जिंकण्याची जिद्द होती, हारणारा डाव होता
क. : बदीऊज्जमा बिराजदार (साबिर शोलापुरी)

जिंकण्याची जिद्द होती, हारणारा डाव होता
जे पुढे घडणार त्याचा जीवघेणा घाव होता
मागतो प्रत्येक वेळी त्याच न्यायाचा निवाडा
थांबला संघर्ष कोठे? चोर ऐसा साव होता
देह नाही, थोर आत्मा माणसाच्या जीवनी या
जाण हे माणूसकीचे सत्य ज्याला भाव होता
पाठलागी मृगजळाच्या तोल गेला पावलांचा
मांडताना सत्य माझे अंतरीचा ताव होता
काय दोषारोप लावू या जगाला मानभावी
मौज संसारी रथाचा अश्व हा भरधाव होता
ऐक "साबिर", जीवनाची ना कधी मी खंत केली
अर्पिले हे शब्द ज्याला तूच तेव्हा ठाव होता
- बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर शोलापुरी)