एक दुपार - हरवलेली!
बंगल्याचं फाटक वाजल्याचा आवाज आल्यासरशी चैत्राने लॅपटॉपवरची आपली नजर हटवली व खिडकीचा पडदा दूर सारून बाहेर डोकावून पाहिलं. अपेक्षेप्रमाणे गार्गीची चिमुकली मूर्ती समोरच्या अंगणातून नाचत बागडत आत येत होती. ''बाऽय गार्गी! '' गार्गीला सोडायला आलेल्या रिक्शातल्या दोस्तकंपनीचा आवाज रस्त्यावरच्या इतर वाहनांच्या आवाजात मिसळून गेला. गार्गीचं चिमुकलं दप्तर एका बंदानिशी तिच्या खांद्यावरून खाली लोंबकळत होतं. पाण्याच्या बाटलीला अंगणातील फरशी झाडण्याचं पुण्य प्राप्त झालं होतं. गार्गीचा तो मळका अवतार पाहून चैत्राला हसूच आलं. क्षणभर तिला आपले स्वतःचे शाळेतले दिवस आठवले.
अचानक बाहेर कुठेतरी जोरात हॉर्न वाजला. त्या पाठोपाठ करकचून ब्रेक दाबल्याचा आवाज! त्या आवाजानं चैत्राच्या अंगावर क्षणभर शहारा उमटला. या रस्त्यावरची दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक, वाहती गर्दी, क्षणाक्षणाला कानांवर आदळणारे कर्कश भोंगे, फेरीवाल्यांची वर्दळ.... चैत्राला अनेकदा वाटायचं की जरा शांत भागात घर घ्यावं. पण ही जागा गार्गीच्या शाळेजवळ होती आणि म्हणूनच जास्त सोयीची होती. शिवाय हे घर प्रद्युम्नच्या मामांनी बांधलेलं, त्याच्या अनेक आठवणी या घराशी जोडलेल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघताक्षणी गार्गी आणि चैत्रा या बंगल्याचं अंगण, बाग, गच्चीवरचा झोपाळा यांच्या प्रेमात पडल्या होत्या. खूप खूप आवडलं होतं त्यांना हे सारं!
आताही आपल्या आनंदी फुलपाखराला अंगणातल्या बागेत मजेत रेंगाळताना पाहून चैत्राच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. हसतच तिनं दार उघडून गार्गीला हाक मारली, "एक फुलपाखरू घरी आलेलं आम्ही पाहिलंय बरं का! गरम गरम वरणभात तयार आहे... फुलापानांशी खेळून झालं की आत ये आणि हात-पाय धुतलेस, कपडे बदललेस की मला हाक मार! " गार्गीच्या डोक्यावरचं केसांचं कारंजं होकारार्थी डोललं.
चैत्राने स्वयंपाकघरात जाऊन वरणाचं पातेलं गरम करायला ठेवलं, धुलाईयंत्रातल्या कपड्यांचा ’सेकंड वॉ’श’ सुरू केला आणि जेवणाच्या टेबलपाशी येऊन गार्गीची आवडती ताटली, पाण्याचं भांडं, तुपाचा डबा आणि मिठाचं पाळं मांडलं. गार्गी हात-पाय धुऊन कपडे बदलून येईस्तोवर शेगडीवर वरणाला उकळी आली होती.
कुकरामधल्या गरम गरम भाताची पांढरीशुभ्र मूद, त्यावर पिवळंधमक वरण, साजूक तुपाची धार आणि गार्गीच्या भाषेतलं ''चुळ्ळं'' लिंबू. सगळं पान वाढेपर्यंत गार्गी कपडे बदलून आली होती. फ्रॉकची बटणं जरा वर-खाली झाली होती इतकंच! पण चैत्राने काही सेकंदात ती बटणं सारखी केली.
मग पुढचा अर्धा तास गार्गीचा वरण-भाताचा रवंथ करत शाळेत आज काय झालं, कोण काय म्हणालं, बाई कोणाला रागावल्या आणि रिक्षावाल्या काकांनी आज कोणता पी. जे. सांगितला याबद्दलच्या इत्थंभूत कथाकथनाचा कार्यक्रम पार पडला.
''गार्गी, असा पाय हलवतात का जेवताना? शांत जेव बघू! ''
''बेटा, पाणी जरा सावकाश प्यावं गं! मग कोणाला ठसका लागतो? ''
''हे बघ, पानात वाढलेलं सगळं संपवल्याशिवाय मी टी. व्ही. लावू देणार नाहीये! ''
माय-लेकींमधले नेहमीचेच संवाद!
गार्गीचं जेवण आटपेपर्यंत चैत्राने स्वयंपाकघर आवरून घेतलं होतं. जेवण झाल्या झाल्या बाईसाहेब बाहेरच्या खोलीत टी. व्ही. वर कार्टून चॅनल लावून बसल्या. तोवर चैत्राने गार्गीचं दप्तर उघडून आज बाईंनी गृहपाठाच्या वहीत काय नोंद केली आहे ते पाहायला सुरुवात केली.
''गार्गी, अगं किती तो कचरा! काय काय जमा करून आणतेस गं शाळेतून? आँ? आणि हे पुस्तक असं दुमडलं कसं गेलं? ''
गार्गीकडून फक्त एक हुंकार.
चैत्राने गृहपाठाबद्दल आणखी काहीतरी विचारलं, पण गार्गीचं सारं लक्ष टी. व्ही. वरच्या कार्टूनच्या करामतींकडे! शेवटी चैत्रानं गार्गीचं दप्तर बाजूला ठेवून दिलं आणि लॅपटॉपवरचं आपलं अर्धवट राहिलेलं काम संपवायला ती आतल्या खोलीत गेली.
सहा महिन्यांपूर्वी या बंगल्यात रहायला आल्यापासून आणि गार्गीची नवी शाळा सुरू झाल्यापासून चैत्राचा हाच दिनक्रम जवळपास ठरून गेला होता. एकुलत्या एका मुलीला आपल्या नोकरीपायी पाळणाघरात ठेवायला चैत्राचं मन तयार नव्हतं. प्रद्युम्नची नोकरी फिरतीची. महिन्यातील दोन-तीन आठवडे तरी तो शहराबाहेर असायचा. मग अशा वेळी आपल्या लेकीला एकटं वाटू नये, तिच्याकडे दुर्लक्ष होऊ नये, तिचं बालपण आपल्याला समरसून अनुभवता यावं म्हणून चैत्रानं घरून काम करायचा निर्णय बऱ्याच विचाराअंती घेतला होता. पैसे तुलनेने कमी मिळत होते. पण मुलीपाशी राहण्याच्या, तिच्या बाललीला अनुभवण्याच्या आनंदापुढे चैत्राला सध्या नोकरी, करियर यांचे विचार कमी महत्त्वाचे वाटत होते.
''ढिंकचिका ढिंकचिका ढिंकचिका ढिंकचिका रे.... ए ए ए '' टी. व्ही. तून येणारा गाण्याचा आवाज ऐकून चैत्रा तरातरा बाहेरच्या खोलीत आली. गार्गी फिल्मी गाण्यांचा चॅनल लावून सलमान खान आणि असीनच्या जोडीची नक्कल करत टी. व्ही. समोर नाच करत होती.
''ए पिटक्या, काय चाललंय तुझं? तू कार्टून बघत होतीस ना? मधूनच हे गाणं कुठून आलं? ''
''मम्मा, दोनच मिनिटं... '' गार्गी कंबर हालवत ठेका धरत उद्गारली.
''एकतर कार्टून चॅनल, नाहीतर मग टी. व्ही. बंद! ''
''ऑ, अस्सं काय ग्गं मम्मा.... ''
दोघींचा सुखसंवाद रंगायच्या अगोदरच दाराची बेल वाजली. गार्गीने पळत जाऊन संरक्षक साखळी लावून दरवाजा किलकिला उघडला. बाहेर रश्मी, गार्गीची कॉलनीमधील मैत्रीण हातात गोष्टीचं पुस्तक घट्ट धरून उभी होती.
''मम्मा, रश्मी आली आहे! उघडू ना दरवाजा? ''
''हं उघड! ''
रश्मी आत आल्यासरशी गार्गीने तिच्या हातातील पुस्तकावर झडपच घातली. चैत्राच्या ''अगं, तिला आत तर येऊ देशील! '' कडे दोघींनीही दुर्लक्ष केलं. आता तर गार्गीच्या अभ्यासाला पुढचा तासभर तरी वेळ मिळण्याची आशा पुरती मावळली होती. चैत्रानं निमूटपणे रश्मीला पाणी आणि एका वाटीत थोडा खाऊ आणून दिला. बाहेरचं फाटक आणि दरवाजा नीट लावल्याची खात्री केली आणि दोघींना फार दंगा न करता खेळायची ताकीद देऊन परत आपल्या लॅपटॉपसमोर बैठक मारून बसली.
तासभारानं तिनं दोघींना खेळाचा पसारा आवरायला सांगितल्यावर गार्गीने चेहरा एवढासा केला. पण रश्मी मात्र शहाण्या मुलीसारखी फ्रॉक झटकत उठली.
''ए गार्गी, मी जाते आता. मला अभ्यास करायचाय! नाहीतर शाळेत बाई रागावतील. '' रश्मी गार्गीपेक्षा दोन वर्षांनी मोठी होती. त्यामुळे शहाण्यासारखे वागायचीही जबाबदारी तिच्यावरच होती ना!
''मम्मा, मी रश्मीला तिच्या घरी सोडायला जाऊ? त्यांनी नवा गोल्डफिश आणलाय! '' गार्गीचा लाडिक हट्ट!
''तुझा गृहपाठ कधी करणार मग तू? ''
''आल्यावर करेन ना मी! प्रॉमिस!! ''
आपली लेक तो गोल्डफिश पाहिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे ओळखून चैत्राने सुस्कारा सोडला आणि गार्गीला अर्ध्या तासाच्या आत घरी परत येण्याच्या अटीवर रश्मीच्या घरी जायची परवानगी दिली.
तिने हो म्हणायचा अवकाश, की गार्गी पायात चपला अडकवून रश्मीसोबत दाराबाहेरही पडली होती. त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तींकडे बघत चैत्राने हाक मारली, ''गार्गीऽऽ... ''
''आता काय मम्मा? ''
''नीट जा गं रस्त्यानं... की मी येऊ सोडायला? ''
''मी जाईन ना नीट! ''
गार्गी आणि रश्मी गेल्यावर गेले तास-दोन तास चैतन्यानं भरलेलं घर पुन्हा एकदा शांत झालं.
आयपॉडवर गाणी लावून चैत्रा पुन्हा एकदा लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसली. अचानक तिचं लक्ष घड्याळाकडे गेलं. गार्गी जाऊन एक तास कधीच उलटून गेला होता. घाईघाईत तिने रश्मीच्या घरचा फोन लावला. फोनवर रश्मीची आजी होती.
''हॅलो, आजी, गार्गीला घरी पाठवाल का प्लीज? उद्या सकाळची शाळा आहे! ''
''अहो, अर्ध्या तासापूर्वीच गेली गार्गी! आमच्या रश्मीशी तिला खेळायचं होतं अजून! पण रश्मी म्हणाली की तिचा गृहपाठ राहिलाय. घरी नाही का आली ती? ''
''नाही हो. मी इथंच आहे घरी. तुमच्याकडून निघाली का ती? बरं, मी बघते इथं रस्त्यावर. नाहीतर इथंच बाहेर अंगणात गुपचूप खेळत बसली असेल ती! '' फोनवर बोलता बोलता चैत्रानं मोबाईल, पर्स व बंगल्याच्या चाव्या हातात घेतल्या होत्या.