असोशी
क. : मृण्मयी
जुना आवेग लाटांच्या उरी नाही
किनाऱ्याची असोशीही खरी नाही ||धृ||
शिडाचे फाटले केव्हाच वाऱ्याशी
सुकाणूचा अबोलाही खलाश्याशी
अढळ तारा दिशेचा अंबरी नाही ||१||
गळाभेटी तशा होतात नेमाने
उचंबळतो निसर्गाच्या प्रभावाने
क्षणिक त्या मीलनाला माधुरी नाही ||२||
कसे विरतात आपोआप हे धागे?
कशा पडतात उत्कट भावना मागे?
उबारा गोठलेल्या अंतरी नाही ||३||
सती जाते कुणी, जातो कुणी फाशी
दिवा ठेवू नका वृंदावनापाशी
इथे फुलतात काटे, मंजिरी नाही ||४||
- मृण्मयी