सार्थ 'तस्मात् गीता'

          असे म्हणतात की, श्रीमद् भगवद्गीता मनुष्याला ‘जगावे कसे’  हे शिकवते तर श्रीमद् भागवत ‘मरावे कसे’
हे सांगते. नुकताच, श्री. गोविंद टाकळे यांचा एक छोटा लेख ‘भाविकांसाठी तस्मात्-गीता’ वाचनात आला.
(दै. प्रहार, दि. २८.. ४. १०). त्यात 'तस्मात्’ या पदाचा वापर असलेल्या श्लोकांविषयी लिहिताना श्री. टाकळे म्हणतात,
‘गीतेतील -तस्मात्- हा शब्द आलेले एकवीस श्लोक मुखोद्गत करणाऱ्याला पूर्ण गीता जाणल्याचे श्रेय मिळते. ’
त्यांनी उदाहरणादाखल या लेखात तीन श्लोक सार्थ उद्धृत केले आहेत. सहज उत्सुकता म्हणून गीता प्रेस, गोरखपूर
यांचा गीता-तत्त्वविवेचनी टीका हा ग्रंथ पाहिला. या ग्रंथाच्या शेवटी गीतेतील श्लोकात आलेल्या पदांची अकारविल्हे
यादी पाहाता येते. त्या यादीप्रमाणे ‘तस्मात्’ हे पद गीतेतील एकवीस नव्हे तर चोवीस श्लोकात आलेले दिसते.
श्री. टाकळे म्हणतात त्याप्रमाणे हे श्लोक गीतेचे सार सांगणारे आहेत. तस्मात्, लो. टिळक यांच्या गीतारहस्याचा
आधार घेऊन ‘सार्थ तस्मात् गीता’ संकलित केली आहे. यात श्लोकांचा अर्थ जरी दिला असला तरी थोडा मागचा
पुढचा संदर्भही देणे आवश्यक वाटले. त्याप्रमाणे श्लोकाच्या अर्थानंतर कंसात संदर्भ दिलेला आहे.

                   तर, अशी संकलित ‘तस्मात गीता’ कांही भागात मनोगतींच्या वाचनार्थ देत आहे.

सार्थ तस्मात् गीता (१)

तस्मान्नार्हा वयं हंतुं धार्तराष्ट्रान् स्वबांधवान् ।
स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥१. ३७॥
- म्हणून हे माधवा! आमचेच बांधव असलेल्या या धृतराष्ट्रपुत्रांना
आम्हीच मारणे योग्य नव्हे कारण आमच्याच माणसांना मारून
आम्ही सुखी कसे होऊ?
 ( घर जाळण्यास आलेला, विष घालण्यास आलेला, हातात शस्त्र
घेऊन मारण्यास आलेला, धन लुटून नेणारा आणि बायको किंवा
शेत हरण करणारा हे सहा आततायी होत. या दुष्टास बेशक ठार
मारावे, यात कांही पाप नाही-वसिष्ठस्मृती ३. १६)

अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः ।
अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माध्युध्यस्व भारत ॥२. १८॥
- नित्य, अविनाशी व अचिंत्य असा जो शरीराचा मालक (आत्मा)
त्याला प्राप्त होणारे देह किंवा शरीरे नाशवंत म्हणजे अनित्य होत
असे म्हटले आहे. म्हणून हे भारता, युद्ध कर. ’
 (नित्यानित्यविवेक केला तर ’मी अमक्याला मारतो’
ही बुद्धीच खोटी ठरून युद्ध न करण्यास अर्जुनाने दाखविलेले कारण
बिनबुडाचे ठरते. )

अव्यक्तोऽयमचिंत्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।
तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥२. २५॥
- या आत्म्यालाच अव्यक्त म्हणजे इंद्रियांना गोचर न होणारा, अचिंत्य
म्हणजे मनानेही जाणण्यास अशक्य आणि अविकार्य म्हणजे ज्याला
कोणत्याच विकाराची उपाधी नाही, असे म्हणतात. यासाठी हा (आत्मा)
अशा प्रकारचा आहे हे जाणून त्याचा शोक करणे तुला योग्य नाही.
 (हे वर्णन उपनिषदांवरून घेतलेले असून ते निर्गुण
आत्म्याचे आहे, सगुणाचे नव्हे. कारण अविकार्य किंवा अचिंत्य ही विशेषणे
सगुणास लागू होत नाहीत. आत्म्यासंबंधाने वेदांतशास्त्राचा जो अखेरचा
सिद्धांत त्याच्या आधारे शोक न करण्याबद्दल उपपत्ती सांगितली. आता
कदाचित कोणी असा प्रश्न उभा करील की आम्ही आत्मा नित्य समजत
नसल्यामुळे तुमची उपपत्ती आम्हास ग्राह्य नाही. याविषयी पुढे सांगतात-)

जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥२. २७॥

-जो जन्मला त्याला मृत्यू निश्चित आहे, आणि जो मेला त्याला जन्म
निश्चित आहे, म्हणून (या) अपरिहार्य गोष्टीचा शोक करणे तुला उचित नाही.
 (आत्मा नित्य माना किंवा अनित्य माना, उभयपक्षीही
शोक करण्याचे कारण नाही. )

देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत ।
तस्मात्सर्वाणी भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥२. ३०॥
- अरे भारता, साऱ्यांच्या शरीरात असणारा शरीराचा मालक (आत्मा) हा
सर्वदा अवध्य (म्हणजे ज्याचा वध होणे अशक्य आहे, असा ) आहे,
म्हणून (धृतराष्ट्रपुत्रच नव्हे तर) कोणत्याच प्राण्यांच्या बाबतीत तूं शोक
करणे योग्य नाही.
 (सांख्य किंवा संन्यास मार्गातील तत्वज्ञानाप्रमाणे आत्मा
हा अमर म्हणून, व देह हा स्वभावतःच अनित्य, नाशवंत असल्यामुळे कोणी
मरो वा मारो, त्यात शोक करण्याचे कारण नाही. परंतु, एव्हढ्यावरून कोणी
कोणाला मारले तर त्यात पाप नाही असे जर कोणी अनुमान करील, तर ती
भयंकर चूक होय. मरणे किंवा मारणे या दोन शब्दांच्या अर्थांचे हे पृथःकरण
असून, मरण्याची किंवा मारण्याची जी भीती वाटते, ती प्रथम दूर करण्यापुरतेच
हे ज्ञान सांगितले आहे. मनुष्य म्हणजे आत्मा व देह यांचा समुच्चय होय.
पैकी आत्मा अमर असल्यामुळे मरणे किंवा मारणे हे दोन्ही शब्द त्यास लागू
होत नाहीत. बाकी राहिला देह, पण तोही स्वभावतःच अनित्य असल्यामुळे
त्याचा नाश झाल्यास त्यात शोक करण्यासारखे कांही नाही. परंतु यदृच्छेने
किंवा कालगतीने कोणी मेले किंवा कोणी कोणाला मारले म्हणून त्याचे सुख-दुःख
न मानिता शोक करण्याचे जरी सोडून दिले तरी लढाईसारखे घोर कर्म करण्यास
मुद्दाम प्रवृत्त होऊन लोकांच्या देहांचा आपण कां नाश करावा, या प्रश्नाचा त्याने
निकाल होत नाही. कारण, देह जरी अनित्य असला तरी आत्म्याचे कायमचे कल्याण
किंवा मोक्ष संपादन करण्यास देह हेच काय ते एक साधन असल्यामुळे आत्महत्या
करणे, किंवा योग्य कारणाखेरीज दुसऱ्यास मारणे, ही दोन्ही शास्त्राप्रमाणे घोर पातकेच
होत. म्हणून मेल्याचा शोक करणे जरी योग्य नाही तरी एकाने दुसऱ्यास कां मारावे
याचे दुसरे कांही तरी सबळ कारण सांगणे जरूर आहे. यालाच धर्माधर्मविवेक हे नांव
असून गीतेतील खरा प्रतिपाद्य विषयही तोच आहे. यासाठी अर्जुनास प्राप्त क्षात्रधर्माप्रमाणे
लढाईत मरणे वा मारणे योग्यच असल्याचे भगवंत सांगतात. )

हतो वा प्राप्स्यसी स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।
तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः ॥(२. ३७)

- (अरे, ) मेलास् तर स्वर्गास जाशील आणि जिंकलास् तर पृथ्वी भोगशील!
म्हणून हे अर्जुना, युद्धाचा निश्चय करून ऊठ!

बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते ।
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् ॥२. ५०॥

- (साम्य) बुद्धीने जो युक्त झाला तो पाप आणि पुण्य या दोहोंपासून या
लोकी अलिप्त राहातो, म्हणून योगाचा आश्रय कर.
 (पाप-पुण्य न लागता कर्मे करण्याची जी चतुराई (कौशल्य किंवा युक्ती)
तिलाच (कर्म)योग असे म्हणतात. श्लोक क्र. ४८-५० यातून कर्मयोगाचे दिलेले लक्षण
महत्वाचे आहे. ४९व्या श्लोकात 'बुद्धी’ या शब्दामागे 'व्यवसायात्मिका’हे विशेषण
नसल्यामुळे त्याचा अर्थ या श्लोकात 'वासना’ किंवा 'समजूत’ असा घेतला पाहिजे.
बुद्धी म्हणजे ज्ञान असा अर्थ करून ज्ञानापेक्षा कर्म हलक्या प्रतीचे असा या श्लोकाचा
अर्थ कित्येक जण करू पाहातात, पण हा अर्थ खरा नव्हे. कारण मागील श्लोकात
सांगितलेल्या समत्वाचेच वर्णन पुढील श्लोकातून चालू असल्यामुळे बुद्धी म्हणजे
समत्वबुद्धी असाच या ठिकाणी अर्थ घ्यावयास हवा. कोणत्याही कर्माचा बरे-वाईटपणा
कर्मावर अवलंबून नसून कर्म एकच असले तरी कर्त्याच्या बऱ्यावाईट बुद्धीप्रमाणे ते
शुभ अगर अशुभ होत असते, म्हणून कर्मापेक्षा बुद्धीच श्रेष्ठ होय. वासनात्मक बुद्धी
सम व शुद्ध राहाण्यास कार्याकार्याचा निर्णय करणारी व्यवसायात्मिका बुद्धी प्रथम
स्थिर झाली पाहिजे. म्हणून 'साम्य-बुद्धी’ या एका शब्दानेच स्थिर व्यवसायात्मिका
बुद्धी आणि शुद्ध वासना (वासनात्मक बुद्धी) या दोहोंचाही बोध  होतो. ही
साम्य-बुद्धीच शुद्ध आचरणाचे किंवा कर्मयोगाचे मूळ असल्याने कर्मे करूनही
कर्माची बाधा न लागणारी युक्ती किंवा योग तुला सांगतो, असे जे भगवंतांचे सांगणे
त्याला अनुसरून या श्लोकात 'कर्मे करताना बुद्धी स्थिर, पवित्र, सम व शुद्ध ठेवणे’
हीच ती युक्ती किंवा कौशल असून यासच योग म्हणतात, अशी योग शब्दाची द्विवार
व्याख्या केली आहे. 'योगः कर्मसु कौशलम्’- या पदाचा याप्रमाणे सरळ अर्थ लागत
असता कित्येकांनी 'कर्माचे ठायी जो योग त्याला कौशल म्हणतात’ असा ओढाताणीने
अर्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण 'कौशल’ शब्दाची व्याख्या देण्याचे येथे कांही
कारण नसून 'योग’ शब्दाचे लक्षण सांगणेच प्रस्तुत असल्यामुळे हा अर्थ खरा मानिता 
येत नाही. शिवाय 'कर्मसु कौशलम्’ असा सरळ अन्वय लागत असता 'कर्मसु योगः’
अशी उलटापालट करणेही योग्य नाही. साम्यबुद्धीने सर्व कर्मे केली असता व्यवहाराचा
लोप न होता पूर्ण सिद्धी किंवा मोक्ष प्राप्त झाल्याखेरीज राहत नाही, असे पुढे सांगितलेले आहेच. )

तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः ।
इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥२. ६८॥

-म्हणून हे महाबाहो अर्जुना, इंद्रियांच्या विषयापासून ज्याची इंद्रिये सर्व बाजूंनी
आवरून धरलेली (असतात), त्याचीच बुद्धी स्थिर झाली (म्हणायचे).
 (सारांश, मनोनिग्रहद्वारा इंद्रियनिग्रह हा सर्व साधनांचे मूळ होय.
इंद्रिये विषयात व्यग्र होऊन सैरावैरा धावत असली म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करून
घेण्याची (वासनात्मक) बुद्धीच होऊ शकत नाही. बुद्धी नाही म्हणजे त्याबद्दल दृढ
उद्योगही होत नाही, आणि मग शांती व सुखही नाही, असा अर्थ आहे. तथापि,
इंद्रियनिग्रह म्हणजे इंद्रिये अजिबात मारून सर्व कर्मे अजिबात सोडणे असा अर्थ
नसून निष्काम बुद्धीने कर्मे करावी असा गीतेचा अभिप्राय आहे. )

(क्रमशः)