स्मृतींचा हिंदोळा
दिवेलागणीची वेळ. एका शांत संध्याकाळची उतरती उन्हे. संध्याप्रकाशाचे कवडसे सांभाळत झाडाची पाने एक एक कवडसा अलगद हलवून लाकडी गजाआड सांडत राहिलेली. लहानपणी आजी बसायची त्या व्हरांड्यात लाकडी गज समोर बाजूला होते आणि आतल्या बाजूला दोन आरामखुर्च्या - त्यातली एक लहान, एक मोठी - समोरासमोर गजांना लागून ठेवलेल्या असत. उरलेल्या जागेत आणखी दोन खुर्च्या असत. त्या जरा भक्कम पण लाकडीच होत्या. हिरव्या रंगाचे जाड कापड आणि आत स्प्रिंग आणि भुसा भरलेला अशा. ह्या दोन खुर्च्यांवर बसले की त्या स्प्रिंगमुळे वाजायच्या आणि आमचा आपला एक खेळ व्हायचा. एका खुर्चीवर आजीची मनीमाऊ, तिचे नाव पेशवीण, अगदी बिनधोक बसलेली असायची. तिला एक हक्काची मऊ उशी आजीने बसायला दिली होती. अगदी शांत निद्रेत गहन विचार करत असल्यागत दिसायच्या पेशवीण बाई! आज त्या व्हरांड्यात उभे राहून समोर पाहताना सगळे आठवत आहे.
दुपारी आरामखुर्चीत बसून आजीचे स्त्री आणि किर्लोस्कर ह्या मासिकांचे वाचन चालायचे. तिच्या वाचनात शक्यतो खंड पडायचा नाही. बाहेर रस्त्यावर काही ठराविक आवाज येत. बैलगाडीच्या चाकांचा, रस्त्यावरून जाण्याऱ्या गाईंच्या हंबरण्याचा, लांबून येणाऱ्या बसचा आवाज वगैरे. अगदी नाक्यावर वळण घेणारी बस घरी येईपर्यंतच्या रस्त्यावर नेमकी कुठे असेल हे तिच्या आवाजावरून ताडता यायचे. डोळे मिटून, पलंगावर उताणे पडून, मी ही बस आता कुठे वळली असेल आणि कुठे घटकाभर तिचा वेग कमी झाला असेल ह्याचा आवाजाच्या रोखाने अंदाज बांधायचा खेळ दुपारच्या शांततेत खेळत असे. बस जवळ येऊ लागली की तिचा आवाज आणखी मोठा व्हायचा. सुट्टीत ह्या दुपारच्या गाडीतून कोणी काका-मामा येतील अशी एक आशा असायची आणि अचानक कोणी आल्याचा असा आनंद देखील अनुभवलेला आठवतो.
ह्या व्हरांड्याची आणि माझी खासच खास मैत्री होती, कारण गजांतून दोन्ही हात बाहेर काढले की मग जणू काही एखाद्या नव्या जगात आल्यागत वाटायचे. मी शिक्षिका आणि हे गज माझे विद्यार्थी असा खेळही कधी रंगे. मात्र ह्या गजरूपी विद्यार्थ्यांना शिकवताना मी हातात कधी छडी घेतली नाही. लहान वर्गात असताना आम्हाला एक कडक बाई होत्या. मला आठवते की शाळेत एक दिवस आमची वर्गातली मस्ती त्यांना आवडली नव्हती. तेव्हा त्यांनी हातावर दोन पट्ट्या मारलेल्या आठवतात. पहिलाच पट्टीचा मार, चांगलाच लक्षात राहिलेला. तो खाताना पोटात जे काही झाले ते आणि मग डोळ्यांत जो महासागर उभा राहिला तेही आठवणीत राहिलेले. तेव्हा रडले तरी मनातून काही तो मार गेला नाही. मग घरी आले आणि उगाच त्या गजांना हातून शासन घडले. हातात पट्टी होतीच. तेव्हा आजी बघत होती आणि तिने विचारले हा काय प्रकार आहे म्हणून. मी म्हटले, "आज बाईंनी फटके दिले. " तसे आजी मला म्हणाली, "अगो, एका व्यक्तीचा राग दुसरीवर काढू नये. सगळे जग त्रासेल न अशाने! आणि हे तर तुझे शहाणे विद्यार्थी! " मग मात्र परत कधी गजांना शिक्षा केली नाही आणि त्या दिवशी ह्या प्रसंगातून एक धडा गिरवला.
घरासमोरून जाणारे ठराविक विक्रेते आणि त्यांच्याकडे असणारा विक्रीचा ठराविक माल हे नेहमीचे दृश्य होते. आजीचा स्वभाव प्रेमळ आणि लाघवी. तेव्हा मासेवाल्या कोळीण मावशीची सुद्धा अगदी नीट नियमित विचारपूस व्हायची. कोणाला कधी दुखवायचे नाही आणि गरिबांवर नेहमी दया करायची हे आजीचे विचार अगदी ती जाईपर्यंत कायम होते. आजीसारखी दुसरी व्यक्ती आजवर माझ्या पाहण्यात नाही. तशी ती रागेही भरायची, पण ते रागावणे अगदीच साधे असे. मग 'का बरे रागावले मी! ' असा विचार करून तिलाच त्याचा त्रास व्हायचा. मी तशी तिचे सांगितलेले ऐकायचे. दुपारी शांत बसून अभ्यास करणे थोडे कठीण आणि मोठ्यांच्या आग्रहाखातर न खेळता निवांत पडून राहणे हे तर त्याहून कठीण. 'जवळपासच राहा. जास्त इकडे तिकडे जाऊ नका, ' ह्या आजीच्या सूचनेला मान देऊन मग ह्या व्हरांडा आणि जिन्यात खेळ सुरू होत.
आज त्या जिन्यावरून चढताना ठराविक लाकडी पायरीवर असलेली एक वलयाकार खूण आठवली तशी पटकन जिन्यावर बसले आणि धूळ झटकली तर ती खूण आजही तशीच आहे! प्रत्येक पायरीचे एक वैशिष्ट्य होते. मी प्रत्येक पायरीला नावे दिली होती आणि आमचे संवादही चालत. सर्वात शेवटची लाकडी पायरी म्हणजे 'करकरी' कारण हिचा आवाज फार! ह्या पायरी नंतर २ मजबूत दगडी जिने होते ह्यांची भक्कम बैठक होती. आजही जणू ते तसेच माझी वाट पाहतात.
नंतर कधी आजोळचे ते जुने घर मालकांना परत दिले पण तरीही आठवणी दुपारच्या सावल्यांगत जवळपास रेंगाळतात. आता कठड्याला, भिंतींना नवे रंग आले आहेत. चुना गेला आणि आता 'पेंट' आला आहे. पण पायऱ्या मात्र तेच सगळे हावभाव घेऊन आणि धावपळीच्या अनेक अनुभवांना गाठीशी घेऊन उभ्या आहेत. जिना चढून वर गेल्यावर असलेली चपला ठेवण्याची जागा ही एक लहानगी मोकळी खोलीच होती. तिच्या एका बाजूची भिंत अर्धीच बांधून वर लांबच्या लांब उघडी खिडकी असल्यागत जागा होती. तिकडे बसून हाताने आंब्याच्या पानांना हात लावलेला आठवतो. आज ते झाड तसे तितके झुकून जवळ येत नाही. बहुतेक आम्ही मुले खूप मोठी झालो, किंवा आमचे हात खूप लहान झाले! आता आंब्याचा तो मोहोरही पूर्वी इतका नाही आणि कैऱ्याही फारशा दिसत नाहीत. ह्या झाडावरच्या कैऱ्या पाडताना काय धमाल यायची! कैऱ्या पाडण्याचा कार्यक्रम छपरावरून साजरा होत असे. आवाज न करता, कितीही हळुवारपणे हे केले तरी मस्ती उघडकीला यायचीच. कधी फुटलेले कोपर, ढोपर आमचे पराक्रम उघड करीत.
हे घर दोन मजली होते. कौलारू. सुंदर लाल रंगाची कौले होती. वरच्या मजल्यावरच्या समोरच्या व्हरांड्याला समोर उतरते छप्पर होते. व्हरांड्यातून त्या छपरावर खाली उतरणे म्हणजे गड सर केल्यागत वाटायचे. छपराला पाऊल लागले की कोण आनंद व्हायचा! अर्थात हे सौख्य फार टिकायचे नाही, कारण समोरून कोणी पाहण्याची शक्यता असे. ओळखीच्या कोणी पाहिले तर मग लगेच मस्तीची वर्दी आत जायची. अशावेळी आजीने पाठीशी घातलेले आठवते. 'लहानपणीच तर मस्ती करणारच! ' हा तिचा वाद घालण्यासाठीचा ठरलेला मुद्दा असे. मग कोणीही वादाच्या भानगडीत पडत नसत. आजीच्या हाताला चव होती. साधा चहा केला तरी अप्रतिम व्हायचा. सगळे खाण्याचे पदार्थ चवदार असत आणि वाढण्याचा आग्रहही विशेष असे. पोटात दोन घास जास्तच जात. तिच्या घरात आलेला पाहुणा कधीही नाराज परतला नव्हता. नातेवाईकांचे पण ती खूप करायची. तिच्यासोबत आम्हा मुलांची दुपार कशी निर्धास्त जायची.
आज दिवेलागणीला अजून अवकाश असताना हे घर पाहते आहे. पण भूतकाळातल्या घराचे आणि आजूबाजूच्या परिसराचे चित्र मनात उजळत आहे, डोळ्यांसमोर येत आहे. ठराविक वेळेला पाण्याचे शिंपण अंगणात होऊन तुळशीपाशी दिवा लागे. मालकांच्या घरी धुपाचा वास दरवळे. ओटीवर माझ्या आजीचे आणि मालकीण बाईंचे संवाद चालत. त्या दोघी समवयस्क होत्या. त्या गप्पा मारत आणि आम्हाला मात्र अभ्यासाला पळावे लागे. घरासमोरचे सारवलेले अंगण आणि घरामागची वाडी - आता सगळे सगळे बदलले आहे. मालकांचे घर आणि आम्ही राहायचो ती जागा ह्यांच्या मधले बैठे घर पार मोडकळीस आले आहे. आज ते बैठे घर पाहवत नव्हते. मग डोळ्यांची मनाने समजूत घातली. 'चांगले तेच पाहायचे' असे मनाला समजावून आताच्या परिसराचा आनंद घेत फिरले. वाडीतली ठराविक झाडांच्या - केळी, फणस, नारळ, सुपारी, चिकू - प्रत्येकाच्या बुंध्याला हात लावला. एका झाडाकडून दुसऱ्या झाडाकडे जाताना काही आठवणी शिवून गेल्या. 'वाडी' म्हणजे आमच्या लपाछपीचा मुख्य डेरा होता. जमिनीला नुसत्या पायाने स्पर्श करून पाहिला. ठराविक वेळेला वाडीत पाणी सोडत असत तसे आजही सोडलेले होते. पाण्याच्या त्या ओहोळात अलगद पाऊल टेकले. डोळे भरून आले. आठवणींना पुन्हा एकदा सजवायचे आणि खूप हसायचे असे ठरवून गेले होते, पण त्या काही ऐकेनात. आठवणी जणू म्हणत होत्या की आम्हाला आमचे जुनेच रुपडे आवडते. डोळे पाझरत असताना आकाशात पाहिले तर नारळाच्या झावळ्यांनी शाकारलेले आकाश दिसले. लहानपणी करायचे तशी दोन्ही हात वर पसरून त्या हिरव्या पानांनी नटलेल्या आकाशाकडे पाहत गोल गोल फिरले. मग वाटले की बदल तसा अपरिहार्यच असतो, तरी समजून घेण्याच्या पलीकडला असतो. लहानपणी जिथे आनंद आणि दु:ख अनुभवले ते घर आज डोळ्यांत पाणी का घेऊन येत आहे?
कोकिळेचा आवाज हाक घालू लागल्यावर मन परत जागेवर आले. वाटले, जोरात हाळी घालावी आणि लहानपणीचे सगळे सवंगडी परत एकत्र खेळायला यावेत. परत एकदा लहान व्हावे आणि ह्या दुपारच्या उन्हात बागडावे. पक्ष्यांची किलबिलही नेहमीचीच. झाडे, जमीन, जिना, व्हरांडाही तोच. पण आमचे सर्वांचे जग आता बदलले आहे. आता ती हातांची ओंजळ लहानगी नाही आणि आजीच्या प्रेमळ हास्याचा खळखळाटही नाही. वाटून घेतलेला खाऊ आणि डबा ऐसपैस नाही. ते सगळे हरवले की आम्हीच हरवलो?
मालकांनी आग्रहाने फराळ चहाचा बेत केला होता तो यथासांग पार पडला. तरी जाणवले की गाव तोच आहे, पण माणसे बदलली आहेत. आता फक्त औपचारिकता उरली आहे. तो आपलेपणा आता लहानपणासोबत हरवला. परतीचे क्षण मात्र नेहमीच कठीण असतात. तेच अनुभवत गाडीत बसले आणि निघाले.
- सौ. मोनिका रेगे