शोध आईकमनचा
"मानवतेला कलंक असलेल्या नरपिशाच्च डॉ. जोसेफ मेंगलला आम्ही पकडू शकलो नाही. पण आम्हाला त्याचा ठावठिकाणा माहीत होता. दूरलक्ष्यवेधी बंदुकीने आम्ही कधीही त्याला मारू शकलो असतो पण मी असे करण्याच्या विरुद्ध होतो. हा काही सूड घेण्याचा विषय नाही. मानवतेच्या अशा नराधम गुन्हेगारांनी न्यायदेवतेच्या समोर उभे राहूनच आपल्या अपराधांचा जबाब द्यायला हवा. " – इति मोसादचा गुप्तचर राफी आयटन.
राफी आयटन
ऍडॉल्फ आईकमनच्या अटकेची कहाणी सुरस आणि रोमांचक खरी, पण त्याहीपेक्षा ती कथा आहे आपल्या जमातीच्या आत्मसन्मानासाठी जंग जंग पछाडणाऱ्या व आपल्या नागरिकांना ताठ मानेने, छाती रुंद करून जगता यावे म्हणून सर्वशक्तिनिशी प्रयत्न करणाऱ्या एका चिमुकल्या नवजात राष्ट्राची, इझ्रायलची.
तरुण ऍडॉल्फ आईकमन
ऍडॉल्फ आईकमन ह्या नराधमाची कथा सुरू होते इ. स. १९३४ मध्ये, जेव्हा त्याची नाझी दल 'SS' च्या ज्यू-संबंधित विभागात नेमणूक झाली. सुरुवातीला ज्यूंचे स्थलांतर केवळ गेटो (मूळ समाजापासून ज्यूंना वेगळे करून ठेवण्यासाठी निर्माण केलेली एक बंदिस्त वसाहत) मध्ये करणे अशी कार्यपद्धती असलेला हा विभाग नंतर त्यांचे स्थलांतर थेट छळछावण्यांत व तेथून मृत्युमुखात करू लागला.
छळछावणी
नवजात अर्भके, आबालवृद्ध ह्यांचा प्रत्यक्ष सैतानालाही लाजवेल असा छळ झाल्यावर सर्व ज्यूंना स्वतःचेच थडगे खोदण्यास भाग पाडले जात असे आणि मग त्यांना रांगेत उभे करून त्यांच्यावर नेमबाजीचा सराव केला जात असे. मात्र ह्यात फार वेळ आणि काडतुसे खर्च होतात असे आढळल्यावर, आईकमनने गॅस चेंबरची योजना मांडली. ज्यात सार्वजनिक स्नानगृहाच्या देखाव्याखाली शेकडो ज्यूंना नग्न करून, त्यांचे मुंडन करून त्यांना विषारी वायूंनी स्नान घातले जाई आणि ते मेल्यावर ज्यू कैद्यांमार्फत त्यांचे तोंड उघडून त्यांचे सोन्याचे दात काढून घेतले जात, रोगराई पसरू नये म्हणून प्रेते भट्टीत जाळली जात आणि केस ब्रश-कारखान्यांना विकले जात.
छळछावणी
नशीबाने आपल्या पुढे काय ताट वाढून ठेवले आहे ते व्यक्त करणारी देहबोली दर्शवणारी, आपल्या लहानग्यांना घेऊन गॅस चेंबरकडे पावले ओढीत चाललेली आई.
अशा रीतीने आईकमनने ६० लाख ज्यूंना ठार केले व तो दुसरे महायुद्ध संपल्यावर उडालेल्या अनागोंदीचा फायदा घेऊन 'रिकार्डो क्लेमंट' असे खोटे नाव घेऊन बेमालूमपणे अर्जेंटिनात राहू लागला. इथे ज्यूंनी अधिकृतपणे नाझीअधमांना शोधायला सुरुवात केली. त्यांत आईकमन, जोसेफ मेंगल व इतर छळछावण्यांशी संबंधित सैतानांची नावे प्रमुख होती. पण जवळ जवळ एक तप त्यांना यश आले नाही.
महायुद्ध संपल्यावर, आरंभी ज्यूंनी पकडून दिलेल्या दोन नाझी गुन्हेगारांना रशियाने सोडून दिले व हे गुन्हेगार रस्त्यांतून हसत हसत मोकाट फिरू लागले. हे पाहिल्यावर मग मात्र ज्यूंनी अशा गुन्हेगारांना थेट यमसदनी पाठवण्यास सुरुवात केली. पण त्यांना मुख्यतः हवे होते आईकमन, जोसेफ मेंगल, हाईनरिश म्यूल आणि मार्टीन बोरमन पण....
आता हा लढा केवळ ज्यूंचा होता. खुद्द जर्मनीने ह्या लोकांच्या विरुद्ध इंटरपोल वॉरंट काढण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर जर्मनी व अमेरिकेने आईकमनचा ठावठिकाणा कळल्यावरही राजकीय स्वार्थापायी ती माहिती इझ्रायलला कळवली नाही. युरोपीय राष्ट्रे आणि रशिया-अमेरिका ह्या बड्या राष्ट्रांचा मानवतेचा कळवळा म्हणजे "नक्राश्रू". मात्र स्वतःच्या बळावर जन्माला आलेले आणि स्वतःच्या जिद्दीवर उभे असलेले इझ्रायल राष्ट्र कोणत्याही भाबड्या विचारात रममाण नव्हते किंवा कोणीतरी आपल्याला न्याय देईल अशी भोळी स्वप्नेही रंगवत नव्हते. त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत.
१९५७ च्या शरद ऋतूत, इझ्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयातील श्री. वॉल्टर एटन ह्यांना आईकमन अर्जेंटिनात कुठेतरी राहात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ती माहिती मोसाद-प्रमुख इस्सेर हारेल ह्याला कळवली. मात्र तोपर्यंत हारेल ह्यांनी आईकमनचे केवळ नावच ऐकलेले होते. ती रात्र हारेल ह्यांनी आईकमनविषयी कागदपत्रे वाचण्यात घालवली आणि सकाळ होता होता ह्या क्रूरकर्मा आईकमनला पकडण्याचा त्यांनी निश्चय केला. ह्या निश्चयात त्यांचे प्रमुख अडथळे होते – अर्जेंटिनातील नाझींचे सहानुभूतिदार धनिक आणि दस्तुरखुद्द अर्जेंटिना सरकार.
रिकार्डो क्लेमंट ह्या नावाचे अर्जेंटिनी ओळखपत्र
सगळ्यात महत्त्वाचे होते ते इझ्रायली सरकारने ह्या मोहिमेच्या राजकीय परिणामांना आणि आर्थिक हानीला ध्यानी घेऊन ह्या योजनेला हिरवा कंदिल दाखवणे. इझ्रायलचे पंतप्रधान बेन गुरीयन ह्यांनी हा जुगार खेळण्याचे ठरवले कारण ही बाब अखिल मानवजातीला न्याय प्रदानाची होती.
कामगिरी सोपी नव्हती. परक्या भूमीवर चुकीच्या माणसाला पकडले असते अथवा आईकमनला पकडताना रक्तपात झाला असता तर जागतिक पातळीवर त्याचे पडसाद उमटणार होते. आईकमनला पकडणे एकवेळ सोपे होते पण त्याला गुप्तपणे इझ्रायलला आणून त्याच्यावर खटला भरणे हे तर आणखी दुरापास्त. पण अवघड गोष्टींना सोपे करण्यासाठी मोसादकडे जादूची चावी होती जिचे नाव होते कठोर परिश्रम!
निव्वळ एका छोट्याश्या धाग्यावरून आईकमनला शोधणे म्हणजे गवताच्या गंजीतून सुई शोधण्यासारखे होते. एकतर त्याने आपली ओळख संपूर्णपणे बदलली होती (अगदी आपल्या काखेत गोंदलेला आपला SS ओळखक्रमांकही ब्लेडने खरवडून टाकला होता) व दुसरे म्हणजे ह्या मोहिमेचा सुगावा आईकमनला, नाझींच्या सहानुभूतिदारांना वा अर्जेंटिना सरकारला लागला असता तर इझ्रायल आईकमनला न्यायपीठासमोर कधीच उभे करू शकले नसते आणि त्यांचे बहुमूल्य गुप्तचर सुद्धा अलगद अर्जेंटिना सरकारच्या ताब्यात गेले असते.
अर्जेंटिनात मोसादने आता आईकमनला शोधायची मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली. तरी म्हणावे तसे यश मिळत नव्हते. एक तर त्यांच्याकडे केवळ आईकमनचे जुने अस्पष्ट फोटो होते आणि आईकमनच्या बोटांचे ठसे पण नव्हते. पण अपयशाला कंटाळून मोसादने प्रयत्न करण्याचे थांबवले नव्हते. एकदा तर मोसाद आईकमनच्या घराजवळ पोहोचली पण त्याने ते घर सोडून कित्येक महिने झाले होते.
दिवस असेच जात होते. सरत्या १९५९ मध्ये मोसादला अचानक घबाड हाती लागले. आईकमनने युद्धोत्तर आपले नाव "रिकार्डो क्लेमंट" असे बदलले होते आणि त्याचा मुलगा कधीकधी आपले खरे आडनाव वापरतो अशी माहिती मोसादला मिळाली आणि मग सुरू झाला रिकार्डो क्लेमंटचा शोध.
लवकरच मोसादच्या गुप्तचरांचा शोध सान फर्नांडो मधील गॅरिबाल्डी मार्गावरच्या एका घरावर येऊन ठेपला. ते रात्रंदिवस त्या घरावर पाळत ठेवू लागले. त्यांनी टिपणे काढली, त्या घराचे चहू अंगांनी फोटो काढले. त्या घरात राहाणारा टकलू, चश्मीस हा आईकमन असू शकेल असे त्यांना वाटत होते पण खात्री नव्हती. भलते धाडस करूनही चालण्यातले नव्हते.
२१ मार्च १९६० - मोसादला आवश्यक तो पुरावा मिळाला. संध्याकाळी कामावरून परतलेला टकलू, चश्मीस हातात पुष्पगुच्छ घेऊन आला. दारातच त्याने तो आपल्या बायकोला दिला. मुलांनी नवे कपडे घातले होते. थोड्याच वेळात त्या घरातून खिदळण्याचे आवाज येऊ लागला. २१ मार्चलाच आईकमनचे लग्न झाले होते. आता तर शंकेला वावच राहिला नाही.
आईकमनच्या अपहरणाची योजना ठरली. मोसादप्रमुख हारेल जातीने अर्जेंटिनात आला. त्यासाठी त्याने ३० सर्वोत्तम, हरहुन्नरी गुप्तहेर काळजीपूर्वक निवडले. त्या ३० जणांतील बहुतांश जणांनी जर्मन छळछावण्यांत आपले आप्त-मित्र गमावले होते.
मे १९६० मध्ये अर्जेंटिना आपल्या स्वातंत्र्याचा १५० वा वर्धापनदिन साजरा करणार होती. त्या दरम्यान अर्जेंटिनात सर्वत्र, विशेषतः विमानतळावर सौजन्याचे वातावरण असणार होते. आईकमनची अर्जेंटिनातून उचलबांगडी करून त्याला इझ्रायलच्या न्यायालयात उभे करण्यासाठी ह्यापेक्षा चांगली संधी कदाचित कधीच मिळाली नसती.
सगळे काही योजनाबद्ध रीतीने घडू लागले. आवश्यक ती सर्व कागदपत्रे उदा. आरोग्य प्रमाणपत्रे, विमान तिकिटे, पारपत्रे, विमा दस्तऐवज, ओळखपत्रे; युरोपातील एका देशातून बनवण्यात आली. मोहिमेत काही अनपेक्षित झाले तर इझ्रायलचा भविष्यातील कोणत्याही घटनेशी प्रत्यक्ष संबंध लावता येणार नाही ह्याची पुरेशी काळजी घेण्यात आली. कारण आईकमनचे अपहरण हा एक प्रकारे अर्जेंटिनाच्या सार्वभौमत्वावरच हल्ला होता. एखाद्या छोट्याश्या चुकीचे रूपांतर विशाल राजकीय स्थित्यंतरात झाले असते. त्यामुळे 'विनाअपघात मोहीम' हे एकच लक्ष्य ठरवले गेले.
मोहिमेच्या प्रत्येक वळणार घडू शकणाऱ्या फेरफारांना आधीच विचारात घेऊन योजना कमालीची निर्दोष बनवण्यात आली. मे महिन्याच्या आरंभास इझ्रायली गुप्तहेर अर्जेंटिनात अर्जेंटिनाच्या स्वातंत्र्याचा १५० वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी (खरेतर आईकमनला पकडण्यासाठी) राजरोस दाखल झाले. आल्यावर त्यांनी वेळोवेळी घरे व वाहने बदलली.