सध्या आम्ही परदेशात रहात आहोत.आमचा तीन वर्षाचा मुलगा आहे.कालच ओळखीची एक भारतीय स्त्री मला विचारत होती-"तू याला काही रामरक्षा वगैरे शिकवले आहेस का?नाहीतर इथे राहून आपले संस्कार कसे होणार याचा जरा प्रश्नच पडतो नाही?" हे विचारणारी ती लवकरच आई होणार आहे.
संस्कार हा शब्द सम+कृ(यातील 'म'चा पाय मोडणे आवश्यक आहे.पण मला ते जमलेले नाही.क्षमस्व!) या धातूपासून तयार झालेला आहे.या संस्कृत भाषेतील धातूचा अर्थ ' चांगले करणे'-to refine असा आहे.संस्कृत हा शब्ददेखील याच धातूचे भूतकालवाचक विशेषणाचे रूप आहे.तेव्हा संस्कार करणे म्हणजे मुळात असलेली वस्तू/व्यक्ती अधिक चांगली होण्यासाठी केलेले प्रयत्न असे मला वाटते.हल्लीच्या पिढीवर संस्कार होत नाहीत अशीही एक चर्चा अधून-मधून ऐकू येते. म्हणून या विषयावर आपली मते येथे प्रकट करावीत अशी माझी कल्पना मी मांडते आहे.कृपया प्रतिसाद द्यावा.कदाचित यावर याआधीही येथे विचारमन्थन झाले असेल तर पुन्हा एकदा क्षमस्व.