दाक्षिणात्य आणि आंग्लभाषा

'हिंदी' ही भारताची राष्ट्रभाषा(कागदोपत्री फक्त!), पण तामिळ,कन्नडा,तेलुगू,मल्याळम ही नकाशाच्या दक्षिण भागातील मंडळी मात्र 'हिंदी' बोलणे आणि 'हिंदी बोलता येणे' हा अक्षम्य अपराध का समजतात हो? १४ प्रांतीय भाषा असलेल्या भारतात सामाईक भाषा म्हणून हिंदी वापरली जावी,पण प्रत्यक्ष आज स्थिती काय आहे? कामात आंग्ल भाषा अपरिहार्य, पण बाहेर भेटल्यावर, अनौपचारीक मेळाव्यातही दाक्षिणात्य मंडळी फक्त आंग्ल भाषा बोलतात. आणि 'मला हिंदी येतच नाही. आंग्ल आणि माझी भाषाच येते फक्त' हे सांगताना त्याना 'देशाची राष्ट्रभाषा येत नाही' याची शरम नसून 'आम्ही आंग्ल भाषा उशापायथ्याशी ठेवून असतो सारखे' याचा अभिमान असतो. याची पराकाष्ठा म्हणजे नवरा बायकोशी आणि मुलांशी चार चौघात आंग्ल भाषेत बोलतो.दाक्षिणात्यांनी आपल्या(यंडूगुंडू)मातृभाषेचा अभिमान जरुर ठेवावा, पण त्यामुळे एका परदेशी माणसाच्या डोळ्यासमोर 'इंग्रज गेले तरी अजूनही आंग्लभाषा भारताची राष्ट्रभाषा आहे आणि इंग्रजाचा पगडा भारतावर आहे' हे चित्र उभे करुन देऊ नये.

आमचाच एक तामिळ बंधू(???'दुर्बंधू' असा एखादा मराठी शब्द तयार करावा का?) बाहेर मित्रांच्या घोळक्यात पण शब्दमात्रही हिंदी का बोलत(आणि ऐकून घेत) नाही, यावर कालच २ हिंदी आणि एका मराठी माणसाची चर्चा ऐकली. आणि त्यातल्या मराठी माणसाचे म्हणणे असे होते कि 'दाक्षिणात्य हिंदीला राष्ट्रभाषाच समजत नाहीत. जवळजवळ हिंदी भाषिक आहेत तितकेच जगात तामिळ भाषिक आहेत. सिंगापूर, थायलंड, श्रीलंका, इंडोनेशिया सगळीकडे तामिळ लोक आहेत. त्यामुळे ते हिंदीला आवश्यक भाषा मानत नाहीत.' (वा!मराठी माणसाच्या पडखाऊपणाचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.तामिळ देशबंधू सगळीकडे फक्त साहेबाची भाषाच बोलतो आणि इतरांनी त्याच्याशी फक्त साहेबाच्याच भाषेत बोलावे ही अपेक्षा करतो, आणि त्याला पदराखाली घेणारा 'सहिष्णू' आणि 'समजूतदार' माणूस हा नेमका माझाच मातृभाषाबंधू मराठी माणूस. हा हंत हंत!!)


दुसर्‍या एका तेलुगू बंधूचे म्हणणे: 'मला हिंदी येत नाही आणि शिकायची ईच्छा पण नाही. माझे त्यावाचून काहीही अडत नाही.'


'हिंदी अजिबात बोलता येत नाही' किंवा 'अजिबात समजत नाही' हे मला ऐकायला जड जाते..अरे ज्या देशात दर आठवड्याला नविन हिंदी चित्रपट जन्माला येत असतात तिथे राहता,'क्योंकी सास भी कभी बहू थी' वगैरे सारख्या अनेक हिंदी मालिका पाहता, हिंदी नविन चित्रपटांच्या CD आणि DVD आणून पाहता आणि 'हिंदी अजिबात येत नाही आणि समजत नाही'?? ('मनोगत' हा मराठीचा मंच, पण इथे मी मायमराठीबरोबरच आज हिंदीचीही कडाडून बाजू घेऊ इच्छीते. मराठी ही आपली भाषा असली तरी सर्व भाषिय भारतीयांना जोडणारी भाषा हिंदी असावी.)

भले!! दाक्षिणात्य हिंदीला राष्ट्रभाषा मानत नाहीत. पण अ-राष्ट्रभाषा आणि अ-भारतीय  असलेली आंग्ल भाषा मात्र त्यांच्यासाठी अपरिहार्य! इंग्रजाचे राज्य जाऊन ५० पेक्षा जास्त वर्षे उलटली, पण आजही मातृभाषा आणि राष्ट्रभाषा आली नाही तरी चालेल, ती न येणारा आणि फक्त आंग्ल भाषा बोलणारा उच्चभ्रू, आणि आंग्ल भाषा परकी म्हणून ती नीट न येणारा एखादा भारतीय बंधू मात्र 'गावठी'(अ-मराठी लोकांच्या तोंडात असलेला प्रिय शब्द: 'घाटी'), हा कुठला न्याय आहे?आंग्ल भाषा न येणारा चिनी आणि जपानी आणि जर्मन आणि इटालियन माणूस भारतीय नजरेत 'बिचारा!त्याची भाषाच नाही तर त्याला कशी येणार' असतो, पण आपलाच देशबांधव मात्र 'च्या मारी याला ओघवती आंग्ल भाषा पण येत नाही. विचार करुन बोलत असतो.' असे का हो?


मनोगतींना आपल्या दाक्षिणात्य बंधूंच्या आंग्ल/हिंदी बोलण्याबद्दल काही लक्षणीय चांगले/वाईट अनुभव आल्यास त्यांनी जरुर मांडावेत.  


(राष्ट्रभाषा आणि मातृभाषाप्रेमी) अनु