इलाखा शक्यतांनी किर्र पुढला

इलाखा शक्यतांनी किर्र पुढला
किती गर्भार हा अंधार पडला

किती भरपूर आले चांदणे हे
किती आहे सुना रस्ता गवसला

ढगळ घालून झब्बा डोंगरावर
कुणाची वाट पाहत चंद्र बसला

हवेमध्ये किती धुरके पसरले
पहाटेने जुना डगला बदलला

अमावास्येतल्या चंद्राप्रमाणे
तुझा उल्लेख आहे मी वगळला

खरे तर फाटले काहीच नाही
तुझ्यामाझ्यातला धागा उसवला

जुनी पाटी निखळत्या अक्षरांची
कसा वाचायचा तो काळ मधला

पुन्हा तंद्रीत माझे बोट सुटले
पुन्हा जत्रेमध्ये मुलगा हरवला

मला तर वाटते मी वाट व्हावे
करावे काय मी गाठून मजला

तुझी होणार फिरुनी मूलद्रव्ये
तसा तू 'चित्तरंजन' कोण कुठला


- चित्तरंजन भट