श्री. गोपाळ गोडसेंच्या पुस्तकातील मराठी प्रतिशब्द

नुकतेच श्री. गोपाळ गोडसेंचे "गांधीहत्या आणि मी" हे पुस्तक पुन्हा वाचले. अनेक वर्षांपूर्वी, शाळेत असताना हे पुस्तक वाचले होते. ह्यावेळी पुस्तक वाचताना पुस्तकात योजलेल्या मराठी प्रतिशब्दांकडे विशेष लक्ष गेले, जे पूर्वीच्या वाचनात गेले नव्हते. ह्या पुस्तकातील विशेषतः इंग्रजी तसेच इतर परभाषी शब्दांसाठी वापरलेल्या प्रतिशब्दांची आणि परभाषेतील त्यासाठीच्या शब्दांची यादी पुढे देत आहे. काही शब्दांवर चर्चा करता येण्यासारखी वाटल्यास जरूर करावी.

गांधीची हत्या झाल्यानंतर गोपाळ गोडसेंना नथुराम गोडसेंचा भाऊ म्हणून अटक झाली आणि जन्मठेपेची शिक्षाही झाली. ही शिक्षा भोगत असताना त्यांना आलेले अनुभव ह्या पुस्तकात मांडलेले आहेत. अर्थातच बंदिगृह आणि कायदे ह्यासंबंधी चर्चा ह्या पुस्तकात मोठ्या प्रमाणात आहे. ह्या पुस्तकात कैदी, बंदीगृह, त्यासंबंधीचे कायदे, न्यायालय व कायद्यांमध्ये वापरात असलेल्या व वापरल्या जाणाऱ्या अनेक शब्दांसाठी मराठी प्रतिशब्दांची योजना केलेली आढळते. तेव्हा ते मराठी शब्द विषयाची पार्श्वमूमी बघून त्या संदर्भात घेणे योग्य ठरेल. इतर विषयांमध्ये हे शब्द जसेच्या तसे वापरता येतीलच असे नाही, काही ठिकाणी येतीलही.

गोडसे हे सावरकरांचे समलाकीन. तेव्हा, सावरकरांच्या भाषाशुद्धीचा परिणाम ह्या लेखनावर असावा. लेखकाने जेथे मराठी प्रतिशब्द वापरलेले आहेत तिथे बहुतेक ठिकाणी कंसात इंग्रजी वा इतर भाषातील शब्द दिलेले आहेत. तरीही पुस्तक वाचताना मराठी प्रतिशब्दांमुळे भाषा फार बोजड झाली असे मला वाटले नाही.

  क्र. मराठी शब्द इतर भाषांतील शब्द
१. मानीव हायपोथेटिकल (hypothetical)
२. अभिलेख रेकॉर्ड (record)
३. संविधानसभा कॉन्स्टिट्युअंट असेंब्ली (constituent assembly)
४. अग्निक्षेपक प्लेम थ्रोअर (flame thrower)
५. प्रतिभूती सेक्युरिटी (security) / जामीन 
६. नस्ती/नस्त्या फाईल/फायली
७. परमार्शदात्री समिती ऍडवायजरी बोर्ड
८. दूरमुद्रक प्रिंटर?#
९. छेदक पॉइंटस (मुद्दे ह्या अर्थी)
१०. पश्चालेख ताजा कलम /P.S.
११. महाशासक गव्हर्नर जनरल
१२. चक्रीटंकित सायक्लोस्टाइल्ड
१३. न्यूनीकरण कॉम्युटेशन (commutation)
१४. उत्तरीय परीक्षा पोस्ट मॉर्टेम
१५. संपुष्टी कोलॅबरेशन (collaboration)
१६. न्यास# डेटा (data)
१७. उन्मुक्त डिसचार्ज
१८. लेखापित डिक्टेट
१९. असंगत ऍबसर्ड
२०. उत्सादन टु सेट असाइड
२१. विपणी दुकान
२२. समपहृत कॉन्फीस्केट (confiscate)
२३. निष्कासन ट्रार्न्स्पोर्टेशन (transportation)
२४. दयार्द्रता क्लेमन्सी (clemency)
२५. काटपुरावा ऍलबाय (alibi)
२६. फितलेला साक्षीदार हॉस्टाईल विटनेस
२७. वचनपत्र प्रॉमिसरी नोट
२८. ऐकीव माहिती अनकोरॅबोरेटेड हिअरसे
२९. संमोदित सँक्शन
३०. अभियोजक वकील
३१. अभियुक्त कैदी
३२. स्वीकारोक्ती कन्फेशन (confession)
३३. अभिवक्तव्य, उपपादन** आर्ग्युमेंट
३४. अभियोग खटला
३५. लवंगकील रिव्हेट (rivet)
३६. उद्योगालय वर्कशॉप
३७. श्रमिक वर्कर्स
३८. व्यध ड्रिलिंग मशीन
३९. अधीन घेणे ताब्यात घेणे
४०. स्वैच्छित वॉलेंटरी (voluntary)
४१. अवसायन लिक्विडेशन
४२. एकस्व मोनोपोली
४३. वरकाम ओव्हरटाईम
४४. दूरध्वनीयंत्राचे श्रावित्र टेलिफोन रिेसिवर
४५. उत्क्षेपण पटल मिसाईल बेस
४६. अंतिमोक्ती अल्टिमेटम
४७. चरयान (कृत्रिम) उपग्रह?*
४८. संयान रेल्वे
४९. उपबंध (कायद्यातील) प्रोविजन
५०. प्रकोष्ठ हॉल
५१. वेश्म (वकील वा न्यायमूर्तींचे) चेंबर
५२. अप्रकट (सुनावणी वा साक्ष) इन कॅमेरा
५३. पटल टेबल/डेस्क
५४. पंजीकार रजिस्ट्रार
५५. स्फुर प्रकाश (कॅमेराचा) फ्लॅश
५६. चित्रपट्टी फिल्म
५७. न्यायपरामर्शक ऍमिकस क्युरी (amicus curiae) दुवा क्र. २ (लॅटिन)
५८. परंतुके प्रोविजो (proviso)
५९. अधिपत्र वॉरंट
६०. प्रत्यर्पण अधिपत्र एक्स्ट्रॅडिशन वॉरंट
६१. निलंबन सस्पेन्स
६२. पुनरावेदन अपील
६३. प्रारूप ड्राफ्ट
६४. अवभार रिलीफ
६५. कर्तव्य तालिका ड्यूटी लिस्ट
६६. प्रावकाश फर्लो (furlough) दुवा क्र. ३ (डच)
६७. कक्षावली सेल्युलर यार्ड
६८. निरोधाविभाग क्वारंटाइन वार्ड
६९. प्रशाल हॉल/बरॅक
७०. उद्धावन (शौचकूप) फ्लश टॉयलेट
७१. पुनःप्रेषण रीडिरेक्ट/रीडायरेक्ट (redirect)
७२. निर्माणी फॅक्टरी
७३. कीटांतक फिनेल
७४. भर्जनी बेकरी
७५. (शिक्षेतील) सूट रेमिशन (remission)
७६. फलतः अंतिम लघुकरण कॉन्सिक्वेंट शॉर्टनिंग ऑफ दी सेंटेन्स
७७. अवधीपूर्व प्रीमॅच्युअर
७८. फुफ्फुसफोड लंग ऍबसेस (lung abscess)
७९. विशेष सुटी परोल/पॅरोल (parole)
८०. जानपद चिकित्सक सिविल सर्जन
८१. दहद्रव्य कॉस्टिक मटेरिअल
८२. आवेदन पिटीशन
८३. बंदी प्रत्यक्षीकरण आवेदन हिबिअस कॉर्पस पिटीशन (habeas corpus petition)
८४. न्यायासन पॅनेल ऑफ जजेस
८५. विलोपित कॅन्सल
८६. कृष्णसूची ब्लॅकलिस्ट
८७. संशोषित सीझन्ड (seasoned)
८८. प्रदेय फी (fee)
८९. शोणवर्तुली हिमोग्लोबिन
९०. प्राङन्याय रेस ज्युडिकाटा (res judicata) दुवा क्र. १ (लॅटीन)
९१. मार्गरक्षी एस्कॉर्ट (escort)
९२. अफलित इनफ्रक्च्युअस (infructuous)
९३. अभिप्रमाणित अटेस्टेड (attested)

वाचताना साधारण ज्या क्रमाने हे शब्द पुस्तकात आले आहेत साधारण त्याच क्रमाने यादीत दिले आहेत. तसे न करता अकारविल्हे शब्द लिहिता आले असते, मात्र मी तसे करण्याचा कंटाळा केला आहे . यादीतील काही संकल्पनांचे अर्थ समजण्यासाठी दुवे दिले आहेत.


* दूरमुद्रकाचा अर्थ प्रिटर असा तर चरयान ह्या शब्दाचा अर्थ (कृत्रिम) उपग्रह असा असावा असे पुस्तक वाचताना वाटले. मात्र ह्या अर्थांबद्दल खात्री नसल्याने पुढे प्रश्नचिह्न दिले आहे. पुस्तकामध्ये चरयान आणि अवकाशयान असे दोन्ही शब्द आलेले असल्यामुळे ह्या दोन्ही शब्दांच्या अर्थामध्ये लेखकाने फरक केला आहे वा नाही हे नेमके समजले नाही. पृथ्वीभोवती फिरत राहणारा उपग्रह ह्या अर्थी चरयान आणि पृथ्वीला सोडून बाहेरील अवकाशात जाणारे ते अवकाशयान असा फरक चरयान आणि अवकाशयान ह्या शब्दांमध्ये केला असण्याची शक्यता आहे.

** आर्ग्युमेंट ह्या अर्थी अभिवक्तव्य आणि उपपादन असे दोन शब्द वापरलेले आढळले. अभिवक्तव्य आणि उपपादनामध्ये नेमका फरक कोणता ह्याबद्दल खात्री नाही. नथुराम गोडसेंची न्यायालयामध्ये स्वतःची बाजू स्वतःच मांडली होती. त्यांच्याबाबतीत बहुतेकवेळा अभिवक्तव्य असा शब्द आलेला आहे, तर इतरांच्या वतीने वकिलांनी (अभियोजकांनी) बाजू मांडली, 
त्याबाबतील बहुतेकवेळा उपपादन असा शब्द आलेला आहे. तेव्हा स्वतःच स्वतःसाठी केलेले आर्ग्युमेंट म्हणजे अभिवक्तव्य तर एखाद्याच्या वतीने केलेले आर्ग्युमेंट ते उपपादन असा फरक असण्याची शक्यता आहे. मात्र पुस्तकात असा फरक केलेला बहुतांश वेळा आढळला तरी तसा फरक न केलेलाही एखाद-दोन ठिकाणी आढळला. त्यामुळे ह्या दोन शब्दांतील नेमक्या फरकाबद्दल साशंकता आहे.

# न्यास ह्या शब्दाचा एक अर्थ खूण असा होतो (संदर्भ - शब्दानंद, संपादिका - स्त्त्वशीला सामंत), त्यावरून डेटासाठी हा शब्द वापरला असावा असे वाटते. मराठी भाषा. कॉम ह्या संकेतस्थळावरही भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासनाच्या शब्दकोशामध्ये डेटा ह्या शब्दासाठी न्यास हा शब्द दिल्याचे पाहिले. तसेच ह्या संकेतस्थळावर डेटा ह्या शब्दासाठी संदर्भानुसार वापरण्यासाठी पुढील प्रतिशब्दही दिलेले आहेत - आधार सामग्री, न्यास, दत्त, प्रदत्त, आकडे, माहिती. काही संकेतस्थळांवर श्री. शैलेश खांडेकर ह्यांनी घडविलेलेआ विदा हा शब्द डेटासाठी प्रतिशब्द म्हणून वापरलेला पाहिला आहे. तसेच श्री. भांडारकरांच्या शब्दभांडारातही विदा शब्दाचा समावेश झाला आहे. म्हणून ह्या दोघांनाही न्यास शब्दाबद्दल कळवले आहे.