संस्कृतविषयी गैरसमज ?

   मराठी आणि उत्तर भारतीय भाषकांना संस्कृत ही बहुतेक भारतीय भाषांची जननी आहे असे वाटते. .पण "अक्षर" दिवाळी २०१३ च्या अंकात श्री चिन्मय धारुरकर यांनी "भाषेचं मायपण " या शीर्षकाचा लेख लिहून बव्हंश भारतियांच्या संस्कृत भाषेविषयी खालील समजुती आहेत
१)संस्कृत भारतीय भाषांची मायभाषा आहे.
२)ती शुद्ध भाषा आहे. व
३) ती देवभाषा आहे
   हे उदधृत करून ती भाषा तशी नाही हे कोणतीही उदाहरणे न देता बजावले आहे व या संक्षिप्त लेखाने "भाषाविज्ञान या विषयाकडे वाचक खेचले जातील असा आशावाद प्रकट केला आहे. याशिवाय संस्कृत संगणकासाठी खूप अनुकूल भाषा आहे हे मतही चुकीचे आहे असे त्यानी म्हटले आहे.
  प्रत्यक्षात मायभाषा,शुद्ध भाषा व देवभाषा या तिन्ही कल्पना वाच्यार्थाने कोणी घेत असेल असे मला वाटत नाही.मायभाषा या संकल्पनावर टीका करताना श्री धारुरकर म्हणतात
"जणु त्या जननी भाषेतून उद्भवण्यासाठी सगळ्या भाषा दबा धरून बसलेल्या असतात आणि एका विशिष्ट क्षणी पिल्ल व्हावीत तशी भाषांची ही पिलावळ बाहेर पडते"
   जननी भाषा समजणारे एका मर्यादित अर्थाने तिला तसे समजतात ही गोष्ट धारुरकर यांना मान्य नाही.संस्कृत भाषा ही जणु एक स्त्री आहे व ती प्रसूत होऊन तिला इतर भाषारूपी पिल्ले होतात असे हास्यास्पद विधान या समजुतीला गैरसमजूत ठरवताना त्यानी केले आहे यावरून भाषाविज्ञानाविषयी त्यांनाच अधिक प्रशिक्षणाची आवश्यकता आहे असे वाटते.