राष्ट्रभाषेची गरज.... आहे का ?

'माझ्या मराठीसाठी..' या लेखावरील चर्चा वाचताना मनात आलेले मुद्दे, मनोगतींचे त्यावरील विचार समजावेत यासाठी इथे देत आहे.
पाच-सहा भाषा अवगत असणारी काही दुर्मिळ मंडळी सोडली तर तुमच्या-आमच्या सारख्यांना एक किंवा फारतर दोन भाषा चांगल्याप्रकारे शिकणे शक्य असते. मराठी माणसांबद्दल बोलायचे तर घरीदारी मराठी आणि कामाच्या ठिकाणी इंग्रजी अशी बऱ्याच जणांची स्थिती असेल. असे असताना राष्ट्रभाषा/राजभाषा म्हणून आणखी एका भाषा शिकावी लागणे कितपत योग्य आणि व्यवहार्य आहे.
इंग्रजीच्या वापराबाबत सध्याची आणि भविष्यातील अपरिहार्यता किमान आंतरजालावर तरी वेगळी सांगायला नकोच. त्यामुळे जर मराठी आणि इंग्रजी अशा दोनच भाषा अभ्यासक्रमात आवश्यक ठेवल्या तर त्याचा फायदा ह्या भाषा अधिक चांगल्याप्रकारे शिकण्यासाठी होईल का ?
मातृभाषा, राष्ट्रभाषा/राजभाषा आणि कामकाजाची भाषा अशा तीन/अधिक भाषा वापरले जाणारे इतर काही देश कोणाला माहिती आहेत का ? फ्रान्स, जपान यासारखे इंग्रजीलाही आवश्यक न मानणारे देश आहेत, पण तो वेगळा चर्चाविषय होऊ शकेल. आपल्याकडे सध्यातरी इंग्रजीला पर्याय नाही . असे असताना एका अधिक भाषेचे लोढणे गळ्यात अडकवून आपला खरोखरच काही फायदा झाला आहे का ?
हिंदीवर बहिष्कारच टाकावा असे मला सुचवायचे नाही. आवड असेल त्यांना हिंदी शिकण्याचा पर्याय जरूर असावा, पण त्याबरोबरच जर्मन, स्पॅनिश किंवा आपल्या बंगाली, तमिळ यासारखा भाषा बरोबरीने उपलब्ध असाव्यात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भाषाज्ञान अधिक विस्तारण्यास मदत होईल असे वाटते.
तुम्हाला काय वाटते ?