी निकॉन विक्रेत्याने मला एफ ५० प्रग्राचा बीना भिंगाचा भाग १८५ रियालला दिला. दोन दिवस नवीन प्रग्राचा अभ्यास केल्यावर बायको खूश होती.

छायाचित्रणाच्या बरोबरीने तिने चलचित्रणाचे काम मिळावे म्हणून माझ्या कडून चलचित्र ग्राहकाचे (व्हिडिओ कॅमेरा) प्रशिक्षण व अभ्यास सुरू केला. चलचित्र माध्यमात बर्‍याच गोष्टींचा अभ्यास व सराव करणे अत्यंत आवश्यक असते. ध्वनिग्रहण, तिपायी, विविध रंगाचे प्रकाश, चित्रफीत, प्रासंगिक संपादन, द्रुश्राव्य स्थिती दर्शक (एव्ही मॉनिटर). बायकोने हे सगळे शिकून घेतले व सगळ्यात कौतुक हे की एकटी मदतनीस न घेता छाया व चलचित्रण करीत होती. पहिलेच काम ६०० रियालचे मिळाले. काम छान झाले होते. चलचित्राचे शीर्षक अमीगा / कमोडोर संगणकाने मी करून देत असे. चलचित्रणा करता तीन तासाची चित्र फीत व तीन बॅटरी संच आम्ही वापरत होतो.

मला दोन वा तीन चलचित्र ग्राहक वापरण्याची कामे मिळू लागली. माझी चित्रग्राहक साधने गृहोपयोगी पद्धतीची असल्याने थेट (लाइव्ह) मिश्रण शक्य नव्हते. पण चित्रग्राहक निवड करणारे साधन (चार कॅमेरा स्वीचर) वापरून मी उर्दू मुशायरा, क्रिकेट स्पर्धा, हिंदी चित्रपट कलाकारांचे मस्कत मधील खास कार्यक्रम, मोठ्या पडद्यावर दाखवण्याची स्थानिक सेवा देणारा मस्कत मधला पहिला ठरलो. तसेच नवीन गाड्यांचे मोटर शो व घरगुती वस्तूंचे आंतर्राष्ट्रीय प्रदर्शन वर्षातून दोनदा होत असे त्याचे तीन दिवसाचे सकाळ संध्याकाळचे चित्रीकरणाचे काम मला मिळत होते ह्याचे कारण लिफ्टट्रकच्या वर बसून १५ फूट उंचावरून दोनशे - चारशे दुकानांचे व भेट देणार्‍या ग्राहकांचे अचूक चित्रीकरण करणारा पण मीच पहिला होतो. तसेच अशा उंचावरून छायाचित्राचा वेगळा अनुभव मी प्रेक्षकाना करून दिला होता. व्यावसायिक दर्जाचा वापरलेला चलचित्र ग्राहक कमी किमतीत मिळाला म्हणून मी विकत घेतला. त्याची जेनलॉक पद्धत वापरून गृहोपयोगी पद्धतीचे दोन चलचित्र ग्राहक जोडून प्रथमच प्रत्यक्ष (लाइव्ह ऑन लाइन) मिश्रणाचा प्रयोग करून किरण सेहगल ह्या भारतीय नृत्यांगनेचा तीन तासाचा कार्यक्रम मुद्रित केला होता त्याचे बरेच कौतुक झाले होते. -

एका नव्याने सुरू झालेल्या मॉलच्या आत पाश्चिमात्य पद्धतीच्या खानपान गृहाच्या मालकाने मला खाद्य पदार्थांच्या जाहिरातीचे छायाचित्रण करण्याचे काम दिले. ते काम मी त्याच जागेत आजूबाजूला ग्राहक बसले असताना पूर्णं केले. ति छायाचित्रे त्याला खूप आवडली होती. त्याने चित्रांच्या खास दोन फूट उंचीच्या पारदर्शी चौकटी बनवून त्या मॉलच्या आत मोक्याच्या ठिकाणी लावल्या होत्या. त्यातील काही छायाचित्रे इथे जोडली आहेत. ह्या चित्रांचे अप्रूप मला आहे ह्याचे कारण महागड्या क्षप्र - क्षणिक प्रकाश (फ्लॅश अंबरेला स्ट्रोब) चा उपयोग न करता (कारण तेवढे पैसे माझ्या खिशात त्या काळात नव्हते). मी १००० वॉटचे दोन हॅलोजन फ्लड दिवे वापरून ही छायाचित्रे काढली होती. त्याचे मुद्रण करताना प्रत्येक प्रशाळेने (प्रोसेस लॅब) ती छायाचित्रे बिघडवून मला छायाचित्र तंत्राची समज नसल्याचे व्यावसायिक क्षेत्रात मुद्दाम पसरवले होते. शेवटी एका हाताने प्रत्येक रसायनाचा उपयोग करणाऱ्या एका प्रशाळेच्या तंत्रज्ञाला १०० रियाल रोख बक्षीस म्हणून देऊन हि चित्रे मुद्रित करून घेतली होती. एकूण ७० चित्रे होती. हे चार नमुने निकॉन पी ९० प्रग्राने डिजीटाइज केले आहेत.

(सर्व चित्रे मोठ्या आकारमानात क्रमाने पाहण्यासाठी कोठल्याही चित्रावर टिचकी मारून सरकचित्रदर्शन सुरू करावे : प्रशासक)

(सर्व चित्रे मोठ्या आकारमानात क्रमाने पाहण्यासाठी कोठल्याही चित्रावर टिचकी मारून सरकचित्रदर्शन सुरू करावे : प्रशासक)

क्रमश: