अफानासी निकीतिनचा हिंदुस्थान

मॉस्कोच्या उत्तर-पश्चिमेस सुमारे १८० किमी अंतरावर त्व्येर नावाचे वोल्गा नदीच्या काठावरचे एक जुने रशियन शहर आहे. तिसऱ्या इवानच्या नेतृत्वाखाली रशियाचे एकीकरण होण्याआधी त्व्येरचा प्रान्त मॉस्कोपासून स्वतंत्र होता. त्या काळात अफानासी निकीतीन नावाचा त्व्येरचा एक व्यापारी वोल्गा नदीतून कास्पियन समुद्र, तेथून इराणचे आखात आणि नंतर अरबी समुद्र असा प्रवास करत व्यापार करण्याच्या हेतूने हिंदुस्थानात पोहोचला आणि इ. स. १४७१ च्या मध्यापासून ते इ. स. १४७४ च्या प्रारंभापर्यंत सुमारे अडीच-तीन वर्षे त्याचे वास्तव्य बहामनी राज्याची तत्कालीन राजधानी बिदर आणि आसपासचा प्रदेश येथे होते. इ. स. १४६८ ते इ. स. १४७४ हा त्याच्या एकूण प्रवासाचा काळ. परतीच्या प्रवासात रशियात त्व्येरला पोहोचण्याअगोदरच स्मोलेन्स्कमध्ये त्याचा मृत्यू झाला. हिंदुस्थानात येऊन गेल्याचे माहीत असणाऱ्यांपैकी तो पहिला रशियन. ह्या गोष्टीच्या स्मरणार्थ त्व्येरमध्ये त्याचा एक पुतळा उभारण्यात आला आहे.

क्रांतीनंतर त्व्येरचे नाव बदलून ’कालीनीन’ असे करण्यात आले होते पण आता पुन्हा जुनेच नाव अधिकृत झाले आहे.

आपल्या प्रवासाचे आणि हिंदुस्थानातील वास्तव्याचे वर्णन निकीतिनने लिहून ठेवले आहे आणि ’Хождение за три моря’ म्हणजेच ’तीन समुद्रांपलीकडला प्रवास’ अशा नावाने ते टिकून राहून आपल्यापर्यंत पोहोचले आहे. अरबस्तान - तुर्कस्तान - मध्य आशिया हे भाग सोडले तर त्यापलीकडील अन्य दूरच्या प्रदेशातून हिंदुस्थानात आलेला अफानासी जवळजवळ पहिल्या-वहिल्या प्रवाशांपैकी एक आहे. बहामनी राज्याच्या आणि विजयानगरच्याही भरभराटीच्या दिवसातील हिंदुस्थानचा आरसा म्हणून हा वृत्तान्त वेधक आहे. त्याच्या प्रवासवर्णनापैकी हिंदुस्थानशी संबंधित भागाचे रशियनवरून केलेले संक्षिप्त भाषांतर ह्यापुढे देत आहे. ह्या प्रवासवर्णनापैकी निकीतीन हिंदुस्थानात पोहोचण्याआधी आणि नंतरचा भाग विस्तारभयास्तव मी येथे वगळला आहे. तसेच हिंदुस्थानशी संबंधित भागातूनही पुनरावृत्ती असलेले भाग आणि अन्य काही अप्रस्तुत भाग - उदाहरणार्थ आपण आपल्या धर्माचे पालन नीट करू शकत नसण्याबाबतचे वारंवार येणारे उद्गार - हेही मी वगळलेले आहेत.

निकीतिनच्या बिदरमधील मुक्कामाच्या दिवसांत दुसरा मुहम्मद शाह हा बहामनी सुलतान होता. बहामनी राज्याचा कर्तबगार दिवाण महमुद गावान हाही त्यावर्षांमध्ये तेथेच होता. त्यांच्या ऐश्वर्याची अनेक वर्णने निकीतिनच्या वृत्तांतात आहेत.

अनेक अडचणी आणि धोक्याच्या प्रसंगांमधून पार पडून १४७१ च्या ईस्टरच्या थोडा आधी, मार्चच्या सुमारास तो ’हिंदुस्तानच्या समुद्रा’तील होर्मुझ बंदराला पोहोचला. येथील हवा त्याला फार गरम वाटली. तेथे महिनाभर मुक्काम करून काही घोडयांसह ’दाव’मध्ये (दुवा क्र. १ - शिडाचे अरबी जहाज) बसून निघाला. १० दिवसांच्या सफरीनंतर तो मस्कतला पोहोचला आणि तेथून गुजरात, गुजरातहून खंबायत ( ’येथे कापडाला द्यायचे रंग आणि लाख तयार होते’ असे तो लिहितो) आणि खंबायतहून चौल. 'दाव'ला येथे पोहोचायला एकूण सहा आठवडे लागले आणि ईस्टरनंतर सातव्या आठवडयात तो चौलच्या बंदरात उतरला.

त्याचे प्रवासवर्णन वाचून असे जाणवते की निकीतिन हा एक सर्वसामान्य छोटा व्यापारी होता. कोणत्या कारणाने आपल्या मातृभूमीपासून इतका दूरचा, धोकादायक आणि जवळजवळ अज्ञात प्रदेशातला हा प्रवास त्याने अंगावर घेतला हे त्याने लिहून ठेवलेले नाही. तसेच कोण्या एका विशिष्ट वस्तूच्या व्यापाराची त्याला खास जाण होती किंवा त्यात रस होता असेही दिसत नाही. प्रत्यक्ष पार पडलेल्या एकाच व्यवहाराचा उल्लेख ह्या वर्णनात आहे - तो म्हणजे त्याने हिंदुस्थानात आणलेला एक घोडा बिदरमध्ये विकला. चांगले घोडे ही हिंदुस्थानची एक प्रमुख आयात असे आणि तसाच काही व्यापार निकीतिनच्या मनात असावा असे वाटते. बाकी २-२॥ वर्षांत त्याने हिंदुस्थानात काय केले आणि त्याची उपजीविका कशी चाले ह्याबाबत तो काहीच लिहीत नाही.

निकीतीन हा पैसेवाला नव्हता तसाच कोणी विशेष शिक्षण घेतलेलाही नव्हता हे त्याच्या लिखाणाच्या साधेपणावरून कळते. ह्यात वरच्या पातळीवरील कोणत्याही राजकीय उलाढालींचे वर्णन नाही. त्याचा वावरही सर्वसामान्य आणि खालच्या दर्जाच्या सामाजिक स्तरावरील लोकांमध्येच झालेला दिसतो. त्यामुळे हिंदू धर्म आणि चालीरीतींविषयक त्याने केलेले वर्णन अतिशय वरवरचे आणि कधीकधी चुकीचेही आहे.

त्याच्या ह्या काहीशा साध्यासरळ वर्णनातून प्रकर्षाने दिसणारी गोष्ट म्हणजे सत्ताधारी व्यक्तींचा डामडौल आणि भपका, आणि त्याच्या तुलनेने सर्वसामान्यांचे दरिद्री जीवन. सुलतान आणि त्याचे वजीर हे जरीच्या आणि हिऱ्यामाणकांनी लगडलेल्या कपडयांत वावरत असताना आसपासची बहुतेक प्रजा मात्र अनवाणी आणि अर्धनग्न आहे. वीस भोयांनी उचललेल्या चांदीसोन्याच्या पालखीतून सुलतान हिंडत असताना त्याच्या पालखीपुढे चालणाऱ्या चाकरांच्या पायात काहीच नाही. आसपासच्या राजांशी सतत लढाया लढण्यासाठी हजारो घोडेस्वार आणि हत्ती ठेवलेले आहेत, पण सामान्य मनुष्याला जेवायला खिचडीशिवाय काहीच नाही.

ध्यानात येणारी दुसरी गोष्ट म्हणजे परक्या भागातून आलेल्या सत्ताधीशांच्या समोर एतद्देशीयांची दीनवाणी अवस्था. निकीतिनच्या मते बिदरमधील सर्व महत्त्वाचे लोक ’खोरासानी’ आहेत आणि हिंदू प्रजा पालख्या वाहणे, छत्रे धरणे, फारतर लढाईत पायी सैनिक म्हणून मरणे एवढेच करताना दिसते.

येथील हिंदू प्रजेकडे निकीतिन मुसलमानी चष्म्यातून पाहताना दिसतो. हिंदू धर्मीयांच्या सर्व मूर्तींना तो ’बुत’ (अरबीभाषेतील ’मूर्ती’ अशा अर्थाचा शब्द - मूर्तिभंजक म्हणजे बुतशिकन) असे संबोधतो आणि देवळांना बुतखाना! सर्व हिंदूंना तो ’काफिर’ असे संबोधतो. हिंदुस्थानामध्ये तो ’खोजा युसुफ खोरासानी’ ह्या नावाने वावरला असावा असे त्याच्या काही उल्लेखांवरून वाटते. मात्र आपण मुसलमान वा ’बेसराबियन’ नाही हेही तो ठिकठिकाणी बजावून सांगतो. एकंदरच हिंदू प्रजेबद्दल त्याला विशेष आत्मीयता वाटताना दिसत नाही. येथील लोकांमध्ये दयाळूपणा नाही, ते खोटेपणाने काम करतात, स्त्रिया सर्रास देहविक्रय करतात आणि स्वस्तात मिळतात अशा प्रकारची मते त्याने ठिकठिकाणी नोंदविली आहेत. ज्या सामाजिक स्तरात तो वावरला त्यावरून त्याने अशी मते करून घेतली असावीत. त्यामुळे हिंदुस्थानाचा worm's-eye view असे नाव ह्या प्रवासवर्णनाला देता येईल.

१९५७ साली ’भारत-रूसी भाईभाई’ चे वारे जोरात वाहत असताना निकीतिनच्या ह्या प्रवासावर बेतलेला ’परदेसी’ नावाचा एक चित्रपट दोन्ही देशांतील नट आणि दिग्दर्शक-तंत्रज्ञ वापरून हिंदी आणि रशियन अशा दोन भाषांत तयार करण्यात आला होता. के. ए. अब्बास ह्यांचा ’नया संसार’ आणि रशियन सरकारचे अंग ’मॉस्फिल्म’ ह्यांचा हा संयुक्त प्रकल्प होता. हिंदी सिनेमा त्यावेळेस मी पाहिला नव्हता पण रशियन आवृत्ती नुकतीच मला जालावर सापडली. भारत-रशिया जवळिकीमुळे निकीतिनचे परखड वर्णन त्या चित्रपटात दाखवले जाणे शक्यच नव्हते पण चित्रपट त्याच्या पार पलीकडे पोहोचला आहे. ही एक चक्क प्रेमकहाणी करून टाकलेली आहे. निकीतिन आणि चंपा (नर्गिस) ह्यांच्यातील प्रेमकहाणी. बरोबर आधाराला निकीतिनचा हिंदी मित्र सखाराम (बलराज सहानी) आणि चंपाची सखी लक्ष्मी (पद्मिनी). अन्य नटवर्ग म्हणजे महमूद गावान (पृथ्वीराज कपूर), चंपाचे वडील (मनमोहन कृष्ण) आणि आई (अचला सचदेव). नटवर्गाच्या नावांवरूनच गोष्टीचा चांगला अंदाज येतो. निकीतिनचे सगळे हिंदुस्थानी अर्धनग्न आणि अर्धभुकेले आहेत. सिनेमात मात्र सर्व स्त्रिया इरकली टोपपदर, पुरुष अंगभर अंगरखे घालून शेतात मजेने गाणी म्हणताना आढळतात, उदा. "रिमिझिमी बरसे पानी आज मोरे अंगना" - चंपा. चित्रपटाच्या अखेरीस जहाजावर चढलेल्या निकीतिनला सखाराम "फिर मिलेंगे जानेवाले द स्विदानिया"असे गाणे म्हणत निरोप देतो.

ह्या प्रास्ताविकानंतर निकीतीन चौल बंदरात उतरल्यापासून त्याच्या वर्णनाचा धागा आता पकडू. (कंसांमधील शब्द मी स्पष्टीकरणासाठी घातलेले आहेत. )