शोध आईकमनचा: पृष्ठ (३ पैकी) २

११ मे १९६० रोजी मोसाद गुप्तचर कार्यवाहीसाठी सिद्ध झाले. आईकमन संध्याकाळी ७. ४० ला बसने घरी येतो हे त्यांना माहीत होते. म्हणून त्यांच्यातील काही जण ७. ३५ लाच त्याच्या घराच्या रस्त्यावर उभे राहिले. काही अंतर ठेऊन गाड्या उभ्या राहिल्या. दोन्ही गाड्यांचे चालक, प्रवासी बॉनेट उघडून आतील संयंत्रे तपासत असल्याचा बहाणा करत होते. ती भूमिका इतकी हुबेहुब वठवली जात होती की एका मार्गस्थ सायकलस्वाराने मदत हवी का अशी विचारणाही केली. अर्थातच प्रेमळ, ठाम नकार ऐकून तो चांगलाच गोंधळला.

दोन बसेस येऊन गेल्या. ८. ०० वाजले. पण आईकमनची चाहूलही नव्हती. आता मात्र गुप्तचरांना शंका-कुशंकांनी घेरले. गाडी बंद पडल्याचे नाटक फार काळ टिकणारे नव्हते. आहे ती योजना पुढे ढकलावी लागेल अशीच लक्षणे दिसू लागली. काहींचे मत पडले की आता अधिक थांबणे धोकादायक आहे. त्यांचे अस्तितव लोकांच्या डोळ्यांत आले असते.

बहुतेकांचे मत पडले की करड्या जर्मन शिस्तीत वाढलेला आईकमन उशीराने येणे शक्य नाही. पण पहिल्या गाडीतील गुप्तचर गाबी आणि दुसऱ्या गाडीतील गुप्तचर एहुद ह्यांनी अजून थोडा काळ थांबण्याचा निर्णय घेतला. पण अर्थातच ह्याची कल्पना त्यांनी एकमेकांना दिली नाही.

८. ०५ ला आणखी एक बस आली आणि त्यातून एक टकलू, चश्मीस माणूस उतरला आणि गॅरिबॉल्डी मार्गावरून पावले टाकत चालायला लागला. पहिल्या गाडीजवळ येताक्षणी एक गुप्तचर त्याला स्पॅनिशमध्ये "Un momento, señor" (एक मिनिट, महोदय) म्हणाला. ह्यामुळे आईकमन गोंधळला आणि तेव्हाच त्या गुप्तचराने आईकमनला जमिनीवर लोळवले व इतरांच्या सहाय्याने त्याच्या मुसक्या आवळल्या. ह्या वेळी आईकमनच्या तोंडून एक चीत्कार निघाला. लगेचच त्याचे गाठोडे गाडीत टाकण्यात आले व गाडी सुरक्षित स्थळाकडे निघून गेली. काही वेळाने दुसरी गाडीसुद्धा वेगळ्या मार्गाने अपेक्षित ठिकाणी पोहोचली.

प्रवासात भेदरलेल्या आईकमनचे हातपाय बांधले गेले, डोळे झाकले गेले व तो कोणाच्या दृष्टीस पडू नये म्हणून त्याला खाली दाबून ठेवले गेले. संपूर्ण मार्गात 'हालचाल केलीस तर गोळ्या घालू' इतकेच त्याला सांगण्यात आले.

८. ५५ ला दोन्ही गाड्या एका मोसाद गुप्तचराच्या घरी आल्या. मुद्देमाल सुरक्षित उतरवल्यावर एक गाडी शहराकडे परत गेली. मग त्यांनी आईकमनचे पाय एका पलंगाला बांधले आणि त्याचे कपडे बदलले. तोंडात विषाची कुपी नाही ना ह्याची खात्री करून घेण्यात आली. कारण तो न्यायासनासमोर उभा न राहता यमदेवाच्या भेटीस जाणे म्हणजे त्याचे सर्व गुन्हे माफ होण्यासारखेच होते.

सुरुवातीला प्रश्नांना उत्तरे देण्यात आडमुठेपणा करणारा आईकमन हळूहळू बदलू लागला. त्याने मोसाद गुप्तचरांना सुस्पष्टपणे संपूर्ण आणि निर्वेध सहकार्य करण्यास सुरुवात केली. आता तो लाखो जर्मनांना आदेश देणारा अधिकारी राहिला नव्हता, तर घाबरलेला, बेचैन आणि कधी कधी तर दयनीय, असहाय व्यक्ती बनला होता. त्याच्या वागण्यातल्या साधेपणाचे मोसादच्या गुप्तचरांना पण आश्चर्य वाटत होते. त्यांना पूर्वी वाटे की आईकमन ही कोणीतरी क्रूर, कुटिल आणि राक्षसी दिसणारी, वागणारी व्यक्ती असेल.


अर्जेंटिनात राहणारा वयस्कर आईकमन

आता मोसादने २० मे रोजी ब्युनास आयर्सहून एल-अल (इझ्रायल विमान कंपनी) चे विमान जेरूसलेमकडे उड्डाण करेल अशी व्यवस्था केली. कारण जास्त घाई करणे धोक्याचे होते. केवळ हारेललाच असे वाटत होते की आईकमनच्या कुटुंबीयांनी आतापर्यंत अर्जेंटिना सरकारशी संपर्क केला नसावा. पण इतरांना अशी खात्री नव्हती. प्रत्यक्षात मात्र आईकमनच्या कुटुंबीयांनी सर्व दवाखान्यांत आईकमनची चौकशी सुरू केली पण पोलीसांकडे जाणे टाळले.

जे अन्य नाझी अधिकारी नावे बदलून अर्जेंटिनात राहात होते ते जिवाच्या भीतीने भूमिगत झाले. काही तर युरोपात पळाले. मात्र, नाझी सहानुभूतीदारांनी सूडचक्र आरंभले, ज्यात इझ्रायली राजदूताचे अपहरण, इझ्रायली दूतावासावर हल्ला तसेच १५ वर्षांच्या ज्यू विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला अशा घटनांचा समावेश होता.

आता मोसादने आपल्या एका गुप्तचराला एका छोट्या (व खोट्या) अपघातात मेंदूला मार बसला आहे असे दर्शवून एका रुग्णालयात दाखल केले. त्याने हळूहळू प्रगती करणे अपेक्षित होते. २० मे ला सकाळी डॉक्टरांकडून तो बरा झाल्याचे आणि इझ्रायलला जाऊ शकत असल्याचे प्रमाणपत्र घेण्यात आले. मग मोसादने केवळ त्यावरील नाव व फोटो बदलून आईकमनचा तपशील टाकला. नंतर आईकमनला थोड्या प्रमाणात गुंगीचे औषध देण्यात आले. त्यानंतर तो एखाद्या मद्यप्यासारखा भासू लागला. मात्र दोन बाजूला दोघांनी पकडल्यावर तो स्वतः चालू शकत होता. मग त्याला एल-अल चा गणवेष चढवण्यात आला. आईकमनने मोसादला ह्यात व्यवस्थित सहकार्य केले. एकदा तर त्यानेच त्याच्या अंगावर एल-अल चे जाकीट चढवले गेले नसल्याची आठवण करून दिली, जी एक घोडचूक ठरू शकली असती.

आता मोसादच्या तीन गाड्या विमानतळाकडे धावू लागल्या. त्यापैकी मधल्या गाडीत आईकमनला बसवण्यात आले होते. गाड्या विमानतळाच्या फाटकापाशी येताच पहिल्या गाडीतल्या लोकांनी मोठ्यांदा हसायला आणि गाणी म्हणायला सुरुवात केली. त्याच्या चालकाने सुरक्षा रक्षकाला संकोचाने सांगितले की काही जण अतिरिक्त मद्यपानाने बेहोश झालेले आहेत. सुरक्षा रक्षक त्याच्या ह्या नाटकाला बळी पडला. त्यांच्या मद्यधुंद धांगडधिंग्याबद्दल त्याला पुरुषी सहानुभूती वाटली. दोन मोसाद गुप्तचरांनी मग आईकमनला विमानात चढवले. अपयशाला कोणतीही संधी दिली गेली नव्हती.

मात्र जेव्हा एल-अल च्या विमान कर्मचाऱ्यांना आपल्या विमानातून आईकमनला नेले जात आहे कळले तेव्हा ते अतिशय अस्वस्थ झाले. कारण त्यातील अनेकांनी छळछावण्यांमध्ये आपली आपुलकीची माणसे गमावली होती. पण कोणीही आईकमनच्या अंगाला हात लावला नाही.

२ महिन्यांनंतर आईकमनच्या पत्नीने, व्हेरोनिकाने, अर्जेंटिनातील न्यायालयात रिकार्डो क्लेमंट हाच आईकमन असून त्याचे अपहरण झाले आहे असे शपथपत्र दाखल केले. मात्र १९६२ च्या शेवटी न्यायालयाने रिकार्डो क्लेमंटचे अपहरणकर्ते सापडत नसल्याचे सांगून ते प्रकरण बंद केले.

इकडे १९६१ मध्ये इझ्रायल सरकारने आईकमनला न्यायालयासमोर उभे केले आणि एकच जनक्षोभ उसळला. न्यायालयाच्या बाहेर विक्षुब्ध लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या. खुद्द न्यायालयात स्थिती काही वेगळी नव्हती. छळछावण्यांशी संबंधित लोक उद्विग्न होऊन रडत होते, ओरडत होते, काडतुसरोधी काचेच्या बंद चौकोनात बसलेल्या आईकमनला मारायला धावत होते.


इझ्रायली न्यायालयात आरोपी आइकमन