संजीवनी
भाग १ – मंगळ
आज २ फेब्रुवारी २०३१. मंगळावर पाणी असल्याचा शोध लागून १४ महिने पूर्ण होत आहेत. श्रीहरीकोटा इथे ‘मार्स वॉकर्स’ ह्या मोहिमेची तयारी जोरात चालू आहे. मंगळावर पाण्याचे अस्तित्व आढळल्यावर भारताने तातडीने ही मोहीम हाती घेतली. ह्याच संदर्भात मोहिमेचे मुख्य शास्त्रज्ञ श्रीयुत सतीश दिवेकर बातम्यांमध्ये सविस्तर माहिती सांगत होते.
"मोहिमेची १ जून ही तारीख निश्चित झाली आहे. ह्या मोहिमेमध्ये दहा जणांचा चमू मंगळावर पाठवण्यात येईल. मोहिमेसाठी दहा तरुणांची निवड केलेली आहे. ह्यामध्ये पाच पुरुष आणि पाच स्त्रिया असतील. मोहिमेमध्ये मंगळावरील हवेचा दाब तपासणे, तेथील गुरुत्वाकर्षण आणि पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण यांची तुलनात्मक चाचणी करणे, मंगळावर मेणबत्ती लावून त्यातून निघणाऱ्या ज्वाळेचे गुणधर्म तपासणे, असे एकूण १५ वेगवेगळे प्रयोग करण्यात येणार आहेत. मंगळाच्या उत्तर गोलार्धात एका विशिष्ट जागी लाल रंगावर हिरवा भाग दृष्टीस पडतो. ह्या हिरव्या भागाचा आकार लंबगोलाकार असून त्याचा विस्तार साधारण फुटबॉलची चार मैदाने बसतील इतका आहे. तो हिरवा रंग नक्की कशामुळे दिसत आहे त्याचा शोध घेण्याचे काम सुद्धा ‘मार्स वॉकर्स’ करतील.
ह्या सगळ्या गोष्टी पूर्णत्वास न्यायला सर्व अंतराळवीरांना मंगळावर १३ दिवस मुक्काम करावा लागणार आहे.
यान मंगळाच्या जवळ पोहोचेल, तेव्हा पृथ्वीपासून यानाने ५.६ कोटी किलोमीटर अंतर कापलेले असेल. यानाला कमीत कमी अंतर पार करायला लागावे ह्यासाठी मंगळ पृथ्वीच्या सर्वात जवळ असण्याचा कालखंड आणि यान मंगळाजवळ पोहोचण्याची वेळ, अगदी मापून काढण्यात आली आहे.
सरासरी ताशी पंधरा हजार किलोमीटर वेगाने यान मंगळाकडे झेपावेल. यानाचे इंजिन सौर ऊर्जा आणि आण्विक ऊर्जा अशा दोन्ही प्रकारच्या ऊर्जांवर चालेल असे बनविण्यात आले आहे. यानाच्या एका वेळच्या प्रवासाचा कालखंड एकूण पाच महिन्यांचा असणार आहे. यानाच्या हालचालींवर आणि प्रयोगांच्या निकालांवर ‘इस्रो’ पृथ्वीवरून २४x७ लक्ष ठेवून असेल."
"मोहिमेमध्ये दहा अंतराळवीरांबरोबर कडुनिंबाचे एक छोटे रोपटेसुद्धा पाठवण्यात येणार आहे. त्याच्यावर विशेष रासायनिक प्रक्रिया करण्यात आलेली आहे, जेणेकरून कमी सूर्यप्रकाशात ते जिवंत राहू शकेल. त्याचबरोबर, मंगळाच्या पाणी असणाऱ्या भागातील मातीमध्ये पेरण्यासाठी काही निवडक वनस्पती पाठविल्या जातील, ज्यामध्ये कडुलिंब आणि वड, तसेच भाज्या, फळे यांची बियाणी सुद्धा असतील. मंगळावर सापडलेल्या पाण्यामुळे ह्या बियाण्यांना कोंब फुटतील. मंगळाचा लाल रंग आपण लवकरच हिरव्या रंगात बदलू शकू असा विश्वास आम्ही बाळगून आहोत. झाडांना लागणारा कार्बन डाय-ऑक्साइड मंगळावर मुबलक प्रमाणात उपलब्ध असला तरी मंगळावरील सूर्यप्रकाश हा पृथ्वीवरील सूर्यप्रकाशाच्या ३६% इतकाच आहे. ह्या कारणामुळे मंगळावर झाडांची वाढ पृथ्वीवरील झाडांच्या तुलनेत कमी वेगाने होणे अपेक्षित आहे. त्यांच्या रचनेमध्ये बदल होण्याचीही शक्यता आहे. मंगळावर असणाऱ्या कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण कमी करण्यासाठी मानवास माहीत असलेला हा एक जलद मार्ग आहे. यानामध्ये तेरा महिने पुरेल एवढा तयार अन्नाचा साठा असेल."
"मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की 'टाटा स्काय' आणि 'रिलायन्स ग्रूप' यांच्या सौजन्याने ‘मार्स वॉकर्स' यानामध्ये एक सेट-टॉप-बॉक्स आणि टीव्ही बसवण्याची योजना आहे. यानातील एक खास उपकरण पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहाकडून संदेश ग्रहण करत राहील. बातम्यांच्या चार निवडक वाहिन्यांचे २४ तास रेकॉर्डिंग एका हार्ड डिस्क वर केले जाईल अशी सोय करण्यात आली आहे. यानांतील अंतराळवीरांना त्यांच्या प्रदीर्घ प्रवासात करमणूक व्हावी तसेच पृथ्वीवरील घडामोडींबद्दल त्यांना माहिती मिळत राहावी म्हणून ही सुविधा करण्यात आलेली आहे. सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि जनतेच्या शुभेच्छांमुळे मोहीम नक्कीच यशस्वी होईल ह्यात शंका नाही."
इतके बोलून दिवेकरांनी पत्रकारांचा निरोप घेतला.
मानवाला ध्यास लागला होता तो फार पूर्वीपासून सतावत आलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा. पृथ्वीव्यतिरिक्त इतरत्र कुठे जीवसृष्टी अस्तित्वात आहे का? माणसाला मंगळावर एक नवीन वस्ती निर्माण करता येईल का? माणूस तिथे जगू आणि टिकू शकेल का? अद्याप हे प्रश्न अनुत्तरितच होते. पण लवकरच ह्या सर्वांची उत्तरे माणसाला मिळणार होती.
मोहिमेत सहभागी होणाऱ्या सर्व अंतराळवीरांचे प्रशिक्षण एकदम धडाक्यात सुरू झाले. ‘जंपिंग चेअर’ वर बसायची ह्या वेळेस नचिकेतची वेळ होती. ही खुर्ची एका उंच, दंडगोलाकार उभ्या जाड दांड्याला अडकवलेली असते. हायड्रॉलिक्स च्या साहाय्याने एका झटक्यात ही खुर्ची वर जाते. क्षणार्धात खुर्चीचा वेग खूप कमी केला जातो. खुर्ची वरच्या दिशेने जाताना त्यावरील व्यक्तीस वजन वाढल्यासारखे वाटते आणि खाली येताना गुरुत्वाकर्षण नसल्याचा भास होतो. ह्या हालचालींमुळे शरीराला जोरात हादरा बसतो. अशा प्रकारचे हादरे अंतराळवीरांना यान पृथ्वीवरून उड्डाण करताना आणि मंगळावर उतरताना सहन करावे लागणार होते. त्यासाठीच हा सराव चालू होता. त्या अंतराळवीरांचे शरीर अशा धक्क्यांना सहन करू शकते का ते तपासण्यात येत होते.
मोहिमेमध्ये हरिहरन आणि रमेश हे दोघेही ’मिशन स्पेशलिस्ट’ म्हणून काम पाहणार होते. सध्या दोघेही यानाच्या दुरुस्तीचे प्रशिक्षण घेत होते. शून्य गुरुत्वाकर्षणात स्पेस सूट घालून यानाच्या बाहेर जाणे, यानाच्या बिघडलेल्या भागाची पाहणी आणि दुरुस्ती करणे हे खूप जिकिरीचे काम होते. दोघांनाही स्पेस सूट घालून पाण्यात उतरवले होते. उच्च दाबाच्या साहाय्याने पाण्याची घनता वाढवून शून्य गुरुत्वाकर्षणाच्या वेळची स्थिती तयार करायचा प्रयत्न करण्यात आला होता. एकविसाव्या शतकातल्या विज्ञानाच्या साहाय्याने माणसाला पृथ्वीवर ही स्थिती निर्माण करणे शक्य झाले होते.
प्राची एयर इंडिया मध्ये वैमानिक होती. ‘मार्स वॉकर्स'ची ती मुख्य चालक म्हणून काम पाहणार होती. जसे ट्रेन चालवायला शिकवणारे किंवा विमान चालवायला शिकवणारे सिम्युलेटर असतात, त्याचप्रमाणे अंतराळयान चालवायला शिकवण्यासाठी असलेल्या खास सिम्युलेटरमध्ये बसून प्राची प्रशिक्षण घेत होती. सर्वच जण आपल्याला असलेला अनुभव पणाला लावत होते. दिवस भराभर जात होते आणि त्याचबरोबर ‘मार्स वॉकर्स’ कडून सगळ्यांच्याच अपेक्षा सुद्धा प्रचंड उंचावत होत्या.
१० एप्रिल. अखेर उड्डाणाचा दिवस उजाडला. सर्व अंतराळयात्री स्पेस सूट घालून यानात आपापल्या जागेवर जाऊन बसले. यानापासून काही अंतरावर असलेल्या इमारतीमध्ये कंट्रोल रूम होती. तेथील तंत्रज्ञांनी अंतराळवीरांना काही सूचना केल्या. सगळी तपासणी झाल्यावर यानाचे दरवाजे सावकाश बंद झाले.
फक्त भारत नव्हे तर समस्त जगाची नजर आता "मार्स वॉकर्स" कडे खिळली होती. ही मोहीम म्हणजे मानवजातीच्या वाटचालीतील एक अतिशय महत्त्वाचा टप्पा होता.
एस. पी. कॉलेजच्या मैदानात मोठा पडदा लावला होता. त्यावर उड्डाणाचे थेट प्रक्षेपण दिसणार होते. मैदान तुडुंब भरले होते. सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. कर्ण्यातून आवाज आला, "ऑल दि बेस्ट 'मार्स वॉकर्स'. द काउंट डाउन बिगिन्स.. टेन, नाईन, एट,...... थ्री, टू, वन".... यानातून अग्नीच्या प्रचंड ज्वाळा पृथ्वीला खाली ढकलू लागल्या. यान अवकाशात झेपावू लागले. यानाच्या वेगामुळे सर्व अंतराळवीरांना क्षणभर आपले वजन वाढल्याचा भास झाला. आपल्याला दिलेल्या प्रशिक्षणाची त्यांना ह्यावेळेस आठवण झाली. यानाने काही मिनिटांतच बऱ्यापैकी अंतर गाठले. त्याने ताशी चौदा हजार पाचशे तीस किलोमीटर इतका वेग पकडला आणि ते मंगळाच्या दिशेने त्याच्या कक्षेत स्थिरावले. उड्डाण यशस्वी झाल्याचे कानावर पडताच लोकांनी टाळ्या वाजवून जल्लोष साजरा केला.
यानामध्ये सर्व जण उड्डाण होताना बसलेल्या धक्क्यांमधून सावरत होते. गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आता नसल्यातच जमा होता. खुर्चीचे पट्टे काढताच सर्व जण हवेत तरंगू लागले. सर्वांनी यानाच्या एका छोट्या खिडकीतून बाहेर पाहिले. पृथ्वी आणि चंद्र आता बऱ्यापैकी मागे पडलेले दिसले. निळ्याशार वसुंधरेला घिरट्या घालणाऱ्या चंद्राचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडत होते. सर्वांनी त्या दृश्याचा मनमुराद आस्वाद घेतला आणि समस्त मानवजातीच्या भविष्याबद्दल विचार करण्यात सगळे दंग झाले. सर्वांना आता प्रतीक्षा होती ती एका नवीन सुरुवातीची. ज्यासाठी अजून पाच महिने प्रतीक्षा करावी लागणार होती.
प्राचीने एव्हाना यानाचा ताबा घेतला. यानाचा रोख होता मंगळाकडे!
-------------------------