रंग समरसतेचे
प्रत्येक गावाला स्वतःचा असा एक चेहरा असतो असे म्हटले जाते. पण खरेतर त्या गावात राहणारे, गावावर प्रेम करणारेच त्या गावाला ही चेहरेपट्टी बहाल करतात. अशा गावांच्या सहवासात नवनवीन माणसे येत जातात. तिथल्या कडूगोड आठवणींच्या दुव्यांनी त्या गावाशी कायमची बांधली जातात. हे स्मृतिबंध सहजासहजी तुटत नाहीत. आठवणींत रमताना त्या-त्या विशिष्ट कालावधीचा विचार त्या-त्या गावाशिवाय करणे कठीण असते. ‘गावोगावचं पाणी’ या पुस्तकात लेखक रवींद्र जोशी हे ही अशाच काही आठवणींत रमलेले आहेत. वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे निरनिराळ्या गावी राहण्याची संधी त्यांना मिळाली. मनमिळाऊ स्वभाव, माणसे जोडण्याची हौस, गाण्याची, संगीताची आवड यांमुळे प्रत्येक नव्या ठिकाणी त्यांनी आपल्या भोवती गोतावळा जमवला. ऋणानुबंध निर्माण केले.
तासगाव, आमणापूर आणि शहापूर-बेळगाव या गावांशी लेखकाच्या बालपणाच्या स्मृती गुंफलेल्या आहेत. करकरीत संध्याकाळी मुसळधार पावसात लहानगा रवी जेव्हा आपल्या दोन मोठ्या भावांसोबत आईचे बोट धरून तासगाव स्टेशनात उतरतो, अनेक वर्षे बंद असलेल्या आणि पुरूषभर गवत माजलेल्या जोशीवाड्यात जेव्हा प्रवेश करतो, तेव्हा पुढे येणाऱ्या काळाची अनिश्चितता वाचकांनाही काही क्षण वेढून टाकते. तिथे रवीला खेळायला सवंगडी मिळाले आहेत किंवा त्याचा शाळाप्रवेश झाला आहे हे कळताच जरा निवांतपणा मिळाल्यासारखा वाटतो.
आमणापूरचा मामांचा वाडा, शेती, बहरलेली पिके, तिथला पाण्याचा पाट, गुऱ्हाळाचे वर्णन हे सर्व तर इतके हुबेहूब डोळ्यांसमोर उभे राहते, की शेताच्या बांधाच्या कडेकडेने रवीचा हात धरून आपणही आपल्या कल्पनेत नकळत हुंदडायला लागतो, ‘रंग्या-झिंग्या’च्या बैलजोडीला मोट ओढताना पाहतो, नदीच्या पाण्यात डुंबतो, पेलाभर धारोष्ण दूध एका दमात संपवू पाहतो.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे लगेचचे ते दिवस. त्या काळातल्या गावगाडा हाकण्याच्या पद्धती वर्षभर साजरे होणारे निरनिराळे सण, गावची जत्रा, तमाशाचे फड, तंबूतले सिनेमे, राष्ट्रसेवादलाचे मेळे, कलापथके, स्थानिक संदर्भासहीत त्यात रचली, गायली जाणारी कवने हा सर्वच माहितीरूपी खजिना कालौघात अतिशय मूल्यवान ठरेल असा आहे. बेळगावमुक्कामी आल्यानंतर तोपर्यंतची सवयीची माणदेशी बोलीभाषा आणि कर्नाटकी ढंगाची मराठी भाषा यांच्यातला फरक लेखकाने मनोरंजक पद्धतीने मांडला आहे. बेळगावातील ‘रिझ’ थिएटर आणि थिएटरसमोरच्या गप्पाष्टकांतील पु. ल. देशपांडे आणि ‘रावसाहेब’ यांचे उल्लेख आपल्याला आश्चर्याचा सुखद धक्का देऊन जातात.
असाच सुखद धक्का बसतो तो पन्नासच्या दशकातील पुण्यातील काही जुन्या-जाणत्या साहित्यिकांच्या उल्लेखामुळे आणि तेव्हाच्या गणेशोत्सवाच्या वर्णनामुळे. बेळगावी धाटणीचे मराठी तोंडात बसल्याने सुरुवातीला पुण्याच्या शाळेत लेखकाची जी फजिती होते, ते सारे वर्णन अगदी हलकेफुलके आहे.
अशा प्रकारे आठवणींत रमून लेखन करताना एकीकडे लेखनाचे रंजनमूल्य सांभाळावे लागते. पण त्याचबरोबर ते आत्ममग्नतेच्या वळचणीला जाऊ न देण्याचे भानही सतत ठेवावे लागते. या पुस्तकात हा तोल व्यवस्थित सांभाळला आहे.
प्रत्येक नवीन ठिकाणी लेखक पूर्णपणे तिथला होऊन राहताना दिसतो. विशेषतः आळंदी (देवाची) या प्रकरणात वाचकांना ‘समूहप्रधान आत्मकथन’ या सुरुवातीच्या मनोगतातल्या शब्दयोजनेची पुरेपूर अनुभूती मिळते. निरनिराळ्या गावी जेव्हा मुक्काम करावा लागतो, तेव्हा निव्वळ फिरस्त्याची भूमिका घेऊन चालत नाही. ‘यथा काष्ठं च काष्ठं च... ’ हे वैश्विक सत्य आहे हे खरेच. पण गावोगावच्या दोन घडीच्या डावात लेखकाचे समरसतेचे रंग भरणेही तितकेच उल्लेखनीय ठरते.
आळंदी या प्रकरणानंतर मात्र लेखनावरची पकड काहीशी ढिली झाली आहे असे वाटते. सुरुवातीच्या प्रकरणांमध्ये आठवणींच्या साथीने त्या-त्या गावचे गावपण प्रकर्षाने नजरेत भरते. तर दिल्ली, (थोडा अपवाद वगळता) भोपाळ, चितोडगड, उदयपूर आणि जयपूर ही गावे नुसती हजेरी लावून गेल्यासारखी वाटतात. या गावांशी लेखकाचा संपर्क हा काही दिवसांचाच असल्यामुळे असा फरक पडला असावा. ‘ते हि नो दिवसा गताः’ ही प्रत्येक पिढीची खंत ‘पुन्हा पुणं’ या प्रकरणात जागोजागी दिसते. पण वाईट, अप्रिय गोष्टींकडे वाचकांचे लक्ष वेधून घेऊन केलेली निखळ टीका कुठेही खटकत मात्र नाही.
पुस्तक अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सादर केले आहे. पत्र्याची ट्रंक, वळकटी आणि फिरकीचा पितळी तांब्या दर्शवणारे रविमुकुल यांचे सेपिया टोनमधील मुखपृष्ठ, महावीर जोंधळे यांची प्रस्तावना आणि डॉ. द. भि. कुलकर्णी यांचे ‘पाठपृष्ठ लेखन’ पुस्तकाला अधिक उंचीवर नेऊन ठेवतात.
हे पुस्तक पुढ्यात दिसले, तर चोखंदळ वाचक ते पटकन उचलून घेतील. त्यांची ही निवड अगदी योग्य असेल एवढे नक्की.
गावोगावचं पाणी. लेखक - रवींद्र जोशी. अनुबंध प्रकाशन. पृष्ठे २००. मूल्य १७५ रुपये.
- प्रीति छत्रे