रिक्त

आकाशाकडे झेपावणाऱ्या झाडाची फांदी प्रणवने रेखाटली आणि पेन्सिल खाली ठेवली. बराच वेळ ते झाड तो लांबून निरखत राहिला. चित्राला जुने, विटके रूप आणण्याचा तो कसोशीने प्रयत्न करत होता. १८६० च्या काळातल्या शेताचे, खोपटेवजा झोपडीचे आणि त्या झाडाचे त्याने वेगवेगळया बाजूने खूप वेळ निरीक्षण केले. हिरवागार मळा, कडेकडेला नजर खिळवून टाकणारी फुलझाडे, इकडे तिकडे बागडणारी मुले. सुंदर चित्र होते. पण त्या शेतातून परत येताना तिथे वाचलेले, शेतात राबणाऱ्या गुलामांचे वर्णन मनात घर करून राहिले होते. ते या चित्रात काही केल्या जिवंत होत नव्हते. तो पुन्हा पुन्हा केस मागे करत बराच वेळ नुसताच उभा राहिला. शेजारच्या खोलीतून येणारे गाण्याचे स्वर आता कुठे त्याच्या मनात झिरपले. अमिता एरोबिक्स करत असावी. एक सुरेल लकेर कानाने टिपली आणि त्या तालावर झाडावर निसटता हात त्याने फिरवला. कलती मान करत प्रणवने चित्र पुन्हा पुन्हा पाहिले आणि धावत जाऊन अमिताच्या खोलीचे दार ढकलले.
"अमू, तुझ्या त्या गाण्याच्या लकेरीने माझं चित्र बघ कसलं मस्त आलंय. "
"अमिता म्हण रे, " नाईलाज झाल्यागत पाय ओढत ती प्रणवच्या खोलीत शिरली. पुढचे शब्द तिच्या तोंडून बाहेर पडलेच नाहीत. ती नुसतीच त्या चित्राकडे पाहत राहिली.
"ओ गॉड, कालच पाहिलं आपण हे शेत. तिथेच आहोत असं वाटतंय. फक्त त्या काळातल्या माणसांची कमी होती तिथे. चेहऱ्यावर सुरकत्या पडलेला माणूस केवढा खरा वाटतोय. वॉव! आणि ती बाजूला धुळीने माखलेली चिमुरडी. कूल ड्यूड! आईला दाखव हं. " तिने दोनतीन वेळा जवळ जाऊन ते चित्र नीट निरखले. तो विलक्षण खुशीत नुसताच तिच्याकडे पाहत होता.
"आता मध्येच ओढून आणू नकोस मला. " ती पुन्हा आपल्या खोलीत गेली. प्रणव ते चित्र घेऊन धावतच वरती गेला. पोटमाळ्यावर बाबांच्या समोर त्याने चित्र नाचवले. प्रणवच्या डोळ्यात आनंद ओसंडून वाहत होता. पण बाबांच्या चेहऱ्याकडे पाहून कुठून ही दुर्बुद्धी झाली असे झाले त्याला. आकाशभाईंनी त्या चित्राकडे एक नजर टाकली आणि पुन्हा कागदात डोके खुपसले.
"कसं आहे? " त्याला तरीही राहवले नाही.
"किती वेळ लागला हे चित्र काढायला? " उत्तर न देता बाबांकडे खाऊ का गिळू अशा नजरेने तो पाहत राहिला. संतापाने त्याने ते चित्र उचलले आणि कोपऱ्यात शांतपणे काम करत बसलेल्या आईच्या हातात दिले.
"किती सुंदर रेखाटलंयस रे! " नवऱ्याला त्या चित्रातल्या खुब्या समजावून द्याव्यात, मुलाला प्रोत्साहन द्यायला सांगावे असे वाटूनही त्या गप्प राहिल्या. मुलाने डॉक्टरच व्हायला पाहिजे हा धोशा लावलेल्या माणसाला काय सांगायचे आणि कशासाठी?
"काल बाबांनी चित्र बघायचीही तसदी घेतली नाही. " प्रणवचा राग धुमसत होता.
"कामात होते रे ते. "
तो नुसताच हसला.
"मी खरंच सांगतेय. आणि चित्रकलेत गती नाही त्यांना फारशी. " उषाताईंना नवऱ्याची बाजू आणखी कशी सावरावी ते कळेना.
"एकदा सांगून टाकणार आहे मी. ते डॉक्टर वगैरे काय करायचं ते अमिताला करा. मला नाही आवड. "
"बघू आपण नंतर ते. पण तू काही बोलू नकोस बाबांना. " तो काहीच बोलत नाही म्हटल्यावर उषाताईंनाच चैन पडले नाही.
"प्रणव, ऐकलंस का मी काय म्हटलं ते? "
"मी निघतोय, शाळेत पोचायला उशीर होईल. "
"माझं बोलणं पुरं व्हायचंय, " काहीशा नाराजीनेच उषाताई म्हणाल्या. एरवी आईच्या चेहऱ्यावर जरा जरी नापसंती उमटली की लगेच त्यांच्या मनाप्रमाणे वागणारा प्रणव बदलत चालला होता. आईकडे दुर्लक्ष करत तो दाराबाहेर पडला. वाढत्या वयातल्या दोन्ही मुलांशी कसे वागावे तेच त्यांना समजेनासे झाले होते. काही बोलले की झालाच वाद सुरू. आडनिडे वय म्हणून दुर्लक्ष करायला हवे हे पटत होते, पण जमत नव्हते. अमिताही धावत प्रणवच्या मागे बाहेर पडली.
उषाताईंनी निःश्वास सोडला. दिवसातली हीच एक वेळ, एकटीची. नंतर रहाटगाडगे सुरू. बराच वेळ त्या तशाच बसून राहिल्या. आकाशभाईंना मदत करायला तिसऱ्या मजल्यावर जायचे होते. शेअर व्यवसायात चांगला जम बसला असला तरी वाढत्या वयाप्रमाणे व्याप हाताबाहेर चाललाय असे वाटायला लागले होते. पण आकाशभाईंची तहान वाढती होती. जमते आहे तोपर्यंत पैसा कमवायला हवा हे सूत्र होते.
"चहा झालाय का गं माझा? " जिन्याच्या पायरीवरून पावलांचा आवाज आला. उषाताईंनी चहा आणि नाश्ताही पटकन टेबलावर ठेवला.
"काल दोन तीन नवीन लोकांशी बोलणं झालं आहे. पन्नास हजारापर्यंत तरी गुंतवतील. जेवायलाच बोलवूया शनिवारी सगळ्यांना. "
"फोन करून अंदाज घ्यायला हवा किती जणांना रस आहे पैसे गुंतवण्यात. नंतर जेवायचं बघता येईल. " या जेवणावळीत उषाताईंना अजिबात रस नव्हता. पन्नाशी जवळ आली होती. मुले मोठी होत चालली होती. त्यांचे वेगळे प्रश्न समोर येत होते. आता व्यवसाय भरभराटीला आणण्याची धडपड करण्यापेक्षा आहे त्यात समाधान मानावे असे वाटायला लागले होते.
"फोन नंबर काढून ठेव. आज बोलतो मी काहीजणांशी. आणि आटोपलं की लगेच ये वर. काम आहे भरपूर. मुलं गेली शाळेत? "
"हो. "
"तो चित्रबित्र काढण्याचा नाद काढून टाकायला हवा प्रणवचा. "
"आवड आहे त्याला. मेडिकलला जायचं नाही यावर ठाम आहे तो. "
"काहीतरीच काय? खोऱ्याने पैसा ओढेल तो वैद्यकीय व्यवसायात. आपल्यासारखी ढोरमेहनत नको पोरांना करायला लागायला. "
नेहमी ऐकायला लागणारे लांबलचक भाषण पुन्हा ऐकायला लागणार हे उषाताईंच्या लक्षात आले. सवयीने त्या हुंकार देत राहिल्या.
"... या देशात राहायचं म्हणजे सोपं काम नाही. पैसा कमावायचा तर डॉक्टरच व्हायला हवं त्याने. " तावातावाने टेबलावर बुक्का मारत शेवटचा मुद्दा मांडून आकाशभाई तिथून उठले.
उषाताईंच्या कपाळावरच्या आठ्या गडद झाल्या. विरळ झालेल्या केसाच्या एक दोन बटा कपाळावर रुळत होत्या त्या ओढल्यासारख्या करत त्यांनी मागे ढकलल्या. शरीर, मन दोन्ही उभारी नाकारत असले तरी घरातले आटपून कामाला लागणे भाग होते. कागदाच्या चळतीत बुडालेले आकाशभाई आणि त्यांच्या इच्छा बराच वेळ त्यांचा पाठलाग करत राहिल्या.